दुर्गादेवी ही आदिशक्ती आहे. दुर्ग नावाच्या राक्षसाला तिने मारले म्हणून तिला दुर्गा हे नाव पडले, अशी पौराणिक कथा आहे. मार्कंडेय पुराणात असे म्हटले आहे की शंकर, यम, विष्णू, चंद्र, इंद्र, वरुण, भूमी, सूर्य या देवतांच्या अंशापासून दुर्गेचा जन्म झाला. दुर्गा देवीची रौद्र व सौम्य अशी दोन्ही रूपे आहेत. कोलकात्यात ती काली रूपात आहे, तर गोमंतकात शांता स्वरूपात आहे. तिच्या वेगवेगळ्या रूपांतील मूर्ती आढळून येतात. अशीच एक काळ्या पाषाणातील शिल्पजडीत दुर्गादेवीची प्राचीन मूर्ती मालवण तालुक्यातील कुणकवळे येथील मंदिरात आहे. ही देवी नवसाला पावणारी व हाकेला धावणारी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
कुणकवळे येथील दुर्गादेवीचे हे मंदिर किती प्राचीन आहे, याची निश्चित माहिती उपलब्ध नसली तरी ते हजार वर्षे पुरातन असावे, असा अंदाज व्यक्त केला जातो. या मंदिराच्या प्रांगणास स्वागत कमान आहे. प्रांगणात चौथऱ्यावर पाच थरांचा अष्टकोनी दीपस्तंभ आहे. त्या शेजारीच वैशिष्ट्यपूर्ण तुळशी वृंदावन आहे. वृंदावनाच्या खालील बाजूस विविध भौमीतिक आकार आहेत व त्यावर कमळाची प्रतिकृती आहे. या कमळ फुलात चारी दिशांना गजशीर्ष आहेत. गजशीर्षांनी सोंडेत धरलेली आणखी एक कमळ फुलाची प्रतिकृती आहे. याशिवाय प्रांगणात एक प्राचीन विहीर आहे. तिला तिर्थाची विहीर असे संबोधले जाते. या विहिरीच्या पाण्याने अंघोळ केली असता त्वचारोग बरे होतात, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे.
सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. दीपस्तंभाजवळून सभामंडपात जाता येते. येथील सभामंडप हा अर्धखुल्या स्वरूपाचा आहे व त्यात बाजूने भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. अंतराळाच्या लाकडी प्रवेशद्वाराच्या द्वारपट्टीवर नक्षीकाम आहे. येथील अंतराळ बंदिस्त स्वरूपाचे आहे. त्यात हवा व प्रकाश येण्यासाठी चार गवाक्ष आहेत. अंतराळात रासाई, दारोबा, पावणा देवी, रवळनाथ व गांगो अशा तरंगदेवता आहेत. दुसऱ्या बाजूला उत्सव काळात वापरली जाणारी लाकडी पालखी आहे. अंतराळातून बाहेर पडण्यासाठी दोन्ही बाजूस द्वार आहेत. या द्वारांच्या बाहेर असलेल्या दर्शन मंडपांवर मोदकाच्या आकाराचे शिखर व त्यावर कळस आहेत.
अंतराळात प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह आहे. या गर्भगृहात मध्यभागी चार स्तंभ असलेले नक्षीदार लाकडी मखर आहे. मखरात दुर्गादेवीची सुमारे साडेचार फूट उंचीची काळ्या पाषाणातील उभी चतुर्भुज मुर्ती आहे. असे सांगितले जाते की पूर्वी या मंदिरात देवीचा पाषाण पुजला जात असे. ३५० वर्षांपूर्वी एका देवीभक्त शिल्पकाराने दोन वर्षे एकांतात राहून देवीची ही अत्यंत देखणी मूर्ती घडविली. देवी चतुर्भुज आहे. तिच्या डावीकडील हातांमध्ये चक्र व तलवार आहे, तर उजव्या हातांत त्रिशूल व अमृतपात्र आहे. देवीच्या डोक्यावर शिल्पजडीत मुकुट, गळ्यात माळा, बाजूबंद व अन्य वस्रालंकार अत्यंत कलात्मक पद्धतीने, बारीक तपशिलासह साकारले आहेत. देवीच्या पायांत खटावा व पायाजवळ दोन्ही बाजूस सेविका (शक्ती) आहेत. त्यातील एक सेविका द्वारपाल रूपात शस्त्रधारी आहे, तर दुसरी चवरी ढाळणारी आहे. या सेविकेच्या मूर्तीमागे नाग आहे, तर त्या खाली व्याघ्रप्रतिमा कोरलेली आहे. मूर्तीच्या पाठशिळेवर पानाफुलांची वेलबुट्टीदार नक्षी आहे. या मूर्तीसमोर प्राचीन दगडी प्रसादपात्र आहे. देवीच्या अभिषेकाच्या तीर्थाने व हातात असलेल्या अमृत पात्रातील पाण्याने विविध आजारांत आराम पडतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
मंदिराच्या छतावर दोन शिखरे आहेत. सभामंडपाच्या प्रवेशद्वारावरील लहान शिखर मोदकाच्या आकाराचे आहे. त्यावर कळस आहे. गर्भगृहावरील शिखर सुमारे वीस फूट उंच आहे. शिखराचा खालील निम्मा भाग द्वादशकोनी आहे. त्यांतील बारा देवकोष्टकांत गणेश, लक्ष्मी, सरस्वती आदी देवतांच्या मूर्ती आहेत. शिखराचा वरील गोलाकार भाग कळसाकडे निमुळता होत गेलेला आहे. त्यावर आमलक व कळस आहे. मंदिराच्या प्रांगणात लिंगेश्वर मंदिर आहे. या मंदिरात काळ्या पाषाणातील ब्रम्हदेव व शिवपिंडी आहे. येथे नारायण नागबळी आदी विधी केले जातात. लिंगेश्वराच्या या मंदिरात महिलांना प्रवेश निषिद्ध आहे. याच मंदिराजवळ भावई देवीचे मंदिर आहे. त्यात भावई देवी व उजव्या सोंडेचा गणपती यांच्या मूर्ती आहेत. बाजूला असलेल्या मंदिरात विविध स्थानिक व कुटुंब देवतांचे पाषाण व मूर्तीं आहेत. प्रांगणात छोट्याशा देवळीत राजसत्ता पाषाण आहे.
मंदिरात चैत्र पाडव्यापासून विविध वार्षिक उत्सवांना सुरुवात होते. चैत्र नवरात्री, नारळी पौर्णिमा, ऋषी पंचमी, दिवाळी, तुळशी विवाह, त्रिपुरारी पौर्णिमा, देवीचा वार्षिक जत्रोत्सव (मार्गशीर्ष वद्य चतुर्थी) तसेच नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. सर्व वार्षिक उत्सवांच्या वेळी देवीचे अभिषेक, भजन, कीर्तन, प्रवचन, जागरण, गोंधळ, दशावतारी नाटक आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यासोबतच भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते.