मुंबईच्या अंधेरी पश्चिम भागातील गिल्बर्ट हिल या ऐतिहासिक टेकडीवर गावदेवी दुर्गामातेचे मंदिर वसलेले आहे. अंधेरीची गावदेवी म्हणून ओळखली जाणारी ही देवी परिसरातील रहिवाशांचे आणि विविध समाजातील हजारो कुटुंबांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. येथील देवीचे स्थान सुमारे ४५० वर्षे जुने असल्याचे सांगण्यात येते. बेसाल्ट खडकांच्या उभ्या स्तंभांनी बनलेल्या या सुमारे ६० मीटर उंचीच्या टेकडीवर हे मंदिर स्थित आहे. सुमारे ६.६ कोटी वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखीच्या महाकाय उद्रेकाची स्मृती मुंबईत दोन ठिकाणी विशेषत्वाने जपण्यात आली आहे. त्यातील एक ठिकाण म्हणजे घोडपदेव येथील मंदिरात लाव्हा खडकाच्या रुपात विराजमान असलेला घोडपदेव आणि दुसरे ठिकाण म्हणजे अंधेरीतील गिल्बर्ट हिल हे ज्वालामुखीचे मुख म्हणजेच ‘व्होल्कॅनिक व्हेंट’ होय. ही मुंबईतील अस्तित्वात असलेली सर्वांत जुनी भूगर्भीय रचना मानली जाते.
भूगर्भशास्त्रानुसार, सुमारे ६.६ कोटी वर्षांपूर्वी म्हणजे ‘क्रिटेशियस’ कालखंडाच्या अखेरीस जमिनीला पडलेल्या मोठ्या भेगांमधून म्हणजेच ‘फिशर इरप्शन’द्वारे ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. पृथ्वीच्या पोटातून प्रचंड मोठ्या प्रमाणावर, परंतु संथपणे लाव्हारस बाहेर पडला आणि कित्येक किलोमीटर परिसरात तो पसरला.
या लाव्हारसाचे एकावर एक थर साचत जाऊन ‘डेक्कन ट्रॅप्स’ किंवा ‘डेक्कन ज्वालामुखी प्रांत’ तयार झाला. महाराष्ट्राचा मोठा भाग या लाव्हा उद्रेकातून तयार झालेल्या बेसाल्ट खडकाने बनलेला आहे. मुंबईची बेटे हीसुद्धा या उद्रेकाची निर्मिती आहेत. हा लाव्हारस पृथ्वीच्या पोटातून बाहेर पडण्याच्या मुख्य ठिकाणांपैकी एक मुख्य ठिकाण म्हणजे गिल्बर्ट हिल होय. सुमारे ८०० चौरस मीटर क्षेत्रावर पसरलेली ही बेसाल्ट खडकांच्या स्तंभांनी बनलेली एकसंध म्हणजेच ‘मोनोलिथिक’ टेकडी आहे.
या टेकडीला तीन बाजूंनी जवळजवळ उभे कडे आहेत. तेथे बेसाल्टचे उंच आणि एकमेकांना व्यवस्थित जोडलेले षटकोनी स्तंभ स्पष्टपणे दिसतात. या स्तंभांची उंची सुमारे ४५ ते ६० मीटर आहे. जगभरात अशा प्रकारची केवळ तीन महत्त्वाची ठिकाणे आहेत. त्यातील दोन स्थळे अमेरिकेत आहेत. ती ‘डेव्हिल्स पोस्टपाईल नॅशनल मॉन्युमेन्ट, कॅलिफोर्निया’ आणि ‘डेव्हिल्स टॉवर नॅशनल मॉन्युमेन्ट, व्योमिंग’ या नावाने ओळखली जातात. ही दोन्ही स्थळे तेथील सरकारने काळजीपूर्वक जतन केलेली आहेत. भारतातील गिल्बर्ट हिल ही टेकडी सुद्धा केंद्र सरकारने १९५२ मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून, तर मुंबई महानगरपालिकेने ‘वारसा संरचना’ म्हणजेच ‘ग्रेड २’ म्हणून घोषित केलेली आहे.
प्राचीन काळी अंधेरी हे साष्टी बेटांतील एक महत्त्वाचे गाव होते. ‘महिकावतीची बखर’ या ऐतिहासिक ग्रंथात त्याचा नामोल्लेख ‘आंधेरी’ असा केलेला आढळतो. या टेकडीची रचना उभ्या खडकांच्या स्तंभांनी झाली आहे. भूगर्भशास्त्राच्या परिभाषेत या रचनेला ‘लॅकॉलिथ’ किंवा ‘कॉलम्नर बेसाल्ट’ असे म्हणतात. सुप्रसिद्ध अमेरिकन भूवैज्ञानिक ग्रोव्ह कार्ल गिल्बर्ट यांनी या विशिष्ट प्रकारच्या भूगर्भीय रचनेचा शोध लावून या खडकांच्या जन्माची उकल करणारे गृहितक मांडले होते. त्यामुळे ब्रिटिश काळात त्यांच्या सन्मानार्थ या टेकडीस त्यांचे नाव अर्थात गिल्बर्ट हिल असे देण्यात आले, असे सांगण्यात येते. काहींच्या मते एका ब्रिटिश अधिकाऱ्याच्या नावावरून तिला गिल्बर्ट हिल असे म्हणण्यात येऊ लागले. मात्र या टेकडीवर प्राचीन काळापासून गावदेवीचे मंदिर असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये तिची ओळख गावदेवीची टेकडी अशीच होती.
येथील गावदेवीच्या स्थानाबद्दल एक प्राचीन आख्यायिका सांगण्यात येते. त्यानुसार, दुर्गादेवी ही विजयनगरच्या साम्राज्याच्या दिवाणाची कुलदेवता होती.
या दिवाणाचे कुटुंबीय साष्टी बेटावरील या स्थळी आले होते आणि या टेकडीच्या तळाशी त्यांनी आपली छावणी ठोकली होती. त्यावेळी अचानक त्या कुटुंबातील एका स्त्रीवर भीषण आपत्ती कोसळली. तेव्हा ती अत्यंत हताश होऊन जीव देण्यासाठी टेकडीवर चढून गेली. त्याच वेळी तेथे दुर्गामाता प्रत्यक्ष प्रकट झाली आणि तिने त्या स्त्रीचे प्राण वाचवले. त्या स्त्रीचे माहेर बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे असल्याचे सांगण्यात येते. मलकापूर येथील एका टेकडीवर चारोळीच्या वृक्षासह दुर्गामातेचे मंदिर आहे. विशेष म्हणजे, गिल्बर्ट हिलवरही दुर्गादेवीच्या मंदिराजवळ चारोळीचा एक प्राचीन वृक्ष आजही पाहायला मिळतो.
अलीकडच्या काळात या टेकडीचे सौंदर्यीकरण आणि जतन-संवर्धनाचे कार्य करण्यात आले आहे. भाविकांना टेकडीवर जाण्यासाठी पत्र्याची शेड असलेला पायरी मार्ग बांधण्यात आलेला आहे. येथे वर जाण्यासाठी एकूण १९५ पायऱ्या आहेत. वर सपाट जागेवर उंच अधिष्ठानावर देवीचे भव्य मंदिर उभारलेले आहे. येथे सात पायऱ्या चढून मंदिराच्या संगमरवरी फरसबंदी असलेल्या प्रशस्त प्रांगणात प्रवेश होतो.
हे मंदिर सांधार प्रकारचे आहे. सभामंडप, मुख्य गर्भगृह आणि सभामंडपातून गर्भगृहाभोवती फिरणारा प्रदक्षिणामार्ग अशी या मंदिराची संरचना आहे. मंदिराच्या गर्भगृहावर त्रिकोणाकार उंच शिखर आहे. सभामंडप मोठा आणि अर्धखुल्या प्रकारचा आहे. या मंडपावर समतल छत आहे. बाजूने कक्षासने असलेल्या या सभामंडपायच्या पायऱ्यांलगत कासवशिल्प आहे. मंडपाच्या मध्यभागी होमकुंड आहे. त्याच्या नजीकच हनुमानाची एक छोटी देवळी आहे. विशेष म्हणजे येथे असलेले मूळचे झाड तसेच राखण्यात आलेले आहे. त्याचे खोड छतातून बाहेर गेलेले दिसते. गर्भगृह सभामंडपापासून काही फूट खालच्या भागात आहे. गर्भगृहाच्या भिंती कोरीव काम केलेल्या पत्र्याने सुशोभित केलेल्या आहेत. आत छोट्या वेदीवर गावदेवी दुर्गामातेची पितळी मुखवटा असलेली मूर्ती प्रतिष्ठापित आहे. वस्त्रालंकारांनी शृंगारलेल्या या मूर्तीच्या वर पितळी छत्र आहे. या मूर्तीच्या समोरच दुर्गादेवीची सिंहाधिष्ठित पितळी मूर्ती विराजमान आहे. याच प्रमाणे गर्भगृहात डावीकडे गणेशाची, तर उजवीकडे दुर्गामातेची संगमरवरी मूर्ती प्रतिष्ठित आहे.
या मंदिरात सकाळी ७ ते दुपारी १२.३० आणि सायंकाळी ४ ते रात्री ८.३० या कालावधीत भाविक दर्शनाचा लाभ घेऊ शकतात. धार्मिक कार्यक्रम व सणांच्या दिवशी मंदिर दिवसभर दर्शनासाठी खुले असते. येथे रोज सायंकाळी ७ वाजता देवीची आरती केली जाते. येथील हनुमानाचे अधिष्ठान फार पूर्वीपासून असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे येथे दर चैत्र पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी ‘गावदेवी दुर्गा देवस्थान ट्रस्टच्या’ वतीने टेकडीवरून मिरवणुकीने देवीची भव्य पालखी काढण्यात येते. या पालखी सोहळ्यात परिसरातील हजारो भाविक सहभागी होतात. या वेळी संपूर्ण टेकडी परिसरास विद्युत रोषणाई केली जाते. येथील सामाजिक सलोखा जपण्यासाठी परिसरातील मुस्लिम बांधवांकडून या पालखीत सहभागी होणाऱ्या भाविकांना शरबत दिले जाते. हनुमान जयंतीच्या आधी दोन दिवस येथे पारंपरिक ‘परडी उत्सव’ साजरा केला जातो. त्यावेळी देवीला अर्पण केलेले निर्माल्य एका परडीत गोळा करून ती समुद्रात सोडली जाती. मंदिरात नवरात्रोत्सव, वटपौर्णिमा, हरतालिका, गणेशचतुर्थी हे उत्सवही मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. येथील देवी हिंदुंप्रमाणेच मुस्लिम आणि ख्रिश्चन बांधवांनाही प्रसन्न झाल्याच्या कथा येथे सांगण्यात येतात. परिसरातील अनेक मुस्लिम बांधव आजही देवीला अत्यंत आदराने नारळ अर्पण करतात. गावदेवी दुर्गा देवस्थान ट्रस्टद्वारे मंदिराचा कारभार पाहिला जातो.