प्राचीन काळी राष्ट्रकूट व चालुक्य राजवटीचा भाग असलेल्या धाराशिव शहरावर नंतर दिल्लीच्या मोगल व हैदराबादच्या निजामाने राज्य केले. इसवीसन सातव्या, आठव्या शतकातील शिलालेखात या शहराचे नाव धाराशिव असल्याचे उल्लेख सापडतात. विसाव्या शतकाच्या सुरूवातीला हैदराबादचे सातवे निजाम मीर उस्मान अली खान यांच्या राजवटीत (१९११ ते १९४८) शहराला उस्मानाबाद नाव देण्यात आले होते. सन २०२३ साली या शहराचे व जिल्ह्याचे नाव धाराशिव करण्याचा निर्णय शासनाने घेतला. ज्या देवीच्या नावावरून या शहराला धाराशिव नाव पडले, त्या धाराशिव देवीचे प्राचीन व प्रसिद्ध मंदिर शहरातील आनंद नगर भागात आहे. येथील जागृत देवी नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
हे मंदिर सुमारे हजार ते बाराशे वर्षांपूर्वीचे आहे. लोकसहभागातून जिर्णोद्धार होऊन मंदिरास सध्याचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. या मंदिराबाबत स्कंद पुराणात उल्लेख असल्याचे सांगितले जाते. त्यानुसार धारासुर राक्षसाला महादेवाने वर दिल्याने तो उन्मत्त होऊन जनतेस त्रास देवू लागला. धारासुराच्या त्रासातून सुटका व्हावी म्हणून लोकांनी भगवती देवीचा धावा केला. देवीने महिषासुर मर्दिनीचे रूप घेऊन धारासुराचा वध केला. वधानंतर थकलेली देवी विश्राम करण्यासाठी या स्थानावर बसली व येथेच स्थापित झाली. धारासुर राक्षसाचा वध केल्याने देवीस धारासुर मर्दिनी नावाने ओळखले जाऊ लागले.
मंदिराजवळ वाहनतळ व समोर पेव्हरब्लॉक आच्छादित प्रशस्त प्रांगण आहे. प्रांगणात मंदिरासमोर दोन्ही बाजूला चौथरे व त्यावर अष्टकोनी दीपमाळा आहेत. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी संरचना असलेल्या मंदिराच्या मुखमंडपास समोरील बाजूला महिरपी कमानीने जोडलेले चार चौकोनी स्तंभ आहेत. स्तंभांच्या दर्शनी बाजूला प्रत्येकी आठ दीपकोष्टके आहेत. स्तंभांवर तुळई व तुळईवर छत आहे. मुखमंडपाच्या छताची मागील बाजू सभामंडपाच्या भिंतीवर आहे.
मुखमंडपाच्या छतावर मध्यभागी चौकोनी मंदिर प्रतिकृती व त्यावरील शिखरावर आमलक आणि कळस आहे. या मंदिर प्रतिकृतीच्या दोन्ही बाजूला सिंहशिल्पे आहेत. मुखमंडपापुढे सभामंडपाचे प्रवेशव्दार आहे. मुखमंडपापेक्षा उंचावर असलेल्या सभामंडपाच्या प्रवेशद्वारास तीन पायऱ्या आहेत. सभामंडपात प्रवेशद्वारासमोर जमिनीवर यज्ञकुंड व त्यापुढे सिंहशिल्प आणि पितळी कासव आहे. सभामंडपात प्रत्येकी आठ चौकोनी स्तंभांच्या चार रांगा आहेत. बाह्य बाजूचे स्तंभ भिंतीत आहेत. स्तंभांवर तुळई व तुळईवर छत आहे. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात उजेड व हवा येण्यासाठी वातायने आहेत. सभामंडपास उजव्या व डाव्या बाजूला आणखी दोन दारे आहेत.
अंतराळास समोरील बाजूला तीन दरवाजे आहेत. मधल्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस चौकोनी स्तंभ व बाजूला वातायने आहेत. तिन्ही दारे व वातायनांच्या वर चक्राकार नक्षी आहे. अंतराळात गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर जमिनीवर सिंह शिल्प, त्यापुढे पितळी कासव व त्यापुढील चौथऱ्यावरील चौकोनी पाषाणावर पादुका कोरलेल्या आहेत. अंतराळात उजव्या बाजूला उत्सव काळात वापरली जाणारी देवीची पालखी आहे. पालखीजवळ जोगव्याच्या परड्या ठेवलेल्या आहेत. दर्शनाला येणारे भाविक या पराड्यांमध्ये पीठ, मीठ, धान्य आदी वस्तू अर्पण करतात. अंतराळातून बाहेर पडण्यासाठी डाव्या व उजव्या बाजूला दोन दरवाजे आहेत.
पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. गर्भगृह अंतराळापेक्षा उंचावर असल्यामुळे प्रवेशद्वारास पायरी आहे. ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती व ललाटपट्टीवर मयुर नक्षी आहे. गर्भगृहात वज्रपिठावर दोन नक्षीदार स्तंभ व त्यावर शिखर आणि कळस असलेला मखर आहे. या मखरात धारासुर देवीची महिषासुर मर्दिनी रूपातील सिंहारुढ मूर्ती आहे. मूर्तीसमोर चांदीची पावले आहेत. गर्भगृहात उजव्या कोपऱ्यात सध्या दुर्मिळ समजला जाणारा दगडी दिवा (माल्टा) आहे.
गर्भगृहाच्या बाह्य बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. मुख्य गर्भगृहाच्या डाव्या व उजव्या बाजूला प्रत्येकी दोन गर्भगृहे आहेत.
डाव्या बाजूच्या पहिल्या गर्भगृहात शिवपिंडी व नंदी आणि दुसऱ्या गर्भगृहात विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती आहेत. उजव्या बाजूच्या पहिल्या गर्भगृहात देवीचा पलंग आहे. नवरात्रीत येथे देवी शयनी असते. उजव्या बाजूच्या दुसऱ्या गर्भगृहात दत्तात्रयांची संगमरवरी मूर्ती आहे. येथे उत्सव काळात वापरले जाणारे छत्र ठेवलेले आहेत.
मंदिराच्या छतावर चहुबाजूंनी सुरक्षा कठडा व गर्भगृहाच्या छतावर दोन थरांचे चौकोनी शिखर आहे. शिखरात प्रत्येक थरात चारही बाजूंना देवकोष्टके, शीर्षभागी आमलक, त्यावर कळस व ध्वजपताका आहे. प्रांगणात देवी मंदिराच्या उजव्या बाजूला मारुती मंदिर व डाव्या बाजूला खंडोबा मंदिर आहे. दोन्ही मंदिरे दगडी बांधणीची आहेत.
वैशाख पौर्णिमा हा देवीचा मुख्य वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी ढोल ताशांच्या गजरात, गुलाल उधळीत, देवीची पालखी मिरवणुकीने शहर प्रदक्षिणा केली जाते. मंदिरात चैत्र नवरात्री व शारदीय नवरात्रोत्सव साजरे केले जातात. सर्व उत्सवांच्या वेळी हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी, नवस फेडण्यासाठी व पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी येतात. प्रत्येक पौर्णिमेला देवीची मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा केली जाते. मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, अमावस्या आदी दिवशी मंदिरात भाविकांची जास्त गर्दी असते.