गीताई मंदिर

गोपुरी-वर्धा, ता. वर्धा, जि. वर्धा

आई रुक्मिणी हिच्या आग्रहावरून भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांनी संस्कृतमधील भगवद्‌गीतेचे मराठीत भाषांतर करून त्याला गीताई असे नाव दिले. गीतेतील श्लोकांचा आशय अर्थ बदलता त्यांनी १८ अध्यायांची रचना केली. विनोबांनी लिहिलेली ही गीताई जेथे अमर झाली ते गीताई मंदिर वर्धा शहरापासून जवळ असलेल्या गोपुरी परिसरात आहे. या ठिकाणी देशाच्या विविध भागांतून आणलेल्या दगडांवर गीताईच्या ७१० ओव्या कोरल्या आहेत. आकाशाचे छत्र असलेले गायीच्या आकारातील जगातील एकमेव असे हे मंदिर आहे.

गीताई मंदिराची उभारणी एक प्रार्थनास्थळ म्हणून करण्यात आलेली नसून गांधीजींचा सत्य, अहिंसा करुणेचा संदेश वास्तुरूपाने चिरंतन करण्यासाठी केलेली आहे. एका अर्थाने गांधीजी, आचार्य विनोबा भावे जमनालाल बजाज यांचे हे स्मारक आहे, तर दुसऱ्या अर्थाने भगवद्‌गीतेत कथन केलेल्या कर्मयोग सांख्ययोगाचे हे दृश्य स्वरूप आहे. जमनालाल बजाज यांचे चिरंजीव कमलनयन बजाज यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या मंदिराचे नोव्हेंबर १९६४ ला भूमिपूजन झाले होते. ‘सरहदी गांधीम्हणविले जाणारे खान अब्दुल गफारखान यांच्या हस्ते नोव्हेंबर १९६९ रोजी या मंदिराची पायाभरणी झाली मे १९७७ रोजी बांधकामास प्रारंभ झाला. भारताचे तत्कालीन उपराष्ट्रपती एम. हिदायतुल्ला यांनी ऑक्टोबर १९८० रोजी या मंदिराचे उद्‌घाटन केले. ज्या दिवशी मंदिराचे उद्‌घाटन झाले त्याच्या ५० वर्षांपूर्वी याच दिवशी विनोबांनी गीताई लेखनाला सुरुवात केलेली होती.

गीताई मंदिराची रचना त्याचा आकार वैशिष्ट्यपूर्ण आहे. ते समोरून पाहिल्यास चरखा; तर मागील टेकडीवरून पाहिल्यास गायीच्या आकाराचे असल्याची जाणीव होते. भारतीय संस्कृतीत महत्त्व असलेली गाय दारिद्र्य निर्मूलनाचे एक साधन असलेला चरखा प्रतीक म्हणून येथे दाखविलेले आहेत. मंदिराच्या महादरवाजाची रचना ठावणीप्रमाणे आहे. धर्मग्रंथ हे ठावणीच्या आधाराने वाचले जात असल्याने महादरवाजाची रचना त्याप्रमाणे करण्यात आलेली आहे. हा दरवाजा सिमेंटच्या साह्याने बांधला असला तरी तो लाकडात बांधल्याचा भास होतो. दरवाजाचे सिमेंट बसविताना त्यामध्ये देवदाराचे लाकूड वापरून तो लाकडी असल्याचा आभास निर्माण केलेला आहे. महादरवाजावर महाभारतातील अर्जुनाच्या रथाच्या चाकांची प्रतिकृती कोरलेली आहे. प्रत्येक चाकाला आठ आरे आहेत. दरवाजातून आत गेल्यावर एक भव्य स्तंभ लागतो. स्तंभावर स्वस्तिक कोरलेले असून त्याचा चौथरा उत्तर प्रदेशातील चुनार येथून आणलेल्या गुलाबी रंगाच्या दगडांचा आहे. स्तंभ चौकोनी असून तो बंगळूरनजीकच्या कुप्पम येथून आणलेल्या गुळगुळीत दगडाचा आहे. विनोबांची गीताईबद्दलची भावना दर्शविणारा श्लोक त्यांच्या स्वतःच्या हस्ताक्षरात या स्तंभावर कोरला आहे. तो श्लोक असा

गीताई माऊली माझी तिचा मी बाळ नेणता। 

पडता रडता घेई उचलोनी कडेवरी।।

त्याचप्रमाणे विनोबांचा सत्य, प्रेम आणि करुणेचा संदेश या स्तंभावर कोरण्यात आला आहे.

सुमारे २५ पायऱ्या उतरल्यानंतर सव्वादोन मीटर उंच पाच मीटर लांब भुयार लागते. भुयाराला कमान असून आत कमलनयन बजाज यांच्या अंतिम इच्छेप्रमाणे त्यांच्या रक्षेचा कलश ठेवलेला आहे. तेथून २३ पायऱ्या चढून गेल्यानंतर गीताई मंदिरात प्रवेश होतो. नजीकच खान अब्दुल गफारखान यांनी बसविलेला मंदिराच्या कोनशिलेचा दगड आहे. प्रचंड दगडांची एका ओळीत केलेली गुंफण मंदिराची परिसीमा बनविते. मंदिराचा ईशान्येकडील भाग चरख्याच्या आकाराप्रमाणे आहे, तर पूर्वेकडील भाग गायीच्या पाठीच्या आकारासारखा आहे. दक्षिणेकडील बाजूस गायीची शेपटी मागील पाय, तर नैऋत्य बाजूस गायीची कास पुढील पाय दिसतात, पश्चिमेस गोमुखाचा आकार दिसतो.

गीताई हे भगवद्‌गीतेचे रूपांतर असल्याने त्यामध्ये सात अधिकरण १८ अध्याय आणि ७०० श्लोक आहेत. या मंदिरात गीताईमधील प्रत्येक श्लोक स्वतंत्र दगडावर कोरण्यात आला आहे. त्यामुळे श्लोक कोरलेले ७०० दगड आहेत. याशिवाय अध्याय क्रमांक देण्यासाठी १८ अधिकरण देण्यासाठी सात, अनुक्रमणिकेसाठी दोन गीताई नावाकरिता एक असे स्वतंत्र दगड वापरलेले आहेत. याशिवाय अधिकरणाच्या मालेचे अध्याय मालेच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी एक हलत्या दरवाजाकडे दोन दगड आहेत. एकूण ७३२ दगडांच्या ओळीने मंदिराची परिसीमा बनलेली आहे. नऊ फूट उंच, दोन फूट रुंद आणि एक फूट जाड असलेल्या प्रत्येक दगडाचे वजन १४०० ते १५०० किलो आहे. प्रत्येक दगडाचा पृष्ठभाग यंत्राच्या साह्याने रासायनिक प्रक्रियेने गुळगुळीत केलेला आहे. दोन दगडांमध्ये सें. मी. इतके अंतर आहे. या दगडांवर कोरलेले श्लोक इतके स्पष्ट आहेत की १० फूट अंतरावरूनही ते वाचता येऊ शकतात. एकाच अधिकरणातील श्लोकांकरिता असलेले दगड समपातळीवर आहेत. या सर्व दगडांमध्ये रंगीत दगडांची फरसबंदी करण्यात आली आहे. दोन दगडांमधील जागेत हरळीचे गवत लावण्यात आलेले आहे.

येथील पहिल्या अध्यायातील श्लोक काळसर लाल वज्रतुंड (ग्रेनाईट) दगडात कोरलेले आहेत. हा भाग गायीच्या शिंगाचा आभास निर्माण करतो. दुसऱ्या अध्यायातील श्लोक लाल रंगाच्या वज्रतुंड दगडात कोरलेले असून ते बंगळूर परिसरातून आणलेले होते. या अध्यायाच्या काही भागाला गायीच्या शिंगाचा आकार आहे, तर ६८व्या श्लोकापासून चौथ्या अध्यायापर्यंत चरख्याचा आभास होतो. तिसऱ्या अध्यायासाठी बंगळूर परिसरातून आणलेला करड्या रंगाच्या वज्रतुंड दगडांचा वापर करण्यात आलेला आहे. चौथ्या अध्यायातील श्लोक तपकिरी रंगाच्या तमिळनाडूतून आणलेल्या वज्रतुंड दगडांत कोरलेले आहेत.

पाचव्या अध्यायासाठी उत्तर प्रदेशातील चुनार येथील गुलाबी रंगाचा वालुकामय दगड वापरण्यात आला आहे. या अध्यायापासून चरख्याच्या दुसऱ्या भागाला सुरुवात होते. सहाव्या अध्यायासाठी कृष्णम येथून आणलेल्या पांढऱ्या दगडांवर काळे ठिपके असलेल्या वज्रतुंड दगडांचा उपयोग करण्यात आलेला आहे. सातवा अध्याय कुप्पम येथील गुलाबी वज्रतुंड दगडांवर आहे. या अध्यायापासून दहाव्या अध्यायापर्यंत गायीच्या पाठीचा भास होतो. आठव्या अध्यायासाठी कुप्पम येथील काळा वज्रतुंड दगड वापरण्यात आला आहे. नवव्या अध्यायासाठी कुप्पम येथील गडद करड्या रंगाचा दगड वापरण्यात आलेला आहे. सूर्यप्रकाशात वाचणे सोयीचे व्हावे म्हणून या कोरीव अक्षरांवर अल्युमिनियमचा गिलावा देण्यात आलेला आहे.

दहाव्या अध्यायातील श्लोक गुलाबी रंगाच्या वज्रतुंड दगडांत, ११व्या अध्यायातील श्लोक गंदीपेठ येथील करड्या रंगाच्या वज्रतुंड दगडांत कोरलेले आहेत. या भागाला गायीच्या शेपटीचा आकार दिला आहे. १२व्या अध्यायासाठी राजस्थानमधील करोळीहून आणलेला लाल वालुकामय दगड वापरण्यात आलेला आहे. या अध्यायापासून १४व्या अध्यायाच्या काही भागापर्यंत गायीच्या मागच्या पायांचा आकार दिलेला आहे.

१३व्या अध्यायासाठी करड्या रंगाचा वज्रतुंड दगड, १४व्या अध्यायासाठी कोल्हापूरजवळील जोतिबा डोंगरातील टणक बेसाल्ट दगड, १५व्या अध्यायासाठी कुडप्पमचा काळा वज्रतुंड दगड वापरलेला आहे. १६व्या अध्यायासाठी फिक्कट गुलाबी रंगावर काळे ठिपके असलेला वज्रतुंड दगड वापरण्यात आलेला आहे. याला गायीच्या पोटाचा आकार आहे. अध्याय १७वा १८वा हे अंतिम दोन अध्याय बंगळूरहून आणलेल्या करड्या रंगाच्या वज्रतुंड दगडांत कोरलेले आहेत. याला गायीच्या पुढच्या पायांचा आकार आहे.

मंदिराच्या आवारात जमनालाल बजाज, त्यांची आई बिरदीबाई, पत्नी जानकीदेवी आणि महात्मा गांधींचे सहकारी किशोरलाल मश्रूवाला यांची स्मारके आहेत. जवळच असलेल्या विहिरीचे पाणी खेळवून नेपाळमधील त्रिशुळी नदीची प्रतिकृती येथे केलेली आहे. गीताई मंदिरासमोरील शांती कुटीत महात्मा गांधी, विनोबा भावे जमनालाल बजाज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कायमस्वरूपी प्रदर्शन उभारण्यात आलेले आहे. या मंदिरासाठीचा संपूर्ण खर्च बजाज कुटुंबीयांनी केला होता.

विनोबांनी १९३० ते ३१ दरम्यान वर्धा येथे गिताई लिहिली. या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९३२ साली प्रकाशित झाली. विनोबा त्यावेळी धुळे कारागृहात होते. गीताई या पुस्तकाच्या आतापर्यंत २६८ पेक्षा अधिक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. वर्धा जिल्ह्यातील शाळांमध्ये गीताई पठणाची परीक्षा घेतली जाते. पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. ऑक्टोबर हा गीताई मंदिराचा वर्धापन दिन आहे. १९७९ पासून या दिवशी वर्ध्यातील हजारो विद्यार्थी पहाटे वाजल्यापासून सूर्यकिरणांच्या आगमनापर्यंत गीताईचे सामूहिक वाचन करतात. ही परंपरा आजही कायम आहे. गीताई मंदिराला लागूनच विश्वशांतीचा संदेश देणारा शांती स्तूप आहे. गौतम बुद्धांच्या आकर्षक भावमुद्रेतील मूर्ती त्यात विराजमान आहेत

उपयुक्त माहिती:

  • वर्धा बस स्थानकापासून . किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक भागांतून वर्ध्यासाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने गीताई मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home