घोगरा महादेव मंदिर

दुंडाखैरी, ता. पारशिवनी, जि. नागपूर

घोगरा महादेव हे पारशिवनी तालुक्यातील दुंडाखैरी येथून वाहणाऱ्या पेंच नदीच्या पात्रातील मोठमोठ्या खडकांच्या (कातळ) मध्यभागी वसलेले देवस्थान आहे. अभ्यासकांच्या मते, हे स्थान १००० वर्षांपूर्वीचे असून विदर्भातील प्राचीन प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे येथील खडकांना आलेले वैशिष्ट्यपूर्ण आकार हे येथील आकर्षण आहे. हे ठिकाण मंदिरासोबतच पर्यटन क्षेत्र म्हणूनही विदर्भात प्रसिद्ध असून नागपूर जिल्ह्यातील पहिल्या पर्यटनस्थळांमध्ये याचा समावेश होतो.

नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी या तालुक्याच्या शहरापासून जवळच असलेल्या दुंडाखैरी गावात घोगरा महादेवाचे स्थान आहे. सातपुडा पर्वत रांगेतून उगम पावणाऱ्या नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पेंच नदीच्या पात्रामधून या देवस्थानाकडे जाण्यासाठी मार्ग आहे. या मार्गावर नदीपात्रात सुमारे ३० ते ४० पूजा साहित्य भाकरीठेच्याची दुकाने आहेत. येथील ज्वारीची भाकरी मिरचीचा ठेचा प्रसिद्ध आहे. या दुकानांच्या पुढे गेल्यावर नदीपात्रात पाणी वाहत असते. या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे येथून वाहणारे पाणी हे स्फटिकाप्रमाणे स्वच्छ असते. या वाहत्या पाण्यातूनच घोगरा महादेवाच्या स्थानापर्यंत जाण्यासाठी पायरी मार्ग आहे. आजूबाजूने वाहणारा नदीचा प्रवाह, मध्यभागी पांढऱ्या खडकांपासून बनलेलाचक्रव्यूहअसून त्यात हे स्थान आहे. त्यामुळे या स्थानालाविदर्भाचे कैलासअसेही म्हटले जाते.

पायरी मार्गावरून देवस्थानाकडे जाताना प्रथम गणेशाचे दर्शन होते. येथे एका उंचवट्यावर प्राचीन गणेशमूर्ती आहे. याशिवाय एका छोट्याशा मंदिरामध्ये कश्यप, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, भरद्वाज, अभेय वशिष्ठ ऋषी यांच्या मूर्ती आहेत. त्यांच्यासमोर एक शिवलिंग आहे. तेथून खडकांमधील रस्त्याने पुढे गेल्यावर श्री नागदेवतेचे स्थान आहे. एका उंच चौथऱ्यावर फण्यांची नागदेवता असून त्याच्या समोरील बाजूस नंदीचे स्थान आहे. या नागदेवतेसमोर अनेक त्रिशूळ आहेत. भाविकांनी नवसपूर्तीसाठी ते वाहिलेले आहेत.

नागदेवतेच्या स्थानापासून घोगरा महादेव मंदिरासाठी पुढे खडकांतून मार्ग सुरू होतो. विविध रंगांच्या आकाराच्या खडकांतून वाट काढत पुढे जावे लागते. नदी पात्रातील खडकांची नैसर्गिक रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे हे खडक निर्माण झाल्याचे सांगितले जाते. ऊन, वारा, पाऊस नदीतील पाण्याच्या प्रवाहामुळे या खडकांची झीज होऊन त्यावर नैसर्गिकरित्या तयार झालेले नक्षीकाम अतीव सुंदर भासतेया खडकांच्या कपारीतून पाण्याचा प्रवाह वाहत असतो. (जबलपूरमधील बंदर कुदनी या स्थानावर नर्मदा नदी संगमरवरी पर्वतातून अशा चिंचोळ्या स्थानातून वाहत असते. असे सांगितले जाते की या स्थानावर नर्मदा नदीची खोली सर्वाधिक आहे. घोगरा महादेव येथील हे स्थान पाहिल्यावर बंदर कुदनी या नर्मदेवरील स्थानाचा भास होतो.)

येथून पुढे घोगरा महादेवाचे स्थान आहे. एका उंच स्थानावर महादेवांची निळ्या रंगातील मूर्ती असून बाजूला नंदी आहे. त्याच्या खालच्या भागातील एका खडकाला शिवलिंगासारखा आकार आलेला आहे. हा खडक म्हणजे येथील पवित्र ज्योतिर्लिंग असल्याचे भाविक मानतात. असे सांगितले जाते की येथील शेकडो खडकांवर ऊन, पाऊस, हवा, पाण्याचा प्रवाह याचा परिणाम होऊन त्यांची झीज वा आकार बदलले असले तरी कित्येक वर्षांपासून या ज्योतिर्लिंगाच्या खडकाचा आकार मात्र तसाच आहे. याशिवाय या ज्योतिर्लिंगाच्या बाजूला एका खडकाच्या खोलीत नागदेवतेचा आकार आलेला असून त्याखाली स्वयंभू शिवपिंडी आहे. येथील विविध खडकांच्या खोलीत श्री नारायण देव, मोतण शेष अनेक स्वयंभू शिवलिंग आहेत.

प्रत्येक शनिवारी, रविवारी तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशी येथे हजारो भाविक पर्यटकांची गर्दी होते. या दिवसांमध्ये परिसराला जत्रेचे स्वरूप येते. पेंच नदी पात्रातील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासोबतच येथील स्थानिक महिलांनी बनविलेल्या चुलीवरच्या ज्वारीच्या भाकऱ्या आणि मिरचीच्या ठेच्याचाही आस्वाद पर्यटकांकडून आवर्जून घेतला जातो. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. त्या दिवशी लाखांहून अधिक भाविक येथे दर्शनाला येतात, अशी नोंद आहे. पावसाळ्याच्या दिवसांत नदीला पाणी जास्त असल्यामुळे नदी पात्रात असलेल्या घोगरा महादेवाच्या दर्शनाला जाता येत नाही; परंतु तेव्हाही पर्यटनासाठी या परिसरात पर्यटकांची गर्दी असतेच.

उपयुक्त माहिती:

  • नागपूरहून ३८ किमी, तर पारशिवनीपासून किमी 
  • नागपूरहून पारशिवनीसाठी एसटीची सेवा उपलब्ध
  • पारशिवनीहून खासगी वाहनांची सोय
  • खासगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home