गणपती मंदिर

कोईळ, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग

गणेश हे संपूर्ण देशातील भाविकांचे आराध्य दैवत आहे. येथील घराघरांत गणेशाची पूजा केली जाते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत घरोघरी व सार्वजनिकरीत्या गणेशाचा मोठा उत्सव साजरा केला जातो. परंतु महाराष्ट्रात असे एक गाव आहे जेथे गणेश चतुर्थीला एकाही घरात पार्थिव गणेशमूर्तीची स्थापना केली जात नाही. या गावाचे नाव आहे कोईळ. मालवण तालुक्यात वसलेल्या या गावामध्ये केवळ येथील गणेश मंदिरामध्येच गणेशोत्सव साजरा केला जातो.

‘एक गाव-एक गणपती’ ही प्रथाच केवळ कोईळमध्ये श्रद्धापूर्वक पाळली जात नाही, तर येथील ग्रामस्थ दुसऱ्या पार्थिव गणपतीच्या मूर्तीच्या मातीसही स्पर्श करीत नाहीत. येथे गणेश चतुर्थीला कोणी घरामध्ये गणेशाची स्थापना केल्यास तसे करणाऱ्यास विविध अडचणींचा सामना करावा लागतो, असा समज आहे. त्यांच्या विवाहांच्या आमंत्रण पत्रिकांवरही गणपतीची प्रतिमा छापली जात नाही. घरांत गणेशाची तसबीर वा दिनदर्शिकाही लावत नाहीत. येथे गणेशाची पूजा गावातील स्वयंभू गणपती मंदिरामध्येच होते. कोईळमधील या अनोख्या परंपरेबद्दल व गावातील गणपती मंदिराविषयी दोन आख्यायिका सांगण्यात येतात.

यातील एक आख्यायिका अशी की या गणेश मंदिरातील मूर्ती दुसऱ्या कोण्या गावातील लोकांनी स्वतःच्या गणेश मंदिरात प्रतिष्ठापित करण्यासाठी घडवली होती. वाटेत त्यांनी ती कोईळच्या सीमेवर ठेवली व काही कारणानिमित्ताने आजूबाजूस गेले. कोईळमधील काही लोकांनी ती मूर्ती पाहिली व तेथे कोणीच नसल्याचे पाहून ती मूर्ती त्यांनी उचलून गावामध्ये आणली. नंतर ते दुसऱ्या गावातील लोक तेथे आले असता, त्यांना मूर्ती गायब झाल्याचे दिसले. त्यावर त्यांनी चिडून ‘जाब’ घातला. म्हणजे देवदेवस्की वा जादुटोणा केला. या घटनेपासून गणेशाच्या दुसऱ्या मूर्तीचे पूजन करताच कोईळमधील गावकऱ्यांना त्रास होऊ लागला.

दुसरी आख्यायिका अशी सांगितली जाते की कोईळ या गावात पूर्वी हिंदूंची संख्या कमी होती. त्यांना मुस्लिमांचा मोठा उपद्रव होत असे. मुस्लिमांचे भारतावरील पहिले आक्रमण प्रेषित महंमद पैगंबराच्या निधनानंतर केवळ चारच वर्षांनी म्हणजे इ.स. ६३६ मध्ये झाले होते. खलिफा उमर इब्न अल् खत्ताब याच्या एका सरदाराच्या आरमाराने त्यावर्षी श्रीस्थानकावर (हल्लीचे ठाणे शहर) हल्ला केला होता. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात इ.स. १२९६ मध्ये दिल्लीच्या सुलतानाचा सरदार अल्लाऊद्दिन खिलजी याने देवगिरीवर स्वारी केली. इ.स. १३१८ मध्ये यादवांचे राज्य खालसा झाले व महाराष्ट्रातील स्वातंत्र्यलक्ष्मी अस्तास गेली. कोकणातही कालांतराने मुस्लिम सत्ता प्रस्थापित झाली. त्यामुळे येथील नागरिकांस स्वधर्मपालन कठीण झाले. कोईळमधील अशाच एका हिंदूने या त्रासास कंटाळून आत्महत्या करण्याचे ठरवले.

गड नदीत उडी घेऊन तो प्राणत्याग करणार, तोच तेथे उभ्या असलेल्या एका सुफी फकिराने त्यास अडवले. आत्महत्येचे कारण विचारता त्या हिंदू व्यक्तीने मुस्लिम धर्मांधांकडून होणारा त्रास कथन केला. तेव्हा तो त्रास निवारण करण्याचे आश्वासन त्या फकिराने दिले. तू कोणत्या देवाचा भक्त आहे, कोणत्या देवतेची पूजा तुला करायची आहे, असेही त्या फकिराने विचारले. त्यावेळी त्या व्यक्तीने गणपती असे सांगितले. तेव्हा त्या फकिराने स्वतः असगणी या मूर्ती घडवण्यासाठी त्याकाळी प्रसिद्ध असलेल्या गावी जाऊन गणेशाची मूर्ती आणून त्या व्यक्तीस दिली व याच मूर्तीची पूजा कर, असे सांगितले. त्यावेळी त्या फकिराने एक अटही घातली होती की उत्सवाच्या वेळी गणेशाला जो नैवेद्य दाखवाल, तसाच मलाही नैवेद्य द्या. तेव्हापासून त्या फकिरास प्रसाद दिला जातो. प्रत्येक उत्सवाच्या वेळी त्या फकिराच्या नावाने ‘वाडी’ काढण्याची म्हणजेच प्रसाद देण्याची परंपरा आजही पाळली जाते. हा प्रसंग ज्या ठिकाणी घडला ते ठिकाण ‘फकिराचे तळे’ या नावाने ओळखले जाते. मुस्लिम समाज व हिंदू समाज यांच्यातील सहिष्णुतेचा नमुना म्हणजे या गावात इस्लाममध्ये निषिद्ध मानल्या जाणाऱ्या डुकराची पारध जाणीवपूर्वक केली जात नाही. त्या मुस्लिम फकिराच्या कृतज्ञतेपोटी ही प्रथा पाळली जाते.

हे स्वयंभू गणपती मंदिर कोईळमधील घनदाट झाडीत, निसर्गसौंदर्याने नटलेल्या परिसरात, शांत वातावरणात स्थित आहे. मंदिराच्या विस्तीर्ण प्रांगणास काही फूट उंचीची सीमाभिंत आहे. येथील साध्याशा, परंतु उंच अशा कमानीतून प्रांगणात प्रवेश होतो. प्रारंभी सद्गुरू साटम महाराज यांचे स्मृती मंदिर लागते. आधुनिक स्थापत्यशैलीत बांधलेल्या या मंदिराची रचना सभागृह, गर्भगृह आणि त्यावर साधेसे शिखर अशी आहे. १९९४ मध्ये नूतनीकरण करण्यात आलेल्या या मंदिराच्या गर्भगृहात उंच षटकोनी वज्रपीठावर साटम महाराजांची बसलेली उंच मूर्ती आहे. गर्भगृहात त्यांच्या अनेक तसबिरीही लावलेल्या आहेत. साटम महाराज हे विसाव्या शतकातील एक अवलिया सिद्धपुरुष होते. ते मूळचे कोईळ येथील. ते चार वर्षांचे असतानाच त्यांचे माता-पिता मुंबईला स्थलांतरित झाले. तेथे तरुणपणी, १९१० नंतर काही वर्षांनी त्यांना बाबा अब्दुल रहमान या अवलिया फकिराचे गुरुत्व लाभले. या फकिराच्या कृपेने साटम महाराजांना अनेक सिद्धी प्राप्त झाल्या. त्यानंतर ते मुंबई सोडून सावंतवाडी तालुक्यातील दाणोली येथे आले. तेथे त्यांची समाधी आहे. कोईळ हे त्यांचे जन्मग्राम आहे व त्यांच्या स्मृती येथे मंदिररूपाने जतन करण्यात आल्या आहेत.

साटम महाराजांच्या स्मृती मंदिरापासून पुढे काही अंतरावर कुलदैवताचे छोटेसे मंदिर आहे व त्याच्या बाजूलाच सातेरी मंदिर आहे. या मंदिरात सातेरी देवीच्या पाषाणाच्या बाजूस एक वीरगळ व एक सतीशिळा आहे. त्याच्या शेजारी काही अंतर सोडून स्वयंभू गणपतीचे आधुनिक शैलीतील भव्य मंदिर आहे. या मंदिराच्या समोरच्या भागात एका उंच चौथऱ्यावर चार देवळ्या आहेत. त्याच्या बाजूस चार दीपस्तंभ आहेत. त्या पुढे अत्यंत वेगळ्या स्वरूपाचे असे तुळशी वृंदावन आहे. हे वृंदावन मोठ्या देवळीच्या व समाधीस्थानाच्या स्वरूपाचे आहे. याच ठिकाणी एक चिऱ्याच्या दगडात बांधलेले पारंपरिक पद्धतीचे तुळशी वृंदावन आहे. तेथून काही अंतरावर एका चौथऱ्यावर चाळ्याचे पाषाण आहेत.

मुखमंडप, सभामंडप, उपसभामंडप, अंतराळ आणि त्यातच गर्भगृह अशी गणपती मंदिराची संरचना आहे. मंदिर उंच जगतीवर बांधलेले आहे. मुखमंडप आणि गर्भगृहावर शिखरे आहेत. मुखमंडपावरील शिखर हे छोटे चौरसाकृती पायऱ्या पायऱ्यांचे आहे. त्यावर आमलक व कळस आहे, तर गर्भगृहावरील शिखर उंच, चारही बाजूंनी वर निमुळते होत गेलेले आहे. त्यावर द्विस्तरीय आमलक आणि कळस आहे. मंदिराचे खांब दगडी, चौरसाकार आहेत. सभामंडप अर्धखुल्या प्रकारचा आहे. तेथून दोन पायऱ्या उंचावर उपसभामंडप आहे. अंतराळातच मध्यभागी गर्भगृह आहे. तेथे अर्धचंद्राकार वज्रपीठावर गणेशाची कोरीव दगडी मूर्ती आहे. मूर्तीसमोर पितळेची मोठी मूषक मूर्ती आहे.

या मंदिरात भाद्रपद शुद्ध चतुर्थीस गणेश जन्माचा मोठा सोहळा आयोजित करण्यात येतो. परंपरेनुसार भाद्रपद शुद्ध तृतीयेस गणेशमूर्तीला येथील देवराईतील विहिरीच्या पाण्याने स्नान घातले जाते. नारळाचे दूध लावले जाते. चतुर्थीच्या दिवशी मडवळ हे गणेश सेवक पहाटेलाच उंबराचा डिंक काढतात. सुतार त्या डिंकाने मूर्तीला रंगीत बेगडी कागदाने सुशोभित करतो. त्यानंतर गणेशाचे पूजन केले जाते. श्रींच्या प्रसादासाठी गावातील प्रत्येक घरातून शिधा गोळा होतो. येथे अत्यंत उत्साहाने व भाविकांच्या अलोट गर्दीत गणेशोत्सव साजरा केला जातो. पाचव्या वा सातव्या दिवशी फकिराचे तळे येथे गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते. या मंदिरात संकष्टी व अंगारकी चतुर्थीसही भाविकांची रीघ लागते.

उपयुक्त माहिती

  • मालवणपासून ३१ किमी, तर देवगडपासून ४१ किमी अंतरावर
  • मालवण, ओरोस, देवगड येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : आठवले काका, मो. ९४२२६३२३४१
Back To Home