महाराष्ट्रात खास दत्तभक्तीची परंपरा चालवणारा दत्तसंप्रदाय शेकडो वर्षे नांदत आहे. हिंदूंच्या महानुभाव, नाथ, वारकरी तसेच समर्थ आदी संप्रदायांतही दत्तात्रयाविषयी उत्कट श्रद्धाभाव आहे. पुराणे व अर्वाचीन पाच उपनिषदांतून दत्तास वर्णाश्रमधर्माची प्रतिष्ठा राखणारा, गुरुतत्त्वाचा आदर्श आणि योगाचा उपदेशक म्हटले आहे. धाराशिव तालुक्यातील रुईभर येथील दत्त मंदिर संस्थानात दत्तात्रयाची उपासना केली जाते. जिल्ह्यातील दत्त उपासकांबरोबर विविध संप्रदायांतील भाविक येथे मोठ्या प्रमाणावर दर्शनास येतात.
महाराष्ट्रात दत्तात्रयाची उपासना पुराणकाळापासून सुरू असली, तरी दत्तावतार श्रीनरसिंह सरस्वती यांच्यामुळे येथे दत्त संप्रदायाचा मोठ्या प्रमाणावर प्रचार-प्रसार झाला. नरसिंह सरस्वती यांचा काळ हा इ.स. १३७८ ते १४५८ असा आहे. ‘दत्त संप्रदायाचा इतिहास’ या रा. चिं. ढेरे यांच्या संशोधनात्मक पुस्तकानुसार, इ.स. १५४८ (शके १४७०)च्या सुमारास सरस्वती गंगाधर यांनी लिहिलेल्या ‘गुरुचरित्रा’त दत्त हा त्रिमुखी स्वरूपात मानलेला आहे. संत एकनाथ (इ.स. १५२३ ते १५९९) यांनी रचलेल्या ‘त्रिगुणात्मक त्रैमूर्ती’या आरतीतही दत्त त्रिमुखी स्वरूपात आहे. सर्वसाधारणतः याच स्वरूपात दत्ताची पूजा केली जात असली, तरी अनेक ठिकाणी दत्त एकमुखी स्वरूपातही पूजला जातो.
महाराष्ट्रात दत्तोपासना संप्रदायातीतच नव्हे, तर धर्मातीत आहे. दत्ताच्या उपासकांत हिंदूंबरोबरच मुस्लिम भक्तांचाही समावेश आहे. पुराणे आणि अर्वाचिन उपनिषदांतील दत्तचरित्रांत दत्तजन्माच्या विविध कथा प्रचलित आहेत. त्यातील लोकप्रिय कथा अशी की नारदमुनींनी अनसूयेच्या सतीत्वाचा गौरव केल्यामुळे ब्रह्मा-विष्णू-महेश यांच्या पत्नींच्या मनात अनसूयेविषयी असूया निर्माण झाली. तिचे सत्वहरण करण्यासाठी त्यांनी आपापल्या पतींना अतिथीवेशाने अनसूयेकडे पाठविले. त्यावेळी आश्रमात अनसूयेचे पती अत्री ऋषी नव्हते. अनुसूयेने या अतिथींचे भक्तिभावाने पूजन केले व त्यांना भोजन वाढले. त्यावर, ‘आम्ही या भोजनाचे सेवन करू.
मात्र, तू निर्वस्त्र होऊन वाढावे,’ अशी अट त्यांनी घातली. त्यावेळी अनसूयेने पतीचे स्मरण करून तिन्ही देवांच्या मस्तकावर तीर्थ शिंपडले. त्या बरोबर त्या तिघांचेही लहान बालकात रूपांतर झाले.
इकडे आपल्या पतींची वाट पाहून शिणलेल्या देवभार्या त्यांच्या शोधार्थ अत्रीऋषींच्या आश्रमात आल्या. आपल्या पतींचे बालकांत रूपांतर झाल्याचे पाहून त्यांनी अनसूयेकडे क्षमा याचना केली. त्यांची विकलावस्था पाहून अनसूयेने देवांना पूर्वरूप दिले. त्यानंतर देवांनी तिच्या इच्छेनुसार तिच्या उदरी जन्म घेण्याचे मान्य केले. कालांतराने ब्रह्मदेवांच्या तेजातून चंद्र, विष्णूच्या तेजातून दत्तात्रेय, तर शंकराच्या तेजातून दुर्वास यांनी पृथ्वीलोकात जन्म घेतला. ब्रह्मपुराणातही दत्तात्रय हा विष्णूचा अवतार असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे, महाभारतात तसेच माघकवीच्या ‘शिशुपालवध’ या महाकाव्यात दत्तात्रयाचे पिता अत्री नसून तो ‘अत्रिगोत्रज’ असल्याचे म्हटले आहे.
रुईभर येथील दत्त मंदिराच्या उभारणीबाबत असे सांगितले जाते की सुमारे चाळीस ते पंचेचाळीस वर्षांपूर्वी दत्तात्रयाने दृष्टांत दिल्याने आप्पासाहेब रुईकर यांनी येथे हे मंदिर उभारले. सुरूवातीला गावकऱ्यांनी त्यांना मंदिरासाठी वीस गुंठे जमीन दिली होती. नंतर त्यांची दत्तभक्ती, अध्यात्मिक अधिकार व जनसेवा पाहून गावकऱ्यांनी त्यांना आणखी शंभर गुंठे जमीन दिली. भाविकांच्या देणगीतून येथे मोठ्या मंदिराची उभारणी करण्यात आली. दर गुरुवारी मंदिरात हजारो भाविक दर्शनासाठी येतात.
रुईभर गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात एक मोठे व्यासपीठ आहे. दर गुरुवारी व उत्सव काळात येथे भजन, कीर्तन, संगीत, प्रवचन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पुढे मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी संरचना असलेले मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम राजस्थानी धौलपुरी दगडांत केलेले आहे. मुखमंडपातील चार नक्षीदार स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत. पुढे तीन प्रवेशद्वारे असलेला सभामंडप आहे.
तिन्ही प्रवेशद्वारांस नक्षीदार द्वारशाखा आहेत व मधील प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर इष्टशिल्प व तोरणात शिखरशिल्पे आहेत. तिन्ही प्रवेशद्वाराच्या मंडारकास चंद्रशिला आहेत.
येथील सभामंडप १०५ फूट लांब व ७० फूट रुंद असा प्रशस्त आहे. सभामंडपात डाव्या व उजव्या बाजूला गोलाकार स्तंभांवर सज्जाची रचना आहे. या सज्जावर उभे राहून उत्सवकाळात भाविक दत्तात्रयांच्या पालखीचे दर्शन घेतात. पुढे एका मोठ्या चौथऱ्यावर कोरीव पाषाणात बांधलेले गर्भगृह आहे. सहा पायऱ्या चढून या गर्भगृहात प्रवेश होतो. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीत प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला देवकोष्टके आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस दोन नक्षीदार स्तंभ व त्यांवर महिरपी तोरण आहे. प्रवेशद्वारास नक्षीदार द्वारशाखा व ललाटबिंबस्थानी गणपतीची मूर्ती आहे. गर्भगृहात वज्रपिठावर त्रिमुखी दत्तात्रयांची संगमरवरी मूर्ती आहे. मूर्तीच्या मागील प्रभावळीत पानाफुलांच्या नक्षी आहेत. गर्भगृहाच्या बाह्य बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे.
मुखमंडपाच्या छतावर समोरील बाजूला दोन व डाव्या आणि उजव्या बाजूला प्रत्येकी एक नक्षीदार बाशिंगी रचना आहे. मध्यभागी पिरॅमिड आकारातील उतरत्या पायऱ्यांचे चौकोनी शिखर आहे. शिखराच्या शीर्षभागी स्तूपिका व त्यावर कळस आहे. सभामंडपाच्या छतावर चोहोबाजूंनी बाशिंगी सुरक्षा कठडा आहे. गर्भगृहाच्या छतावर सुमारे ५१ फूट उंच व ९ थरांचे चौकोनी शिखर आहे. शिखराच्या शीर्षभागी घुमटाकार स्तुपिका, त्यावर कळस व ध्वजपताका आहे. मंदिराच्या प्रांगणात दत्त उपासकांना नामजप, मंत्र साधना, योग व ध्यान धारणा करण्यासाठी ध्यानमंदिर आहे. प्रांगणात असलेल्या सभागृहात विवाह, अन्नछत्र व उत्सवकाळात कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सभागृहाच्या शेजारी पाच मजली भक्त निवासाची इमारत आहे.
दत्त जयंती हा येथील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यानिमित्ताने मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा असे सात दिवस हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. यावेळी मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या सात दिवसांत हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. पौर्णिमेच्या दिवशी मंदिरात दत्त जन्मोत्सव साजरा केला जातो. यावेळी दत्तात्रयांची पालखी मिरवणूक हत्ती, घोडे नाचवत, लेझिमच्या तालावर, ढोल ताशांच्या गजरात व गुलाल उधळीत ग्रामप्रदक्षिणेला जाते. सकाळी ६ वाजल्यापासून रात्री ८ पर्यंत भाविकांना या मंदिरात दर्शन घेता येते.