परमेश्वर / सोमेश्वर मंदिर

होट्टल, ता. देगलूर, जि. नांदेड

प्राचीन शिल्पकलेचा समृद्ध वारसा जपणाऱ्या स्थानांमध्ये देगलूर तालुक्यातील होट्टल गावचे विशेष महत्त्व आहे. येथील मंदिरांच्या भिंती आणि खांबांवर कोरलेली शिल्पे त्यांच्या जिवंतपणामुळे आपल्याशी संवाद साधतात, असाच भास होतो. चालुक्य सम्राट विक्रमादित्य (सहावा) याने या गावाला उपराजधानीचा दर्जा दिला होता. चालुक्य राजांनी येथे अनेक भव्य मंदिरांची उभारणी केली. सिद्धेश्वर महादेव व पार्वती मंदिर या मंदिरांसोबतच गावातील परमेश्वर आणि सोमेश्वर ही मंदिरे देखील शिल्पकलेचे उत्कृष्ट नमुने आहेत. दुर्दैवाने, काळाच्या ओघात यापैकी सोमेश्वर मंदिराचे महत्त्व काहीसे झाकोळले गेले असले, तरी आजही ही मंदिरे आपल्या गतवैभवाची साक्ष देत येथे उभी आहेत.

होट्टल येथील परमेश्वर मंदिर अकराशे वर्षांपूर्वीचे असल्याचे येथील शिलालेखांवरून सिद्ध होते. अकराव्या शतकात बदामीच्या चालुक्यांची मराठवाडा व कन्नड भागात सत्ता होती. त्यांचे मांडलिक राजे वन्हीकुळातील राजांची ‘पोटल’ म्हणजेच होट्टल ही राजधानी होती. चालुक्य सम्राट विक्रमादित्य सहावा याने हे मंदिर बांधून मंदिरांच्या अंग, रंग व भोगासाठी काही गावे दान दिल्याचे उल्लेख येथे सापडलेल्या शिलालेखात आहेत. हे शिलालेख व मंदिरावरील शिल्पसौंदर्य मंदिराचे प्राचीनत्व सिद्ध करण्यासाठी पुरेसे ठरतात.

मंदिरासमोर दोन चौकोनी चौथरे व त्यावर वर निमुळते होत गेलेले दीपस्तंभ आहेत. खुला मंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी रचना असलेले मंदिर ५४ फूट लांब व २५ फूट रुंद असून ते तीन फूट उंच अधिष्ठानावर आहे. मंदिरापुढे दगडी फरसबंदी असलेला खुला मंडप आहे. त्यापुढे अर्धखुल्या स्वरूपाच्या सभामंडपात प्रत्येकी तीन नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. स्तंभदंडाचा खालील सुमारे तीन फूट भाग चौकोनी आहे व त्यावरील भाग चौकोनी, गोलाकार, षटकोनी, अष्टकोनी अशा विविध भौमितिक आकारांत आहे. शीर्षभागी वर्तुळाकार कणी व त्यावर हस्त आहेत. अष्टकोनी वितानावर चक्राकार नक्षी व त्यात पाषाणी झुंबर आहेत. स्तंभदंडातील चौकोनी पटावर विविध आकाराची नक्षी, कीर्तिमुखे व काही पौराणिक प्रसंग कोरलेले आहेत. हस्त व तुळईवर विविध आकारातील नक्षी कोरलेल्या आहेत. सभामंडपात मध्यभागी नंदीची मूर्ती आहे. नंदीजवळ लहान-मोठ्या आकारातील अनेक शिवपिंडी व काही पादुका शिल्पे आहेत.

मंदिराच्या अंतराळाच्या दर्शनी भिंतीजवळ प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस गणेशाची काळ्या पाषाणातील चतुर्भुज मूर्ती व समोर शिवपिंडी आहे. उजव्या बाजूला मारुतीची द्विभुज मूर्ती आहे. या मूर्तीच्या एका हातात गदा व दुसऱ्या हातात पर्वत उचलला आहे. अंतराळाच्या द्वारशाखांवर खालील भागावर गंगा-यमुना व द्वारपाल शिल्पे आहेत. द्वारपालांच्या अंगावर वस्त्रे व अलंकार आणि डोक्यावरील मुकुटात रत्ने कोरलेली आहेत. हातात विविध शस्त्रे आहेत. द्वारपाल शिल्पांच्या शीर्षभागी पर्णपुष्पलता नक्षी आहेत. प्रवेशद्वारास वेलबुट्टीशाखा, पुष्पशाखा व स्तंभशाखा आहेत. ललाटबिंबावर गजलक्ष्मी शिल्प व ललाटपट्टीवर पुष्पलता नक्षी आहेत. प्रवेशद्वारावरील उत्तरांगावर शिखरशिल्प नक्षी आहे. मंदिराचे बंदिस्त अंतराळ अरुंद असून पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारास असलेल्या स्तंभशाखांवर विविध भौमितिक आकृत्या व पानफुलांच्या नक्षी आहेत. गर्भगृहात वज्रपीठावर परमेश्वराची मांडी घालून बसलेली योगमुद्रेतील चतुर्भुज मूर्ती आहे. मूर्तीच्या मागील दोन हातांत शंख व चक्र आहेत आणि पुढील दोन हात एकात एक गुंफलेले आहेत. मूर्तीच्या मागील पाठशिेळेवर वरील बाजूस पंचपिंडी शिल्पे आहेत. मूर्तीसमोर छताला पितळी घंटा टांगलेल्या आहेत. अंतराळात व गर्भगृहाच्या भिंतीत असलेल्या स्तंभांवर विविध नक्षी आणि वितानावर चक्राकार नक्षी आहेत. मंदिराच्या बाह्य बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. मंदिराच्या छतावर चोहोबाजूंनी उतरता सज्जा व कठडा आहे.

मंदिरात महाशिवरात्री व श्रावणातील सर्व सोमवारी विशेष उत्सव साजरे केले जातात. उत्सव काळात मंदिरात महाअभिषेक, आरतीसहित देवाची सालंकृत पूजा केली जाते. पौष मासातील शेवटच्या सोमवारी बुट्टीयात्रा साजरी केली जाते. यावेळी भाविक बांबूच्या टोपलीत पुरणपोळ्या आणून देवास नैवेद्य अर्पण करतात व गरिबांना अन्नदान करतात. यात्रेदरम्यान हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी येथे येतात.

या मंदिरापासून साधारण ५०० मीटर अंतरावर सोमेश्वर मंदिर आहे. मुखमंडप, सभामंडप व तीन गर्भगृहे असे या मंदिराचे स्वरूप आहे. मूलतः हे ब्रह्मा, विष्णू व महेश यांचे मंदिर असल्याचे सांगितले जाते. सद्यस्थितीत सुमारे १०० चौरस फूट आकारमानाच्या या मंदिराच्या मुखमंडपाच्या छताचा बराचसा भाग कोसळला आहे. सभामंडपात मध्यभागी चार नक्षीदार चौकोनी स्तंभांच्या मधे रंगशिळा आहे. स्तंभदंडात विविध भौमितिक आकार असून स्तंभांच्या चौकोनी पटावर संयुक्त नक्षी आहेत. तिन्ही गर्भगृहांसमोर प्रत्येकी दोन नक्षीदार स्तंभ आहेत. येथील सर्व स्तंभ चौकोनी स्तंभपादावर उभे आहेत स्तंभदंडात चौकोन, षटकोन, अष्टकोन, वर्तुळ असे विविध भौमितिक आकार आहेत. मुख्य गर्भगृहात शिवपिंडी आहे. डाव्या व उजव्या बाजूच्या गर्भगृहांमध्ये सध्या कोणत्याही मूर्ती नाहीत. हे मंदिर भग्नावस्थेत असले तरी मंडोवरावरील सूर्य, विष्णू व नृसिंह यांच्या मूर्ती स्पष्ट व सुस्थितीत आहेत

उपयुक्त माहिती:

  • देगलूर येथून ९ किमी अंतरावर
  • नांदेड येथून ९० किमी अंतरावर
  • देगलूरसह नांदेडमधील अनेक शहरांतून होट्टलसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवासाची सुविधा नाही
  • संपर्क : शेषराव सूर्यवंशी, मो. ९०२१७१४६९९

भगवान / सोमेश्वर मंदिर होटल, ता. डेगलूर, जिला. नांदेड़

Back To Home