हिंदू धर्मात अनेकविध संतांनी कर्मकांडाला विरोध करून निर्भेळ अध्यात्माचा पुरस्कार केला. परंतू आध्यात्मिक शक्तींनी भौतिक दुःखातून सुटका करून घेता येते हे ही दाखवून दिले आहे. सामान्य भाविक यालाच चमत्कार मानतात. त्यामुळे अशा स्थानांवर भाविकांची अढळ श्रद्धा निर्माण होते. धाराशिव जिल्ह्यातील मलकापूर येथील दत्त मंदिर व सुभाष महाराज समाधी मंदिर हे त्यापैकीच एक आहे. येथे आल्याने जीवनातील सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
हे देवस्थान सुमारे शंभर वर्षे प्राचीन आहे. असे सांगितले जाते की सुभाष महाराज हे लहानपणापासून मोठे दत्त भक्त होते. ते उठता बसता दत्त नामाचा जप करीत. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन श्रीदत्तात्रयांनी त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले. त्यामुळे त्यांना विविध सिद्धी प्राप्त झाल्या. या सिद्धींचा उपयोग करून जनसामान्यांचे कल्याण करावे, असा श्रीदत्तात्रयांनी त्यांना आदेश दिला. त्यामुळे येथे पिंपळाच्या झाडाखाली बसून सुभाष महाराज सामान्य जनांच्या समस्यांचे निवारण करू लागले. पुढे येथे त्यांनी दत्तस्थान स्थापन केले. १९७० साली मुंबई ते मलकापूर अशी थेट एसटी सेवा केवळ सुभाष महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सुरु झाली होती, असे सांगितले जाते.
या स्थानावर येऊन दर्शन घेतल्याने भाविकांच्या शारीरिक व मानसिक व्याधी दूर झाल्याची हजारो भाविक साक्ष देतात. केवळ समाधीचे दर्शन घेतल्याने काही भाविकांचे हृदय विकार, अस्थिरोग, मणक्याचे दुखणे, कॅन्सर, एड्स, मेंदू विकार दूर झाल्याची उदाहरणे सांगितली जातात. सुभाष महाराजांच्या निर्वाणानंतर त्यांच्या समाधीच्या दर्शनानेही सर्व समस्यांचे निवारण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे आजही दर गुरुवारी व पौर्णिमेला समाधीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांचा मेळा येथे भरतो.
मलकापूर गावापासून काही अंतरावर असलेल्या या देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंदिराची पहिली स्वागतकमान आहे. कमानीपासून सुमारे एक किमी अंतरावर असलेल्या देवस्थानापर्यंत पक्की सडक आहे.
मंदिरासभोवती असलेल्या तीन फूट उंचीच्या आवारभिंतीत प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या पेव्हर ब्लॉक आच्छादित प्रशस्त प्रांगणात भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. प्रांगणात एक मोठे कीर्तन व प्रवचन सभागृह आहे. खुल्या स्वरूपाच्या या सभागृहात समोरील बाजूला व्यासपीठ व व्यासपिठाच्या दोन्ही बाजूला दोन कक्ष आहेत. येथून पुढे टप्याटप्याने वर जाणाऱ्या सुमारे वीस फूट लांबीच्या पायऱ्या आहेत. त्यापुढे सुभाष महाराज यांचे समाधी मंदिर आहे.
सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला देवकोष्टके आहेत. प्रवेशद्वारासमोर पाच पायऱ्या, द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी व ललाटबिंबावर चक्र आहेत. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा आहेत. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात उजेड व हवा येण्यासाठी वातायने आहेत. सभामंडपात नक्षीदार चौकोनी स्तंभ आहेत. मध्यभागी जमिनीवर वर्तुळ रचनेत कासव शिल्प आहे. येथे सुभाष महाराज यांच्या चितेचे दहन केले होते व दहनापासून तिसऱ्या दिवशी चितेच्या राखेतून औदुंबर वृक्ष प्रकट झाला होता, असे सांगितले जाते. सभामंडपात उजव्या बाजूच्या कक्षात सुभाष महाराजांची गादी आहे. या गादीवर बसून ते भाविकांच्या अडचणी व समस्या दूर करीत असत.
या कक्षात मागील भिंतीवर सुभाष महाराजांचे चित्र असलेली मोठी प्रतिमा आहे. पुढे गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या लाकडी द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी व प्रवेशद्वारास चांदीच्या नक्षीदार झडपा आहेत. गर्भगृहात मध्यभागी सुभाष महाराजांची समाधी व मागील भिंतीलगत वज्रपिठावर महाराजांची ध्यानस्थ मूर्ती आहे. मूर्तीवर वस्त्रे व डोक्यावर फेटा आहे. गर्भगृहाच्या बाह्यबाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. गर्भगृहाच्या छतावर तीन थरांचे चौकोनी शिखर आहे. शिखरात स्तंभ नक्षी व पद्मदल नक्षी आहे. शिखराच्या शीर्षभागी स्तूपिका व त्यावर कळस आहे.
मंदिराच्या बाजूला प्रांगणात भक्तनिवासाच्या इमारती आहेत. बाहेर गावाहून आलेल्या भाविकांना राहण्यासाठी येथे खोल्या आहेत. भक्तनिवासाच्या बाजूला स्वयंपाकघर व बाजूला अन्नछत्र मंडप आहे. येथे दिवसभर महाप्रसादाचे वाटप केले जाते. प्रांगणात श्रीदत्तात्रेयांचे लहान मंदिर आहे. मंदिरात वज्रपिठावर मध्यभागी दत्तात्रयांची त्रिमुखी मूर्ती आहे. या मूर्तीच्या डाव्या बाजूला सुभाष महाराज यांची मूर्ती आहे.
दत्त जयंती हा येथील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दर गुरुवारी व पौर्णिमेला हजारो भाविक मंदिरात सुभाष महाराज यांच्या समाधीचे दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी येतात. मंदिरात वर्षभरातील सर्व सण व उत्सव साजरे केले जातात. मंदिरात वर्षभर भजन, कीर्तन, प्रवचन, संगीत, महाप्रसाद आदी कार्यक्रम सुरू असतात. मंदिरात रोज दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या हजारोंच्या घरात असते.