एकमुखी दत्त मंदिर

दत्तशिखर देवस्थान, ता. माहूर, जि. नांदेड

नांदेड जिल्ह्यातील माहूर हे ठिकाण महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या रेणुका मातेच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, याच पवित्र भूमीवर श्रीदत्तात्रेयांचे अत्यंत जागृत आणि प्राचीन स्थान आहे, जे दत्तशिखर म्हणून ओळखले जाते. दत्त संप्रदायात या स्थानाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘काशीला स्नान, कोल्हापूरला भिक्षा आणि माहूरला शयन’, असा श्रीदत्तात्रेयांचा नित्यक्रम मानला जातो. म्हणजेच, दिवसभर कोठेही असले तरी रात्री विश्रांतीसाठी दत्त महाराज माहूरगडावर येतात, अशी मान्यता आहे. त्यामुळे येथील रात्रीच्या ‘शयन आरती’ला आणि सेवेला विशेष महत्त्व आहे.

अत्रि ऋषी आणि माता अनसूया यांच्या तपाचे फळ म्हणून साक्षात श्रीदत्तात्रेयांचा जन्म याच गडावर झाला, अशी भाविकांची श्रद्धा आहे. येथील दत्त मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथील एकमुखी मूर्ती. साधारणपणे सर्वत्र श्रीदत्तात्रेयांची त्रिमुखी (ब्रह्मा, विष्णू, महेश) रूपे असतात, परंतु येथील श्रीदत्तात्रेय हे परब्रह्म स्वरूपात, म्हणजेच एकमुखी रूपात विराजित आहेत. हे रूप अद्वैत आणि ज्ञानमार्गाचे प्रतीक मानले जाते.

हे मंदिर महंत मुकुंद स्वामी यांनी इ.स. १२९७ मध्ये बांधल्याचे सांगितले जाते. औरंगजेबाने या मंदिरास चाळीस हजार रुपये देणगी दिली होती, असे उल्लेख जुन्या दस्तऐवजांमध्ये आढळतात. मार्कंडेय पुराणातील सतराव्या व अठराव्या अध्यायात श्रीदत्तात्रेयांचा उल्लेख आहे. इसवीसनाच्या पाचव्या शतकापासून दत्तसंप्रदाय अस्तित्वात असल्याचे पुरावे सापडतात. दत्तात्रेयांचे पिता अत्रि ऋषी हे ऋग्वेदातील पाचव्या मंडळातील ऋचांचे रचयिते आहेत. म्हणूनच श्रीदत्त संप्रदायाचा उगमकाळ वेदकाळापर्यंत पोहोचतो. या देवस्थानाच्या ठिकाणी श्रीदत्तात्रेयांचा अखंड वास आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

हे मंदिर समुद्रसपाटीपासून १९०० फूट उंचीवर वसलेले आहे. पायथ्यापासून मंदिरापर्यंत येण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत. पक्क्या सडकेने खाजगी वाहने थेट मंदिरापर्यंत येऊ शकतात किंवा पायरी मार्गाने पायी येता येते. कोरीव पाषाणात बांधलेला पायरी मार्ग सुमारे वीस फूट रुंद आहे. त्याच्या दोन्ही बाजूला पाषाणात बांधलेले सुरक्षा कठडे आहेत. पायरी मार्गाच्या प्रारंभी डाव्या बाजूला पिंपळवृक्ष आणि उजवीकडे महादेवाचे मंदिर आहे.

मंदिरासमोर असलेल्या मैदानात प्रशस्त वाहनतळ आहे. या परिसरात भारती महंतांच्या अनेक प्राचीन समाध्या आहेत. प्रांगणात खाद्य पदार्थ, पूजा साहित्य व इतर वस्तूंची दुकाने तसेच अन्नछत्राची प्रशस्त इमारत आहे. दररोज सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत येथे महाप्रसादाचे वाटप होते. प्रांगणात हेमाडपंती शैलीचे प्राचीन चिंतामणी गणपती मंदिर आहे. येथील गणेशाची शेंदूर चर्चित पाषाण मूर्ती उजव्या सोंडेची आहे. या मंदिरापासून जवळच स्वतंत्र तटबंदीयुक्त कामाख्या देवीचे मंदिर आहे. या मंदिरासमोर स्थानिक देवतांची पाषाणे व शेंदूर चर्चित गणेश मूर्ती आहेत, तर मंदिरात वज्रपीठावर कामाख्या देवींची काळ्या पाषाणातील मूर्ती विराजमान आहे. दत्त मंदिराच्या समोर पाहुणा मारुतीचे मंदिर आहे. याबाबत अशी आख्यायिका आहे की एकदा मारुती श्रीदत्तात्रेयांना भेटायला संध्याकाळच्या वेळी आला होते. त्यांची भेट होईपर्यंत रात्र झाली. तेव्हा श्रीदत्तात्रेयांनी मारुतीला येथेच थांबण्याचा आग्रह केला, त्यामुळे मारुती कायमस्वरुपी येथेच स्थिरावला.

मुख्य मंदिराभोवती भक्कम तटबंदी आहे. तटबंदीतील दुमजली प्रवेशद्वारासमोर एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले सहा नक्षीदार स्तंभ असलेला मुखमंडप आहे. प्रवेशद्वाराच्या वरील मजल्यावर नगारखाना तर प्रवेशद्वारास लाकडी झडपा व दिंडी दरवाजा आहे. आतमध्ये दोन्ही बाजूला पहारेकरी कक्ष आहेत. तटबंदीच्या आत मंदिरासमोर डावीकडे अष्टकोनी दीपमाळ आणि बाजूला निळकंठेश्वर मंदिर आहे. या मंदिरात मध्यभागी जमिनीवर शिवपिंडी आहे. मंदिराच्या तिन्ही दिशेच्या भिंतीत असलेल्या देवकोष्टकांमध्ये गणेश, हनुमान व पार्वती यांच्या मूर्ती आहेत. निळकंठेश्वर मंदिराला लागून काळभैरव, भटकभैरव, हरिहरेश्वर इत्यादी मंदिरे आहेत. या सर्व मंदिरांच्या प्रवेशद्वारावर द्वारपाल शिल्पे कोरलेली आहेत. याच ठिकाणी त्रिमुखी दत्तात्रेयाचे मंदिर, अखंड धुनी, काही नंदी मूर्ती व शिवपिंडी देखील आहेत. येथेच प्रथम महंत सिद्धजी भारती महाराज यांची समाधी आहे. समाधीवर त्यांचे आयुष्यमान सन ७५९ ते १२५९ असे पाचशे वर्षांचे असल्याचे लिहिलेले आहे. येथील धुनीबाबत अशी आख्यायिका आहे की त्रेतायुगात पिंगलनाग नावाच्या ऋषींनी येथे तपश्चर्या करून दत्तदर्शन प्राप्त करून घेतले होते. त्यावेळी पेटविलेली ही धुनी अद्याप तेवत आहे. समाधीच्या बाजूला एक वृक्ष आहे. हा वृक्ष म्हणजे सिद्धजी महाराजांची काठी असल्याचे सांगितले जाते. महाराजांनी शुष्क काठी जमिनीत रोवल्यानंतर त्यातून हा वृक्ष बहरला अशी धारणा आहे. त्यापुढे इतर महंतांच्या समाधी आहेत.

सभामंडप, मुख्य सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मुख्य मंदिराची संरचना आहे. बाहेरचा सभामंडप अलीकडील काळात मुख्य सभामंडपाला जोडून बांधण्यात आला आहे. या अर्धखुल्या स्वरूपाच्या सभामंडपात डाव्या व उजव्या बाजूला प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत. सभामंडपात मध्यभागी चार नक्षीदार गोलाकार स्तंभांची आणखी एक रांग आहे. बंदिस्त स्वरूपाच्या मुख्य सभामंडपात नक्षीदार स्तंभांवर अर्धचंद्राकार कमानी आणि प्रत्येक चार स्तंभांमधील वितान (छत) घुमटाकार आहे. स्तंभांच्या शीर्षभागी कणी आणि त्यावरील हस्तांवर नागशिल्पे आहेत. मुख्य सभामंडपात उजव्या बाजूला महंतांचे परंपरागत आसन आहे. येथील देवकोष्टकांत गणपतीसह इतर देवी-देवतांच्या मूर्ती आहेत. अंतराळाच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला पंचमुखी शिवपिंडी, तर डावीकडे ऋषी अत्रि, माता अनसूया, श्रीदत्तात्रेय व अनघादेवी यांच्या मूर्ती आहेत. मुख्य सभामंडपात अंतराळाच्या प्रवेशद्वारासमोर नंदी आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन नक्षीदार स्तंभ व त्यावर तोरण आहे. अंतराळाचे व गर्भगृहाचे प्रवेशद्वार रजतपटल (चांदीने) आच्छादित आहे. त्यावर विविध प्रकारची नक्षी कोरलेली आहे. गर्भगृहाच्या द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी व ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. उत्तरांगावर शिखरशिल्पांचे तोरण आहे. गर्भगृहातील पिंडीवर श्रीदत्तात्रेयांचा चांदीचा मुखवटा आहे. हे श्रीदत्तात्रेयांचे मुख्य स्थान असल्याचे सांगितले जाते. गर्भगृहाच्या छतावर पिरॅमिड आकाराचे आणि उतरत्या पायऱ्यांची रचना असलेले चौकोनी शिखर आहे. शिखरावर काही अस्पष्ट शिल्पे व उरूशृंगी शिखरे आहेत. मुख्य शिखराच्या शीर्षभागी स्तूपिका व कळस आहे.

श्रीदत्त जयंती हा येथील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या उत्सवाच्या निमित्ताने हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. याशिवाय श्रावण मास, शारदीय नवरात्र, दसरा, दिवाळी, कोजागिरी पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा आदी सर्व सण व उत्सव मंदिरात साजरे केले जातात. श्रावण महिना आणि दत्त जयंतीच्या उत्सवात येथे भाविकांचा अथांग सागर लोटतो. गुरुवार, पौर्णिमा, अमावस्या यांसारख्या दिवशीही मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. दररोज सकाळी ६.३० पासून सायंकाळी ७.३० पर्यंत या मंदिरात भाविकांना देवदर्शन करता येते.

उपयुक्त माहिती:

  • माहूर येथून ६ किमी अंतरावर
  • नांदेड येथून १३१ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून माहूरसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • माहूर गड व परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय

एकमुखी दत्त मंदिर

दत्तशिखर देवस्थान, ताल. महुर, जिला. नांदेड़

Back To Home