
महाराष्ट्र हा विविध गड–किल्ले, अद्भूत स्थाने आणि मंदिरांची रेलचेल असणारा प्रदेश आहे. त्यापैकी जळगाव जिल्ह्यात अनेक प्राचीन व शिल्पसमृद्ध मंदिरे आहेत. यापैकी काही मंदिरांना देश स्वतंत्र होण्याच्या कित्येक वर्षे आधी राष्ट्रीय स्मारक म्हणून दर्जा मिळालेला आहे. त्यात पाचोरा तालुक्यातील दिघी या गावातील देवी मंदिराचा समावेश होतो. सुमारे ८०० वर्षांपूर्वी उभारलेले हे शिल्पसमृद्ध व प्राचीन मंदिर दिघी गावचे वैभव मानले जाते. हे दुर्मिळ माणिकरूपी मंदिर पाहण्यासाठी शेकडो भाविकांसह मूर्ती व स्थापत्य अभ्यासक येथे आवर्जून येतात.
दिघी हे जळगाव जिल्ह्यातील एक लहानसे गाव आहे. गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी देवीचे पुरातन मंदिर स्थित आहे. या मंदिराची जळगाव गॅझेटियरमध्ये ‘देवी’ या नावाने, तर पुरातत्त्व विभागात देवी आणि सांभाचे मंदिर अशी नोंद आहे. गावकऱ्यांमध्ये मात्र ते दुर्गाभवानी वा महिषासूरमर्दिनीचे मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. हे मंदिर तेराव्या शतकातील असल्याचे पुरातत्व विभागाकडून सांगितले जाते. गावात जाणाऱ्या रस्त्यालगत साधारणतः १० फूट उंचीच्या मोठ्या दगडी चौथऱ्यावर हे मंदिर स्थित आहे. आठ ते दहा पायऱ्या चढून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात मंदिरासमोर प्राचीन दीपस्तंभ आहे. सुमारे चार फूट उंचीच्या अधिष्ठानावर बाहेरील बाजूने प्रदक्षिणामार्ग सोडून मंदिराचे बांधकाम करण्यात आलेले आहे.
मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. प्रांगणातून सात पायऱ्या चढून मुखमंडपात प्रवेश होतो. या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूस मोठे ओटे आहेत. मुखमंडप अर्धखुल्या स्वरूपाचा आहे व त्यात दोन्ही बाजुला दगडी कक्षासने व त्यावर स्तंभ आहेत. मुखमंडपाच्या समोरील बाजूस अधिष्ठानावरही कक्षासनांची रचना आहे. मुखमंडपाच्या बाह्य भिंतीवर
स्तंभाकार कोरलेले आहेत व दोन स्तंभाकारांच्यामध्ये मानवी मूर्ती कोरलेल्या आहेत. आतील चार स्तंभांवर मध्यभागी चौकोनी कोष्टकांमध्ये काही प्राण्यांचे तर काही ठिकाणी मानवी प्रतिमांचे शिल्पांकन आहे. स्तंभांच्या वरील बाजूस असलेल्या हस्तांवर भारवाहक यक्ष कोरलेले आहेत.
येथून पुढे सभामंडपात प्रवेश होतो. हा सभामंडप बंदिस्त स्वरूपाचा आहे. सभामंडपात गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीजवळ विष्णूची एक भग्न मूर्ती आहे. असे सांगितले जाते की पूर्वी या मूर्तीचे स्थान गर्भगृहात होते. परंतु ती भंग झाल्याने तिला येथे ठेवण्यात आलेले आहे. सभामंडपात डावीकडील भिंतीत असलेल्या देवकोष्टकात प्राचीन शेंदुरचर्चित गणेशमूर्ती आहे. भिंतींवर सुंदर कोरीव काम तसेच विविध शिल्पे आहेत. सभामंडपाचे छत हे अवरोही वर्तुळांनी बनलेले आहे. त्यात चार दिशांना सूरसुंदरींची वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे होती. परंतु त्यातील दोन शिल्पांची अज्ञात व्यक्तींकडून चोरी झाल्यामुळे आता दोन शिल्पे शिल्लक आहेत. त्यापैकी एका सूरसुंदरी ही मर्दला (छोट्या ढोलकीसारखे
तालवाद्य) वाजवणारी व दुसरी नृत्य मुद्रेत आहेत. या सूरसुंदरींच्या मूर्तीच्या खालच्या बाजूस यक्षिणींची शिल्पे आहेत. त्यांपैकी काहींच्या हातांत विविध वाद्ये कोरलेली आहेत. येथील भिंतींवर देवकोष्टकांत गणपती, हनुमान यांच्यासह विविध देवीदेवतांची शिल्पे आहेत. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे शेकडो वर्षे होऊनही यातील अनेक कोरीव शिल्पे अद्याप सुस्थितीत आहेत.
गर्भगृहाच्या द्वारशाखेवर वेलबुट्टीचे नक्षीकाम आहे. द्वारशाखेच्या खाली दोन्हीकडे स्त्री द्वारपालांच्या कोरीव मूर्ती आहेत. द्वारशाखेशेजारी असणाऱ्या स्तंभशाखांवरही कोरीव नक्षीकाम आहे. प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आहे. द्वारचौकटीवरील उत्तरांगेवर नृत्य व वादन करणारे स्त्री–पुरूष, कुस्ती खेळणारे पुरूष, तसेच हनुमानाची द्वंद्व करतानाची अशी विविध शिल्पे कोरलेली आहेत. मंदिराच्या गर्भगृहात अठरा भुजा असलेल्या व्याघ्रारूढ महिषासुरमर्दिनीची मूर्ती विराजमान आहे. उग्र मुद्रा असलेली ही मूर्ती दगडी वज्रपीठ व गर्भगृहाची मागची भिंत यांच्या आधाराने साकारण्यात आलेली आहे. मूर्तीच्या हातांमध्ये विविध आयुधे आहेत. एका हातात राक्षसाचे शिर दिसत आहे. देवीच्या डोक्यावर मुकूट, नाकात नथ व गळ्यात विविध दागिने आहेत.
येथील मुखमंडप, सभामंडप व गर्भगृहावर शिखरे आहेत. त्यापैकी सभामंडप व गर्भगृहांवरील शिखरांवर आमलक व कळस आहेत. मंदिराच्या भोवतीने असलेले अनेक प्राचीन वृक्ष व प्रांगणातील पेव्हरब्लॉकची फरसबंदी यामुळे हा परिसर शांत व रमणीय भासतो. ब्रिटिश सत्ताकाळात इ.स. १९२० मध्ये या मंदिरास पुरातत्व विभागाकडून महत्त्वाचे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आले होते. या मंदिराशेजारी दिघीतील स्वातंत्र्य सैनिक महादू मोतीराम परदेशी यांचे स्मारक आहे. त्यामध्ये एक नंदी, शिवपिंडी व मागील भिंतीवर महादू परदेशी यांचे उठावशिल्प आहे. नवरात्री उत्सव हा येथील महत्त्वाचा वार्षिक उत्सव असतो. यावेळी पंचक्रोशीतील अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात.