१७व्या शतकात महाराष्ट्रात होऊन गेलेल्या दोन थोर संतांनी येथे रामराज्याचे स्वप्न पाहिले. संत तुकाराम महाराजांनी ‘झाले रामराज्य काय उणे आम्हासी’ असे स्वप्न पाहिले, तर समर्थ रामदास स्वामींनी ‘करी दुर्जनांचा संहार। भक्त जनांसी आधार।’ अशा शब्दांत राममहती गायली होती. तत्कालीन मराठी राज्यकर्त्यांसमोर या मर्यादा पुरुषोत्तमाचा आदर्श ठेवण्याचे कार्य या संतांनी केले. त्यामुळेच अनेक राजे-सरदारांनी रामाची भव्य मंदिरे बांधल्याचे दिसते. यापैकीच एक श्रीराम मंदिर कोल्हापूर जिल्ह्यातील कागल शहरात आहे. येथील घाटगे राजवाड्याच्या जागेवर स्थित असलेले हे भव्य मंदिर घाटगे राम मंदिर म्हणूनही ओळखले जाते. हे मंदिर पाहण्यासाठी व श्रीरामांच्या दर्शनासाठी हजारो भाविक येतात.
घाटगे घराणे हे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे जनक घराणे होय. या घराण्याकडून शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा वारसा कायम जपला गेला आहे. कोल्हापूर शहरापासून जवळ असलेल्या कागल येथील श्रीराम मंदिर हे या राजघराण्याचे आराध्य दैवत आहे. आता जेथे मंदिर आहे त्या जागेवर पूर्वी घाटगे घराण्याचा राजवाडा होता. या राजवाड्यात श्रीरामाचे एक लहानसे मंदिर होते; परंतु ते प्राचीन असल्यामुळे त्याची पडझड होऊ लागली होती. या घराण्याचे वारस असलेले राजे विक्रमसिंह घाटगे
यांनी या संपूर्ण प्राचीन वाड्याच्या जागेवर भव्य राममंदिर उभारण्याचा संकल्प केला. त्यासाठी त्यांनी दिल्ली व अहमदाबाद येथील अक्षरधाम मंदिराप्रमाणे हे मंदिर बांधण्याचे ठरविले. त्यानुसार २००७ मध्ये मंदिराचा पायाभरणी समारंभ होऊन २०१६ मध्ये हे मंदिर भाविकांसाठी खुले झाले.
राजस्थानात आढळणाऱ्या शुभ्र पांढऱ्या मकराना संगमरवरी दगडात हे मंदिर बांधलेले आहे. आग्रा येथील ताजमहालाचे बांधकामही याच दगडांत झालेले आहे. दुमजली असलेल्या या मंदिराच्या वरच्या मजल्यावर येण्यासाठी वीस पायऱ्या आहेत. प्रांगण, मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मंदिरासमोरील प्रांगणात संगमरवरी फरसबंदी आहे व सर्वबाजूने तटभिंती आहेत. या मंदिराला समोर, डाव्या आणि उजव्या बाजूस असे तीन मुखमंडप व त्यांपुढे सभामंडपात जाण्यासाठी प्रवेशद्वारे आहेत. मुख्य प्रवेशद्वाराजवळील मुखमंडपात सहा नक्षीदार स्तंभ आहेत. स्तंभांचा पायाकडील भाग अधिक रुंद असून शीर्षभागी कणी व त्यावर हस्त व तुळई आहेत. या स्तंभांवर कमळ पुष्प, पर्णलता, पुष्पलता व मयूर प्रतिमा असे विविध नक्षीकाम आहे. हस्तांवर केळफुलांच्या आकाराचे झुंबर साकारलेले आहेत. मुखमंडपाच्या छताकडील बाजूस नक्षीदार घुमट आहे.
सभामंडपाच्या द्वारशाखांवर बारीक कलाकुसर असलेल्या आकृत्या साकारलेल्या आहेत. ललाटबिंबावर श्रीराम, सीता, लक्ष्मण व हनुमान यांच्या मूर्ती आहेत. ललाटपट्टीवर पर्ण व पुष्पलता यांचे नक्षीकाम आहे. सभामंडपात प्रवेशद्वाराच्या मागे उजव्या बाजूस असलेल्या नक्षीदार स्तंभांवर पाना-फुलांसहित श्रीराम व लक्ष्मण तर डाव्या बाजूला असलेल्या स्तंभांवर भरत व शत्रुघ्न यांची शिल्पे कोरलेली आहेत. तसेच गर्भगृहाकडील दोन्ही बाजूंच्या स्तंभावर वाल्मीक ऋषी, श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमान यांची शिल्पे आहेत.
सभामंडपात मुख्य गर्भगृहासह आणखी चार उपगर्भगृहे आहेत. त्यापैकी सभामंडपाच्या उजव्या बाजूस असलेल्या दोन स्तंभांवर रिद्धी-सिद्धी सहीत श्री गणेशाची विविध रूपे साकारलेली आहेत. त्यापुढे असलेल्या उपगर्भगृहातील वर्जपीठावर गणेशाची संगमरवरी चतुर्भुज मूर्ती आहे. सभामंडपात डाव्या बाजूस असलेल्या दोन स्तंभावर दत्तात्रेय, विष्णू, राम व कृष्णाच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. येथील उपगर्भगृहात दत्तात्रेयांची मूर्ती आहे. येथील मुख्य गर्भगृहाच्या उजव्या व डाव्या बाजूला आणखी दोन उपगर्भगृह आहेत. त्यापैकी एकामध्ये महालक्ष्मीची मूर्ती व दुसऱ्या उपगर्भगृहात शीवपार्वतीचे स्थान आहे. या उपगर्भगृहाच्या बाहेरील बाजूला काळ्या पाषाणातील नंदीची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या मध्यभागी शिवपिंडी व पिंडीच्या मागच्या बाजूला पार्वती मातेची मूर्ती आहे.
मुख्य गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस दोन नक्षीदार स्तंभ आहेत. त्यापैकी एका स्तंभावर श्रीरामांचे माता-पिता कौशल्या व दशरथ आणि दुसऱ्या स्तंभावर पुत्र लव व कुश यांची शिल्पे कोरलेली आहेत. गर्भगृहाच्या द्वारशाखा पाना-फुलांच्या नक्षीने सुशोभित आहेत व ललाटबिंबावर गरुडाचे स्थान आहे. ललाटबिंबाच्या वरच्या बाजूला विष्णूच्या दहा अवतारांपैकी नऊ अवतार मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, कृष्ण, बुद्ध आणि कलकी यांची शिल्पे कोरलेली आहेत. प्रवेशद्वाराच्या शाखांवर रामायणातील व्यक्तिरेखा साकारलेल्या आहेत. मंडारक म्हणजेच उंबरठ्यावरही कोरीव काम आहे. त्यास अर्धचंद्रशीला म्हणजे अर्धचंद्राकारातील पायरी आहे. या गर्भगृहातील वज्रपीठावर श्रीराम, सीता व लक्ष्मण याच्या शुभ्र संगमरवरातील उभ्या मूर्ती आहेत. मूर्तींच्या मागे असणाऱ्या सजावटीमध्ये पुष्पवृष्टी करणारे गजराज आहेत. येथे लक्ष्मणाच्या पायाजवळ मारुतीची मूर्ती आहे.
मंदिराच्या छतावर नऊ शिखरे आहेत. तिन्ही मुखमंडपावर व चार उपगर्भगृहांवर चौकोनी लघूशिखर, त्यावर आमलक व त्यावर कळस आहेत. सभामंडपाच्या छतावर घुमटाकार शिखर व त्यावरील आमलकावर कळस आहे. गर्भगृहाच्या छतावर वर निमुळते होत गेलेल्या चौकोनी उंच शिखराच्या चारी बाजूंच्या भिंतीवर शिखरांच्या प्रतिकृतीची उतरंड आहे. शिखरात शीर्षभागी आमलक व त्यावर कळस आहे. मंदिराच्या तळघरात सुमारे चार हजार चौरस फूट क्षेत्रफळाचे सभागृह व ध्यान मंदिर आहे.
मंदिरात रामनवमी व विजया दशमी हे मुख्य वार्षिक उत्सव साजरे होतात. तसेच शारदीय नवरात्रौत्सव, चैत्र पाडवा, महाशिवरात्री, दत्त जयंती, गणेश जयंती आदी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. सर्व वार्षिक उत्सवांच्या वेळी हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी येतात. या निमित्ताने भजन, कीर्तन, प्रवचन, संगीत आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. स्थापत्य व वास्तुशास्त्रातील कलात्मकतेचा उत्कृष्ट नमुना म्हणून खर्डेकर चौकात स्थित असलेल्या या मंदिराची ओळख आहे. त्यामुळे अक्षरधाम मंदिराप्रमाणे स्थापत्यरचना असलेले हे मंदिर पाहण्यासाठी भाविकांसोबतच हजारो पर्यटक येथे येतात.