दिगंबर जैन अतिशय क्षेत्र (नेमगिरी संस्थान)

जिंतूर, ता. जिंतूर, जि. परभणी

जिंतूर येथील श्री दिगंबर जैन अतिशय नेमगिरी संस्थान हे जैन तीर्थक्षेत्रांपैकी प्रसिद्ध स्थान आहे. अजिंठा पर्वतरांगांतील एका छोट्याशा वर्तुळाकार पहाडाच्या भूगर्भात हे क्षेत्र विराजमान आहे. येथील नेमगिरी पर्वतावरील सात गुंफांमध्ये सात जैन तीर्थंकरांच्या प्राचीन मूर्तींचे दर्शन होते. येथील भगवान नेमिनाथांची सात फूट उंचीची १५ टन वजनाची मूर्ती तसेच अंतरिक्ष पार्श्वनाथांची ६ फूट उंचीची, ९ टन वजनाची अधांतरी मूर्ती हे मुख्य आकर्षण आहेत. या गुंफेतील मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी तीन गुंफांमधून वेगवेगळ्या मार्गांनी यावे लागते. हे मार्ग एकमेकांना मिळताना एखाद्या चक्रव्यूहाप्रमाणे भासतात. येथून जवळच असलेल्या चंद्रगिरी पर्वतावर चौबीसी मंदिर आहे. जैन धर्मीयांसाठी पवित्र स्थान असलेल्या या क्षेत्रास महाराष्ट्रातीलच नव्हे, तर राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक आदी राज्यांतून आणि परदेशातूनही असंख्य भाविक व पर्यटक भेट देतात. या पवित्र गुंफांमध्ये पादत्राणे घालून गेल्यास मधमाशा मागे लागतात, असा समज आहे.

प्राचीन काळी यमराज आणि नेमिराज या दोन जैन राज्यकर्त्यांनी येथे राज्य केले. त्यावेळी जिंतूरचे नाव ‘जिनपूर’ असे होते. ते ‘जैनपूर’ किंवा ‘जिनतूर’ या नावानेही ओळखले जात असे. त्याचाच अपभ्रंश होऊन ‘जिंतूर’ हे नाव रूढ झाल्याचे सांगण्यात येते. त्या काळात येथे १४ जैन मंदिरे होती. मात्र, परकीय आक्रमणांदरम्यान हे दोन्ही राजे मारले गेले आणि आक्रमकांनी येथील मंदिरे व शेकडो जैन मूर्तींची तोडफोड केली. भाविकांनी त्यापैकी काही मूर्तींचे जीवाची बाजी लावून संरक्षण केले. या मूर्ती शहरातील महावीर जैन मंदिरात जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. सुमारे साडेचारशे वर्षांपूर्वी कुटुंबासह येथे आलेल्या वीर संघवी नावाच्या व्यक्तीला दृष्टांत झाल्यावर त्याने खोदकाम केले असता या मूर्ती आढळल्या. त्यांनी या मूर्तींची १६११ मध्ये पुनःप्रतिष्ठापना केल्याची आख्यायिका आहे. येथील नेमिनाथांच्या पायथ्याशी एक शिलालेख आहे. त्यावर “श्री शके १५३२ श्रावण शुद्ध १२ श्री नांदगाव निवासी श्री बध्धेरवाल ज्ञाती श्री जसूसंघवी भार्या कोंडाई पुत्र वीरसंघवी भार्या वालवी संघवी पुत्र नेमासंघवी ने रचना केली. नेमिनाथ नेमगिरी” असे कोरलेले आहे. वीर संघवी यांच्या घराण्यातील बारावी व तेरावी पिढी या क्षेत्राचे कामकाज पाहते. जिंतूर शहराच्या उत्तरेस सुमारे तीन कि.मी. अंतरावर हे क्षेत्र आहे. या क्षेत्राच्या चारही बाजूंनी झाडी आहे. असे सांगितले जाते की पूर्वी या परिसरात हिंस्र पशू स्वच्छंदपणे विहार करत व सायंकाळी गुंफेत विश्रांती घेत असत. नेमगिरी व चंद्रगिरी या दोन्ही पहाडांमधून अबधबी नदी वाहते.

गावातील कमानीपासून काही अंतरावर हे क्षेत्र आहे. या क्षेत्राला परकोट असलेले सुंदर प्रवेशद्वार आहे. त्याच्या दोन्ही बाजूंना द्वारपाल आहेत. या प्रवेशद्वारातून आत आल्यावर प्रांगणात समोरच सर्व जैन मंदिरांसमोर दिसणाऱ्या महिमास्तंभाचे दर्शन होते. प्रांगणात असलेल्या सभागृहांमध्ये विविध प्रसंगी धार्मिक कार्यक्रम होतात. मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना असलेल्या देवळीवजा मंदिरांमध्ये अनुक्रमे पद्मावती (डावीकडे) व धरणेंद्र यक्ष (उजवीकडे) यांच्या मूर्ती आहेत. या प्रवेशद्वारातून आत आल्यावर वीस फूट खाली गुंफा आहेत. येथील पहिल्या गुंफेत २४ वे जैन तीर्थंकर भगवान महावीर यांची पाषाणी मूर्ती आहे. या गुंफेतील आचार्य भद्रबाहू व आचार्य शांतीसागर यांचे पद्मकमळ हे या गुंफेचे वैशिष्ट्य आहे. येथे धातूच्याही काही मूर्ती आहेत. दुसऱ्या क्रमांकाच्या गुंफेत पहिले जैन तीर्थंकर आदिनाथ भगवानांची पाषाणी मूर्ती आहे. तिसऱ्या क्रमांकाच्या गुंफेत येण्यासाठी काही पायऱ्या उतराव्या लागतात. येथे भगवान शांतिनाथ स्वामींची ६ फूट उंचीची पद्मासनस्थ मूर्ती विराजमान आहे. या मूर्तीचे हात जोडलेले आहेत. या मूर्तीच्या पायथ्याशी या मूर्तीची पुनःप्रतिष्ठापना करणाऱ्यांच्या दोन पुरुष व दोन स्त्रियांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. चौथ्या क्रमांकाच्या गुंफेत भगवान नेमिनाथ यांची काळ्या पाषाणात घडवलेली पद्मासनस्थ, दिगंबरावस्थेतील मूर्ती आहे. या मूर्तीची उंची सात फूट आणि वजन १५ टन आहे. ही मूर्ती चार फूट उंचीच्या व सात फूट लांबीच्या चौथऱ्यावर विराजमान आहे. ही गुंफा सुमारे १७ फूट लांब, १६ फूट रुंद तर १६ फूट उंच आहे. वर्षातील काही दिवस सूर्याची किरणे या मूर्तीच्या पायांवर पडतात, असे सांगितले जाते. मूर्तीजवळ दोन्ही बाजूंना सिंहशिल्प कोरलेली आहेत. ही मूर्ती आत्मशुद्धी व मोक्षमार्गाचे प्रतीक समजली जाते. या मूर्तीच्या खालील चबुतऱ्याच्या समोरील भागावर तिची प्रतिष्ठापना करणाऱ्याचे तसेच त्याचे माता-पिता, दोन बंधू व त्यांच्या भार्यांच्या नावासहित त्यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.

पाचव्या क्रमांकाच्या गुंफेत अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवान यांची पाषाणी मूर्ती विराजमान आहे. या गुंफेची लांबी १७ फूट तर रुंदी १२ फूट आहे. येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवानांची ९ टन वजनाची व ६ फूट उंचीची मूर्ती दोन फूट उंचीच्या चौथऱ्यावर विराजमान आहे. ध्यानमुद्रेत हात जोडलेल्या या मूर्तीवर नऊ फणा उभारलेला नाग दर्शवला आहे. या नागाने मूर्तीच्या अंगाभोवती वेटोळे घातले आहे. ही मूर्ती चार बोटे अधांतरी भासते.

सहाव्या क्रमांकाच्या गुंफेत काही पायऱ्या चढून, वाकून यावे लागते. येथे भगवान नंदेश्वर यांची साडेचार फूट उंचीची मूर्ती आहे. सातव्या क्रमांकाच्या गुंफेतही वाकून यावे लागते. येथे भगवान बाहुबलींची विशाल मूर्ती आहे. तपश्चर्येत मग्न असलेल्या या मूर्तीच्या मानेपर्यंत आलेली वेल, खांद्यांवर नागांचे वास्तव्य व मांडीमध्ये भुंग्याने केलेले छिद्र आहे.

चंद्रगिरी पर्वताच्या उत्तरेस चंद्रगिरी टेकडी आहे. येथे पूर्वी दिगंबर जैनांचे राजुलमातेचे प्राचीन मंदिर होते. नेमगिरी व चंद्रगिरी या पहाडांच्या दरम्यान पूजनीय चारण ऋषीधारक मुनी महाराजांच्या पादुका आहेत. त्यांच्या शेजारीच काही फुटांवर एक विहीर आहे. चंद्रगिरी पहाडावर येण्यासाठी सुमारे अडीचशे पायऱ्या आहेत. वाटेत दोन्ही बाजूंना झाडी आहे.

चंद्रगिरी पहाडीवरील मंदिरातील गर्भगृहात मध्यभागी तीन मूर्ती आहेत. त्यांमध्ये चोवीस जैन तीर्थंकरांचे दर्शन घडते, असे सांगितले जाते. या मूर्तींच्या डावीकडे चंद्रप्रभू भगवानांची शुभ्र पाषाणातील मूर्ती तर उजवीकडे भगवान महावीर यांची सुंदर मूर्ती आहे. या गर्भगृहात आवाज घुमतो. येथील भगवान चंद्रप्रभूंची मूर्ती पूर्वी काळ्या पाषाणातील होती. ती खंडित झाल्यावर येथे नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आल्याचे सांगितले जाते.

नेमिगिरी संस्थानाला भेट देण्यासाठी दूरवरून येणाऱ्या भाविकांच्या निवासासाठी येथे भक्तनिवास बांधण्यात आले आहे. तसेच येथे प्रसादालयाचीही सोय आहे. परिसरात असलेल्या गोशाळेत १७० गोमातांची सेवा करण्यात येते.

पहाटे ५.३० ते रात्री ८.३० या वेळेत येथे दर्शन घेता येते. येथे दरवर्षी भाद्रपद वद्य पंचमीला मोठा उत्सव होतो. श्रावण शुद्ध षष्ठीच्या दिवशी येथे भगवान नेमिनाथ जयंती (नेमिनाथ जन्म कल्याणक) साजरी केली जाते. श्रावण शुक्ल सप्तमीच्या दिवशी पार्श्वनाथ मोक्षकल्याणक (मोक्ष उत्सव) दिनानिमित्त येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

उपयुक्त माहिती

  • जिंतूर बस स्थानकापासून ५ किमी अंतरावर
  • परभणी शहरापासून ४९ किमी अंतरावर
  • जिंतूर येथून खासगी वाहनांनी मंदिरापर्यंत येता येते
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे
  • संपर्क : धन्यकुमार कळमकर, अध्यक्ष, मो. ९४०३५८५५४८

दिगंबर जैन अतिशय क्षेत्र (नेमगिरि संस्थान),

जिंतुर, तालुका जिंतुर, जिला परभणी

Back To Home