एकमुखी दत्त मंदिर

शेणगाव, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर

वेदगंगा ही पंचगंगेची उपनदी. ती भटवाडी (तांब्याची वाडी) येथे गायमुखातून उगम पावते. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील अनेक गावांना सुजलाम् सुफलाम् करत पुढे ती कृष्णा नदीला जाऊन मिळते. या नदीतीरावर वेद संस्कृतीची जोपासना झाली म्हणून ती वेदगंगा या नावाने ओळखली जाते. भुदरगड तालुक्यातील शेणगाव या ठिकाणी ही नदी दक्षिणाभिमुख वाहते. याच ठिकाणी नदीतीरावर वसलेले एकमुखी दत्त मंदिर प्रसिद्ध आहे. अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हे मंदिर दत्त महाराजांचे शयनस्थान असल्याची मान्यता आहे व ते वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामीच्या वास्तव्याने पावन झालेले आहे. या मंदिर आवाराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे सत्यवान-सावित्रीची मूर्ती असलेली देवळी आहे.

मंदिराबाबत आख्यायिका अशी की हुबळी येथील दत्तभक्त बाळंभटजी पैठणकर यांना दत्त महाराजांनी स्वप्नदृष्टांत देऊन आपले वास्तव्य वेदगंगा नदीच्या तीरावर शेणगाव येथे असल्याचे सांगितले. तेव्हा बाळंभटजी हुबळी येथून शेणगाव येथे आले. त्यांनी नदीतीरावर एकमुखी दत्त महाराजांची मूर्ती व पादुका स्वतः घडवून याच ठिकाणी देवालयाची स्थापना केली. त्यानंतर देवालयासमोर घाटाची निर्मिती केली. दत्त महाराज या ठिकाणी शयन करीत म्हणून गावाचे नाव शयनगाव पडले व त्याचा अपभ्रंश होऊन शेणगाव संबोधले जाऊ लागले. श्री टेंबे स्वामी नरसोबाच्या वाडीहून कोकणात जाताना या ठिकाणी विश्रांती घेत असत. अनेक सिद्ध पुरुषांच्या पदस्पर्शाने या ठिकाणचे माहात्म्य वृद्धिंगत झाले आहे. त्यामुळे या क्षेत्रास सिद्धतीर्थ म्हणूनही ओळखले जाते. सद्गुरू बाळूमामा यांना त्यांचे गुरू मुळे महाराजही येथेच भेटले, असे सांगितले जाते. या ठिकाणी नदी पात्रात शिवपिंडी असलेले पुरातन शिवमंदिर आहे. शिवपिंडीवरून वाहणाऱ्या पाण्यामुळे शेतात भरघोस उत्पादन येते, अशी भाविक व ग्रामस्थांची श्रद्धा आहे.

हे मंदिर सुमारे ५०० वर्षांपूर्वीचे असावे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गावाकडून मंदिराकडे जाताना मंदिराचे विस्तीर्ण प्रांगण नजरेस पडते. संपूर्ण प्रांगणात पेव्हर ब्लॉकची फरसबंदी असल्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात विशेष भर पडते. येथील झाडांना दगडी पार बांधलेले आहेत व येथे विविध धार्मिक विधी पार पाडले जातात. येथून काही पायऱ्या उतरून गर्भगृहाच्या बाजूने मंदिराच्या सभागृहाकडे जाता येते. जमिनीपासून काहीसे खाली असलेल्या या मंदिराचे प्रवेशद्वार नदीतीरावर असलेल्या घाटाच्या दिशेने आहे. घाटाकडून मंदिराकडे येताना दगडी पायऱ्या चढून यावे लागते. पायऱ्यांवर दोन्ही बाजूस तुलशी वृंदावन आहेत. येथील सभामंडप हा अर्धखुल्या स्वरूपाचा आहे. या सभामंडपाच्या मध्यभागी बंदिस्त स्वरूपाचे गर्भगृह आहे व सभामंडपातूनच त्याला प्रदक्षिणा घालता येते.
गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस शंकराची मूर्ती आहे. गर्भगृहात वज्रपीठावर एकमुखी दत्त महाराजांची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. या मूर्तीच्या मागे देवकोष्टकात कार्तिक स्वामींची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. गर्भगृहाच्या बाह्य भिंतींवर अनेक देवकोष्टके आहेत. त्यापैकी एकात खंडोबा, म्हाळसा व बानू यांच्या मूर्ती आहेत. दुसऱ्या देवकोष्टकात कार्तिक स्वामींची मूर्तीं आहे. या देव कोष्टकाच्या मागील भिंतीत मोठे छिद्र असून त्यातून गर्भगृहातील कार्तिक स्वामींच्या मूर्तीचे दर्शन होते. त्यापुढील देवकोष्टकात शनिदेव, महादेव व गणेश यांच्या मूर्ती आहेत. पुढील भिंतीत असलेल्या देवकोष्टकात गंगा व वेदगंगा यांचे स्थान आहे. त्यापुढील देवकोष्टकात विठ्ठल-रखुमाई आणि गरुड-हनुमंत यांच्या मूर्तीं आहेत. पुढे सभागृहातच रामपंचायतन मंदिर आहे. यामध्ये वज्रपीठावर श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमान यांच्यासह स्थानिक लोकदेवतांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत.

मंदिराच्या छताकडील भिंतींना कठडे असून मध्यभागी अष्टकोनी शिखर आहे. शिखराच्या आठ बाजूंना कमळ फुलांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. शिखरावर वरच्या बाजूसही कमळ फुलांची प्रतिकृती आहे आणि त्यावर आमलक व कळस आहे. मंदिरासमोरून नदीत उतरण्यासाठी दगडी पायऱ्या असलेला विस्तीर्ण घाट आहे. पायऱ्यांच्या पुढे आप्पाजी नारायण पाटील यांनी इ.स. १८९६ मध्ये या घाटाची निर्मिती केल्याचा उल्लेख असलेला शिलालेख आहे. या मंदिराच्या एका बाजूला असलेल्या प्राचीन वडाच्या झाडाखाली वटसावित्रीची लहानशी देवळी आहे. या देवळीच्या दोन बाजूला द्वारपाल व आतमध्ये सत्यवान-सावित्रीची मूर्ती आहे. सत्यवानाचा पार्थिव देह मांडीवर घेऊन बसलेली सावित्री अशी ही काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. याशिवाय आणखी एका लहानशा मंदिरात अनेक पादुका आहेत.

मंदिरात चैत्र पाडवा, दसरा, दिवाळी, दत्त जयंती, गुरुद्वादशी तसेच त्रिपुरारी पौर्णिमा व कार्तिकी स्वामी जयंती आदी वार्षिक उत्सव साजरे होतात. वार्षिक उत्सवावेळी शेकडो भाविक मंदिरात दर्शनासाठी येतात. मंदिरात दत्त पूजन, गुरु लीलामृत ग्रंथ पारायण, भजन, कीर्तन, प्रवचन, जागरण, नामस्मरण आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावेळी आलेल्या भाविकांसाठी महाप्रसाद दिला जातो. दर गुरुवारी व पौर्णिमेस येथे भाविकांची जास्त गर्दी असते. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी ६.३० पासून ७.३० वाजेपर्यंत अभिषेक व आरती होते. सकाळी १०.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत आलेल्या भाविकांना महाप्रसाद दिला जातो. दुपारी २ ते ५ या वेळेत भजन व सायंकाळी ७ ते ८ या वेळेत आरती व पालखी प्रदक्षिणा असे कार्यक्रम पार पडतात.

उपयुक्त माहिती

  • भुदरगडपासून १० किमी, तर कोल्हापूरपासून ५८ किमी अंतरावर
  • भुदरगड येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Back To Home