देवी माऊली मंदिर

चेंदवण, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग

चेंदवणवालावल येथील देवी माऊली ही या दोन्ही गावांची ग्रामदेवता आहे. या देवस्थानचे वैशिष्ट्य म्हणजे ही देवी नवसाला पावते अशी भाविकांची श्रद्धा आहे. अनेक लोक येथे येऊन देवीस नवस बोलतात ते पूर्ण झाल्यानंतर ज्या कारणासाठी नवस केला, त्याची लाकडी प्रतिकृती येथे अर्पण करतात. अशा वस्तूंचा मंदिरात अक्षरशः ढीग लागलेला आहे. येथे दरवर्षी देवी माऊलीचा वाढदिवस अर्थात अवतारप्राप्ती दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो

येथील डोंगरपठारावरचे म्हणजेच सड्यावरचे देवी माऊलीचे स्थान अतिशय प्राचीन असल्याचे सांगण्यात येते. लोकसमजुतीनुसार अत्यंत प्राचीन काळी येथे देवी माऊलीने अवतार घेतला. ही देवी म्हणजे जगदंबेचा अवतार मानली जाते. ती चेंदवण आणि वालावल या दोन्ही गावांची रक्षक देवता आहे. त्यामुळे येथे मंदिराची उभारणी करताना त्याचा अर्धा भाग एका गावात, तर अर्धा भाग दुसऱ्या गावाच्या हद्दीत अशी रचना करण्यात आली आहे. एवढेच नव्हे, तर देवी माऊलीच्या मंदिरासमोर असलेला दीपस्तंभ चेंदवण ग्रामस्थांचा असून तुळशी वृंदावन वालावलकरांचा आहे. विशेष म्हणजे येथे देवीच्या मूर्तीची स्थापनाही अशा पद्धतीने करण्यात आलेली आहे की देवीचा एक पाय वालावलच्या हद्दीत तर दुसरा चेंदवणच्या हद्दीत आहे

देवी माऊलीचे हे मंदिर कोकणी स्थापत्यशैलीमध्ये बांधलेले आहे. लांबलचक अर्धखुला सभामंडप, अंतराळ, गर्भगृह, त्यात सांधार प्रदक्षिणापथ म्हणजे गाभाऱ्याभोवती छतयुक्त प्रदक्षिणापथ उतरते छप्पर अशी या स्थापत्यशैलीची ठळक वैशिष्ट्ये असतात. देवी माऊलीचे हे मंदिरही अशाच पद्धतीचे आहे. मंदिरासमोर वालावलकर आणि चेंदवण ग्रामस्थांनी उभारलेला पाच स्तरीय दीपस्तंभ आणि तुळशी वृंदावन आहे. मंदिराचे प्रवेशद्वार दोन दगडी स्तंभांवर महिरपी कमान अशा पद्धतीचे आहे. या द्वारातून सभामंडपात जाताच समोरच एक छोटीशी सिमेंटमध्ये बांधलेली देवळी आहे. ही देवळी देवीच्या आज्ञांकीत मोठ्या पुत्राची असल्याचे सांगण्यात येते. तो अश्वारूढ आहे. त्याच्या हातात बाण भाला आहे. त्या देवळीच्या बाजूने सभामंडपात प्रवेश होतो. कोकणातील अशा अन्य मंदिरांप्रमाणेच येथील सभामंडपही अर्धखुल्या प्रकारचा आहे. मंडपाच्या दोन्ही बाजूस कक्षासने त्यांमध्ये उभारलेले मोठे दगडी स्तंभ आहेत. तेथून काही अंतर सोडून आतल्या बाजूस छोट्या चौथऱ्यावर उभारलेले गोल दगडी स्तंभ आहेत. या सभामंडपाच्या पुढे बंदिस्त सभामंडप आहे. त्यात एका बाजूस छोट्या लाकडी वस्तूंचा ढीग पाहावयास मिळतो. ही देवी भक्तांच्या हाकेस धावून येणारी आणि नवसाला पावणारी असल्याची श्रद्धा असल्याने अनेक भाविक तिला नवस करतात. आर्थिक बाबी, घर, वाहन, पुत्रप्राप्ती, आजारपण अशा विविध बाबींविषयीचे हे नवस असतात. या वेळी घालण्यात येणाऱ्या पारंपरिक गाऱ्हाण्यांमध्ये देवीलामायाअसे म्हटले जाते. नवसाची पूर्ती झाल्यानंतर भाविक येथे येऊन देवीची खणानारळाने ओटी भरून ते नवस फेडतात. त्याच वेळी ज्या कारणासाठी नवस केला असेल, त्याची प्रतिकृतीही देवीला अर्पण केली जाते. वाहनाबाबत असेल तर त्याची प्रतिकृती, कोणाचा मोडलेला हात बरा झाला तर हाताची प्रतिकृती येथे वाहिली जाते. या वस्तू कोणासही तेथून उचलून नेता येत नाहीत, असे सांगण्यात येते.

सभामंडपातून तीन पायऱ्या चढून मंदिराच्या अंतराळात प्रवेश होतो. येथील प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस दर्शनी भिंतीवर दोन व्याघ्रमुखे आहेत. देवीच्या गर्भगृहाच्या भिंती संगमरवरी फरशांनी सजवलेल्या आहेत. गर्भगृहाचे द्वार चांदीच्या पत्र्याने मढवलेले आहे. त्यावर पानाफुलांची नक्षी कोरलेली आहे. द्वारशाखेच्या वरच्या पट्टीवर दोन्ही बाजूंना सिंहमूर्ती तर ललाटबिंबस्थानी गणेशमूर्ती आहे. आत चांदीच्या देव्हाऱ्यामध्ये देवीमाऊलीची मूर्ती विराजमान आहे. एकसंध पाषाणातून कोरलेली ही मूर्ती साधारणतः चार फूट उंचीची आहे. ही देवी दशभुजा आहे. तिच्या हातांत शंख, चक्र, गदा, त्रिशूल, ढाल, तलवार, अग्नी आदी शस्त्रअस्त्रे आहेत. ‘मूळ मायाकिंवामायेची पूर्वस’ (पूर्वज) म्हणूनही देवी पूजली जाते. देवीचा डावा पाय महिषावर असून उजव्या हातातील त्रिशुलाने ती त्याच्यावर प्रहार करीत आहे. डाव्या बाजूस त्या महिषातून उत्पन्न झालेला महिषासुर दैत्य आहे. उजव्या बाजूस चवरी पाण्याची झारी घेतलेल्या सेविकेची मूर्ती आहे.

या मंदिरात नवरात्र आणि अवतारप्राप्ती दिन हे उत्सव जल्लोषात साजरे केले जातात. ही देवी चेंदवण वालावल या दोन्ही गावांचे ग्रामदैवत असल्याने येथे नवरात्रातील पहिल्या पाच दिवसांचे धार्मिक विधी वालावलचे ग्रामस्थ, तर शेवटच्या चार दिवसांचे धार्मिक विधी चेंदवणचे ग्रामस्थ करतात. विजयादशमी दोन्ही गावचे लोक मिळून साजरी करतात. येथे दरवर्षी फाल्गुन शुद्ध द्वादशीला देवीचा अवतारप्राप्ती दिन साजरा केला जातो. फाल्गुन शुद्ध एकादशी द्वादशी अशा दोन दिवशी येथे देवीची मोठी यात्रा भरते. हजारो भाविक या यात्रेत सहभागी होतात. या दोन दिवसांत येथे विविध धार्मिक कार्यक्रम, देवीची पालखी, महाप्रसाद असे कार्यक्रम होतात. या निमित्ताने येथे दशावतारी नाटकही सादर केले जाते. देवीच्या दर्शनासाठी कोकणासह महाराष्ट्र कर्नाटकातूनही भाविक येथे मोठ्या संख्येने येतात.

 

उपयुक्त माहिती

  • कुडाळपासून १४ किमी, तर ओरोसपासून ३० किमी अंतरावर
  • कुडाळ येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा उपलब्ध
Back To Home