‘वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे’ असे संत तुकाराम महाराजांनी म्हटलेले आहे. हिंदू धर्मात औदुंबरासारख्या झाडांना दैवत्व दिलेले आहे. सांगेली या गावात तर त्याही पुढे जाऊन मंदिरातच झाडाच्या खोडाची गिरिजानाथ देव म्हणून पूजा केली जाते. सुमारे ३५० वर्षांच्या परंपरेमुळे सावंतवाडी तालुक्यातील सांगेली हे गाव प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी नव्याने गर्भगृहात फणसाच्या खोडस्वरूपातील मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना करण्यात येते. यावेळी संपूर्ण गर्भगृह बाजूला केले जाते. त्यात नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करून जुनी मूर्ती तेथून काढली जाते. या मंदिराच्या बांधकामाची रचना त्यादृष्टीने सोयीस्कर अशी केलेली आहे.
सांगेली-सनामटेंब येथील देव गिरिजानाथ हा माहेरवाशिणींसह महिलांचा पाठीराखा आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. गिरिजा हे पार्वतीचे नाव आहे. गिरिजा म्हणजे गिरीमध्ये जन्मलेली. या गिरिजेचा नाथ म्हणजे शंकर. त्यामुळे नावावरून हे मंदिर शैव असले, तरी येथील गिरिजानाथ ही मूळची लोकदेवता आहे. येथे ती गिरोबा या लाडक्या नावाने ग्रामदैवत म्हणून पूजली जाते. एरवी अनेक मंदिरांमध्ये पाषाणाची वा पाषाणात वा काष्ठात कोरलेल्या मूर्तींची पूजा केली जाते. येथील मंदिरामध्ये गिरोबा हा फणसाच्या झाडाच्या बुंध्याच्या स्वरूपात प्रतिष्ठापित केला जातो. दरवर्षी होणारा हा मूर्तीचा पुनर्प्रतिष्ठापना सोहळा गिरोबा उत्सव म्हणून प्रसिद्ध आहे. हा देव जागृत व नवसाला पावणारा असल्याची भाविकांची श्रद्धा असल्याने गिरोबाच्या या जत्रोत्सवास हजारो भाविकांची गर्दी होते.
मूर्ती पुनर्प्रतिष्ठापनेची येथील परंपरा शिवकालापासून चालत आलेली आहे. या सोहळ्यास दरवर्षी महाशिवरात्रीस प्रारंभ होतो. त्या दिवशी परिसरातील एक मोठे फणसाचे झाड निवडले जाते. देवाचे मानकरी देवाचा कौल घेतात. येथे त्यास शेष लावणे असे म्हणतात. त्यानुसार झाड निश्चित केले जाते. देवाचा कौल प्राप्त झाल्यानंतर या झाडास नवीन गिरोबा म्हणून ओळखले जाते. या झाडाची पूजा-अर्चा केली जाते. येथे भजन-कीर्तनाचे कार्यक्रम केले जातात. हे सर्व गिरोबा उत्सवापर्यंत चालते. होलिकोत्सवाच्या आदल्या दिवशी गिरोबा उत्सव साजरा केला जातो. त्या दिवशी ढोल-ताशांच्या गजरात निश्चित केलेले फणसाचे झाड तोडले जाते. त्यास गुळगुळीत स्तंभाकार दिला जातो. त्यानंतर मिरवणुकीने ते झाड मंदिरापर्यंत आणले जाते. मंदिराच्या गर्भगृहातील जुना गिरोबा हलवला जातो. त्याकरीता गर्भगृहाचे छप्पर दूर केले जाते. तशी खास व्यवस्था या मंदिरात करण्यात आलेली आहे. यानंतर जुना आणि नवा देव एकमेकांना भेटवतात व गर्भगृहात त्याची प्रतिष्ठापना केली जाते. त्याचीही विशिष्ट रीत आहे. मंदिरात झाडाचे खोड आणल्यानंतर ते सात फूट आत व सात फूट बाहेर ठेवले जाते. गर्भगृहातून बाहेर आणलेल्या जुन्या देवाला मंदिराबाहेर ‘खुट्याचा चाळा’ या जागेमध्ये ठेवण्यात येते. याबाबत अशी आख्यायिका सांगण्यात येते की या जागेमध्ये नेहमी केवळ एकवीसच जुने देव असतात. तेथे बाविसावा जुना देव कधीही दिसत नाही. तो देव गायब होतो व काशीला जातो, अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे.
गिरोबाचे येथील मंदिर अत्यंत प्राचीन असल्याचे सांगण्यात येते. सध्याचे मंदिराचे स्वरूप हे कोकणी स्थापत्यशैलीतील आहे. निसर्गसंपन्न अशा परिसरात विस्तृत प्रांगणात उंच जोत्यावर हे मंदिर उभे आहे. सभामंडप, उपसभामंडप, अंतराळ आणि अंतराळात असलेले गर्भगृह, त्यावर शिखर अशी या मंदिराची संरचना आहे. मंदिरासमोर आठ स्तरीय दीपस्तंभ आहे व त्याबाजूस तुळशी वृंदावन आहे. मंदिराचा सभामंडप दुमजली आहे. अर्धखुल्या अशा प्रकारच्या या मंडपास बाहेरच्या बाजूने एकूण १२ खांब आहेत. त्यात कक्षासने आहेत. या कक्षासनांपासून आत काही अंतरावर दोन्ही बाजूंनी चार-चार गोलाकार रुंद पाषाण स्तंभ आहेत. त्यामधील भाग काही इंच खोलगट आहे. तेथून मंदिराच्या उपसभामंडपात प्रवेश होतो. छोट्या आकाराच्या या मंडपातही कक्षासने आहेत. तेथून चार पायऱ्या चढून मंदिराच्या अंतराळात प्रवेश होतो.
अंतराळाचे प्रवेशद्वार रुंद लाकडी आहे. द्वारशाखांवर रंगकाम केलेले आहे व आतील द्वारशाखेवर वेलबुट्टी तसेच गरुड व हनुमानाच्या नमस्कारमुद्रेतील मूर्ती कोरलेल्या आहेत. द्वारशाखेच्या तळाशी वैष्णव द्वारपाल आहेत. अंतराळात दोन्ही बाजूंनी रुंद पाषाणस्तंभ आहेत. स्तंभशीर्षावर घटपल्लव आहेत. अंतराळात साधारणतः मध्यभागी एखाद्या मोठ्या देव्हाऱ्यासारखे दिसणारे गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या दर्शनीभिंतीवर जय-विजय या द्वारपालांच्या मोठ्या मूर्ती कोरलेल्या आहेत. प्रवेशद्वार कमानीच्या आकाराचे आहे. दरवाजाच्या खालच्या बाजूस गरुड व हनुमानाची पाषाणात कोरलेल्या लहान मूर्ती आहेत. प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबस्थानी गणेशाची कोरीव मूर्ती आहे. गर्भगृहात जमिनीवर खास छोटे कठडे लावून तयार केलेल्या जागेमध्ये गिरोबाची वृक्षस्वरूपातील मूर्ती आहे. फणसाचा गुळगुळीत व शिवपिंडीतील उंचच उंच लिंगाप्रमाणे आकार दिलेला स्तंभ तेथे रोवलेला आहे. त्याच्या वरच्या भागात डोळे व मिशा लावलेल्या आहेत. तसेच कपाळाच्या ठिकाणी त्रिपुंड टिळा लावलेला आहे. खालच्या भागास धोतर नेसवलेले आहे.
येथे गिरोबाचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. या वेळी येथील मंदिरावर तसेच वाड्या-वाड्यांमध्ये विद्युत रोषणाई केली जाते. सर्व परिसरात पताका लावण्यात येतात. या उत्सवास या गावातून विवाह होऊन अन्यत्र गेलेल्या महिला म्हणजे माहेरवाशिणी मोठ्या प्रमाणावर येतात. उत्सवाच्या दिवशी सायंकाळी चार वाजता मंदिराकडून निशाणकाठीसह देवस्थानचे मानकरी वाजतगाजत निवडलेल्या फणसाच्या झाडाकडे जातात. तेथे जयघोषात या झाडास ‘खाप’ लावला जातो. त्यानंतर गिरोबाची उत्सवमूर्ती वाजतगाजत मंदिराकडे आणण्यात येते. या सोहळ्यास हजारो भाविक उपस्थित असतात.