गणेश मंदिर संस्थान

डोंबिवली, ता. कल्याण, जि. ठाणे

राज्याची सांस्कृतिक उपराजधानी असलेल्या डोंबिवलीतील गणेश मंदिर संस्थानातील गणपती या शहराचे आराध्यदैवत आहे. येथील नागरिक घरातील मंगलकार्यांची सुरुवात या गणेशासमोर पत्रिका ठेवून करतात. गुढीपाडव्याच्या दिवशी राज्याच्या विविध भागांमध्ये, तसेच परदेशांमध्येही होणाऱ्या नववर्ष स्वागतयात्रांची मुहूर्तमेढ या शहरातच रोवली गेली. गणपती मंदिर संस्थानतर्फे आयोजित होणाऱ्या शोभायात्रेदरम्यान तरुणाईच्या गर्दीने येथील रस्ते फुलून जातात. पौरोहित्य करणाऱ्या महिला हा आज जरी कौतुकाचा विषय असला, तरी या मंदिरात १९३० मध्येच एका महिलेला पौरोहित्य करण्याचा मान मिळाला होता.

आता चहुबाजूने विस्तारलेले डोंबिवली शहर पूर्वी ठाणे जिल्ह्यातील लहानसे खेडे होते. काळ्या जमिनीत भाताचे पीक घेणारा आगरी समाज, सरकारी खात्यांत काम करणारी मोजकीच सुशिक्षित कुटुंबे, आताच्या संगीतावाडीच्या मागच्या बाजूला असलेले सावरीच्या कापसाचे दाट जंगल, असे या खेड्याचे स्वरूप होते. त्यावेळी गावात एकही मोठे मंदिर नव्हते. ग्रामस्थांना नजीकच्या गावांमध्ये होणाऱ्या यात्राउत्सवांमध्ये सहभागी व्हावे लागत असे. या पार्श्वभूमीवर अनेक चर्चा, बैठकांद्वारे एकत्र येऊन, विचारविनिमय करत सर्वांच्या सहकार्याने २२ मे १९२४ रोजी येथे गणपतीचे छोटे कौलारू मंदिर उभारण्यात आले. त्याच दिवशी येथे शंकर, पार्वती, मारुती महालक्ष्मी या देवतांची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.

या गणेश मंदिराच्या उभारणीमागे धार्मिक सणउत्सवांच्या वेळी ग्रामस्थांनी एकत्र यावे, त्यांच्यामध्ये सांस्कृतिक सामाजिक जागृती व्हावी हा उद्देशही होता. १९२६२७ मध्ये मंदिराच्या पहिल्या विश्वस्त मंडळाची स्थापना झाल्यानंतर १९३६ मध्ये मंदिराची घटना तयार करण्यात आली. त्या घटनेचे वैशिष्ट्य असे की त्या काळी असलेल्या जातीपातीची बंधने झुगारून हे मंदिर सर्व जातीजमातींसाठी खुले ठेवण्यात आले. अंबूबाई गोडबोले या महिलेला मंदिराचे पौरोहित्य करण्याचा मान मिळाला होता. येथे काही वर्षे सेवा करणाऱ्या गोडबोले यांनी आपल्या तुटपुंज्या वेतनातून काही रक्कम जमा करून मंदिराच्या आवारातील वटवृक्षाभोवती पार बांधला होता. १०० वर्षांहूनही पुरातन असलेला हा वटवृक्ष आजही मंदिराच्या आवारात आहे. १९४०, १९५२ १९७८७९ साली या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. २०२४ या शताब्दी वर्षानिमित्त मंदिराचे नूतनीकरण करण्यात आल्यानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नूतनीकरण करताना अयोध्येतील राम मंदिरासाठी ज्या प्रकारचा दगड वापरला आहे त्याच प्रकारच्या दगडाचा येथील बांधकामात वापर करण्यात आला आहे.

डोंबिवली आणि ठाकुर्ली रेल्वे स्थानकांच्या मधोमध हे मंदिर आहे. मंदिराची कमान रस्त्यालगत असून डाव्या बाजूला मंदिराची प्रशस्त वास्तू आहे. सगळीकडे संगमरवरी बांधकाम आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर डावीकडे प्राचीन वटवृक्ष भव्य दीपमाळ दिसते. या परिसरात भाविकांना बसण्यासाठी बाके ठेवण्यात आलेली आहेत. मंदिरावरील शिखराची रचना ही पूर्णपणे आधुनिक, पण श्रद्धा भावनांचा समन्वय साधणारी आहे. त्यावरील पितळी कळस हा गुजरातमधील नाडियाद येथे घडवण्यात आला आहे.

प्रशस्त सभामंडप आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. येथे येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता सभामंडपाची रचना मोकळी हवा खेळती राहील, अशाप्रकारे करण्यात आलेली आहे. गर्भगृहासमोरील खांबांवर दोन्ही बाजूंना द्वारपालांची शिल्पे आहेत. गर्भगृहासमोरील चौथऱ्यावर विराजमान असलेल्या मूषकराजाच्या हातात मोदक आहे. मूषकाच्या मूळ पितळी मूर्तीवर सोन्याचा वर्ख लावलेला आहे. ३० फूट आकाराच्या गर्भगृहात कोठेही खांब नाहीत. गर्भगृहात चांदीचा देव्हारा असून त्यावर आकर्षक नक्षीकाम करण्यात आले आहे. मधोमध मुकुटधारी गणेशाची प्रसन्न संगमरवरी मूर्ती आहे. त्यामागील प्रभावळही वैशिष्ट्यपूर्ण आहे. गणेशाच्या बाजूला रिद्धीसिद्धी विराजमान आहेत. रिद्धीसिद्धीच्या या मूर्तींची ३० जून २०२४ रोजी येथे प्रतिष्ठापना करण्यात आली. या मूर्ती जयपूरहून आणल्या आहेत. गणेशाच्या पायाशी मूषक मुख्य मूर्तीसमोर गणेशाची छोटी मूर्ती आहे.

गर्भगृहाच्या प्रदक्षिणा मार्गावर डावीकडे शिवमंदिर आहे. त्यात शिवलिंग त्यामागील भिंतीवर अन्नपूर्णेची मूर्ती आहे. शिव मंदिरातूनच शेजारी असलेल्या दत्तात्रयाच्या देव्हाऱ्याजवळ जाता येते. त्यानंतरच्या देव्हाऱ्यांमध्ये अनुक्रमे विठ्ठलरुख्मिणी, श्रीकृष्ण, दुर्गामाता, श्रीरामसीतालक्ष्मण मारुती यांच्या मूर्ती आहेत. काही पावलांवर उजवीकडे मारुतीची आणखी एक शेंदूरचर्चित मूर्ती आहे.

मंदिरात रोज सकाळी वाजता काकड आरती होते. वाजता अभिषेक सर्व देवतांची पूजा होते. साडेसात वाजता आरती होते. वाजल्यापासून भक्तांनी नोंदणी केलेले अभिषेक होतात. दुपारी १२.३० वाजता सर्व देवतांना महानैवेद्य दाखवला जातो. दुपारी वाजता नामांकित प्रवचनकार, कीर्तनकारांचे प्रवचन कीर्तन होते. .३० वाजता सायंकाळची आरती, तर रात्री १० वाजता शेजारती होते. मंदिरात काही शुल्क आकारून ब्राह्मणांद्वारे दैनंदिन अभिषेक, लघुरुद्र, सहस्रावर्तने, सत्यनारायण पूजा, सत्यविनायक पूजा, संकल्प पूजा वाहन पूजा असे विधी पूजा केल्या जातात. संकष्टी चतुर्थी, अंगारकी, महाशिवरात्री, श्रावणी सोमवार, श्रावणी शनिवार, तसेच विविध सणांच्या दिवशीही येथे विशेष अभिषेक करण्यात येतात. प्रत्येक एकादशीला विष्णुसहस्रनाम गीता पठण केले जाते. (संपर्क : संस्थान कार्यालय, दूरध्वनी : ०२५१ २४७११६७, २४७३९९५)

दर मंगळवारी, महिन्याची संकष्ट चतुर्थी, तसेच अंगारकीला येथे भक्तांची गर्दी असते. संकष्ट चतुर्थीला भक्तांचे संकल्प अभिषेक केले जातात. येथील प्रत्येक देवतांचे उत्सव साजरे केले जातात. १९२८ पासून येथे गणेशोत्सवाला, तर १९५२ पासून महालक्ष्मी उत्सवाला सुरुवात झाली. गणेश जयंतीच्या उत्सवादरम्यान सकाळी वाजता महापूजा होते. सकाळी वाजल्यापासून गणेश याग होतो. सकाळी १०.३० वाजल्यापासून गणेशजन्माचे कीर्तन होते. गुढीपाडव्याला सकाळी गणेशपूजा झाल्यावर पंचांग वाचन केले जाते. सकाळी वाजता पालखी निघते. रामनवमीला सकाळी .३० वाजता महापूजा होते. सकाळी १० वाजल्यानंतर रामजन्म कीर्तन होते. सायंकाळी रामनाम जप होतो. येथे दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सवही होतो.

मंदिराच्या वास्तूत पाच मजली प्रशासकीय इमारत आहे. पहिल्या मजल्यावर ध्यानकक्ष, संस्थानमार्फत चालवले जाणारे सोनोग्राफी सेंटर, लंबोदर सभागृह आणि विश्वस्त सभाकक्ष आहे. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरील सभागृहात विविध कार्यक्रम होतात. पाचव्या मजल्यावर मुख्य पुजारी निवास, अतिथी निवास, कीर्तनकार प्रवचनकार निवास आहे. मंदिर संस्थानमार्फत विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक वैद्यकीय उपक्रमही राबवले जातात. येथील श्री गणेश अल्टासोनोग्राफी सेंटरमध्ये माफक दरात सोनोग्राफी करण्यात येते. संस्थानतर्फे तसेच इतर संस्थांच्या माध्यमातून वेळोवेळी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येते. संस्थानतर्फे शहरातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना आर्थिक मदत केली जाते. याशिवाय परिसरातील हुशार, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतही देण्यात येते. मंदिर संस्थानाने योगवर्ग, तत्त्वज्ञान, ज्योतिष, संस्कृत तसेच गीता पठणाचे वर्गही सुरू केले आहेत.

दरवर्षी २८ ते ३१ डिसेंबर या कालावधीत येथे संगीत महोत्सव होतो. त्यावेळी अनेक नामवंत गायक कला सादर करतात. ३१ डिसेंबरला देशभक्तीपर गीते सादर होतात. यावेळी स्लाईड शोही होतातया उत्सवादरम्यान युवा पिढीला सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या शौर्याची माहिती देण्यात येते. संगीत क्षेत्रातील नवोदितांसाठी मंदिरात दर रविवारी संगीत सेवा हा उपक्रम राबवला जातो. ३७ वर्षांपासून तो अखंड सुरू आहे.

राज्यातील अनेक शहरांत, तसेच परदेशातही अनुकरण केली जाणारी हिंदू नववर्ष स्वागतयात्रा हे डोंबिवली शहराचे प्रमुख आकर्षण आहे. १९९९ मध्ये मंदिर संस्थानच्या पुढाकाराने या शोभायात्रेस सुरुवात झाली. या उत्सवाने हळूहळू सार्वजनिक रूप घेतले. शोभायात्रेच्या पूर्वसंध्येला शहरात फटाक्यांची आतषबाजी केली जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे मंदिरात गणेशाची पूजा झाल्यावर नवीन वर्षाच्या पंचांगाचे वाचन केले जाते. त्यानंतर मंदिरात गुढी उभारून शोभायात्रेला सुरुवात होते. पारंपरिक वेषातील नागरिक या शोभायात्रेत सहभागी होतात. त्यात तरुणतरुणींची संख्या लक्षणीय असते. शहरातील सर्व आध्यात्मिक आणि धार्मिक संप्रदाय, सर्व ज्ञाती संस्था, सर्व सामाजिकसेवाभावी संस्थांच्या प्रतिनिधींचाही या शोभायात्रेत सहभाग असतो. शोभायात्रेच्या स्वागतासाठी संपूर्ण शहरात ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात येतात. असंख्य वाहने, घोडे, बैलगाड्या, चित्ररथ, ढोलताशे, लेझीम, टाळ यांच्या तालावर सहभागी झालेल्या व्यक्ती यात नृत्य करतात. दांडपट्टा आणि तलवारीची प्रात्यक्षिकेही केली जातात. अनेक जण भगवे ध्वज, पालख्या, विविध सत्पुरुषांच्या प्रतिमा येऊन घेतात. या शोभायात्रेतून दरवर्षी एक सामाजिक संदेश दिला जातो. वेगवेगळी पथके त्या विषयावर आधारित देखावेकार्यक्रम सादर करतात. यापूर्वी या शोभायात्रेत पर्यावरण, देहदान, नेत्रदान, पाणी वाचवा आदी विषय़ांवरील सामाजिक संदेश देण्यात आले होते. दररोज सकाळी ते दुपारी .३० दुपारी .३० ते रात्री १० पर्यंत भाविकांना या मंदिरातील गणेशाचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती:

  • डोंबिवली रेल्वे स्थानकापासून पायी दहा मिनिटांवर
  • कल्याणपासून किमी, ठाण्यापासून २१ किमी
  • राज्यातील अनेक भागांतून एसटी सेवा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • मंदिर वेबसाईट
  • www.shriganeshmandirsansthan.org
Back To Home