उमा, गौरी, पार्वती, चंडी आणि काली आदी रूपांनी ओळखली जाणारी दुर्गादेवी ही शक्तिदेवता आहे. पौराणिक कथेनुसार, दुर्ग नावाच्या राक्षसाचा वध करणारी आदिशक्ती म्हणजेच दुर्गादेवी होय. दुर्गादेवीची रौद्र व सौम्य अशी दोन्ही रूपे आहेत. कोलकाता येथे ती कालीरूपात आहे. गोवा येथे ती शांतास्वरूपात आहे. ग्रँट रोड स्थानकाजवळ असलेल्या कुंभारवाड्यामध्ये या देवीचे इतिहासकालीन मंदिर वसले आहे. येथे ही देवी प्रसन्नवदन स्वरूपात विराजमान आहे. या मंदिरात दुर्गादेवीसोबत कालिकामाता आणि शीतलादेवी यांच्याही मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आल्या आहेत.
मार्कंडेय पुराणातील ८१ ते ९३ या अध्यायांत देवीमाहात्म्य सांगण्यात आले आहे. त्यातील श्लोकांची संख्या ७०० असल्यामुळे त्या ग्रंथास ‘दुर्गासप्तशती’ असे म्हणतात. यात महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तीन स्वरूपांत दुर्गेच्या चरित्राचे वर्णन केले आहे. ही तीन रूपे अनुक्रमे तम, रज व सत्त्व या तीन गुणांची प्रतीके आहेत. या पुराणानुसार शिव, यम, विष्णू, चंद्र, इंद्र, वरुण, भूमी आणि सूर्य या देवतांच्या अंशापासून दुर्गेचा जन्म झाला. मधुकैटभ, महिषासुर, चंडमुंड, शुंभ-निशुंभ आदी राक्षसांचा तिने आपल्या पराक्रमाने वध केला.
मार्कंडेय पुराणानुसार दुर्गेने देवांना उत्पन्न केले. सर्व विद्या दुर्गास्वरूप आहेत. ती ओंकाररूप आहे. जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो, तेव्हा तेव्हा दुर्गा अवतार घेते. ही देवी रौद्ररूपात तांत्रिकांची उपास्य देवता आहे.
कुंभारवाड्याचे ग्रामदैवत मानल्या जाणाऱ्या या देवीच्या मंदिराची स्थापना कोणी आणि केव्हा केली, याचा नेमका इतिहास अज्ञात आहे. मंदिरातील पुजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हे मंदिर किमान दोनशे वर्षे जुने आहे. डॉ. भालचंद्र आकलेकर यांच्या ‘मुंबईतील आद्य जागृत शक्तिपिठे’ या पुस्तकात, “हे मंदिर ‘काशीकावड’ जिंकणाऱ्या जमातीने बांधल्याचे कळते,” असा उल्लेख आहे. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संदर्भांनुसार, ‘काशीकावड’ म्हणजे काशीहून कावडीने गंगाजल आणण्याची परंपरा होय. ही कावड जिंकणारी किंवा या परंपरेशी जोडली गेलेली प्रमुख जमात म्हणजे ‘भोई’ समाज होय. यासोबतच ‘गोसावी’ किंवा ‘बैरागी’ संप्रदायाचे लोकही यात आघाडीवर असत. ही कावड जमिनीला न टेकवता, अत्यंत कडक नियमांचे पालन करत ठराविक वेळेत पोहोचवावी लागत असे. सर्व नियम पाळून गंगाजल मूळ देवतेपर्यंत सर्वांआधी पोहोचवून तिचा अभिषेक करणाऱ्या गटाला किंवा जमातीला ‘कावड जिंकली’ असे म्हटले जाई. पूर्वी होळकर आणि गायकवाड यांच्या संस्थानांमध्ये अशा कावडधारकांना राजाश्रय दिला जाई. डॉ. आकलेकर यांच्या पुस्तकातील अन्य उल्लेखानुसार, या मंदिराचा पहिला जीर्णोद्धार इ.स. १८७५ मध्ये करण्यात आला होता. विसाव्या शतकातील नव्वदच्या दशकात या मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार करण्यात आला. यानंतर काही वर्षांपूर्वी झालेल्या नूतनीकरणामुळे या मंदिरास सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
हे मंदिर छोटेखानी दुमजली स्वरूपाचे आहे. मंदिरासमोरील छोट्या अंगणात उंच पार असलेला वटवृक्ष आहे. त्याच्या शेजारी सातस्तरीय दीपस्तंभ आहे. प्रशस्त सभामंडप आणि त्याच्या समोर मोठ्या शिखरबंद देवकोष्टकाच्या स्वरूपातील गर्भगृह, असे या मंदिराचे स्वरूप आहे. मंदिरवास्तूच्या वर साधेसे उंच शिखर आहे. मंदिराच्या सभामंडपास कमानाकार प्रवेशद्वार आहे. आत संगमरवरी फरसबंदी केलेली आहे. येथे भिंतीलगत भाविकांना बसण्यासाठी लाकडी बाके ठेवलेली आहेत. सभामंडपाच्या छतावर पितळी घंटा, तसेच काचेचे झुंबर टांगलेले आहे. एका भिंतीवर या मंदिराचे दिवंगत विश्वस्त बाबय्या रामय्या इजाप (१९०६-१९४१) यांची तसबीर लावलेली आहे. समोरच्या भागात पिरॅमिडच्या आकाराचे शिखर असलेल्या देवकोष्टकामध्ये उंच अधिष्ठानावर देवीच्या मूर्ती प्रतिष्ठापित आहेत. येथे मध्यभागी दुर्गादेवी, डावीकडे शीतलामाता आणि उजवीकडे कालिकादेवीची मूर्ती आहे. वस्त्रालंकारांनी आणि पुष्पमालांनी शृंगारलेल्या या द्विभुज मूर्तींना चांदीचे हात तसेच चांदीचा मुखवटा आहे. देवींच्या मस्तकी सोनेरी मुकुट आहे. येथील दुर्गादेवी खड्गधारिणी स्वरूपात आहे. तिन्ही मूर्तींच्या मागे त्रिशूळ आहे. मूर्तींच्या वर चांदीचे तिहेरी छत्र आहे.
‘दुर्गादेवी मंदिर ट्रस्ट’ तर्फे या मंदिराचा कारभार पाहिला जातो. मंदिरात सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत भाविक देवीचे दर्शन घेऊ शकतात. येथे दर मंगळवारी आणि शुक्रवारी देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. ही देवी नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. तिला साडी-चोळीचा नवस बोलला जातो. येथे विजयादशमी आणि पिठोरी अमावस्येस देवीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी देवीची मिरवणूक काढली जाते. नवरात्रोत्सव हाही या मंदिरात साजरा केला जाणारा महत्त्वाचा उत्सव होय. येथे नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो.
दुर्गादेवीच्या या मंदिराच्या जवळच, मागच्या बाजूस पंचमुखी हनुमान मंदिर आहे. मंदिर छोटेखानी व जुन्या बांधणीचे आहे. त्याच्या स्थापत्यावर प्राचीन नागर मंदिरशैलीची छाप आहे. मंदिराच्या छतावरील कठड्यावर ऋषींच्या मूर्ती तसेच वानरशिल्पे आहेत. मंदिराचे शिखर उरुशृंग पद्धतीचे आहे. त्यावरील आमलकाच्या चारही बाजूंनी ऋषींच्या मूर्ती आणि साधकांचे मुखवटे लावलेले आहेत. चक्राकार आमलकाच्या वर उंच कलश आहे. सभामंडपाच्या द्वारचौकटीच्या वरच्या भागात बन्सीधर श्रीकृष्ण आणि दोन गायी असे शिल्प आहे. आत उंच संगमरवरी वेदीवरील संगमरवरी देव्हाऱ्यामध्ये पंचमुखी हनुमानाची शेंदूरचर्चित पाषाणमूर्ती प्रतिष्ठापित आहे. मूर्तींची प्रतिष्ठापना असलेल्या एका देवकोष्टकात संतोषीमातेची संगमरवरी मूर्ती विराजमान आहे. दुसऱ्या एका देवकोष्टकात अनघड पाषाणातील गणेशमूर्ती आहे.