कोल्हापूरमधील पन्हाळा किल्ल्याशी अनेक ऐतिहासिक घटना–घडामोडींप्रमाणेच अनेक पौराणिक कथाही निगडित आहेत. त्याच प्रमाणे सांगली जिल्ह्यातील जुना पन्हाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरलिंग डोंगराशीही अनेक पौराणिक कथांचे सहचर्य आहे. कुकटोळी येथील या डोंगरावर महादेवाचे एक प्राचीन मंदिर आहे. डोंगरावरील महादेव या अर्थाने त्यास गिरीलिंगेश्वर महादेव म्हणून ओळखले जाते. हे स्थान नाथ संप्रदायाचे एक केंद्रही मानले जाते. त्याच प्रमाणे येथे वसिष्ठ ऋषींचे नातू आणि महर्षि व्यासांचे पिता पराशर ऋषी यांचे समाधीस्थानही आहे.
सांगली, सातारा, कोल्हापूर आदी प्रदेशास प्राचीन काळी कुंतल असे म्हटले जात असे. या कुंतलदेशात पराशर ऋषींचे वास्तव्य होते, अशी आख्यायिका आहे. ‘करवीर माहात्म्या’तील उल्लेखानुसार कोल्हापूरमधील पन्हाळा किल्ल्यावर पराशर ऋषी पत्नी सत्यवती व शिष्यगणांसह राहात असत. पराशरांच्या तपामुळे पाताळलोक तप्त झाला. तेव्हा तेथील नागांनी त्यांचा तपोभंग करण्याचे प्रयत्न केले. त्याने संतप्त झालेल्या पराशरांनी गारुडिक मंत्रांनी भारलेले दर्भ सोडून अनेक नाग मारले. उरलेले त्यांना शरण आले. तेव्हा पराशरांनी त्यांना अभय देऊन हे स्थान तुमच्या नावाने ओळखले जाईल, असे सांगितले व त्या स्थानास पन्नगालय म्हणजे नागांचे आलय असे नाव दिले. त्याचेच पुढे पर्नालक झाले व त्यातून पन्हाळा नाव आले अशी कथा आहे.
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील नरसिंहपूर (कोळे) येथेही पराशरांचे वास्तव्य होते. येथेच कृष्णातीरी त्यांनी भगवान नरसिंहाची तपस्या केली होती. पन्हाळ्याप्रमाणेच जुना पन्हाळा म्हणजे गिरलिंग डोंगरावरही पराशर ऋषींचा आश्रम होता व या ठिकाणी त्यांनी समाधी घेतली, असे सांगण्यात येते. याच गिरलिंग डोंगरावर गिरलिंगेश्वर महादेवाचे स्थान आहे.
डोंगरात कपारीत आसलेल्या या मंदिराचे हेमाडपंथी स्थापत्य शैलीतील बांधकाम सुमारे बाराव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. या काळात या परिसरात शिलाहार राजांची सत्ता होती. डोंगरांच्या पायथ्यापासून डोंगर माथ्यावर असलेल्या मंदिरापर्यंत कच्चा रस्ता आहे. रस्त्यावरून खाजगी वाहनाने मंदिरासमोर असलेल्या वाहनतळापर्यंत येता येते. मंदिराच्या प्रांगणात विविध वृक्ष व काही प्राचीन समाधीस्थळे आहेत. यातील एक समाधी पराशर ऋषींची असल्याचे सांगितले जाते. या प्रांगणात पाण्याचा हौद आहे.
सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपाच्या कमानी आकारातील प्रवेशद्वारावर फणाधारी नागाचे शिल्प आहे. सभामंडपात १४ नक्षीदार स्तंभ आहेत. चौकोनी स्तंभपादावर उभे स्तंभ चौकोन, षट्कोन, अष्टकोन, वर्तुळ अशा विविध भौमितिक आकारात आहेत. स्तंभांच्या शीर्षभागी कणी व त्यावर हस्त आहेत. हस्तांवर तुळई व तुळईवर छत आहे. छताला पितळी घंटा टांगलेल्या आहेत. अर्धखुल्या सभामंडपात भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. सभामंडातील बाह्य बाजूचे स्तंभ भिंतीत व कक्षासनात आहेत. सभामंडपात अंतराळाच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला देवकोष्टकात नागयुगल शिल्प आहे. तेथील वातायनालगत मारुतीची मूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला वातायनालगत महिषासुरमर्दिनीची मूर्ती व त्या पुढील देवकोष्टकात शिवपिंडी आहे.
अंतराळाच्या प्रवेशद्वारास पाच द्वारशाखा आहेत. पहिल्या व शेवटच्या प्रत्येकी दोन द्वारशाखांवर वेलबुट्टी नक्षी व मधल्या द्वारशाखेवर स्तंभनक्षी आहेत. ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती व त्यावरील तोरणात फुले व शिखर नक्षी आहे. मंडारकास चंद्रशीला व त्याशेजारी दोन्ही बाजूस कमळ फुलांची नक्षी आहे.
अंतराळातील चार स्तंभ हे डोंगर कपारीत जांभ्या दगडात कोरलेले आहेत. अलिकडील काळात त्यांना सिमेंटचा गिलावा केल्याचे दिसते. अंतराळात मध्यभागी चौथऱ्यावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. अंतराळाच्या भिंतीत दीपकोष्ठके आहेत व येथे हवा खेळती राहण्यासाठी गवाक्षे आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारातूनच भाविकांना गिरीलिंगेश्वराचे दर्शन घ्यावे लागते. गर्भगृहाच्या द्वारशाखांवर वेलबुट्टी नक्षी आहे. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी चौकोनी शाळूंका असलेली मोठी शिवपिंडी आहे व त्यावर छत्र धरलेला पितळी नाग आहे.
मंदिराच्या छतावर चौकोनी उतरत्या पायरीचे पिरॅमिडसारखे शिखर आहे. शिखरात शीर्षभागी एकावर एक असे दोन आमलक, त्यावर कळस व ध्वजपताका आहेत. मंदिराच्या दोन्ही बाजूने मागील विस्तीर्ण पठारावर जाण्यासाठी डोंगरात खोदलेल्या पंधरा पायऱ्या आहेत. पठाराच्या मागील बाजूला डोंगरकड्यात तिघई लेणी आहेत. तेथेही शिवलिंग आहे व त्याची स्थापना बाराशे वर्षांपूर्वी करण्यात आल्याचे सांगण्यात येते. श्रावणातील दुसऱ्या सोमवारी मंदिराचा मुख्य जत्रोत्सव व महाशिवरात्र हा सात दिवसांचा वार्षिक उत्सव साजरा केला जातो. दोन्ही उत्सवांच्या वेळी हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येथे येतात. सर्व उत्सवांच्यावेळी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. मंदिरात दर सोमवारी, गुरुवारी, पौर्णिमा व अमावस्या या दिवशी विशेष गर्दी असते.