एकवीरा देवी मंदिर


कार्ला-लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे

पुणे जिल्ह्यातील लोणावळा परिसरात, सह्याद्रीच्या रांगांमध्ये वेहेरगाव कार्ला येथील डोंगरावर, राज्यात प्रसिद्ध असलेले एकवीरा देवीचे पुरातन मंदिर आहे. एकवीरा आईच्या या स्थानाशेजारी प्रसिद्ध कार्ला लेणी आहेत. पुरातत्त्व विभागाने हे सांस्कृतिक वारसा स्थळ म्हणून संरक्षित केले आहे. देशातील सर्वात मोठे बौद्ध चैत्यगृह असलेल्या या लेण्यांची निर्मिती प्राचीन काळातील आहे. महाराष्ट्रातील आगरी-कोळी बांधवांची कुलस्वामिनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या देवस्थानचा इतिहास पांडवकाळापासूनचा असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.

एकवीरा देवीचे येथील स्थान अत्यंत प्राचीन आहे. या मंदिराला लागून असलेली प्रसिद्ध बौद्ध लेणी इसवी सन पूर्व १६० च्या कालखंडातील आहेत. पुरातत्त्व विभागाने या संपूर्ण परिसराला संरक्षित सांस्कृतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. प्राचीन काळी हा प्रदेश ‘वलुरक’ या नावाने ओळखला जात असे. त्याकाळी हा भाग कोकण व देश यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या व्यापारी मार्गावर होता. सातवाहन काळातील शिलालेखांमध्ये या लेण्यांचा उल्लेख आढळतो आणि याच लेण्यांच्या परिसरात देवीचे मंदिर स्थित आहे. ऐतिहासिक संदर्भांनुसार, मध्ययुगीन काळात या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केला. इसवी सन १८६६ मध्ये देखील या मंदिराच्या बांधकामात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले होते. ऐतिहासिक महत्त्वाच्या बोर घाटाजवळ हे मंदिर असल्यामुळे अनेक राज्यकर्त्यांनी आणि व्यापाऱ्यांनी वेळोवेळी या देवस्थानच्या विकासात योगदान दिले आहे.

‘मत्स्य पुराणा’तील तेराव्या अध्यायात देवीच्या १०८ नावांची आणि तिच्या पवित्र स्थानांची माहिती दिलेली आहे. या अध्यायातील चाळीसाव्या श्लोकात एकवीरा देवीचा उल्लेख येतो.
रुद्राणी रुद्रकोट्यां तु विशालाक्षी तु वाराणसी |
पुष्पावती गयायां तु एकवीरा सहाद्रिके ||
रुद्रकोटी येथील रुद्राणी, वाराणसीतील विशालाक्षी, गयेतील पुष्पावती आणि सह्याद्री पर्वतावरील एकवीरा देवी असा या श्लोकाचा अर्थ होतो. हा उल्लेख कार्ला येथील देवी मंदिराच्या प्राचीनतेला पौराणिक आधार देतो आणि सह्याद्रीमध्ये वसलेल्या या स्थानाचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करतो. मत्स्य पुराणातील हा ‘सह्याद्रिके’ शब्द थेट कार्ला लेण्यांच्या परिसराशी संबंधित आहे. हा श्लोक या मंदिराची प्राचीनता दर्शवणारा एक भक्कम धार्मिक पुरावा मानला जातो. पुराणातील या उल्लेखांमुळेच एकवीरा देवीचे हे स्थान महाराष्ट्रातील कोळी-आगरी बांधवांचे कुलदैवत असण्यासोबतच ते संपूर्ण भारतातील एक प्रमुख शक्तीपीठ म्हणून नावारूपास आले आहे.

प्रबोधनकार ठाकरे यांनी ‘माझी जीवनगाथा’ या त्यांच्या आत्मचरित्रात केलेले वर्णन असे की आई एकवीरा ही आगरी, कोळी आणि सीकेपी समाजाची कुलस्वामिनी आहे. या देवीची दरवर्षी चैत्र महिन्यात मोठी जत्रा भरते. या जत्रेला मुंबई-कोकणातील कोळी समाज मोठ्या उत्साहाने येतो. पालखीचा सोहळा आणि कोळीगीते यांनी तो सारा डोंगर दणाणून जातो. आई एकवीरेचे रूप अत्यंत तेजस्वी आणि शांत आहे. देवीच्या गर्भगृहात एक वेगळीच प्रसन्नता जाणवते. हे स्थान अत्यंत जागृत आहे आणि देवी भक्तांच्या हाकेला देवी धावून येते, अशी आमची दृढ श्रद्धा आहे. आमच्या वडिलांची या देवीवर अढळ निष्ठा होती आणि त्यांच्यामुळेच आम्हालाही या देवस्थानाबद्दल आदर आणि भक्तीची शिकवण मिळाली. कार्ल्याचा तो डोंगर, ती प्राचीन लेणी आणि तिथे वसलेली आमची आई एकवीरा, हे आमच्या जीवनातील एक महत्त्वाचे प्रेरणास्थान आहे.

‘द इंडियन एनसायक्लोपीडिया’ या मूळ इंग्रजी विश्वकोशातही कार्ला लेणी आणि त्या सान्निध्यात असलेल्या एकवीरा देवी मंदिराचा उल्लेख आहे. तो असा की कार्ला हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यापासून जवळ आहे आणि तेथील प्राचीन लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. या लेण्यांच्या समूहामध्ये भारताचे सर्वात मोठे आणि जतन केलेले ‘चैत्यगृह’ आहे. त्याचा काळ साधारणतः इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकापासूनचा मानला जातो. याच चैत्यगृहाच्या अगदी प्रवेशद्वाराजवळ देवी एकवीरा हिचे मंदिर आहे. हे मंदिर ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे आणि बौद्ध लेण्यांच्या उपस्थितीत हिंदू देवीचे हे स्थान भारतीय धार्मिक सहिष्णुतेचा पुरावा देते. सातवाहन काळात या लेण्यांची निर्मिती झाली असून त्याच कालखंडापासून या परिसराचा धार्मिक आणि व्यापारी वापर सुरू होता.

एकविरा देवीची आख्यायिका अशी की वनवासात असताना पांडव या डोंगरावर आले होते. तेव्हा आई एकवीरा देवीने त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले आणि त्यांची परीक्षा घेण्यासाठी तिने या ठिकाणी मंदिर बांधण्याची इच्छा प्रकट केली. मात्र हे कार्य एका रात्रीत करावे लागेल, अशी अटही घातली. एवढ्या उंच आणि अवघड डोंगरावर एका रात्रीत मंदिर बांधणे शक्य नव्हते. पण पांडवांनी हे आव्हान यशस्वीपणे पेलले आणि एकवीरा आईची इच्छा पूर्ण केली. त्यांची भक्ती पाहून आई एकवीरा प्रसन्न झाली आणि अज्ञातवासात तुम्हाला कोणीही ओळखू शकणार नाही, असा वर तिने पांडवांना दिला. त्या वरदानामुळे वनवासानंतरचा पांडवांचा अज्ञातवास यशस्वीपणे पूर्ण झाला.

पौराणिक कथेनुसार, पृथ्वीवरील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक म्हणजे रेणुका माता. आई एकवीरा ही या रेणुकामातेचेच रूप आहे. त्यातही रेणुका आणि एकवीरा या दोन्ही देवता मूळ पार्वतीचे अवतार आहेत. जमदग्नी ऋषी आणि रेणुका माता यांचा चिरंजीवी पुत्र म्हणजे परशुराम. या वीर परशुरामाची आई म्हणून तिचे नामकरण एकवीरा आहे, अशी या नावामागची कथा सांगितली जाते. सामाजिक आणि सांस्कृतिक अभ्यासकांच्या मते आई एकवीरा ही प्रामुख्याने कोळी, आगरी, कुणबी यांसारख्या बहुजनांचे कुलदैवत असल्यामुळे हिंदू धर्मातील आदिदेवतांपैकी ती एक आहे. काही प्रमाणात चांद्रसेनीय कायस्थ प्रभू अर्थात सीकेपी, दैवज्ञ ब्राह्मण या समाजातील लोकही तिला कुलदेवता मानतात.

जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर कार्ला गडाकडे जाणाऱ्या फाट्यावर मंदिराची पहिली स्वागत कमान आहे. या कमानीपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरावर देवीचे मंदिर आहे. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या वन विभागाच्या चौकीवर प्रवेश शुल्क देऊन खासगी वाहनधारकांना प्रवेश दिला जातो. येथून एक मार्ग डोंगरावर येतो तर दुसरा मार्ग देवीच्या पायथा मंदिरापाशी जातो. पायथा मंदिरासमोरही वाहनतळ आहे. मंदिराच्या परिसरात पूजा साहित्य, खेळणी, खाद्यपदार्थ इत्यादी वस्तूंची शेकडो दुकाने आहेत. बऱ्याच दुकानांत आगरी-कोळी संस्कृतीची ओळख असलेल्या गोंड्याच्या टोप्या विक्रीसाठी ठेवलेल्या असतात.

पायथा मंदिराचा अलीकडील काळात जीर्णोद्धार करण्यात आला आहे. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. येथील गर्भगृहात वज्रपीठावर देवीची उभ्या स्थितीतील पाषाण मूर्ती आहे. देवीच्या हातात शस्त्र व पायाजवळ देवीचे वाहन कोंबड्याचे शिल्प आहे. विविध वस्त्रे व अलंकार ल्यालेल्या या देवीला चांदीचा मुखवटा लावला आहे. पायथा मंदिराच्या बाजूने डोंगरावर असलेल्या मुख्य मंदिराकडे येण्यासाठी पायरीमार्ग आहे. येथून सुमारे दीडशे पायऱ्या चढल्यावर डावीकडे पाचपायरी पादुका मंदिर आहे. या मंदिराच्या गर्भगृहात देवीची शिळा स्वरूपातील स्वयंभू मूर्ती आहे. याच शिळेवर देवीची पावले उमटली आहेत, असे सांगितले जाते.

येथून पुढे पायरीमार्गाच्या दुतर्फा पूजा साहित्याची दुकाने आहेत. पायरी मार्गाच्या शेवटी प्रांगण व प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारात उजव्या बाजूला पुरातत्व विभागाचे तिकीटघर आहे. येथील चैत्यगृहात प्रवेश मिळण्यासाठी हे तिकीट आवश्यक असते. मंदिरात दर्शनाला जाण्यासाठी तिकिटाची गरज पडत नाही. प्रांगणास डाव्या बाजूला डोंगराची नैसर्गिक तटबंदी लाभली आहे आणि या डोंगरात प्राचीन लेणी आहेत. उजव्या बाजूला कोरीव पाषाणाची तटबंदी आहे. प्रांगणात तिकीट घराच्या पुढे उजव्या बाजूला जकातीचा रांजण आहे. येथेच प्राचीन लेण्यांचा इतिहास सांगणारा माहितीफलक लावलेला आहे.

मंदिराच्या प्रांगणात एक प्राचीन शमीचे झाड आहे. या वृक्षाखालील शमीदेवतेचे मंदिर आहे आणि ते देशातील शमीदेवतेचे एकमेव मंदिर असल्याचे सांगितले जाते. विजयादशमीच्या दिवशी या वृक्षाची पूजा करण्यासाठी हजारो भाविक येथे येतात. मुख्य मंदिराच्या रांगमंडपासमोर बाबाजी महाराज यांचे कोरीव पाषाणात बांधलेले लहानसे समाधी मंदिर आहे. मंदिरात महाराजांच्या समाधीचा चौथरा आहे. समाधी मंदिरासमोर चौथऱ्यावर दीपस्तंभ आहे. दीपस्तंभापुढे दुमजली प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराचा खालील मजला कोरीव पाषाणात बांधलेला आहे व वरील मजल्याचे बांधकाम जुन्या विटांचे आहे. प्रवेशद्वाराच्या आत दोन्ही बाजूंना पहारेकरी कक्ष आहेत. प्रवेशद्वाराच्या वरील मजल्यावर जिथे पूर्वी नगारखाना होता तेथे सध्या पोलीस नियंत्रण कक्ष आहे.

बाबाजी समाधी मंदिराच्या डावीकडे रांगमंडप आहे. लोखंडी संरचनेच्या रांगमंडपावर पत्र्याचे छत आहे. देवीचे मंदिर उंच अधिष्ठानावर आहे. सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मंदिराला सिमेंट गिलावा केलेला असला तरी मूळ मंदिर कोरीव पाषाणात बांधलेले आहे. सभामंडपास समोर, डाव्या व उजव्या बाजूने प्रत्येकी एक प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारांत ललाटबिंबांवर गणपती शिल्पे आहेत. सभामंडपात जमिनीवर मध्यभागी कासवशिल्प आहे. गर्भगृहाचे प्रवेशद्वार सभामंडपापेक्षा उंचावर आहे. गर्भगृहात मागील भिंतीला लागून एकवीरा देवीची स्वयंभू पाषाण मूर्ती आहे आणि उजव्या भिंतीस लागून जोगेश्वरी देवीची स्वयंभू पाषाण मूर्ती आहे. नक्षीदार चांदीच्या मखरात विराजमान असलेल्या या देवी विविध वस्त्रे व अलंकार ल्यालेल्या आहेत. गर्भगृहाच्या आतील भिंती चांदीच्या नक्षीदार आवरणाने मढवलेल्या आहेत. मंदिरावर चारही बाजूंनी उतरते चौकोनी छत आहे. छतावर शीर्षभागी एकावर एक असे दोन आमलक व त्यावर कळस आणि ध्वजपताका आहे. मंदिरासमोर उंच चौथऱ्यावर विरगळ शिल्पे आहेत.

मंदिराच्या उजव्या बाजूला भव्य चैत्यगृह आहे. चैत्यगृहासमोर अशोक स्तंभ आहे आणि स्तंभावर चार दिशांना चार सिंहशिल्पे आहेत. हे भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह आहे. चैत्यगृहाच्या प्रवेशद्वारात गजराज, सम्राट अशोक, त्यांच्या राण्या, बुद्ध, यक्ष, किन्नर इत्यादी शिल्पे आहेत. चैत्यगृहात दोन्ही बाजूने स्तंभ आहेत व प्रत्येक स्तंभावर दोन गजराज आणि गजराजांच्या पाठीवर स्त्री-पुरुषांची शिल्पे आहेत. छताला लाकडी तुळयांचा आधार आहे. चैत्यगृहात विशाल स्तूप आहे. डोंगरात काही अंतरावर आणखी काही लेणी आहेत. येथे बौद्धविहार आहे आणि संन्यासी व्यक्तींच्या राहण्यासाठी कक्ष आहेत.

चैत्र शुद्ध अष्टमी हा देवीचा वार्षिक जत्रोत्सव येथे उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक इत्यादी राज्यांतून लाखो भाविक देवीच्या दर्शनाला येतात. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी इत्यादी जिल्ह्यांतून व मुंबई, ठाणे शहरांतील प्रत्येक आगरी पाड्यातून व कोळीवाड्यातून देवीच्या भेटीला पालख्या येतात. यावेळी संपूर्ण कार्ला डोंगर ढोल-ताशांच्या गजरात, बँजो आणि डीजेच्या आवाजात दुमदुमतो. गुलालाच्या उधळणीत डोंगर लालेलाल होतो. हजारोंच्या संख्येने कोंबड्या-बकऱ्यांचे बळी दिले जातात. चैत्र पौर्णिमा हा दिवस काठीची जत्रा म्हणून येथे साजरा केला जातो. यावेळी परिसरातील गावोगावातून सजवलेल्या काठ्या देवीच्या मंदिरात आणल्या जातात. शारदीय नवरात्री हा उत्सव येथे भक्तिभावाने साजरा केला जातो. वर्षातील हे नऊ दिवस देवीचा डोंगर शाकाहार पाळतो. नवमीला शतचंडी यज्ञ केला जातो. यावेळी यज्ञात आहुती टाकण्यासाठी हजारो भाविक मंदिरात येतात. मंदिरात वर्षभर भाविकांची वर्दळ असते. दर रविवारी व सुट्टीच्या दिवशी मंदिर परिसरात मोठी गर्दी असते.

दररोज पहाटे ५ वाजता एकवीरा आईची पूजा सुरू होते. गुलाबजल, अत्तर, गोमूत्र शिंपडून मंदिर परिसर स्वच्छ, सुगंधित आणि पवित्र केला जातो. पहाटे ५.३० वाजता काकड आरती केली जाते. सकाळी ६.३० वाजता अभिषेक होतो. पौर्णिमा-अमावस्येच्या आदल्या दिवशी म्हणजेच चतुर्दशीला देवीला पंचामृताचा अभिषेक करून स्नान घातले जाते. सकाळी ६ ते रात्री ८.३० पर्यंत भाविकांना एकवीरा आईचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती

  • लोणावळा येथून ११ किमी अंतरावर
  • पुणे शहरापासून ५७ किमी अंतरावर
  • लोणावळा येथून कार्ला डोंगराच्या पायथ्यापर्यंत एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९२७२०९७४००
Back To Home