परभणी जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या परभणी शहराला प्राचीन काळी ‘प्रभावतीनगरी’ म्हणून ओळखले जात असे. या ऐतिहासिक नगरीतील वसमत रस्त्यावर वसलेले दत्तधाम हे पवित्र स्थान मराठवाडा आणि विदर्भातील असंख्य दत्तभक्तांना चिरपरिचित आहे. दत्तात्रयांचे परम भक्त असलेले श्री अखंडानंद सरस्वती (ओक) स्वामी यांनी या मंदिराची स्थापना केली आहे. येथे स्वामींचे समाधीमंदिरही उभारण्यात आले आहे. दत्तधाम मंदिरात दरवर्षी कार्तिक पौर्णिमेपासून ते मार्गशीर्ष पौर्णिमेपर्यंत संपूर्ण एक महिना दत्तजयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. दत्तजयंतीच्या दिवशी अनेक भाविकांच्या उपस्थितीत “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” आणि “अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त” या भक्तीपूर्ण गजरात दत्तजन्मोत्सव साजरा केला जातो.
या मंदिराच्या स्थापनेचा एक विशेष इतिहास आहे. दत्तात्रयांचे निस्सीम भक्त असलेले श्री अखंडानंद सरस्वती (ओक) स्वामी हे परभणी शहरात विविध प्रसंगी गुरुचरित्र पारायणाचे कार्यक्रम करत असत. एके वर्षी शहरातील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात अशाच एका गुरुचरित्र पारायणाचा कार्यक्रम पार पडला.
या धार्मिक कार्यक्रमातून जमा झालेल्या निधीचा एखाद्या योग्य कारणासाठी विनियोग व्हावा अशी स्वामींची तीव्र इच्छा होती. त्यातूनच येथे दत्तात्रयांचे मंदिर उभारण्याची कल्पना पुढे आली. मंदिराच्या बांधकामासाठी स्वामींनी योग्य जागेचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी परभणी शहरानजीकच्या कारेगाव शिवारातील सध्याची मंदिराची जागा त्यांना पसंत पडली. या जमिनीचे मालक श्री कारेगावकर हेही दत्तात्रयांचे भक्त होते. त्यांनी ही जागा मंदिरासाठी स्वेच्छेने दान केली. त्यानंतर येथे हे भव्य मंदिर उभारण्यात आले. श्री अखंडानंद स्वामींचे शिष्य असलेले श्री मकरंद महाराज हे १९८८ पासून येथे मठाधिपती म्हणून मंदिराचे सर्व काम पाहतात. या परिसरात स्थापन केलेल्या अखंडानंद सरस्वती (ओक) स्वामी यांच्या समाधीमंदिरात, सन २०१७ मध्ये गुरुप्रतिपदेच्या शुभमुहूर्तावर परभणी शहरात काढलेल्या भव्य मिरवणुकीनंतर स्वामींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
हे मंदिर वसमत रस्त्यावर स्थित आहे. शांत परिसर लाभलेल्या या मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत आल्यावर सुरुवातीला अखंडानंद सरस्वती (ओक) स्वामी यांचे समाधीमंदिर लागते. तेथून काही पावलांवर असलेल्या दुमजली वास्तूला लागूनच हे मुख्य मंदिर आहे. प्रशस्त सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे.
मंदिराच्या बंदिस्त अशा सभामंडपात उजवीकडे श्री अखंड गुरुचरित्र पारायण कक्ष आहे. येथे अखंडानंद सरस्वती (ओक) स्वामी यांची एक सुंदर मूर्ती आहे. सभामंडपातील भिंतींवर श्री नृसिंह सरस्वती, संत एकनाथ, श्री लोकनाथ तीर्थस्वामी, श्री स्वामी समर्थ, श्री माणिक प्रभू महाराज, श्री रंगावधूत महाराज, श्री पंतमहाराज आणि श्री पाचलेगावकर महाराज आदी संत व महापुरुषांच्या प्रतिमा लावलेल्या आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळील चौथऱ्यावर पवित्र पादुका ठेवण्यात आल्या आहेत. येथून पुढे मंदिराच्या मुख्य गर्भगृहात प्रवेश होतो. गर्भगृहात उंच पीठासनावरील दत्तात्रयांची संगमरवरी दगडात घडवलेली अत्यंत विलोभनीय मूर्ती आहे. या मूर्तीभोवती सुंदर अशी कोरीव प्रभावळ आहे. या मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर बांधलेल्या छोट्या मंदिरांमध्ये आद्य शंकराचार्य, श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी), मछिंद्र महाराज, श्री नृसिंह सरस्वती (अयोध्या), सीताराम महाराज आणि श्री योगानंद सरस्वती यांच्या मूर्ती आहेत.
मुख्य मंदिरासमोरच असलेले अखंडानंद सरस्वती (ओक) स्वामी यांचे समाधीमंदिर काळ्या पाषाणात उभारलेले आहे.
अर्धखुला सभामंडप आणि मध्यभागी गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. येथील दगडी स्तंभांवर आकर्षक कलाकुसर केलेली आहे. गर्भगृहात अखंडानंद सरस्वती (ओक) स्वामी यांची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या बाह्य भिंतींवरील देवकोष्टकांमध्ये गरुडदेवतेसह काही देव-देवतांच्या मूर्ती आहेत. या समाधीमंदिरावर सुंदर शिखर आहे आणि त्यावर अनेक शिल्पे कोरलेली आहेत. मंदिर परिसरात एक गोशाळाही चालवली जाते. परिसरात असलेल्या एका औदुंबर वृक्षाखाली एक छोटे मंदिर आहे.
दत्तधाम मंदिरात दिवसभर भाविकांची मांदियाळी असते. दर गुरुवारी शहरातील अनेक भाविक दर्शनासाठी येथे येतात. येथे श्री गुरुचरित्र सारामृत पारायण, श्री दत्त याग, श्री गुरुचरित्र कथामृत आणि कीर्तन सप्ताह आदी कार्यक्रम नियमितपणे होतात. दरवर्षी आषाढ महिन्यात शेगाव येथील श्री गजानन महाराजांची पालखी एक दिवसासाठी येथे मुक्कामी असते.
दरवर्षी कार्तिक पौर्णिमेपासून ते मार्गशीर्ष पौर्णिमेपर्यंत एक महिना येथे दत्तजयंतीचा उत्सव होतो. या कालावधीत दररोज लघुरुद्राभिषेक करण्यात येतो. या उत्सवादरम्यान दररोज सुमारे दीड हजार भाविक येथे दर्शनासाठी येतात.
या उत्सवानिमित्त येथे गुरुचरित्र पारायण, महाभिषेक, भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दत्तजयंतीच्या दिवशी सभामंडपात फुलांचा भव्य गालिचा तयार करण्यात येतो. परिसरात मोठी रांगोळीही काढण्यात येते. संपूर्ण मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात येते. या दिवशी येथे दीपोत्सवही होतो.
या दिवशी पहाटेपासून दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागतात. सकाळी महाभिषेक झाल्यावर विविध धार्मिक विधी होतात. दुपारी महानैवेद्य दाखवण्यात येतो. त्यानंतर आरती झाल्यावर भाविकांना प्रसादाचे वाटप केले जाते.
सायंकाळी अनेक भाविकांच्या उपस्थितीत “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” आणि “अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त” या जयघोषात दत्तजन्मोत्सव साजरा करण्यात येतो. आरतीने या जन्मोत्सवाचा समारोप करण्यात येतो.
जन्मोत्सवानंतर परिसरात पालखी मिरवणूक काढण्यात येते. दररोज सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात दर्शनासाठी येता येते.