मुंबईतील महालक्ष्मी मंदिरापासून काही अंतरावर एका लहान टेकडीवर धाकलेश्वर महादेवाचे सुमारे दोनशे वर्षांचा इतिहास केलेले मंदिर वसले आहे. हे मंदिर धाकलेश्वर महादेवाबरोबरच मयुरेश्वर गणपती, रमेश्वरी देवी, हरिनारायण आणि विनायकादित्य यांना समर्पित आहे. मुंबईतील नामांकित व्यापारी धाकजी दादाजी प्रभू यांनी या मंदिराची स्थापना केल्यामुळे त्याला धाकलेश्वर या नावाने ओळखले जाते. मंदिरात वैशाख पौर्णिमेला मोठा वार्षिक उत्सव साजरा केला जातो. मंदिराचे जतन आणि आधुनिक मानकांबद्दलची कटिबद्धता यामुळे या मंदिराला ‘आंतरराष्ट्रीय मानकीकरण संस्थे’चे (आयएसओ) प्रमाणपत्र मिळाले आहे.
या मंदिराच्या स्थापनेचा इतिहास अठराव्या शतकातील मुंबईतील एक धनाढ्य व्यापारी दादी नुसेरवानजी यांच्याशी निगडित आहे. इ.स. १७८५ च्या सुमारास महालक्ष्मीचे मंदिर बांधण्यात आल्यानंतर सुमारे १४ वर्षांनी त्यांनी या परिसरातील मोठी जमीन धर्मादाय कार्याच्या उद्देशाने विकत घेतली होती. त्यांच्या मुलाचे नाव अर्देशीर दादी असे होते. २९ जून १८१० रोजी त्यांचे निधन झाले. त्यानंतर अर्देशीर यांचे पुत्र करशेटजी यांनी, १९ एप्रिल १८४५ रोजी या जागेसंबंधी ‘डीड पोल’ (एकतर्फी अभिहस्तांतरण दस्तावेज) केले. त्याद्वारे त्यांनी त्यांच्या आजोबांनी धर्मादाय कार्याकरिता घेतलेल्या या मालमत्तेचे व्यवस्थापक म्हणून धाकजी दादाजी यांना नेमले. या जमिनीवर हिंदू धर्मादाय इमारती, धर्मशाळा किंवा मंदिरे बांधण्याची परवानगी या ‘डीड पोल’ द्वारे धाकजी दादाजी यांना देण्यात आली.
यानुसार सन १८३० मध्ये धाकजी दादाजी यांनी येथे मंदिराच्या बांधकामास प्रारंभ केला. सन १८३२ मध्ये मंदिराची वास्तू पूर्णत्वास आली. याकरिता त्या काळात सुमारे ८० हजार रुपये खर्च आला होता, असे सांगण्यात येते. मंदिराच्या स्थापनेसंदर्भातील एक इंग्रजी शिलालेख मंदिरात आहे. त्यावरील मजकूर पुढीलप्रमाणे आहे: “मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मे १८३२ मध्ये झाला. बांधकामाची सुरुवात फेब्रुवारी १८३० मध्ये झाली होती. हे मंदिर श्री मयुरेश्वर, श्री रामेश्वरी, श्री धाकलेश्वर, श्री हरिनारायण आणि श्री विनायकदित्य या पाच हिंदू देवतांना समर्पित करण्यात आले होते. त्या काळात अर्ल ऑफ क्लेअर हे गव्हर्नर म्हणून कार्यरत होते. सर हर्बर्ट कॉम्प्टन के. टी. हे बॉम्बे बेटावरील सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. संस्थापक धाकजी दादाजी प्रभू यांनी मंदिराची उभारणी धर्मादाय उद्देशांसाठी सुनिश्चित केली होती. याचे व्यवस्थापन आणि संरक्षण कायमस्वरूपी त्यांच्या वारसांकडे राहील.” मंदिरातील महादेवास धाकजी दादाजी प्रभू यांचा ईश्वर म्हणून धाकलेश्वर असे नाव देण्यात आले.
तर त्यांची पत्नी रमाबाई हिच्या नावावरून येथील देवीस रमेश्वरी, थोरला मुलगा मोरेश्वर याच्या नावावरून गणेशास मयुरेश्वर, दुसरा मुलगा नारायण याच्यावरून येथील विष्णूस हरिनारायण, तर नारायण व आदिती यांच्या जोडमूर्तीस धाकटा मुलगा विनायक याच्या नावावरून विनायकादित्य असे संबोधण्यात येऊ लागले.
धाकजी दादाजी यांचे १८४६ मध्ये निधन झाले. त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात या मंदिराच्या खर्चासाठी दहा हजार रुपये राखून ठेवले होते. त्यांच्यानंतर या मंदिराची जबाबदारी कृष्णनाथ नारायण यांच्याकडे आली. त्यांच्यानंतर धाकजी दादाजींचा दत्तकपुत्र काशीनाथ धाकजी यांच्याकडे मंदिराचे व्यवस्थापन आले. काशीनाथ धाकजी २१ डिसेंबर १८८१ रोजी मरण पावले. त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा बापूजी याच्याकडे मंदिराची मालमत्ता आली. याच काळात मुंबईतील जमिनीची किंमत मोठ्या प्रमाणावर वाढली होती. गोविंद नारायण मांडगांवकर यांनी १८६३ मधील ‘मुंबईचें वर्णन’ या पुस्तकात पुढीलप्रमाणे लिहिले आहे: “तीस वर्षांमागे एका गृहस्थाचा वालुकेश्वरी डोंगराचा तुकडा होता, तो चारपाचशें रुपये घेऊन कोणास तरी विकून टाकावा म्हणून तो गिऱ्हाईक शोधी, परंतु त्या किमतीस तेवढा तुकडा घेणारा त्याला कोणी सापडला नाहीं. परंतु तीच जागा आज तीस हजार रुपयांस मागितली असतां मिळत नाहीं.” या अशा परिस्थितीमुळे बापूजी काशीनाथ प्रभू यांनी मंदिराची काही जागा परस्पर विकून टाकली. या भ्रष्ट आचारीविरोधात सरकारचे महाधिवक्ता आणि अन्य दोन हिंदू गृहस्थांनी बॉम्बे हायकोर्टात १९०१ मध्ये दिवाणी दावा (खटला क्रमांक ७३१/१९०१) दाखल केला. त्यावरून उच्च न्यायालयाने १९०२ मध्ये बापूजी यांना विश्वस्तपदावरून हटवले व २ डिसेंबर १९०५ च्या आदेशान्वये नवीन विश्वस्तांची नियुक्ती केली.
सध्या या मंदिराचे व्यवस्थापन ‘द तुलसीदार गोपालजी चॅरिटेबल अँड धाकलेश्वर टेम्पल ट्रस्ट’ या विश्वस्त संस्थेद्वारे पाहिले जाते. २० ऑक्टोबर २००८ रोजी ज्योतिर्मठ बद्रिकाश्रमचे शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती यांच्या हस्ते या पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला.
एका टेकडीवर हे मंदिर वसले आहे. मंदिरात जाण्याकरिता ३२ पायऱ्या बांधलेल्या आहेत. संगमरवरी फरशा बसवलेल्या आणि बाजूस कठडा असलेल्या या पायरी मार्गाच्या मधोमध एक कारंजे आहे. वरून पाहिल्यावर हे कारंजे शिवलिंगाच्या शाळुंकेसारखे दिसते. या कारंजाला तसा वैशिष्ट्यपूर्ण आकार देण्यात आला आहे. पायऱ्यांवरून मंदिराच्या प्रशस्त अशा प्रांगणात प्रवेश होतो. येथे कोकणातील स्थापत्यकलेशी साधर्म्य दर्शवणाऱ्या दोन दीपमाळा आहेत. मंदिराचे संकुल आयताकृती आहे आणि ते उंच जोत्यावर बांधण्यात आले आहे. लांबलचक ओवरी आणि गर्भगृहे असे या मंदिराचे स्वरूप आहे. या ओवरीस इस्लामी वास्तुकला शैलीतील कमानी आहेत. ओवरीचे स्तंभ तत्कालीन मुंबईत प्रचलित असलेल्या ग्रीक पुनरुज्जीवन (ग्रीक रिव्हायव्हल) वास्तुशैलीतील आहेत. मंदिरावर नागर गुजराती शैलीतील उरूशृंग प्रकारचे उंच शिखर आहे.
त्यावर चक्राकार आमलक आणि उंच कलश आहे. मंदिरात सुंदर रंगकाम व झुंबरांनी सुशोभित केलेली पाच गर्भगृहे आहेत. या ओवरीस प्रत्येक गर्भगृहासमोर एकेक प्रवेशकमान आहे. सहा पायऱ्या चढून या ओवरीत प्रवेश होतो. येथे सर्वात डावीकडील गर्भगृहात उंच वेदीवर मयुरेश्वराची मूर्ती विराजमान आहे. ही गणेशमूर्ती पाषाणात घडवलेली आहे. मूर्तीच्या समोर एका आसनावर पाषाणाची मूषकमूर्ती आहे. याच्या शेजारील गर्भगृहात रमेश्वरी देवीची सुमारे पावणे दोन फूट उंचीची संगमरवरी मूर्ती प्रतिष्ठित आहे. मध्यभागी असलेले गर्भगृह धाकलेश्वर महादेवास समर्पित आहे. गर्भगृहासमोर पाषाणातील नंदीची सुबक मूर्ती आहे. आत भूतलावर महादेवाची पिंड विराजमान आहे. ही पिंड काळ्या संगमरवरी पाषाणातील आहे. गर्भगृहातील मागील भिंतीवरील देवकोष्टकात पार्वतीची मूर्ती आहे. या नंदीच्या एका कानात आपली इच्छा सांगितली आणि त्याचा दुसरा कान एका हाताने झाकला, तर भगवान शंकरापर्यंत ती इच्छा पोहोचते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या गाभाऱ्याच्या उजवीकडील गर्भगृह हरिनारायणास समर्पित आहे. येथे हरिनारायणाची मूर्ती स्थापित आहे, तर सर्वात शेवटच्या गाभाऱ्यात, चार अश्वांच्या रथावर विराजमान असलेल्या नारायण आणि अदिती यांची जोडमूर्ती प्रतिष्ठापित आहे. या मूर्तीच्या दोन्ही बाजूंना जय आणि विजय यांच्या लहान मूर्ती आहेत. देवी अदिती ही देवराज इंद्र, वरुण, तसेच सूर्यदेव यांची माता मानली जाते. या गर्भगृहात सूर्यदेवाची मूर्तीही विराजमान आहे. येथे ओवरीत सर्वांत उजवीकडे साईबाबांची मूर्तीही प्रतिष्ठापित आहे.
धाकलेश्वराच्या या मंदिरामध्ये सकाळी ६ ते रात्री ८ पर्यंत देवदर्शन घेता येते. येथे रोज पूजेपूर्वी सकाळी ७.१५ वाजता देवाला मंगल भोग (नैवेद्य) अर्पण केला जातो. त्यानंतर ७.३० वाजता प्रभात आरती होते. नंतर दुपारी ११.३० वाजता राज भोग आणि सायंकाळी ६.३० वाजता भोग अर्पण केला जातो. सायंकाळी ७ वाजता सायंआरती होते. महाशिवरात्र हा येथील अत्यंत महत्त्वाच्या सणांपैकी एक सण आहे. तो येथे मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या उत्सवादरम्यान देवांचा महाअभिषेक केला जातो. वैशाख पौर्णिमेला देवाचा वार्षिक उत्सव अत्यंत धार्मिक वातावरणात व जल्लोषाने साजरा केला जातो. या वेळी मूर्तींना नवीन वस्त्रे व मुकुट परिधान केले जातात.