देवदेवेश्वर मंदिर

माहूर, ता. माहूर, जि. नांदेड

नांदेड जिल्ह्यातील माहूरगड हे महाराष्ट्रातील अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. देवी रेणुका मातेचे शक्तीपीठ म्हणून या क्षेत्राला प्रसिद्धी मिळाली असली, तरी दत्त संप्रदाय आणि महानुभाव पंथाच्या दृष्टीनेही या ठिकाणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच भूमीवरील देवदेवेश्वर मंदिर हे महानुभाव पंथाचे एक अत्यंत महत्त्वाचे तीर्थस्थान होय. भगवान श्रीचक्रपाणी महाराज (श्रीचांगदेव राऊळ) व श्रीचक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीवर हे मंदिर उभे आहे. त्यामुळे महानुभाव पंथाच्या अनुयायांसाठी हे मंदिर काशी किंवा पंढरपूर इतकेच पवित्र आहे.

या पवित्र स्थानावरील सध्याचे मंदिर आठशे वर्षांपूर्वीचे असल्याचे मानले जाते. हेमाडपंती शैलीतील बांधकाम असलेले हे मंदिर महानुभाव पंथातील चांगदेव राऊळ यांनी उभारले आहे. श्रीचांगदेव राऊळ हे महानुभाव पंथातील अत्यंत महत्त्वाचे दैवत आणि श्रद्धेय स्थान होय. महानुभाव पंथाच्या तत्त्वज्ञानानुसार जे पंचकृष्ण मानले जातात, त्यापैकी श्रीचांगदेव राऊळ हे तिसरा अवतार आहेत. त्यांना श्रीचक्रपाणी या नावाने देखील ओळखले जाते. महानुभाव साहित्यातील आख्यायिकेनुसार, द्वारकेच्या परिसरात एक महान योगी ‘चांगदेव’ वास्तव्यास होते. त्यांना श्रीदत्तात्रेयांकडून ईश्वरी शक्ती आणि ज्ञान प्राप्त झाले होते. याच काळात फलटण येथे जनकनायक आणि त्यांच्या पत्नी जनकाईसा यांच्या पुत्राचे निधन झाले होते. तेव्हा योगी चांगदेव यांनी आपली काया सोडून त्या मृत राजपुत्राच्या शरीरात प्रवेश केला आणि तो मृत देह पुन्हा जिवंत झाला. हेच पुनर्जीवित झालेले व्यक्तिमत्त्व पुढे श्रीचांगदेव राऊळ म्हणून ओळखले जाऊ लागले. चांगदेव राऊळ यांनीच रिद्धपूर येथील श्रीगोविंदप्रभूंना अनुग्रह दिला होता आणि पुढे गोविंदप्रभूंनी श्रीचक्रधर स्वामींना अनुग्रह दिला. म्हणजेच श्रीचक्रधर स्वामींच्या गुरुपरंपरेत चांगदेव राऊळांचे स्थान वरचे आहे.

माहूरगडावरील देवदेवेश्वर मंदिराची आख्यायिका अशी की प्राचीन काळी या ठिकाणी देवल ऋषींचा आश्रम होता. देवल ऋषींनी आपल्या तपोबलाने अनेक विद्या सिद्ध केल्या होत्या, त्यामुळे त्यांना आपल्या सिद्धींचा गर्व झाला होता. त्यांनी तपोबलाने आश्रमात शिवपिंडीची स्थापना केली होती. ही शिवपिंडी अमर्याद वेगाने वाढत होती व त्यातून निघणारी उष्णता सामान्य जीवांना असह्य झाली होती. यामुळे सर्वच पशू-पक्षी माहूरगड सोडून इतरत्र जाऊ लागले होते. या शिवपिंडीची शक्ती समस्त सृष्टी नाहीशी करेल की काय, अशी सर्व देवांना चिंता पडली. त्यावेळी सर्व देवांनी दत्तात्रेयांना यावर उपाय करण्याचे साकडे घातले. श्रीदत्तात्रेय देवल ऋषींच्या आश्रमात गेले. श्रीदत्तात्रेयांना पाहताच देवल ऋषींचे गर्वहरण झाले. देवल ऋषी दत्तात्रेयांसमोर नतमस्तक झाले व त्यांच्या चरणी फुले वाहिली. तीच फुले श्रीदत्तात्रेयांनी शिवपिंडीवर वाहून करंगळीने शिवपिंडी जमिनीत दाबली. तेव्हा देवल ऋषींनी श्रीदत्तात्रेयांना विनंती केली की या शिवपिंडीची स्मृती कायम राहू द्या. तसेच या स्थानाचे महत्त्व अबाधित राहावे म्हणून या स्थानास तुम्ही निद्रास्थान करून घ्यावे व रोज निद्रेसाठी येथेच यावे. दत्त प्रभूंनी ऋषींची विनंती मान्य केली. तेव्हापासून ‘काशीला स्नान, कोल्हापूरला भिक्षा आणि माहूरला शयन’, असा श्रीदत्तात्रेयांचा नित्यक्रम बनला. म्हणजेच, दिवसभर कोठेही असले तरी रात्री विश्रांतीसाठी दत्त महाराज माहूरगडावर येतात, अशी मान्यता आहे.

सभामंडप, मुख्य सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडप प्रांगणापेक्षा उंचावर असल्यामुळे प्रवेशद्वारास सात पायऱ्या आहेत. लोखंडी स्तंभांवर पत्र्याचे छत असलेला हा अर्धखुल्या स्वरूपाचा सभामंडप अलीकडील काळात उभारण्यात आला आहे. यापुढील मुख्य सभामंडप व गर्भगृह हा प्राचीन मंदिराचा भाग आहे. सभामंडपापेक्षा मुख्य सभामंडप सुमारे चार फूट उंचीवर असल्यामुळे प्रवेशद्वारासमोर सहा पायऱ्या आहेत. प्रवेशद्वारात दोन्ही बाजूला चौकोनी स्तंभ व स्तंभांवर महिरपी तोरण आहे. बंदिस्त स्वरूपाच्या मुख्य सभामंडपात प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. त्यापैकी बाह्यबाजूचे स्तंभ भिंतींत आहेत. सर्व स्तंभ एकमेकांना अर्धचंद्राकार तोरणांनी जोडलेले आहेत. स्तंभदंडात चौकोन, षट्कोन असे भौमितिक आकार आहेत, तसेच स्तंभांच्या शीर्षभागी कणी व कणीवर हस्त आहेत. मुख्य सभामंडपात उजव्या व डाव्या बाजूला आणखी दोन दरवाजे आहेत. सभामंडपात उजव्या बाजूला भिंतीलगत श्रीदत्तात्रेयांची सुमारे सहा फूट उंचीची त्रिमुखी व चतुर्भुज मूर्ती आहे.

पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी व प्रवेशद्वाराच्या वर मयूर व इतर आकृत्या रेखाटलेल्या आहेत. गर्भगृहात दोन स्वतंत्र वज्रपीठावर एकमुखी श्रीदत्तात्रेय व महानुभाव पंथाचे गुरु चांगदेव राऊळ यांच्या पाषाणमूर्ती आहेत. दोन्ही मूर्तींना चांदीचे मुखवटे व मुकूट आहेत. मूर्तींच्या मागे चांदीच्या प्रभावळी आहेत. रोज सांजारतीनंतर देवांच्या शय्या सजविल्या जातात. देव रोज रात्री निद्रा घेण्यासाठी या ठिकाणी येतात, अशी श्रद्धा आहे. गर्भगृहाच्या मागील बाजूने बाहेर पडण्यासाठी दरवाजा आहे. गर्भगृहाच्या छतावर निमुळते होत गेलेले चौकोनी शिखर आहे.

श्रीदत्तात्रेयांच्या गर्भगृहाच्या मागील बाजूला दुसरे गर्भगृह आहे. हे गर्भगृह जमिनीपेक्षा खोल आहे, त्यात खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. या गर्भगृहात खालील बाजूला चौरस, त्यावर अष्टकोनी व वर गोलाकार अशा आकाराची शिवपिंडी आहे. हीच शिवपिंडी आकाशाला टेकली होती व दत्तप्रभूंनी करंगळीने ती जमिनीत दाबली, अशी आख्यायिका सांगितली जाते. मंदिरात गोविंद प्रभू यांची मूर्ती असलेले गर्भगृह देखील आहे. मंदिराच्या मागील बाजूला महानुभाव पंथातील काही दिवंगत महंतांच्या समाध्या आहेत. मंदिराच्या परिसरात सर्वतीर्थ नावाचे तीर्थ आहे.

श्रीकृष्ण जन्मोत्सव, श्रीदत्त जयंती व महाशिवरात्री हे येथील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. याशिवाय चैत्र पाडवा, दसरा, दिवाळी, श्रावण मास, नागपंचमी, कार्तिक पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा आदी सण व उत्सव साजरे केले जातात. सर्व उत्सवांच्या वेळी मंदिरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या उत्सवांच्यावेळी देशभरातून हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात.

उपयुक्त माहिती:

  • माहूर येथून १ किमी अंतरावर
  • नांदेड येथून १२६ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून माहूरसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • माहूर गड व परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय

देवदेवेश्वर मंदिर

माहुर, त. महुर, जिला. नांदेड़

Back To Home