द्वारकाधीश मंदिर

सुंदरबाग, काळबादेवी, मुंबई

काळबादेवी हा मुंबईतील एक समृद्ध ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारसा जपणारा तसेच गर्दीने गजबजलेला परिसर आहे. येथील काळबादेवी मार्गावर रामवाडी आणि विठ्ठलवाडीनजीक ‘सुंदरबाग’ म्हणून सुपरिचित असलेल्या राजेशाही हवेलीमध्ये भगवान श्रीकृष्णाला समर्पित असलेले द्वारकाधीश मंदिर वसलेले आहे. दीडशे वर्षांपूर्वी एका धनाढ्य व्यापाऱ्याला पडलेल्या विलक्षण स्वप्नातून वास्तुकलेचा हा अप्रतिम आविष्कार येथे साकारला आहे. भगवान श्रीकृष्णाचे बालपण गोकुळात नंदाच्या राजवाड्यात गेले. त्या राजवाड्याला साजेसे असे हे मंदिर भाविकांसह मंदिर अभ्यासक आणि स्थापत्यकारांनाही आकर्षित करत आहे.

या मंदिराचा इतिहास ब्रिटिश कालखंडात सन १८७० नंतर वेगाने विकसित होत असलेल्या मुंबईच्या इतिहासाशी निगडित आहे. या कालावधीत दोन मोठ्या रेल्वे कंपन्यांनी नवीन रेल्वेमार्ग सुरू करून मुंबई बेट दूरदूरच्या ठिकाणांना जोडले होते. सागरी वाहतूक वाढली होती. व्यापारात वेगाने वृद्धी होत होती. सन १८६१ ते १८६५ दरम्यान झालेल्या अमेरिकन यादवी युद्धामुळे आणि कापसाचे भाव वाढल्यामुळे मुंबईतील कापड व्यापाराची भरभराट झाली होती. सन १८७० मध्ये मुंबईत दहा गिरण्या होत्या. त्यांची संख्या सन १८७५ मध्ये २७ वर गेली होती. या कापड व्यापाऱ्यांमध्ये तेव्हाचे एक अग्रेसर नाव शेठ मूलजी जेठा हे होते. मुंबईत आजही सुप्रसिद्ध असलेल्या आणि एकेकाळी आशियातील सर्वात मोठा कापड बाजार अशी ख्याती लाभलेल्या ‘मूलजी जेठा मार्केट’ची स्थापना याच जेठा परिवाराने सन १८७१ मध्ये केली होती. अशा या सधन व्यापाऱ्याच्या घरात जन्माला आलेल्या सुंदरदास जेठा यांनी त्या काळात येथे या मंदिर-हवेलीची निर्मिती केली.

या द्वारकानाथजी मंदिराची प्रतिष्ठापना ठक्कर मूलजी जेठा यांचे पुत्र सुंदरदास यांनी ज्येष्ठ शुद्ध अष्टमी, शुक्रवार, ११ जून १८७५ रोजी केली, असा स्पष्ट उल्लेख मंदिराच्या प्रवेशद्वारावरील शिलालेखात करण्यात आला आहे. “आ श्री द्वारकानाथजीनुं मंदिर ठक्कर मुलजी जेठा सुत सुंदरदासे बंधाव्यु छे. तेनी प्रतिष्ठा संवत् १९३१ ना जेष्ठ शु. ८ ने शुक्रवारे करी छे.” या मंदिर निर्माणाविषयी एक आख्यायिका सांगितली जाते. त्यानुसार, मूलजी जेठा यांनी गुजराती आणि मारवाडी व्यापाऱ्यांच्या सहकार्याने कापड मार्केट सुरू केले होते. त्यामुळे ते याच परिसरात विठ्ठलवाडी रोडवर राहात असत. काळबादेवी रोडवर त्यांनी एक जागा घेऊन ठेवली होती आणि तेथे नवीन घर बांधण्याची त्यांची योजना होती. त्या सुमारास एके रात्री मूलजी जेठा यांना भगवान श्रीकृष्णाने स्वप्नदृष्टान्त दिला. त्यांच्या घरात कुठेतरी श्रीकृष्णाची मूर्ती लपलेली असल्याचा संकेत त्यांना या स्वप्नात मिळाला. त्यावरून त्यांनी आपल्या घरामध्ये देवमूर्तीचा शोध सुरू केला. अखेर एका जिन्याखालील जुन्या लाकडी संदुकीमध्ये त्यांना ही मूर्ती सापडली. या दैवी संकेताने भारावलेल्या मूलजी यांच्या परिवाराने कृष्णासाठी भव्य मंदिर उभारण्याचा संकल्प केला. काळबादेवी रोडवर आपल्या निवासस्थानासाठी खरेदी करून ठेवलेल्या जागेवरच या मंदिराची उभारणी करण्याचे त्यांनी ठरवले. मूलजींचे सुपुत्र सुंदरदास यांनी सन १८७५ मध्ये तो संकल्प पूर्ण केला. मंदिरात त्या जुन्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि ते मंदिर सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले. हे मंदिर म्हणजे एक भव्य हवेली आहे. आजमितीला मुंबईत अस्तित्वात असलेली आणि कार्यरत असलेली ही सर्वात जुनी हवेली वास्तू मानली जाते. त्यामुळे मुंबईचे इतिहासकार आणि स्थापत्यशैली अभ्यासकांच्या दृष्टीने या वास्तूला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

शेकडो लहान व्यावसायिक गाळे, सोन्या-चांदीची दुकाने, कपड्यांची दुकाने आणि वाहनांचा गोंगाट अशा वातावरणात मुंबईच्या इतिहासाची ही वैभवशाली खूण येथे उभी आहे. गेल्या दीडशे वर्षांत वेळोवेळी या मंदिरात आवश्यकतेनुसार काही छोटे-मोठे बदल करण्यात आले. सन २०२४ मध्ये वास्तुविशारद धृती वैद्य यांनी या हवेली-मंदिराच्या संवर्धन आणि पुनरुज्जीवनाचे काम केले. त्यांनी येथील अनेक वर्षांपासून रंगाच्या थरांखाली दडलेले सागवानी स्तंभ, दरवाजे आणि बाल्कनीचे कठडे स्वच्छ केले. त्यांनी मंदिराची मूळ रंगशैली कायम ठेवून त्याच्या सौंदर्याला अधिक झळाळी दिली.

सन १८८९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘मुंबईचा वृत्तांत’ या पुस्तकात बाळकृष्ण बापू आचार्य आणि मोरो विनायक शिंगणे या लेखकद्वयाने मंदिराची माहिती दिली आहे. त्यातील वर्णनानुसार, “ह्या देवळात जाण्यास मुख्य दोन दरवाजे आहेत. एक पश्चिम बाजूस व दुसरा उत्तर बाजूस. पश्चिम बाजूच्या दरवाज्यावर रिद्धी-सिद्धीसहित गणपती कोरला असून वर मोठे घड्याळ आहे. बाह्य बाजूच्या उत्तर व पश्चिम बाजूस ऋषी, गोसावी, गवळणी, माकडे वगैरे नाना तऱ्हेची चित्रे कोरली आहेत. कोणी जपमाळ घेऊन बसला आहे, कोणी पोथी वाचीत आहे, कोणाच्या जटा वाढल्या आहेत त्या तो नीट करीत आहे, कोठे माकडे नाना तऱ्हेचे खेळ करीत आहेत, असे अनेक जातीचे कोरीव काम मोठे सुंदर केलेले आहे. आत शिरताच मोठा भव्य व विशाल असा सभामंडप दृष्टीस पडतो. ह्या सभामंडपाची जमीन संगमरवरी दगडांनी पिटलेली आहे… सभामंडपावर तीन बाजूंनी गॅलरी आहे व ह्या गॅलरीचे काम व खांबांचे काम मोठे नक्षीदार केले आहे… गाभाऱ्यात जाण्याचा दरवाजा रुपेरी मुलाम्याचा आहे. ह्या दरवाज्यावर श्रीकृष्ण असून त्याजवर दोन मनुष्यांनी छत्र धरलेले आहे असा देखावा दाखविला आहे. दरवाज्याच्या बाजूला जयविजय हे बसविले असून त्यांच्याच दोन्ही बाजूंना कोनाड्यासारखा आकार दाखवून तेथे गोपी हातात हात घालून फुगड्या घालीत आहेत असे दाखवून त्यांच्याखाली गाईंची चित्रे कोरली आहेत व त्यांच्याच बाजूस सारंगीवाला सारंगी व दुसऱ्या बाजूला तबलजी तबला वाजवीत आहेत असे दाखविले असून त्यांच्याहीवर अशीच तबलजी व सारंगीवाल्यांची चित्रे आहेत.”

“श्रीद्वारकानाथजीची मूर्ती काळ्या स्फटिकाची असून एका चौरंगासारख्या उंच चौथऱ्यावर बसविली आहे… बैठकीवर नेहमी रेशमी कपडा असतो. मूर्तीच्या चारही हातात शंख, चक्र, गदा व पद्म ही आयुधे आहेत. ही सर्व रुप्याची आहेत. ह्या मूर्तीच्या बाजूला लहान लहान तक्के ठेवलेले असतात. मूर्तीचा पोशाख नेहमी किनखापी असून पागोटे वल्लभपंथानुयायी महाराजांप्रमाणे असते…”

या मंदिराच्या स्थापनेनंतर १४ वर्षांनी केलेले हे मंदिरवर्णन आज १५१ वर्षांनंतरही जसेच्या तसे या मंदिराला लागू होते. मंदिराची वास्तू मोठी तसेच उंच दुमजली आहे. विख्यात वास्तुविशारद मुस्तंशिर दळवी यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईतील वसाहतकालीन ‘निओ-क्लासिक’, ‘निओ-गॉथिक’ आणि ‘इंडो-सारॅसेनिक’ आदी स्थापत्यशैलींना समांतर अशी ‘डोमेस्टिक व्हर्नाक्युलर’ (निवासी देशज) शैली त्या काळात आकारास येत होती. द्वारकाधीश मंदिरावर या देशज शैलीची मोठी छाप आहे. मंदिराच्या बाह्यभिंतींत अनेक खिडक्या आहेत. खिडक्यांच्या वर कोरलेल्या नक्षीदार कमानी, त्यांवरील कृष्णकन्हैयाच्या मूर्ती, तेथील स्तंभ, त्यांवरील वादकांच्या आणि सूरसुंदरींच्या मूर्ती, तसेच विविध ऋषींच्या प्रतिमांमुळे मंदिराच्या बाह्यभिंती अत्यंत देखण्या दिसतात. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस द्वारपालांची उंच शिल्पे आहेत. ही शिल्पे ईस्ट इंडिया कंपनीच्या सेवेतील ‘मिलिशिया’मधील सैनिकांप्रमाणे दिसतात. या प्रवेशद्वारातून पुढे काही फूट अंतरावरील सहा पायऱ्या चढून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. खिडक्यांमुळे प्रकाशमान असलेल्या या प्रशस्त सभामंडपात संगमरवरी फरसबंदी आहे. सभामंडपाच्या भिंतीपासून काही अंतरावर दोन्ही बाजूंना ‘कॉर्निथियन शैली’मधील सागवानी स्तंभ आहेत. या स्तंभांच्या वरच्या भागात गुलाबी, हिरव्या आणि गडद निळ्या साड्या परिधान केलेल्या सूरसुंदरींची सुंदर काष्ठशिल्पे आहेत. सभामंडपाच्या छतावर बिलोरी काचेची झुंबरे टांगली आहेत. सभामंडपाच्या भिंतीवर कृष्णाच्या जीवनचरित्रातील काही प्रसंगांची जलरंगातील, तसेच तैलरंगातील चित्रे लावलेली आहेत. समोर उंचच उंच दुमजली गर्भगृह आहे. याच्या खालच्या मजल्याच्या दर्शनी भिंतीवरील सुशोभित देवकोष्टकांमध्ये राधा-कृष्णाची चित्रे, तसेच त्यांवर कृष्णजीवनातील प्रसंगांची उठावशिल्पे आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना उंच स्तंभ आहेत आणि त्यावर द्वारपालांची उंच शिल्पे आहेत. या प्रवेशद्वारास रौप्य चौकट आणि दरवाजा आहे. या द्वारचौकटीवर खालच्या बाजूस द्वारपालांची शिल्पे कोरलेली आहेत. चौकटीच्या मंडारकावर अर्धचंद्रशिला व तिच्या दोन्ही बाजूंस कीर्तिमुखे आहेत. उत्तरांग भागात गोवर्धनगिरीधारी श्रीकृष्णाचे उठावशिल्प आहे. आत उंच वेदीवर द्वारकाधीशाची काळ्या स्फटिकातील वस्त्रालंकारांनी शृंगारलेली मूर्ती प्रतिष्ठापित आहे. येथील वेदीच्या पायऱ्यांवर चांदीत घडवलेल्या गायी तसेच अश्वांच्या मूर्ती आहेत.

या मंदिरात सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांना प्रवेश असतो. येथे विविध हिंदू सण-उत्सव साजरे केले जातात. कृष्णजन्माष्टमी हा येथील सर्वात मोठा उत्सव आहे. या उत्सवाच्या वेळी मंदिर विद्युत रोषणाई आणि पुष्पमाळांनी शृंगारले जाते. या सोहळ्यात परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात.

उपयुक्त माहिती

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकापासून ३ किमी अंतरावर
  • मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक व एसटी स्थानकापासून ३ किमी अंतरावर
  • शहरातील अनेक भागांतून बेस्ट बसची सुविधा उपलब्ध आहे
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • संपर्क: मंदिर कार्यालय, दूरध्वनी : ०२२ ६५८४४१८१
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत

द्वारकाधीश मंदिर

सुंदरबाग, कालबादेवी, मुंबई

Back To Home