बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे महाराष्ट्राचे वैभव आहे आणि ते जागतिक आश्चर्य म्हणूनही प्रसिद्ध आहे. हजारो वर्षांपूर्वी एका महाकाय उल्कापातामुळे निर्माण झालेल्या या सरोवराची ओळख ‘विराज तीर्थ’ अशी आहे. आध्यात्मिक तसेच वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या परिसरातील गंगा भोगावती धार (तीर्थ) हे अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. सरोवराचे पाणी क्षारयुक्त आणि अल्कधर्मी असले, तरीही सरोवराच्या कड्यावरून वाहणारा हा प्रवाह अत्यंत गोड आणि शुद्ध असणे हा निसर्गाचा चमत्कार मानला जातो. पौराणिक संदर्भांनुसार, भगवान विष्णूंनी ‘दैत्यसूदन’ अवतारात लवणासुर राक्षसाचा वध केल्यानंतर स्वतःच्या शुद्धीसाठी पाताळातून गंगेला पाचारण केले, तीच ही ‘भोगावती धार’ होय, अशी मान्यता आहे.
स्कंद पुराणातील ‘विराज महात्म्य’ आणि ‘पद्म पुराणा’त लोणारचा उल्लेख ‘विराज क्षेत्र’ किंवा ‘विष्णुगया’ असा आढळतो. या कथांनुसार, कृतयुगात या परिसरात ‘लवणासुर’ (किंवा लोणासुर) नावाचा एक महाकाय दैत्य राहत होता. त्याने पृथ्वीवर आणि स्वर्गात हाहाकार माजवला होता. त्याचे वास्तव्य जमिनीखालील एका मोठ्या गुहेत होते आणि त्या गुहेचे तोंड एका डोंगराळ झाकणाने झाकलेले होते. देवतांच्या विनंतीवरून, भगवान विष्णूंनी ‘दैत्यसूदन’ या सुंदर रूपात अवतार घेतला आणि लवणासुराच्या दोन बहिणींना मोहित करून त्यांच्याकडून गुहेचे रहस्य जाणून घेतले.
त्यानंतर विष्णूंनी आपल्या पायाच्या अंगठ्याने गुहेचे झाकण उडवून लावले आणि लवणासुराशी घनघोर युद्ध करून त्याचा वध केला.
लवणासुराचा वध केल्यानंतर, दैत्यसूदन विष्णूंचे शरीर आणि शस्त्रे रक्ताने माखली होती. तसेच, दैत्यवधाचे पाप क्षालन करण्याची आवश्यकता होती. त्यावेळी भगवान विष्णूंच्या विनंतीवरून किंवा त्यांच्या पादप्रक्षालनासाठी साक्षात ‘गंगा’ पाताळातून या ठिकाणी अवतरली. ती ‘भोगावती’ या नावाने ओळखली जाऊ लागली. विष्णूंनी या धारेच्या पाण्याने स्वतःला स्वच्छ केले, म्हणूनच या प्रवाहाला ‘गंगा भोगावती धार’ असे नाव पडले. या कथेचा असा अन्वयार्थ लावला जातो की लवणासुराचे रक्त आणि मांस कुजल्यामुळे येथील सरोवराचे पाणी खारे आणि अल्कधर्मी झाले; मात्र विष्णूच्या स्पर्शाने पुनीत झालेली गंगा असल्याने धारेतून येणारे पाणी अत्यंत गोड आणि पवित्र राहिले.
या स्थानाला ‘विष्णुगया’ असेही म्हटले जाते. लवणासुराचा वध करताना त्याने विष्णूकडे वरदान मागितले होते की त्याचे नाव या क्षेत्राशी कायमचे जोडले जावे आणि येथे येणाऱ्यांना मुक्ती मिळावी.
त्यावेळी विष्णूंनी त्याला असा वर दिला की जो कोणी या धारेत स्नान करेल आणि सरोवराची परिक्रमा करेल, त्याला सर्व पापांतून मुक्ती मिळेल. बिहारमधील गया हे स्थान जसे पितरांच्या श्राद्धासाठी प्रसिद्ध आहे, तसेच लोणारची ही धार आणि सरोवर ‘विष्णुगया’ म्हणून पितृदोष निवारणासाठी महत्त्वाचे मानले जाते.
लोणार सरोवर दख्खनच्या पठारावर स्थित आहे आणि त्याचा विस्तार सुमारे १.८ किलोमीटर व्यासाचा आहे. हे विवर बेसाल्ट खडकात निर्माण झालेले जगातील एकमेव ‘अतिवेगवान आघात विवर’ (Hyper-velocity impact crater) आहे. या सरोवराच्या ईशान्येकडील कड्यावर, जेथे विवराची मुख्य चढण आणि उतरण मार्ग आहे, तिथेच ‘धार’ किंवा ‘गोमुख’ तीर्थाचे स्थान आहे. गंगा भोगावती धार ही समुद्रसपाटीपासून उंचावर असलेल्या विवराच्या काठावरून उगम पावते आणि खाली सरोवराच्या दिशेने वाहते. हे स्थान लोणार गावाच्या सीमेवर आहे. येथून सरोवरात उतरण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे.
सध्या अस्तित्वात असलेली धारेवरील मंदिरे ही प्रामुख्याने १२व्या ते १४व्या शतकादरम्यान, यादवांच्या राजवटीत बांधली गेली आहेत. या काळात लोणार हे एक महत्त्वाचे व्यापारी आणि धार्मिक केंद्र होते. १३व्या शतकात महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांनी लोणारला भेट दिली होती. ‘लीळाचरित्र’ या ग्रंथातही लोणारच्या धारेचा आणि यात्रेचा उल्लेख येतो. महानुभाव पंथाच्या अनुयायांसाठीही हे एक पवित्र तीर्थ आहे. याशिवाय मुघल सम्राट अकबराचा नवरत्न अबुल फजल याने ‘आईन-इ-अकबरी’मध्ये लोणार सरोवराचा उल्लेख केला आहे. त्याने सरोवरातून मिळणाऱ्या मिठासोबतच येथील धार्मिक महत्त्वही नमूद केले आहे. १८७० च्या ब्रिटिश गॅझेटिअरमध्येही ‘लवणासुर’ कथेचा आणि धारेच्या पवित्रतेचा स्पष्ट उल्लेख आहे.
लोणार बस स्थानकापासून काही मिनिटांच्या अंतरावर लोणार सरोवराकडे येणाऱ्या परिसराचे प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वारापासून अनेक पायऱ्या उतरून गंगा भोगावती धार तीर्थापर्यंत पोहोचता येते. या मार्गावर सुंदर उद्यान विकसित केलेले आहे. पवित्र धार असलेल्या ठिकाणी अनेक प्राचीन मंदिरे आहेत. येथे आधी ब्रह्मकुंडाचे दर्शन होते. असे सांगितले जाते की ब्रह्मदेवांनी येथे श्रीविष्णूंच्या पदतीर्थाचा कलश भरून ठेवला होता.
चारही बाजूंनी असलेल्या पायऱ्यांनी या कुंडात उतरता येते. या कुंडातील पाणी नितळ आहे. या कुंडाला लागून देवळीसदृश्य वास्तू आहे. वरच्या बाजूस भिंतींमध्ये काही देवकोष्ठके कोरण्यात आलेली आहेत. या कुंडाच्या बाजूलाच धार वा गोमुख (तीर्थ) आहे. डोंगराच्या उदरातून किंवा कड्याच्या खडकातून येणारा पाण्याचा नैसर्गिक झरा मानवनिर्मित दगडी रचनेतून येथे वळवण्यात आलेला आहे. काळ्या पाषाणात कोरलेले हे गाईच्या मुखासारखे शिल्प आहे. हिंदू धर्मात गाईच्या मुखातून पडणारे पाणी अत्यंत पवित्र मानले जाते. या मुखातून पाण्याची अखंड धार खाली पडते. हा प्रवाह बारमाही आहे, म्हणजे कडक उन्हाळ्यातही तो आटत नाही, हे या रचनेचे आणि स्रोताचे वैशिष्ट्य आहे. गोमुखाच्या खाली एक आयताकृती, दगडी चिरेबंदी कुंड बांधलेले आहे. या कुंडात उतरण्यासाठी पायऱ्यांची रचना आहे. असे सांगितले जाते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकप्रसंगी या तीर्थाचे जल लोणारवरून रायगडावर नेण्यात आले होते. १९७२ च्या दुष्काळात लोणार शहराची तहान या धारातीर्थानेच भागवली होती. प्राचीन वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेल्या या तीर्थाच्या परिसरात नृसिंह, शिवशंकर, श्रीविष्णू, गणेश आणि जगदंबा आदी देवतांची पुरातन मंदिरे आहेत. या परिसरातील पायऱ्यांवर ठिकठिकाणी हात जोडून नमस्कार करणाऱ्या मानवी आकृत्या कोरलेल्या आहेत. परिसरात अनेक ठिकाणी शिवलिंगे आढळतात.
सोमवती अमावस्येला (जेव्हा अमावस्या सोमवारी येते) लोणारमध्ये मोठी जत्रा असते. या दिवशी या धारेवर स्नानासाठी हजारो भाविकांची गर्दी होते. ‘पितृ तर्पण’ करण्यासाठी आणि पूर्वजांना शांती मिळवून देण्यासाठी हे पर्वणीचे स्थान मानले जाते. या दिवशी भाविक सुमारे सात ते आठ किलोमीटरची सरोवराची ‘परिक्रमा’ करतात. या परिक्रमेची सुरुवात धारेपासून होते व समाप्तीही येथेच होते. सरोवराच्या काठावर असलेल्या कमलजा देवीच्या यात्रेतही धार तीर्थाला महत्त्व आहे. भाविक धारेवर स्नान करून, घटस्थापनेसाठी या कुंडातील पाणी घेऊन देवीच्या मंदिराकडे जातात.