उत्तर प्रदेशातील प्रयागराज हे प्राचीन पवित्र तीर्थक्षेत्र आहे. गंगा, यमुना आणि गुप्त सरस्वती या तीन नद्यांचे संगमस्थान असलेल्या प्रयागराजप्रमाणेच करवीर तालुक्यातही एक प्रयाग क्षेत्र आहे. हे स्थान नंद प्रयाग, दक्षिण काशी, दक्षिण प्रयाग किंवा प्रयाग चिखली या नावाने ओळखले जाते. कोल्हापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेल्या पंचगंगा नदीचे उगमस्थान असलेल्या या प्रयाग क्षेत्रामध्ये तब्बल पाच नद्यांचा संगम होतो. या स्थानावर साक्षात् दत्तगुरू स्नानास येतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या मंदिरात नेहमीच भाविकांची दत्तांच्या दर्शनासाठी गर्दी असते.
हिंदू धर्मामध्ये प्राचीन काळापासून चार प्रमुख क्षेत्री कुंभमेळा भरतो. हरिद्वार, उज्जैन, नाशिक-त्र्यंबकेश्वर आणि प्रयागराज ही ती चार क्षेत्रे आहेत. मोगल काळात प्रयागराजचे नामांतर इलाहाबाद असे करण्यात आले होते. २०१९ मध्ये ते बदलून पुन्हा जुने नाव देण्यात आले. या क्षेत्राचे जे माहात्म्य सांगण्यात येते, तेच माहात्म्य करवीरमधील प्रयाग चिखली या स्थानासही असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. दरवर्षी माघ महिना तसेच कार्तिक पौर्णिमेला लाखो भाविक या ठिकाणी येतात. मकर संक्रांतीपासून एक महिन्याचा काळ येथे माघ स्नान महोत्सव म्हणून साजरा केला जातो. या काळात येथील संगमावरील छोट्या घाटावर स्नान करण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी होते. याचे कारण प्रयाग चिखलीमध्ये पाच नद्यांचा संगम असल्याचे मानले जाते.
‘गुरुचरित्रा’च्या अठराव्या अध्यायामध्ये या पाच नद्यांची नावे नमूद आहेत. त्यातील सोळाव्या श्लोकात असे म्हटले आहे, की ‘शिवा भद्रा भोगावती। कुंभीनदी सरस्वती। पंचगंगा ऐसी ख्याति। महापातक संहारी।।’ गुरुचरित्रात या पंचनद्यांच्या संगमाचाही उल्लेख कुरवपूर म्हणजे हल्लीच्या कुरुंदवाडच्या संदर्भात आला आहे. तेराव्या श्लोकात असे म्हटले आहे, की ‘कुरवपूर ग्राम गहन। कुरूक्षेत्र तेंचि जाण। पंचगंगाकृष्णासंगम। अति उत्तम परियेसा।।’ प्रयाग चिखली हे क्षेत्रही येथील संगमामुळे प्राचीन काळापासून पवित्र गणले गेले आहे. करवीर माहात्म्य या ग्रंथातही या क्षेत्राचा उल्लेख आहे.
या स्थानाबद्दल अशी आख्यायिका सांगण्यात येते की विष्णूने ब्रह्मदेवांना प्रजा निर्माण करण्यास सांगितले तेव्हा त्यांनी पन्हाळा म्हणजेच ब्रह्मगिरी येथे येऊन कठोर तपश्चर्या केली. त्यानंतर अपूर्व यज्ञ केला. त्याची सांगता झाल्यानंतर स्नान करायचे होते; परंतु त्या ठिकाणी महानदी नव्हती. तेव्हा कश्यप, गालव, वसिष्ठ, विश्वामित्र व गार्ग्य या ऋषींनी प्रत्येकी एकेक नदी निर्माण केली. असे सांगण्यात येते की येथील चार नद्या प्रकट आहेत आणि सरस्वती नदी गुप्त आहे. देवांनी येथे स्नान केल्यानंतर येथे रुद्रपद लिंग स्थापन केले. ते येथील कार्तिकस्वामी मंदिरात आहे.
येथे नदीतटावरील प्रशस्त जागेमध्ये गुरुदेव दत्ताचे मंदिर स्थित आहे. हमरस्त्याच्या कडेला प्रशस्त जागेमध्ये वसलेले हे मंदिर आधुनिक बांधणीचे आहे. येथे प्राचीन मंदिराचे अवशेष दिसतात. त्यातून या स्थानाचे प्राचीनत्व दृगोचर होते. या नव्या मंदिराची रचना सभामंडप, अंतराळ, गर्भगृह आणि त्यावर काहीसे कलशाकार असे शिखर अशी आहे. सभामंडपासमोर चौरसाकार पायऱ्यांच्या पिरॅमिडसारखी दिसणारी दोन समाधीस्थाने आहेत. त्यातील एका स्थानावर शिवलिंग व दुसऱ्यावर पादुका आहेत. येथे होमकुंडासारखी दगडी रचना, तसेच प्राचीन मंदिराचे काही भग्न स्तंभही दिसतात. मंदिराचा सभामंडप समतल छताचा आणि अर्धखुल्या प्रकारचा आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस छोट्या देवकोष्टकात गणपतीची, तर डावीकडील देवकोष्टकात हनुमानाची मूर्ती आहे. सभामंडपात दत्तगुरुंची सुंदर सजवलेली लाकडी पालखी ठेवलेली आहे. सभामंडपातून गर्भगृहास प्रदक्षिणा मार्ग आहे. गर्भगृहामध्ये एका चौथऱ्यावरील मोठ्या संगमरवरी देव्हाऱ्यात त्रिमुखी दत्ताची सुबक संगमरवरी मूर्ती आहे. या मूर्तीच्या खालच्या बाजूस चांदीचा त्रिमुखी मुखवटा विराजमान आहे.
मंदिर परिसरात एक बारीक कोरीव काम केलेली उभी आयताकार शिळा आहे. ती नवग्रह शिळा म्हणून ओळखली जाते. या शिळेच्या वरच्या भागात कीर्तिमुख कोरलेले आहे. या शिळेवर नवग्रह आणि सत्तावीस नक्षत्रे कोरलेली असल्याची आणि पूर्वी या शिळेच्या आधारानेच पंचांग पाहिले जात असल्याचे सांगण्यात येते. मंदिराच्या मागच्या बाजूस काही अंतरावर संगम घाट आहे. तेथे छोटा मंडप बांधलेला आहे. मंदिर परिसरात कार्तिक स्वामींचेही मंदिर आहे. वर्षातून एकदाच कृतिका नक्षत्रकाळात भाविक त्याचे दर्शन घेऊ शकतात.
मंदिरात माघ स्नान महोत्सवाप्रमाणेच दत्त जयंतीस भाविकांची मोठी गर्दी असते. येथे विविध सण व धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात येतात. येथे मंदिर व्यवस्थापनातर्फे ‘श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी अन्नछत्र’ही चालवले जाते.