देव गणपती मंदिर

हुर्शी-गडदेवाडी, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग

कोकण आणि गणेश उपासना यांचे एक घट्ट नाते आहे. जगाच्या पाठीवर कुठेही असलेला कोकणी माणूस गणेशोत्सवात हमखास गावाकडे येतो. दहा दिवस गणपती पूजनात रममाण होणाऱ्या कोकणी माणसाच्या श्रद्धा गणपतीच्या चरणाशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळेच कोकणात गणेशाची अनेक देवालये आहेत. पाली व महड हे अष्टविनायकांपैकी दोन गणपती कोकणात आहेत, तर गणपतीपुळे येथील गणेशाचे स्थानही विशेष प्रसिद्ध आहे. याच मालिकेतील सुमारे ३०० वर्षे जुने पेशवेकालीन गणेश देवालय (रिद्धी-सिद्धी गणपती मंदिर) देवगड तालुक्यातील हुर्शी या गावी आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणपतीची कोकणात ख्याती आहे.

गणपती ही पेशव्यांची आराध्य देवता होती. त्यांनी कोकणातील व पुणे प्रांतातील अनेक गणेश मंदिरांचा जीर्णोद्धार केला, तर काही नव्याने बांधली. त्यांच्या सरदारांनीही काही गणपती मंदिरे बांधली. त्यातीलच एक म्हणजे हुर्शी येथील गणपती मंदिर. ते पेशव्यांचे सरदार विश्वनाथ रामचंद्र मराठे यांनी बांधले. हुर्शी येथे मराठे यांचा वाडा होता. या मंदिरास पेशवेकालीन सनद प्राप्त आहे. त्यानुसार आजही सरकारकडून या मंदिरासाठी वार्षिक ६० रुपये वर्षासन दिले जाते. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व असलेले हे मंदिर निसर्गसमृद्ध परिसरात स्थित आहे. या मंदिराचे अंतराळ व गर्भगृहाची मूळ बांधकामशैली भूमीज पद्धतीची आहे. पायापासून कळसापर्यंत त्याचे दगडातील बांधकाम त्याचे प्राचीनत्व सिद्ध करते.

रिद्धी सिद्धी गणपती मंदिर हुर्शी गावाबाहेर रस्त्यालगत आहे. या मंदिराचे काही वर्षांपूर्वी नूतनीकरण करण्यात आले. त्याचे प्राचीनत्व संगमरवरी फरशा आणि सिमेंटच्या गिलाव्याआड दडले आहे. मंदिराभोवती चिऱ्यांची मजबूत तटबंदी आहे. मंदिराचे प्रांगण जमिनीपासून काहीसे उंचावर आहे. आवारभिंतीत असलेल्या प्रवेशद्वारातून सात पायऱ्या चढून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. मंदिराच्या प्रांगणात तटबंदीच्या बाजूने व मंदिराकडे जाणाऱ्या वाटा पेव्हरब्लॉकने सुशोभित केलेल्या आहेत. या प्रांगणात मंदिरासमोर असलेल्या उंच चौथऱ्यावर तुळशी वृंदावन आहे. येथेच वड व पिंपळाचे प्राचीन वृक्ष आहेत.

उंच जगतीवर असलेल्या या मंदिराची रचना सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी आहे. हा सभामंडप अर्धखुल्या प्रकाराचा आहे व त्याचे छत कौलारू आहे. सभामंडपात अखंड लांबीचे, कुठेही जोड नसलेले चिऱ्यांचे खांब होते. त्यावर आता सिमेंटचा गिलावा करण्यात आलेला आहे. प्रत्येक देवदेवतेच्या मंदिरात त्यांच्या वाहनाची प्रतिमा वा मूर्ती असते. गणेशाच्या मंदिरात त्याचे वाहन असलेल्या मूषकाची मूर्ती आवर्जून असते. या मंदिराच्या अंतराळात मात्र गणेशपिता शंकराचे वाहन असलेल्या नंदीची अखंड काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. नंदीसमोर वज्रपीठावर ब्रम्हा, विष्णू व महेश यांच्या मूर्ती आहेत. हे अंतराळ बंदिस्त आहे. त्यात उजेड व हवा खेळती राहावी यासाठी अनेक गवाक्षे आहेत. छताच्या चारही कोपऱ्यांवर नक्षीकाम आहे. अंतराळ व गर्भगृहाचे बांधकाम हे मूळचे दगडी आहे. येथील भिंती या काही ठिकाणी पाच फूट तर काही ठिकाणी तीन फूट रुंदीच्या आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराचे कवाड लाकडी व नक्षीकाम केलेले आहे. गर्भगृहात मध्यभागी वज्रपीठावर गणपतीची चतुर्भुज मूर्ती आहे. गणपतीच्या एका हातात परशू, दुसऱ्या हातात पद्मपुष्प, तिसऱ्या हातात मोदक व चौथा हात मांडीवर ठेवलेला आहे. गणपतीच्या दोन्ही बाजूस चवऱ्या ढाळणाऱ्या स्त्रीमूर्ती आहेत. त्या रिद्धी व सिद्धी या गणेशपत्नी असल्याचे सांगण्यात येते. यामुळे या मंदिरास रिद्धी सिद्धी गणपती मंदिर असे म्हणतात. या सर्व मूर्ती काळ्या पाषाणातील आहेत. वज्रपीठास देव्हाऱ्यासारखे नक्षीदार असे लाकडी मखर आहे.

या पेशवेकालीन मंदिरामध्ये रिद्धी-सिद्धी व गणपतीच्या प्राचीन मूर्ती होत्या. मंदिराच्या नूतनीकरणाच्या वेळी येथे नवीन मूर्ती प्राणप्रतिष्ठापित करण्यात आल्या. येथील प्राचीन मूर्ती आता सभामंडपाबाहेर बांधलेल्या वृंदावनाच्या खालच्या ओट्यामध्ये ठेवण्यात आल्या आहेत. त्यात एक लहानशी काचेची खिडकी आहे. या खिडकीतून या मूर्तींचे दर्शन घेता येते. मंदिर इतिहासाचे अभ्यासक सांगतात की येथील सभामंडपासमोरील वृंदावनाच्या ओट्यावर पूर्वी एक नंदीची प्राचीन मूर्ती असे. त्या नंदीचा वरचा भाग व शिंगे झिजलेली होती. गाभाऱ्यातील तिन्ही मूर्तीही झिजलेल्या होत्या. त्यामुळे या मूर्ती बदलण्यात आल्या.

मंदिराच्या अंतराळावर चौकोनी आकारातील पिरॅमिडसारखे शिखर व त्यावर कळस आहे. गर्भगृहावर असलेले शिखर उंच व अधिक निमुळते आहे. शिखरातून पाणी झिरपू नये म्हणून शिखरांवर जांभ्या दगडाच्या फरशांचे आवरण केलेले आहे. या मंदिरात गणेश जयंती हा मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने साजरा केला जातो. या शिवाय संकष्टी चतुर्थी, त्रिपुरारी पौर्णिमा, दसरा, दिवाळी, महाशिवरात्री, होळी आदी उत्सव साजरे होतात. सर्व उत्सवांचे वेळी देवांचे महाअभिषेक महापूजा केल्या जातात.

उपयुक्त माहिती

  • देवगडपासून २० किमी, तर विजयदुर्गपासून १२ किमी अंतरावर
  • देवगड, मालवण येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : मंदिर कार्यालय, दूरध्वनी : ०२३६४ २२५०५०
Back To Home