सुमारे आठव्या ते बाराव्या शतकात उदय पावलेल्या शैवपूजक नाथ संप्रदायाने वर्ण व्यवस्था नाकारून समाज व्यवस्थेत क्रांती घडवून आणली. आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी नवनाथ व त्यांच्या अनुयायांनी भारतात अनेक ठिकाणी मंदिरे व मठांची स्थापना केली. तेव्हापासून आजतागायत समाज प्रबोधनाचे कार्य सुरू आहे. असेच नाथपंथीय सद्गुरू गगनगिरी महाराज यांचे मंदिर गगनबावडा तालुक्यात गगनगड येथे आहे. आजही हजारो अनुयायी येथे गगनगिरी महाराजांचा अनुग्रह व आशीर्वाद घेण्यासाठी येतात. गगनगिरी महाराजांचे येथे दिव्य रुपात वास्तव्य आहे व आजही ते भाविकांचे संकटनिवारण करतात, अशी श्रद्धा आहे.
गगनगिरी महाराज यांचे मूळ नाव श्रीपाद गणपतराव पाटणकर असे होते. त्यांचा जन्म पाटण तालुक्यातील मणदुरे येथे १९०६ साली दत्त जयंतीच्या दिवशी झाला. पाटणकर यांचे पूर्वीचे आडनाव साळुंखे असे होते. ते पूर्वीच्या चालुक्य घराण्यातील होते. त्यांच्या मूळ पुरूषाने पाटणची जहागिरी मिळविल्यामुळे त्यांना पाटणकर असे आडनाव प्राप्त झाले. या घराण्याच्या वंशविस्तारानंतर शिक्केकरी वाडा पाटण, बीबी, केर, वाजेगाव, रामपूर, दिवशी बुद्रुक व खुर्द, सावंतवाडी, तसेच सातभाई पाटणकर अशा शाखा निर्माण झाल्या. गगनगिरी महाराज हे त्या सातभाई शाखेतील होते. त्यांचे माता-पिता
वारकरी संप्रदायातील होते. असे सांगितले जाते की महाराजांनी लहानपणीच गृहत्याग केला. संन्यास स्वीकारून त्यांनी भारतभ्रमण केले. त्या काळात त्यांनी अनेक नाथपंथीय सिद्ध पुरुषांची कृपा संपादन केली.
कालातंराने ते पुन्हा महाराष्ट्रात परतले. काही वर्षे त्यांनी दाजीपुरच्या जंगलात तपश्चर्या केली. त्यानंतर ते गगनगडावर आले. गगनगड हा किल्ला बाराव्या-तेराव्या शतकातील शिलाहार राजा भोज (दुसरा) याने बांधला. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स. १६६० मध्ये हा किल्ला विजापूरकरांकडून जिंकून घेतला. सभासदाच्या बखरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातील किल्ल्यांची जी यादी दिलेली आहे, त्यात या किल्ल्याचा समावेश आहे. छत्रपती राजाराम महाराजांनी हुकूमतपन्हा रामचंद्रपंत अमात्य यांना गगनगड किल्ला व गगनबावड्याची जहागिरी बहाल केली होती. १८४४ मध्ये इंग्रजांनी तोफांचा मारा करून गगनगडाची बरीच पडझड केली. अशा या किल्ल्यावर गगनगिरी महाराजांनी तपश्चर्या केली. येथेच त्यांनी अनेक शिष्यांना अनुग्रह दिला. अनेक राजकीय नेते त्यांचे अनुयायी होते.
गगनगिरी महाराज हे नाथसंप्रदायी हठयोगी होते. दशनामी संप्रदायाशी त्यांचे जवळचे संबंध होते. त्यांच्या जलतपश्चर्येसाठी ते ओळखले जात. असे सांगितले जाते की ते नदी वा डोहाच्या तळाशी दीर्घकाळ ध्यान लावून बसत असत. योग्याने एकाच ठिकाणी अधिक थांबू नये, या न्यायाने कालांतराने ते गगनगडावरून रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे गेले. खोपोली येथे त्यांचा मोठा आश्रम आहे. तो योगाश्रम पाताळगंगा तीर्थक्षेत्र म्हणून ओळखला जातो. मनोरीबेट, आंबोळगड, दाजीपूर, नागार्जुन सागर इत्यादी ठिकाणीही त्यांचे आश्रम आहेत. येथे दत्तमूर्ती स्थापन करून त्यांनी लाखो लोकांना भक्तिमार्गाकडे वळविले. खोपोली येथील आश्रमात त्यांनी ४ फेब्रुवारी २००८ रोजी देह ठेवला.
गगनबावडा तालुक्यातील गगनगड किल्ला हा सध्या गगनगिरी महाराज मंदिरामुळेच ओळखला जातो. या गडाच्या पायथ्याशी असलेल्या वाहनतळापासून सुमारे २०० पायऱ्या चढून गडावर यावे लागते. यापैकी काही पायऱ्या चढून वर आल्यावर म्हसोबा मंदिर लागते. त्यामध्ये रेड्याचे मोठे शिल्प आहे. येथून पुढे आल्यावर गगनगिरी महाराज मंदिराची नक्षीदार स्वागत कमान नजरेस पडते. या कमानीस दोन्ही बाजुस असलेल्या चौकोनी स्तंभांवर कमळ फुलांची नक्षी, गजराज व द्वारपाल शिल्पे आहेत. दोन्ही स्तंभांच्यामध्ये महिरपी कमान व त्यावर सज्जा आहे. सज्जावर बाशिंगी कठडा व दोन्ही बाजूस लघू शिखरे आहेत. त्यापुढे मंदिरासमोर नवग्रहाचे स्थान आहे.
आणखी काही पायऱ्या चढून गडाच्या माचीवर पोहोचताना अशाच प्रकारची दूसरी कमान दिसते. येथून पुढे मुख्य मंदिराचे प्रांगण आहे. प्रांगणात मंदिरासमोर चौथरा व त्यावर दोन थरांची अष्टकोनी दीपमाळ आहे. शेजारी तुलसी वृंदावन व बाजुच्या कातळावर गणपती व हनुमान यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. पुढे लोखंडी स्तंभांवर गजपृष्ठ आकाराचे छत असलेल्या मंडपात खड्गधारी रक्षक, व्याघ्र व इतर मूर्ती आहेत. येथून सभामंडपात दोन पायऱ्या चढून यावे लागते. येथे दोन नक्षीदार चौकोनी स्तंभावर महिरपी कमान असलेले प्रवेशद्वार आहे. सभामंडपात नाथगुरूंच्या मूर्ती व गगनगिरी महाराजांचा झोपाळा आहे. पुढे गर्भगृहात वज्रपीठावर मध्यभागी श्रीदत्त व त्यांच्या मागे गगनगिरी महाराजांची मूर्ती आहे. या मूर्तीच्या उजव्या बाजूस गणपती व मारूतीची मूर्ती आहे. डाव्या बाजूस चौंडेश्वरी व महालक्ष्मी देवी यांच्या मूर्ती आहेत.
या मंदिरापासून काहीसे वर असेलल्या ध्यान मंदिराकडे जाताना पायऱ्यांच्या डाव्या बाजूस असलेल्या कातळावर नंद राजा, गाईची धार काढणारी यशोदा, दुग्धपान करणारा कृष्ण, अर्जुनाचे सारथ्य करणारा कृष्ण व पाच पांडव, शेषारुढ विष्णू, संत तुकाराम, विठ्ठल-रखुमाई अशा अनेकविध मूर्ती कोरलेल्या व रंगविलेल्या आहेत.
ध्यान मंदिराच्या सभोवती तटभिंत आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस द्वारपालांची शिल्पे आहेत. येथील सभामंडप बंदिस्त स्वरुपाचा आहे व त्यात उजेड आणि हवा येण्यासाठी खिडक्यांची व्यवस्था आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस द्वारपाल आहेत. गर्भगृहातील वज्रपिठावर गगनगिरी महाराजांची ध्यानस्थ मूर्ती आहे. मंदिराच्या छतावर शंकर, गणपती, पार्वती, विष्णू व ऋषीमुनींच्या मूर्ती आहेत. ध्यान मंदिरासमोरील चौथऱ्यावर गगनगिरी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. याशिवाय गडावर महादेव व ग्रामदेवता विठलाई यांची मंदिरे, हजरत अली पीर दर्गा व पाण्याचे कुंड आहेत.
मंदिराच्या प्रांगणात असलेल्या अन्नछत्रात दररोज भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. तसेच भविकाना राहण्यासाठी भक्तनिवासाची सोय उपलब्ध आहे. मंदिरात दत्त जयंती, गुरुपौर्णिमा व दसरा हे मुख्य वार्षिक उत्सव साजरे केले जातात. या दिवशी हजारो भाविक व गगनगिरी महाराजांचे अनुयायी येथे दर्शनासाठी येतात. यावेळी दत्त पूजन व गुरु पूजन तसेच भजन, कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दर पौर्णिमा, अमावस्या व इतर सण-उत्सवांच्या वेळी मंदिरात होम हवन केले जाते.