गड भवानी मंदिर

डभोई किल्ला, ता. डभोई, जि. वडोदरा

ऐतिहासिकदृष्ट्या ‘दर्भवती’ म्हणून ओळखले जाणारे डभोई हे गुजरातमधील एक महत्त्वाचे शहर आहे. या शहराचे नाव ‘दर्भ’ (गवत) यावरून पडले आहे, जे हिंदू आणि बौद्ध परंपरेत अतिशय पवित्र मानले जाते आणि या भागात मुबलक प्रमाणात उगवते. १३ व्या शतकात शहराभोवती तटबंदीची भिंत बांधली गेली, ज्यामुळे शहराचे रूपांतर एका मजबूत किल्ल्यात झाले. किल्ल्याच्या प्रसिद्ध हिरा दरवाजाजवळ गड भवानी देवीचे प्राचीन मंदिर आहे, जे पूर्वी कालिका मंदिर म्हणून ओळखले जात असे. हिरा दरवाजा आणि मंदिराची अद्वितीय वास्तुकला, नक्षीकाम आणि शिल्पकला भाविक, संशोधक आणि पर्यटकांना सारखीच आकर्षित करते.

डभोईला अनेक शतकांचा इतिहास लाभला आहे. ६ व्या शतकातील ‘रोमकसिद्धान्त’ या प्राचीन ज्योतिषशास्त्रीय ग्रंथात या शहराचा उल्लेख आढळतो, ज्यावरून या शहराचे अस्तित्व त्यापूर्वीपासूनच असल्याचे स्पष्ट होते. ८ व्या शतकात हे शहर अणहिलवाड (पाटन) येथील चावडा घराण्याच्या राजवटीखाली होते. चावडा घराण्याचा शेवटचा राजा सामंतसिंह याला मुलगा नसल्यामुळे त्याने आपला पुतण्या मूळराज याला दत्तक घेतले. मात्र, इ.स. ९४२ मध्ये मूळराजाने सिंहासन बळकावले आणि या प्रदेशात चालुक्य राजवटीची स्थापना केली. चालुक्य राजवटीत डभोईला प्रशासकीय आणि व्यावसायिक महत्त्व प्राप्त झाले, परंतु त्यांच्या राजवटीपूर्वीपासूनच डभोई हे हिंदूंचे एक पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध होते.

‘प्रोसीडिंग्ज ऑफ द इंडियन हिस्ट्री काँग्रेस (खंड ६१, भाग एक)’ मध्ये प्रकाशित आध्या भारती सक्सेना यांच्या ‘Dabhoi – An Urban Settlement of Central Gujarat c.1000 – c.1800 A.D.’ या शोधनिबंधानुसार, एक तीर्थक्षेत्र म्हणून डभोईचे महत्त्व प्रामुख्याने कालिका देवीच्या (गड भवानी) मंदिरामुळे होते. उत्तर गुजरातकडून चाणोदकडे जाणाऱ्या यात्रा मार्गावरील हा एक महत्त्वाचा टप्पा होता. १३ व्या शतकात, चालुक्यांनंतर डभोई वाघेला घराण्याच्या अमलाखाली आले, जे चालुक्यांचे वंशज असल्याचा दावा करत असत. राजा वीरधवल वाघेला (मृत्यू इ.स. १२४२) यांनी डभोईचा किल्ला आणि कालिका (गड भवानी) मंदिर बांधले असे मानले जाते.

बडोदा संस्थानाच्या पुरातत्व विभागाचे संचालक इतिहासकार डॉ. हिरानंद शास्त्री यांनी त्यांच्या ‘The Ruins of Dabhoi or Darbhavati’ (बडोदा स्टेट प्रेस, १९४०) या पुस्तकात राजा वीरधवल यांच्याबद्दलची एक आख्यायिका सांगितली आहे. त्यानुसार, राजा वीरधवल यांना सात राण्या होत्या, ज्यांपैकी रतनअली ही पट्टराणी तिच्या सौंदर्य आणि सद्गुणांसाठी प्रसिद्ध होती. मत्सरी सवतींनी तिला मूल होऊ नये म्हणून करणी (मंत्रतंत्र) करण्याचा प्रयत्न केला. तरीही ती गरोदर राहिली आणि आपल्या जन्माला न आलेल्या बाळाच्या संरक्षणासाठी चाणोद या तीर्थक्षेत्राकडे निघाली. वाटेत ती डभोई येथील एका तलावाजवळ थांबली, जिथे एका तपस्व्याने तिला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला आणि तेथेच राहण्याचा सल्ला दिला. कालांतराने तिने विशालदेवला जन्म दिला, ज्याला नंतर राजा वीरधवल यांनी सिंहासनाचा वारस घोषित केले. रतनअलीच्या विनंतीवरून वीरधवल यांनी आपल्या पुत्राच्या जन्मस्थानाभोवती शहराची तटबंदी केली आणि तलावाचा जीर्णोद्धार केला.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) आणि गुजरात पर्यटन विभाग डभोई किल्ल्याच्या या वारसा स्थळाचे व्यवस्थापन करतात. किल्ल्याला चार भव्य दरवाजे आहेत – हिरा दरवाजा, बडोदा दरवाजा, नांदोद (चाणोद) दरवाजा आणि महुडी (चांपानेर) दरवाजा. वास्तुकलेच्या दृष्टीने अत्यंत अप्रतिम आणि सर्वात प्रसिद्ध असलेला हिरा दरवाजा कालिका माता (गड भवानी) मंदिराच्या शेजारी आहे. या दरवाजाच्या आत सापडलेल्या दोन शिलालेखांमध्ये, ज्यांना ‘सोमेश्वर प्रशस्ती’ म्हणून ओळखले जाते, असे नमूद केले आहे की विशालदेव (इ.स. १२४३-१२६१) यांनी हा दरवाजा आणि मंदिर बांधले. काही इतिहासकारांच्या मते हा दरवाजा मूळतः क्षतीग्रस्त झाला होता आणि नंतर विशालदेव यांनी त्याचा जीर्णोद्धार केला. हे चारही दरवाजे दगडी वास्तुकला आणि शिल्पकलेचे उत्कृष्ट नमुने आहेत.

आख्यायिकेनुसार, हिरा नावाच्या एका मुख्य स्थपतीने (वास्तुविशारदाने) या वास्तू बांधल्या. त्याने असे सौंदर्य इतर कुठेही निर्माण करू नये याची खात्री करण्यासाठी राजा विशालदेवने हिराला सहा वर्षांसाठी मंदिराच्या तळघरात कैद केले. त्याची पत्नी एका लहान खिडकीतून त्याला अन्न आणि पाणी पुरवत असे. जेव्हा नवीन बांधकामांची योजना आखली गेली, तेव्हा हिराची सुटका करण्यात आली. ही खिडकी हिरा दरवाजाच्या उत्तर बाजूच्या बाहेरील भिंतीमध्ये अजूनही हयात आहे आणि असे म्हटले जाते की त्याच्या सन्मानार्थ या दरवाजाला हे नाव देण्यात आले. काही लोकांचा दावा असाही आहे की हे नाव दरवाजाच्या अथांग सौंदर्यावरून पडले आहे.

पूर्व दिशेला असलेला हिरा दरवाजा खरोखरच सर्वांत सुंदर आहे. सहा कमानींचा आधार असलेल्या या दरवाजाच्या आतील आणि बाहेरील भिंतींवर अत्यंत बारीक नक्षीकाम केलेले आहे. दरवाजाच्या आवारातील कोनाडे आणि देवड्यांमध्ये शिव, विष्णू, लक्ष्मी, चामुंडा आणि इतर देवतांच्या मूर्ती आहेत. समुद्रमंथनासारखी पौराणिक शिल्पे येथे रेखाटलेली आहेत. सज्ज्याजवळ आतील भिंतीवर स्वार बसलेला हत्तीचा एक मोठा पुतळा आहे, जो बहुधा राजा विशालदेव किंवा वीरधवल यांचे प्रतिनिधित्व करतो, ज्याच्या सभोवताल स्वार आणि सैनिकांचे कोरीव काम आहे.

या दरवाजाजवळ डभोईची रक्षक देवता असलेल्या कालिका देवीचे प्राचीन मंदिर आहे, ज्याला गड भवानी असेही म्हणतात. अलिकडच्या काळात मंदिराचा अंशतः जीर्णोद्धार करण्यात आला आहे. संगमरवरी पायऱ्या आणि जुन्या नक्षीदार खांबांच्या प्रवेशद्वारातून मंदिरात प्रवेश होतो. तटबंदीच्या सज्जातून जाणारा मार्ग मंदिराकडे घेऊन जातो, जिथे पाने, फुले आणि भूमितीय नक्षीने सजवलेले मोठे दगडी खांब आहेत. सज्जाच्या आतील भिंतीवर सिंदूरचर्चित हनुमानाची मूर्ती प्रस्थापित आहे.

मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार दगडातून बांधलेले असून त्याला अर्धवर्तुळाकार खांब आहेत आणि चौकटीच्या वरच्या बाजूस गणपतीची मूर्ती आहे. उंबऱ्यामध्ये चंद्रकोरीच्या आकाराचा दगड असून त्याच्या दोन्ही बाजूंना कीर्तिमुखाची नक्षी आहे. आत गोल, जाड आणि सुंदर कोरीव काम असलेला एक साधा सभामंडप आहे. डाव्या बाजूला गाभारा (गर्भगृह) आहे, ज्याच्या जवळ हनुमानाची मूर्ती आहे.

गाभाऱ्यात संगमरवरी पीठावर चांदीच्या छत्राखाली गड भवानी देवीची दगडी मूर्ती विराजमान आहे. मूर्तीला वस्त्रे, सुवर्णमुकुट, नथ आणि मस्तकावर चांदीचे छत्र अत्यंत सुंदररीत्या मढवले गेले आहे. मूर्तीच्या डाव्या बाजूला त्रिशूळ ठेवले आहे.

मंदिराच्या बाहेरील भिंतींवरही देवी-देवतांचे, प्राण्यांचे आणि पौराणिक प्रसंगांचे अत्यंत सूक्ष्म कोरीव काम आहे. काही कोरीव कामांमध्ये कामशिल्पे (शृंगारिक शिल्पे) दर्शवली आहेत, जी डॉ. देवंगना देसाई यांच्या ‘Erotic Sculptures of India: A Socio-Cultural Study’ या ग्रंथातील उल्लेखानुसार पारंपारिक मंदिर प्रतिमाशास्त्राचा भाग असून ती केवळ कामुकतेसाठी निर्माण केलेली नाहीत.

या मंदिरात नियमित पूजा-अर्चा आणि धार्मिक विधी केले जातात. सकाळी देवीला स्नान घातल्यानंतर तिला नवीन वस्त्रे परिधान केली जातात. त्यानंतर देवीची विधिवत पूजा केली जाते. देवीला दिवसातून दोन वेळा नैवेद्य दाखवला जातो. येथे चैत्र आणि शारदीय नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. या प्रसंगी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शारदीय नवरात्रौत्सवा दरम्यान दहा हजारांपेक्षा जास्त भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. भाविक देवीला साडी, चुनरी, नारळ आणि नैवेद्य अर्पण करतात. या काळात संपूर्ण परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. या उत्सवा दरम्यान गर्भगृहात घटस्थापना केली जाते. नऊही दिवस दररोज पूजा केली जाते. सायंकाळी आसपासच्या परिसरात गरबा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. चैत्र महिन्यात आणि दसऱ्याच्या दिवशी मंदिराच्या शिखरावरील ध्वज बदलला जातो.

प्रमुख वैशिष्ट्ये

  • वडोदरापासून ३६ किमी आणि डभोई बस स्थानकापासून २.५ किमी अंतरावर स्थित
  • वडोदरा जिल्ह्यातील अनेक शहरांमधून एसटी (राज्य परिवहन) बसेस उपलब्ध
  • खाजगी वाहने थेट मंदिरापर्यंत पोहोचू शकतात
  •  जवळपास राहण्याची आणि भोजनाची मुबलक सोय आहे
Back To Home