भक्तांच्या हाकेला धावून येणाऱ्या देव भूतनाथाचे जागृत आणि आगळेवेगळे देवस्थान सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथे आहे. येथील भूतनाथ देवाची मूर्ती सोनुर्ली–मळगाव पंचायतनमधील सर्वात मोठी मूर्ती आहे. कोकणातील डोंगर–दऱ्या, समुद्र–खाड्या आणि घनदाट अरण्याने भरलेल्या गूढ अगम्य वातावरणाच्या प्रदेशात जसे सौम्य देव पूजले जातात तसेच उग्र देवही पूजले जातात. वेतोबा, मुंजोबा, वेताळदेव अशा अनेक नावाने ओळखला जाणारा देव भूतनाथ भक्तांच्या भोळ्याभाबड्या भक्तीने सहज प्रसन्न होऊन त्यांना सौख्याचे वरदान देतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
मळगाव येथील भूतनाथ मंदिर अतिशय प्राचीन असल्याचे सांगितले जाते. भुतांचे उल्लेख अनेक जुन्या ग्रंथांत व पुराणात सापडतात. त्यावरून भूतनाथ पूजन प्राचीन काळापासून सुरू असावे, याची कल्पना करता येते. मळगाव येथील हे भूतनाथ मंदिर किती प्राचीन आहे, हे निश्चित सांगता येत नसले तरी ते किमान पाचशे ते सहाशे वर्षांपूर्वीचे असावे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. देव भूतनाथ भक्तांवर आलेली संकटे परतवून लावतो. शरण आलेल्या भक्तांना सुख, समृद्धी व समाधान प्रदान करतो, अशी या देवाची मान्यता आहे.
देव भूतनाथ मंदिर हे गावापासून दूर शांत व निसर्गरम्य परिसरात आहे. रस्त्यालगत स्वागतकमान आहे. कमानीच्या दोन्ही बाजूस खांबांवर जय–विजय यांच्या द्वारपाल मूर्ती आहेत. त्यांच्या तीन हातांमध्ये शंख, चक्र व गदा आहेत. चौथा हात कमरेवर ठेवलेला आहे. कमानीच्या वरच्या बाजूला सोनेरी कळस आहे. या कमानीपासून साधारण एक किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम पारंपरिक कोकणी दुमजली पद्धतीचे व कौलारू आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस एक सुंदर तुळशी वृंदावन आहे. जमिनीपासून काहीशा उंचावर असलेल्या या मंदिरात जाण्यासाठी चार पायऱ्या आहेत. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे.
सभामंडप हा अर्धखुल्या स्वरूपाचा असून त्यात दोन्ही बाजूने भाविकांना बसण्यासाठी कक्षासनांची रचना आहे. सभामंडपात सर्वत्र लाकडी खांब आहेत. यातील काही खांब हे कक्षासनांवर तर उर्वरित खांबांच्या दोन रांगा या आयताकृती सभामंडपाच्या मध्यभागी आहेत. कोकणी स्थापत्यशैलीप्रमाणे सभामंडपाच्या जमिनीचा या दोन स्तंभांच्या रांगेमधील भाग काही इंच खोलगट आहे. येथील खांब हे नक्षीदार असून त्यावर रंगकाम केलेले आहे. या खांबांच्या वरील बाजूस नागफण्यांचे नक्षीकाम आहे, तर खालील बाजूस फुलांची नक्षी कोरलेली आहे. कक्षासनांवर असलेल्या खांबांवर पानाफुलांची नक्षीदार कलाकुसर केलेली आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ आतल्या बाजूला दोन फूट लांबी–रुंदीचा व दीड ते दोन फूट खोली असलेला एक चौकोनी भाग आहे. त्यामध्ये येथील परिवार देवतांच्या मूर्ती स्थानापन्न आहेत. मंदिराचे कौलारू छत वर दोन भागांत विभागले आहे. त्यामुळे खेळती हवा आणि पुरेसा प्रकाश यांची नैसर्गिक योजना येथे केलेली दिसते.
सभामंडपाच्या पुढील बाजूला प्रदक्षिणा मार्ग सोडून अंतराळ व गर्भगृह आहे. येथील अंतराळ व गर्भगृह हे सभामंडपापासून काहीसे वरच्या बाजूला आहेत. या अंतराळाची रचनाही सभामंडपाप्रमाणे अर्धखुल्या स्वरूपाची आहे. अंतराळात गर्भगृहासमोरील दर्शनी भिंतीला लागून असलेल्या दोन बाजूंच्या खांबांवर सोंड उंचावलेल्या गजराजांचे शिल्प कोरलेले आहे. या खांबांवर असलेल्या लाकडी तुळईस अनेक भाविक नवसपूर्तीनंतर पितळेच्या घंटा अडकवतात. गर्भगृहात देव भूतनाथाची काळ्या पाषाणातील उभी द्विभूज तेजस्वी मूर्ती आहे. मूर्तीच्या एका हातात तलवार व दुसऱ्या हातात पानपात्र आहे. डोक्यावर नागफण्यांचा मुकुट, मोठे डोळे, भारदस्त दाढी व मिशी, गळ्यात रुद्राक्ष माळा, कमरेस पट्टा व पायात कडे असलेली ही मूर्ती सुंदर भासते. या मूर्तीशेजारी गर्भगृहात इतर देवता व गणांच्या पाषाण मूर्ती आहेत.
दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध पंचमी व षष्ठी या दोन दिवशी देव भूतनाथाची यात्रा भरते. या वेळी मंदिराच्या गावाजवळ असलेल्या कमानीपासून ते मंदिरापर्यंतच्या सुमारे एक किमी अंतरावर विद्युत रोषणाई केली जाते. या मार्गाच्या दोन्हीकडे यात्रोत्सवात पूजासाहित्य, खेळणी, गृहोपयोगी वस्तू विक्रीची शेकडो दुकाने सजतात. या यात्रोत्सवासाठी संपूर्ण कोकणासह राज्यातून व परराज्यांतूनही भाविक येतात. या देवाला बोललेला नवस पूर्ण होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. कोकणातील सावंतवाडी परिसरात देवाला लोटांगणांचा नवस बोलण्याची पद्धत अधिक दिसून येते. त्याप्रमाणे याही देवाला लोटांगण घालण्याचा नवस बोलला जातो व यात्रेच्या निमित्ताने नवस फेडण्यासाठी भाविक लोटांगण घालतात.