दिंडेश्वर महादेव मंदिर

सोनाळे-पोगाव, ता. भिवंडी, जि. ठाणे

मुंबई-नाशिक मार्गावर कल्याणपासून काही अंतर पुढे आल्यावर, भिवंडीनजीक एका उंच डोंगरमाथ्यावर असलेले दिंडेश्वर महादेवाचे मंदिर आपले लक्ष वेधून घेते. भिवंडी तालुक्यातील प्राचीन मंदिरांपैकी एक असलेले हे मंदिर जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. हा परिसर पूर्वीपासून दिंडीगड म्हणून प्रसिद्ध आहे. येथे रुढार्थाने कोणताही गड व किल्ला असल्याची इतिहासात नोंद नसली तरी या मंदिराच्या नावावरून या परिसराला हे नाव पडल्याचे सांगितले जाते. दिंडेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसोबतच अनेक ट्रेकर्सही या ठिकाणी येत असतात.

असे सांगितले जाते की काही वर्षांपूर्वी या डोंगरमाथ्यावर एका भाविकाला जमिनीखाली गाडलेल्या अवस्थेतील मंदिराचा काही भाग दिसला. त्याने त्याची कल्पना ग्रामस्थांना दिल्यावर सर्वांनी मिळून येथे खोदकाम केले असता येथे भग्नावस्थेतील मंदिर, शिवपिंडी, गणेश मूर्ती, नंदी तसेच मंदिराचे इतर अवशेष सापडले. त्यानंतर परिसरातील भाविकांनी येथे पूजा-अर्चा करण्यास सुरुवात केली. असे सांगण्यात येते की ज्या वर्षी पाऊस लांबत असे, त्या वर्षी ग्रामस्थ दिंडीगडावर एकत्र येऊन नवस करीत असत. त्यानंतर त्यावर्षी चांगला पाऊस पडत असे. येथील शंकराची मनोभावे सेवा केल्यास निपुत्रिक दाम्पत्याला अपत्यप्राप्ती होते, अशीही भाविकांची श्रद्धा आहे. या दिंडीश्वर महादेवाची कीर्ती पसरू लागल्यानंतर ग्रामस्थांनी राहनाळ येथील एकनाथ पाटील यांच्या पुढाकाराने १९९१ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिराच्या देखभालीसाठी दिंडेश्वर महादेव ट्रस्टची स्थापनाही करण्यात आली.

भिवंडीच्या पूर्वेकडे असलेल्या या मंदिरात येण्यासाठी सोनाळे येथून डोंगराच्या एका पठारापर्यंत खासगी वाहनाने यावे लागते. या पठारापासून मंदिर २०० फूट उंचावर आहे. मंदिराकडे येण्यासाठी सुमारे ३०० पायऱ्या बांधलेल्या आहेत व काही ठिकाणी तीव्र चढावाची पायवाट आहे. पायऱ्या चढून मंदिरापर्यंत येण्यासाठी सुमारे १५ मिनिटे लागतात. पायऱ्या संपल्यावर समोरच मंदिराची वास्तू व त्यावरील आकर्षक शिखर नजरेस पडतात. पोगाव येथून पायवाटेनेही या मंदिरापर्यंत येता येते. अर्धखुल्या स्वरूपाचा मोठा सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. अंतराळ व सभामंडप हे पूर्वीचे मूळ मंदिर असून त्यासमोर नव्याने मोठा सभामंडप बांधण्यात आलेला आहे. या सभामंडपात भाविकांना बसण्यासाठी बाकांची व्यवस्था आहे.

येथील अंतराळात एका चौथऱ्यावर अखंड पाषाणातील नंदीची मूर्ती व त्यासमोर कासवमूर्ती आहे. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर असलेल्या देवकोष्टकांमध्ये डावीकडे गणेशमूर्ती तर उजवीकडे अंबामातेची मूर्ती आहे. अंतराळातून काही पायऱ्या उतरून गर्भगृहात प्रवेश होतो. येथील गर्भगृहातील पाताळलिंग स्वरूपाचे (जमिनीपासून खाली असलेले) पाषाणलिंग आहे. पिंडीवर फणा काढलेला नाग आहे. त्यावर अभिषेक पात्र (गलंतिका) आहे. या पिंडीच्या मागील भिंतीमध्ये तीन देवकोष्टके आहेत व त्यात मध्यभागी पार्वती, उजवीकडे विठ्ठल व डावीकडे रखुमाई यांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या एका कोपऱ्यातही आणखी एक छोटे शिवलिंग आहे. गर्भगृहाला बाहेरून प्रदक्षिणा मार्ग आहे. या प्रदक्षिणा मार्गानजीक खोल दरी आहे.

मंदिरासमोर नव्याने बांधलेला दुमजली सभामंडप आहे. त्याच्या छतावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. येथून मंदिराच्या सुंदर कळसासोबतच ठाणे व भिवंडी या शहरांचा काही भाग, माथेरानच्या पर्वतरांगा, मलंगगड तसेच माहुली गडापर्यंतचा परिसर नजरेच्या टप्प्यात येतो. येथील ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार दिंडीगड हे शिवाजी महाराजांच्या काळात टेहळणीचे ठिकाण होते. येथून मोठ्या प्रदेशावर लक्ष ठेवले जात असे; परंतु याला कोणताही ऐतिहासिक आधार नाही.

दररोज शेकडो भाविक दिंडेश्वराच्या दर्शनासाठी या मंदिरात येतात. दर सोमवारी येथे भाविकांची मोठी गर्दी होते. महाशिवरात्रीला येणाऱ्या हजारो भाविकांमुळे या परिसराला जत्रेचे स्वरूप येते. या दिवशी शिवलिंगावर अभिषेक केला जातो. याशिवाय दिवसभर भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम होतात. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारीही येथे भाविकांची गर्दी असते. त्यावेळीही अनेक धार्मिक कार्यक्रम होतात. उत्तर प्रदेशातील कावड यात्रेप्रमाणेच येथेही आजूबाजूच्या गावांतून अलीकडे कावड यात्रा आणली जाते.

दिंडेश्वर महादेवाच्या मुख्य मंदिराशिवाय या डोंगरावरील छोट्या ओढ्यानजीक आणखी एक प्राचीन शिवमंदिर आहे. ते सुमारे सातशे ते आठशे वर्षांपूर्वीचे असावे, असे सांगितले जाते. या मंदिराचे खांब व आजूबाजूच्या भिंती पडक्या अवस्थेत आहेत. त्यांचे भग्नावशेष इतस्ततः पडलेले आहेत. या मंदिराचे गर्भगृह १० बाय १० फुटांचे असून त्याची उंची १० फूट आहे. गर्भगृहाच्या मध्यभागी शिवलिंग आहे. दरवाजावर भग्न अवस्थेतील काही मूर्ती आहेत. एका बाजूला काही वीरगळ आहेत. येथील एका दगडावर आंब्याची पाने, नारळ आणि मडके कोरण्यात आले आहेत. परिसरात कोरीव काम केलेले अनेक दगडही आहेत. मंदिराच्या वरच्या बाजूला पाण्याचे कुंड आहेत.

उपयुक्त माहिती

  • भिवंडी येथून १२ किमी, तर ठाण्यापासून २७ किमी अंतरावर
  • भिवंडी व कल्याण येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या अर्ध्या वाटेपर्यंत येऊ शकतात, तेथून पुढे पायरी मार्ग
  • मंदिर परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : माणक पाटील, अध्यक्षा, मो. ९२२२४२४३१६, विनायक वखारे, सचिव, मो. ५८२३५५५३५४
Back To Home