देवनारायण मंदिर

आसोली, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आसोली हे गाव राज्यात अत्यंत दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या सुरंगी वृक्षांसाठी प्रसिद्ध आहे. आसोलीमध्ये या फुलांचे व्यापारीदृष्ट्या उत्पादन केले जाते. या वृक्षाची पाने तकतकीत असतात त्याच्या खोडाला खालच्या बाजूने भरपूर फुले लागतात. या सुगंधीत सुंदर दिसणाऱ्या फुलांना चार पाकळ्या असतात. या फुलांना देशातून तसेच विदेशातूनही मागणी असते. जिल्ह्यातील आरवली येथीलवेतोबाला या फुळांच्या माळा वाहण्याचा प्रघात आहे. या गावचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे अनोखी स्थापत्यकला समृद्ध शिल्पकलेने नटलेले येथील देवनारायणाचे प्राचीन मंदिर होय

आसोली गावातील देवनारायण मंदिर हे कोकणातील प्राचीन प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. कोकणातील स्थापत्यकलेचा समृद्ध वारसा म्हणून या मंदिराकडे पाहिले जाते. या मंदिराच्या गर्भगृहातील नारायणाच्या मूर्तीचे दर्शन हे अगदी मंदिराबाहेरील रस्त्यावरूनही होते; परंतु येथील वैशिष्ट्य असे की आपण जसजसे गर्भगृहाकडे जातो, तसतशी नारायणाची मूर्ती मागे मागे जात असल्याचा भास होतो. त्यामुळे अगदी रस्त्यावरून दिसणारी देवाची मूर्ती गर्भगृहात दिसणारी मूर्ती ही सारख्याच आकारमानाची भासते. हे येथील स्थापत्यरचनेचे वेगळेपण आहे. असे सांगितले जाते की मुखमंडप, सभामंडप, अंतराळ गर्भगृह यांच्या प्रवेशद्वारांच्या विशिष्ट रचनेमुळे आकारमानामुळे हा भास निर्माण होतो. काही वर्षांपूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असला तरी तो करताना येथील मूळ स्थापत्यरचनेत बदल केलेला नाही

देव नारायण लक्ष्मी पूजनाची प्रथा आपल्याकडे हजारो वर्षांपासून आहे. आपल्या अडीअडचणी पिडा दूर करण्यासाठी तसेच ऐश्वर्य, संपत्ती, समृद्धी कीर्ती मिळावी म्हणून देव नारायणाला भाविकांकडून साकडे घालण्याची रित आहे. आसोली गावातील देव नारायण भक्तांची दुःखे दूर करून नवसाला पावतो, अशी येथे येणाऱ्या हजारो भाविकांची श्रद्धा आहे. येथील देवनारायण मंदिराभोवती तटबंदी आहे. या तटबंदीत असलेले प्रवेशद्वार दुमजली असून एखाद्या किल्ल्याच्या प्रवेशद्वाराप्रमाणे ते भासते. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपालांच्या मूर्ती कमानीच्या वरील भागात गणेशमूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या वरच्या मजल्यावर नगारखाना आहे तेथे जाण्यासाठी बाजूने पायऱ्या आहेत. वरच्या मजल्याला चारी बाजूंनी सज्जा आहे. प्रवेशद्वाराचे बांधकाम दगडी नक्षीदार कलाकुसरयुक्त आहे.

प्रवेशद्वारातून पुढे आल्यावर मंदिराच्या विस्तीर्ण प्रांगणात प्रवेश होतो. प्रवेशद्वारानजीक आतल्या बाजूस प्राचीन पिंपळवृक्ष आहे त्याभोवती मोठा पार बांधलेला आहे. या पारावार शिवपिंडी आहे. या प्रांगणात मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर एका मोठ्या चौकोनी पट्ट्यात गवताची हिरवळ तयार केलेली आहे. हा हिरवळीचा पट्टा विद्युत दिव्यांनी सुशोभित केलेला आहे. त्यामुळे येथील मंदिराचे सौंदर्य आणखी खुलते. मुखमंडप, दोन सभामंडप, अंतराळ प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. येथील मुखमंडप दोन मोठ्या नक्षीदार स्तंभांवर उभा आहे. या मुखमंडपाच्या वरच्या भागात नागफणीची नक्षी असलेले शिखर त्यावर कळस आहे. आतील बाजूस छतावर फुलांची नक्षी कोरलेली आहे. मुखमंडपातून मंदिराच्या मुख्य सभामंडपात प्रवेश होतो. हा सभामंडप अर्थखुल्या स्वरूपाचा असून तिन्ही बाजूला भिंतींऐवजी भाविकांना बसण्यासाठी त्यात कक्षासने आहेत. कक्षासने सभामंडप यामध्या तीन पायऱ्या आहेत

सभामंडपात येताच नजरेत भरतात ते दोन्ही हातांतही मावणार नाहीत, असे मोठे कलाकुसरयुक्त दगडी स्तंभ. हे स्तंभ अखंड शिळेतून कोरलेले आहेत. हे खांब आणि त्यावरील तुळया यांची रचना हेमाडपंती स्थापत्यशैलीसारखीच आहे. अशा प्रत्येकी सहा स्तंभांच्या चार रांगा या सभामंडपात आहेत. या स्तंभांची रचना ही खालच्या बाजूस चौकोनी संगमरवरी फरशीने आच्छादित आहेत. त्यावरील भाग अष्टकोनी आकाराचा आहे. त्यावर चौकोनी पलगई आणि त्यावरील तुळयांना आधार दिलेले अधिकच्या आकाराचे तरंगहस्त आहेत. या लाकडी तरंगहस्तांवर कोरीवकाम केलेले आहे. मुख्य सभामंडपातून पुढे गेल्यावर दुसऱ्या सभामंडपात प्रवेश होतो. या सभामंडपात स्तंभाच्या दोन रांगा आहेत. येथेही कक्षासनांची व्यवस्था आहे. या सभामंडातील खांब कक्षासनात असून कमानीने ते एकमेकांशी जोडलेले आहेत

अंतराळाची बाह्य भिंत प्रवेशद्वाची कमानचौकट संगमरवरी आहे. वरच्या बाजूस कीर्तिमुख आहे. किर्ती मुखाच्या वर शेषशाही विष्णू विष्णूचे पाय चेपणारी लक्ष्मी यांचे सुंदर चित्र रेखाटलेले आहे. विष्णूच्या नाभीतून निघालेले कमळाचे फूल फुलात विराजमान ब्रम्हदेव या चित्रात दिसत आहे. अंतराळाच्या गजपृष्ठाकार छतावर विष्णू सहस्त्रनामावली लिहिलेली आहे. अंतराळात असलेल्या मोठ्या सहा खांबांवर खालच्या बाजूला मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध कलकी या दशावतराच्या सुंदर सुबक सोनेरी रंगात रंगवलेल्या मूर्ती आहेत. मूर्तींच्या वरच्या बाजूस पानाफुलांची नक्षी आहेत. खांबांच्या वर लाकडी तुळया असून हे खांब कमानीने एकमेकांना जोडलेले आहेत. अंतराळात देवतांच्या तरंग काठ्या आहेत

गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस संगमरवरी चौरंगावर द्वारपालांच्या मूर्ती आहेत. दाराच्या कमानीवर पाचफणा असलेल्या नागाचे शिल्प आहे. गर्भगृहात देवनारायणाची काळ्या पाषाणातील सुंदर मूर्ती आहे. या मूर्तीचे वेगळेपण असे की येथे नारायणाला मिशी आहे. मोठे डोळे, डोक्यावर चांदीचा मुकुट, उंची वस्त्रालंकार यामुळे या मूर्तीचे सौंदर्य आणखी खुलून दिसते

चातुर्मासात म्हणजेच आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या चार महिन्यांच्या काळात असणारे सर्व सण या मंदिरात मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. देवनारायणाचा वार्षिक उत्सव आश्विन शुद्ध दशमी म्हणजेच दसऱ्याला साजरा केला जातो. याशिवाय श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सवही येथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यावेळी हजारो भाविक दर्शनासाठी येतात.

 

उपयुक्त माहिती

  • वेंगुर्लेपासून १४ किमी, तर सावंतवाडीपासून ३० किमी अंतरावर
  • वेंगुर्ला येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : शंकर धुरी, अध्यक्ष, ९६१९६८७८८८,
  • नारायण गावडे, उपाध्यक्ष, मो. ९४०४७४९४४०
Back To Home