देव आदिनारायण मंदिर

परुळे, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग

वेंगुर्ला तालुक्यातील परुळे येथील सुमारे ८०० वर्षांपूर्वीचे देव आदिनारायण मंदिर हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथील आदिनारायण हा काही सारस्वतांचा व गौड ब्राह्मणातील धनंजय गोत्री घराण्याचे कुलदैवत आहे. असे सांगितले जाते की ओडिशाकडून या परिसरात आलेल्या मंडळींनी आपले उपास्यदैवत आदिनारायणही इकडे आणला असावा. या मंदिरातील आदिनारायणाची मूर्ती ही रथावर आरूढ आहे. त्यामुळे येथे माघ शुद्ध सप्तमीला रथसप्तमीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. या उत्सवासाठी हजारो भाविक येथे उपस्थित असतात.

निसर्गाच्या कोंदणात वसलेल्या परुळे गावात ३२ वाड्या आहेत. या गावाच्या एका बाजूला विशाल समुद्र, तर दुसऱ्या बाजूला कर्लीची खाडी आहे. जांभ्या दगडाच्या टेकड्या, नारळी-पोफळीच्या बागा व हिरवळीतून उठून दिसणाऱ्या तांबडमातीच्या पायवाटा असे भरभरून निसर्गसौंदर्य परुळे या गावाला मिळालेले आहे. अशा या सुंदर गावात ग्रामदेवता देव वेतोबा, रवळनाथ, गौरीशंकर, देवी वराठी व देव आदिनारायण यांची प्राचीन मंदिरे आहेत. असे सांगितले जाते की या सर्व मंदिरांची उभारणी व त्यांतील मूर्तींची स्थापना १२०१ ते १२२५ च्या दरम्यान झाली असावी. या सर्व मंदिरांमध्ये भव्य असणाऱ्या देव आदिनारायण मंदिरात सध्या असलेली सूर्यमूर्ती ही १८५१ साली प्रतिष्ठापित करण्यात आलेली आहे. त्यापूर्वीच्या पूजल्या जाणाऱ्या दोन प्राचीन मूर्ती मंदिराच्या आवारात पाहायला मिळतात. सध्या गर्भगृहात असलेली आदिनारायणाची मूर्ती आणि या मूर्तींमध्ये खूप साम्य आहे.

ऐतिहासिक संदर्भांनुसार, शके ९३२ म्हणजेच इ.स. १०१० मधील शिलाहारवंशीय रट्ट राजाच्या बलिपतन ताम्रपटात पलडरे गावाच्या पश्चिम भागाकडे असणारी एक पोफळीची बाग एका ब्राह्मणाला दान करण्यात आली, असा उल्लेख आहे. हा उल्लेख परुळे गावासंदर्भात आहे, असे अभ्यासकांचे मत आहे. शके १३१३ म्हणजे इ.स. १३९१ च्या एका ताम्रपटात परौल्यग्राम असा आलेला उल्लेखही परुळे गावासंदर्भात असल्याचे मानले जाते. अकराव्या शतकापासून ते सोळाव्या शतकापर्यंत येथे सामंत व देसाई यांची सत्ता होती. ‘कोकणाख्यान’ या पोथीच्या सह्याद्री खंडाच्या उत्तरार्धात परुळे येथील आदिनारायण देवालयासंदर्भात उल्लेख मिळतो, तो असा की ‘मग देवलीकरे आराध्यदैवत। स्थापना केली परुळे ग्रामात।। त्यासी म्हणती कनकादित्य। तो आदिनाथ त्या नाव।। देवलीकरे देशमत जोडिले। मांजर्डे वाडीसी घर केले।। म्हणोनी मांजर्डेकर म्हणीतले। धनंजय गोत्र त्याचे॥ या प्रसंगापासोनि जाण। कुडवाळ देशीयासी वेगळेपण।। दुरावले ते हे कारण। अभिमाने जाण पा केले।।’ आदिनारायण, कनकादित्य, आदिनाथ, आदित्यनारायण अशा अनेक नावांनी सूर्यमूर्तीचा उल्लेख या पोथीमध्ये करण्यात आलेला आहे.

परुळे येथील आदिनारायण मंदिर हे पश्चिमाभिमुख आहे. रस्त्यापासून काहीसे उंचावर असलेल्या या मंदिराभोवती तटबंदी आहे. तटबंदीत असलेल्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. येथील प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला सिंहांचे पुतळे आहेत. मुखमंडप, दोन सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. २००३ मध्ये केलेल्या नूतनीकरणानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मंदिराच्या समोरील बाजूस दीपस्तंभ व त्यापुढे सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी रंगमंच बांधण्यात आलेला आहे. मुखमंडपात असलेल्या ११ पायऱ्या चढून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. आयताकृती असलेल्या येथील दोन्ही सभामंडपांच्या दोन बाजूला भाविकांना बसण्यासाठी कक्षासनांची रचना केलेली आहे. या मंदिराच्या गर्भगृहाऐवजी सभामंडपाला पिरॅमिडच्या आकाराचे कौलारू व कोनाकार शिखर आहे.

येथील अंतराळात प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह आहे. या गर्भगृहाच्या दर्शनीभिंतीलगत स्टीलच्या जाळ्या लावलेल्या आहेत. गर्भगृहाच्या द्वारपट्टीच्या वरील भागात दोन सूर्यमूर्ती आहेत. गर्भगृहातील एका दगडी वज्रपीठावर देव आदिनारायणाची द्विभूज मूर्ती प्रतिष्ठापित आहे. काळ्या दगडातील या मूर्तीच्या तळशीलेवर डावीकडे तीन, उजवीकडे तीन व मध्यभागी एक असे सात घोडे आहेत. या सात घोड्यांच्या रथात असणाऱ्या आदिनारायणाच्या मस्तकावर मुकुट, कानात कर्णभूषणे, दंडात केयूर (बाजूबंद), कमरेत मणिमेखला हे दागिने आहेत. आदिनारायणाचे दोन्ही हात कोपरात दुमडलेले आहेत. या दोन्ही हातांमध्ये कमळे धारण केलेली आहेत. मूर्तीभोवती सुंदर कलाकुसर असलेला पितळी मखर आहे. मूर्तीच्या डाव्या पायापाशी एक छोटी मूर्ती आहे. तिच्या डाव्या हातात शाईची दौत आणि उजव्या हातात लेखणी आहे. ही पिंगळाची मूर्ती असल्याचे सांगितले जाते. उजव्या पायापाशी अशीच छोटी, हातात दंड घेतलेली मूर्ती आहे, ती दंडीची मूर्ती आहे. या मूर्तीच्या कपाळावरील गंध, डोळे व मिशीचा भाग हा सोन्याचा आहे.

ज्येष्ठ शुद्ध द्वितीया, शके १७७३ म्हणजे इ.स. १८५१ रोजी आदिनारायणाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना येथे झाल्याचा उल्लेख असलेला शिलालेख या मंदिराच्या गर्भगृहात आहे. या आदिनारायणाचे वाहन रथ आहे. त्यामुळे रथसप्तमीचा उत्सव येथे मोठ्या प्रमाणात साजरा होतो. हिंदू धर्मीयांच्या मते रथसप्तमी हा सूर्याचा जन्मदिवस आहे. हा उत्सव येथे तीन दिवस साजरा होतो. या मंदिरामध्ये होणाऱ्या वार्षिक उत्सवांमधील हा मोठा उत्सव असतो. यावेळी हजारो भाविक उपस्थित असतात. या मंदिरात काही शुल्क आकारून अभिषेक, एकादशणी, लघुसौर, महासौर, समाराधना, लघुसौर समाराधना, सत्यनारायण पूजा व मुंज असे धार्मिक विधी होतात. (संपर्क : समीर सामंत, पुजारी, मो. ८६०५३५३१६७) या मंदिर परिसरातील उमा-महेश्वर मंदिर आहे. त्यामध्ये सुमारे तीन फूट उंचीची काळ्या पाषाणातील वासुदेवमूर्ती आहे. तिच्या अंगावर रुद्राक्षमाळा पायाजवळ सात अश्वांचा सारथी अरुण आहे. या मंदिर परिसरात दोन भक्त निवास असून त्यात भाविकांना राहण्यासाठी साध्या व वातानुकूलित खोल्या उपलब्ध आहेत.

उपयुक्त माहिती

  • वेंगुर्ल्यापासून २८ किमी, तर मालवणपासून १९ किमी अंतरावर
  • वेंगुर्ला, मालवण येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, दूरध्वनी : ०२३६६ २६९५१८
Back To Home