ईएमई मंदिर

ईएमई रोड, फत्तेगंज, वडोदरा

वडोदरा येथील लष्करी छावणीतील फत्तेगंज भागात वसलेले ईएमई मंदिर अध्यात्म, देशभक्ती आणि आधुनिक रचनेचा एक नयनरम्य संगम म्हणून उभे आहे. भगवान शिवाच्या दक्षिणामूर्ती रूपास समर्पित असलेले हे मंदिर केवळ एक पूजेचे स्थान नसून हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन, झोरोस्ट्रियन (पारशी), जैन आणि बौद्ध धर्मातील तत्वांना सामावून घेणारे भारताच्या धार्मिक एकतेचे एक प्रतीकात्मक रूप आहे. भारतीय भूदलाद्वारे व्यवस्थापित हे मंदिर एक भक्तिस्थान असण्यासोबतच वास्तुशिल्पाचा एक अद्भुत नमुना आहे, जो केवळ भाविकांनाच नव्हे तर इतिहासकार, पुरातत्वशास्त्रज्ञ आणि वास्तुशास्त्राच्या विद्यार्थ्यांनाही आकर्षित करतो.

हे मंदिर ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनिअर्स’ (EME) स्कूलच्या आवारात वसलेले आहे, ज्यावरून या मंदिराला हे नाव मिळाले आहे. या स्कूलचे पहिले ख्रिश्चन कमांडंट ब्रिगेडियर ए.एफ. युजीन यांच्या नेतृत्वाखाली फेब्रुवारी १९६६ मध्ये उभारलेल्या या मंदिराची रचना एक धाडसी आणि आधुनिक दृष्टिकोन दर्शवते. अमेरिकन वास्तुशास्त्रज्ञ बकमिनस्टर फुलर यांनी प्रसिद्ध केलेल्या जिओडेसिक घुमटाच्या संकल्पनेवर आधारित अॅल्युमिनियमच्या पत्र्यांचा वापर करून बांधलेले हे मंदिर आपल्या नाविन्यपूर्ण रचना आणि प्रतीकात्मकतेच्या समन्वयासाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरते. ईएमईच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच, तोफांची जोडी भेट देणाऱ्यांचे स्वागत करते, आणि त्यानंतर पार्किंग क्षेत्राजवळ एक रणगाडा (टँक) तैनात असलेला दिसतो. थोडे पुढे चालून गेल्यावर मंदिराचे लक्षवेधी प्रवेशद्वार लागते, ज्याच्या दोन्ही बाजूंना भगवान शिवाच्या उभ्या मूर्ती आहेत आणि वरच्या बाजूला नंदीचे नक्षीकाम केलेले शिल्प आहे. मध्यभागी असलेल्या कोनाड्यात बाल गणेशाला कडेवर घेतलेली शिव आणि पार्वती यांची अत्यंत सुंदर मूर्ती विराजमान आहे. प्रवेशद्वाराच्या अगदी पलीकडे, दगडाच्या शिळा असलेली आयताकृती द्वारे भाविकांचे अंगणात स्वागत करतात, जिथे सुंदर बागा आणि उंचच उंच झाडे आहेत. यामध्ये सात वडाची झाडे आहेत, ज्यांपैकी प्रत्येकाला सप्तर्षी आणि त्यांच्या धर्मपत्नींचे प्रतीकात्मक नाव देण्यात आले आहे.

मंदिर परिसरात ६ व्या ते १६ व्या शतकातील १०८ प्राचीन शिल्पे आहेत, ज्यांमध्ये सूर्यदेव आणि ब्रह्मदेवाच्या उल्लेखनीय मूर्ती विशेष लक्षवेधी आहेत.

७५ x ७५ फूट आकाराच्या पीठावर (चबुतऱ्यावर) वसलेल्या या मंदिरात जिओडेसिक घुमट शैलीत बांधलेला सभामंडप आणि गर्भगृहावर ७० फूट उंच शिखर आहे. लोखंडी कमानी आणि अॅल्युमिनियमने आच्छादलेल्या लाकडी चौकटींपासून बनवलेला हा घुमट पाच लोखंडी खांबांवर पेललेला असून तो दणकटपणा आणि सौंदर्याचा उत्तम मिलाफ आहे. लोखंडी चौकटीतील शिखरही अॅल्युमिनियमने मढवलेले असून, ते त्याच्या भविष्याभिमुख रूपाला अधिकच खुलवते. सर्वधर्मसमभावाची भावना या मंदिराच्या रचनेतच सामावलेली आहे. घुमटावरील कलश हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करतो, तर घुमट स्वतः इस्लामिक वास्तुकलेचे तत्व दर्शवतो. घुमटाजवळील २२ मीटर उंच मनोरा ख्रिश्चन धर्माचे प्रतीक आहे, ज्याच्या शिखरावर बौद्ध धर्माचे प्रतिनिधित्व करणारी सुवर्ण रचना आहे. कमानीदार प्रवेशद्वार जैन परंपरेचे प्रतिबिंब आहे आणि मंदिरातील पवित्र अग्नि पारशी श्रद्धा दर्शवतो. हा वास्तुकलेचा मेळ या घुमटाला भारताच्या धर्मनिरपेक्ष आत्म्याचे एक अप्रतिम प्रतीक बनवतो. आतमध्ये, एकाच वेळी शेकडो भाविक या विशाल सभामंडपात एकत्र येऊ शकतात.

गर्भगृहात, संगमरवरी पीठावर काळ्या दगडातील दक्षिणामूर्तीची मूर्ती अत्यंत भव्य रूपात विराजमान आहे. हातात सर्प धारण केलेल्या आणि आशीर्वादाच्या मुद्रेतील चतुर्भुज देव, अज्ञानाचे प्रतीक असलेल्या असुरावर उभे असल्याचे दर्शवले आहे. मंदिराने ५ फेब्रुवारी २०१६ रोजी पूजा आणि हवनांसह आपला ५० वा वर्धापन दिन साजरा केला. तथापि, हिंदू पंचांगानुसार मुख्य भव्य सोहळा २२ फेब्रुवारी २०१६ रोजी आयोजित करण्यात आला होता. त्या दिवशी, वडोदरा येथील राजघराण्यातील सदस्य आणि मान्यवरांच्या उपस्थितीत, मूर्तीचा विधीवत जलाभिषेक करण्यात आला आणि नंदी, मत्स्य व हिंदू चिन्हे कोरलेली ५.८ किलो वजनाची चांदीची प्रभावळ मूर्तीला अर्पण करण्यात आली. प्रभावळीच्या शिरोभागावर “ॐ नमः शिवाय” हे शब्द कोरलेले आहेत. मूर्तीच्या दोन्ही बाजूंना महाबलीपुरम येथून आणलेल्या गणेश आणि कार्तिकेयाच्या मूर्ती आहेत, तर समोर काळ्या दगडातील शिवलिंग स्थापित आहे. भगवान विष्णू आणि भगवान श्रीरामाच्या मूर्तीही गर्भगृहाची शोभा वाढवतात.

मुख्य मंदिराभोवती सिद्धिविनायक, राधा-कृष्ण, दुर्गा माता, साईबाबा, श्री राम-सीता-लक्ष्मण आणि हनुमान यांना समर्पित छोटी मंदिरे, तसेच गौतम बुद्धांची शांत आणि प्रसन्न मूर्ती आहे. अमरनाथ गुहेच्या छोट्या प्रतिकृतीत बर्फाचे शिवलिंग आणि कैलास पर्वतावर ध्यानावस्थेतील भगवान शिवाची मूर्ती स्थापित आहे. मंदिर परिसरात एक नवग्रह मंदिरही आहे. सुरुवातीला, नवग्रहांच्या मूर्ती एका उघड्या जागेत झाडाखाली ठेवण्यात आल्या होत्या. ३ नोव्हेंबर २०२२ रोजी ईएमई स्कूलचे ३२ वे कमांडंट म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर, मेजर जनरल नीरज वशिष्ठ यांच्या हे लक्षात आले आणि त्यांनी या मूर्तींच्या स्थापनेसाठी नवीन मंदिर बांधण्याचा उपक्रम सुरू केला. हे नवीन नवग्रह मंदिर काही महिन्यांत पूर्ण झाले आणि २०२३ मध्ये रामनवमीच्या दिवशी त्याचे उद्घाटन करण्यात आले. संगमरवरी चबुतरा आणि ही इमारत १९६४ मधील मूळ डिझाइन टीमचे सदस्य असलेल्या ८३ वर्षीय रतीभाई मिस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली बांधण्यात आली. मंदिरात शनिदेवाचे स्थान आणि भगवान विश्वकर्मा यांना समर्पित लाल दगडाची छत्री देखील आहे, तसेच काही सुशोभित कारंजेही आहेत.

ईएमई मंदिर दररोज सकाळी ६:३० ते रात्री ८:३० या वेळेत उघडे असते. भाविक रोज सकाळी आणि संध्याकाळी होणाऱ्या नियमित पूजा आणि आरतीचा लाभ घेऊ शकतात. दर मंगळवारी सायंकाळी ६:३० वाजता विशेष आरती होते, ज्यासाठी अनेक भाविक उपस्थित राहतात. प्रमुख हिंदू सणांदरम्यान मंदिर परिसर भक्तिमय उत्सवाने ओसंडून वाहतो. महाशिवरात्री आणि जन्माष्टमीसारख्या प्रसंगी शेकडो भाविक येथे दर्शन घेण्यासाठी आणि उत्सवात सहभागी होण्यासाठी जमतात. संवेदनशील लष्करी क्षेत्र असल्यामुळे परिसरात प्रवेश करण्यासाठी आधार कार्डसारखे वैध फोटो ओळखपत्र आवश्यक आहे आणि छायाचित्रणाला सक्त मनाई आहे.

मुख्य वैशिष्ट्ये :

  • वडोदरा रेल्वे स्टेशनपासून ५ किमी अंतरावर स्थित
  • राज्य परिवहन, ट्रेन आणि खाजगी वाहनांद्वारे सुलभतेने पोहोचता येते
  • मंदिराच्या पार्किंग क्षेत्रापर्यंत खाजगी वाहनांना परवानगी
  • जवळच राहण्याचे आणि जेवणाचे अनेक पर्याय उपलब्ध
Back To Home