दत्त देवस्थान

मुरूड, ता. मुरूड, जि. रायगड

समुद्रकाठावरील मुरूड या पर्यटकप्रिय नगरीत दत्तात्रेयांचे प्राचीन मंदिर आहे. या शहराच्या उत्तरेकडे, समुद्रसपाटीपासून सुमारे ३५० मीटर उंच टेकडीवर प्रशस्त अशा जागेमध्ये हे मंदिर वसलेले आहे. मंदिर भव्य आणि ऐतिहासिक वारसा असलेले आहे. कोकणात वासुदेवानंतर सरस्वती टेंब्ये महाराज यांच्यासारख्या सत्पुरुषांमुळे दत्त संप्रदायाचा मोठा प्रसार झाला. येथील दत्त मंदिरामुळे कोकणातील दत्त संप्रदायाच्या प्रभावावर प्रकाश पडतो. हे मंदिर भाविकांप्रमाणेच पर्यटकांचेही आकर्षण आहे. येथून मुरूड शहर, जंजिरा किल्ला तसेच कासा किल्ल्याचे नयनमनोहर दृश्य दिसते

हे मंदिर पेशवेकालीन आहे. औरंगजेबाच्या स्वारीमुळे विस्कटलेली स्वराज्याची घडी सुरळीत करण्याचे कार्य छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत सुरू होते. त्या धामधुमीच्या काळात, अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर यांनी या ठिकाणी दत्तपादुकांची प्रतिष्ठापना केली, असा इतिहास सांगण्यात येतो. ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर हे त्या काळातील एक मोठे योगी सत्पुरुष होते. छत्रपती शाहू महाराज, पेशवे बाळाजी विश्वनाथ तसेच बाजीराव पेशवे यांचे ते गुरू होते. ते मोठे गणेशभक्त होते. चिपळूणजवळील मौजे पेढे या गावी परशुरामाच्या प्राचीन देवस्थानाच्या परिसरात त्यांनी .. १६८६ ते १६९८ या काळात गुप्तरीत्या तपश्चर्या केली होती. १६९८च्या पौष शुद्ध पौर्णिमेस ते परशुराम क्षेत्री प्रकट झाले. यानंतर त्यांनी येथील परशुरामाच्या जीर्ण मंदिराचा उद्धार केला. शाहू छत्रपती पेशव्यांप्रमाणेच अनेक सरदारदरकदार त्यांचे भक्त होते. त्यामुळे त्यांना भरपूर दान मिळत असे. पेशव्यांना पैशांची चणचण भासत असताना ब्रह्मेंद्रस्वामी यांनी त्यांना कर्जाऊ रक्कम दिल्याचे उल्लेख आहेत. या पैशांतून त्यांनी अनेक मंदिरे तसेच तलाव, विहिरी बांधण्यासारखी कामेही केली. मुरूडमधील दत्त मंदिर हे त्या कामांपैकी एक आहे

ब्रह्मेंद्रस्वामी यांच्यासारख्या गणेशभक्ताने दत्त मंदिराची स्थापना करणे यामागे विशेष कारण आहे. कोकण ही परशुरामाची भूमी म्हणून ओळखली जाते. ब्रह्मेंद्रस्वामी यांनी परशुराम क्षेत्र हे आपल्या तपश्चर्येसाठी निवडले होते. ‘दत्तात्रेय ज्ञानकोशामधील कथेनुसार दत्त हा परशुरामाचा गुरू होता. दत्ताच्या कृपेनेच परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली आपल्या पित्याच्या हत्येचा सूड घेतला. मात्र त्या कृत्यामुळेही त्याच्या मनास शांती मिळाली नाही. त्यामुळे तो पुन्हा दत्तगुरूंना शरण गेला. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी यांच्याश्रीदत्तमाहात्म्यया ग्रंथातश्रीदत्ताचें सख्य करून। राम राहिला संनिधान।असे म्हटलेले आहे. परशुरामाचे मंदिर बांधल्यानंतर ब्रह्मेंद्रस्वामींनी परशुरामाच्या गुरूचे म्हणजेच दत्ताचे मंदिर बांधले, यास विशेष अर्थ आहे.

या मंदिराबाबत अशीही आख्यायिका सांगण्यात येते की जंजिरेकर सिद्दीला स्वामींनी चमत्कार दाखवल्यानंतर या टेकडीवर दत्तपादुकांची स्थापना करण्यात आली. थोर इतिहास संशोधक रावबहादूर दत्तात्रय बळवंत पारसनीस यांनीमहापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकरचरित्र पत्रव्यवहारया पुस्तकात स्वामींच्या आणि सिद्दीच्या संबंधांबद्दल माहिती दिली आहे. १८५७ च्या बंडानंतर नऊ वर्षांनी प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकात असे नमूद केले आहे की १७०७ मध्ये जंजिऱ्याचा हबशी सिद्दी कासीम हा मेल्यानंतर त्याच्या गादीवर याकूदखान सिद्दी सुरूर ऊर्फ बडेखान बसला. तो सिद्दी कासीमप्रमाणे हिंदुद्वेष्टा नव्हता. त्याच्या कानावर ब्रह्मेंद्रस्वामींची कीर्ती आली होती. ब्रह्मेंद्रस्वामी हे केळीच्या पानावर बसून समुद्राची खाडी तरून जातात, अशी आख्यायिका तेव्हा प्रचलित होती. अशा अवलिया योग्याचे दर्शन घ्यावे म्हणून बडेखान याने स्वामींना दंडाराजापुरीस पाचारण केले. त्यावेळी स्वामी केळीच्या पानावर बसून खाडी ओलांडून दंडाराजापुरीस गेले. काहींच्या म्हणण्यानुसार, सिद्दीच्या बेपत्ता मेहुण्याचा शोध घेण्यासाठी त्याने स्वामींना बोलावले होते. त्यासाठी त्याने मुरूडला पालखी पाठविली. मात्र त्यांनी पालखीत बसण्यास नकार दिला केळीचे पान समुद्रात टाकून त्यावर बसून ते जंजिऱ्याला गेले. हे पाहून बडेखान चकित झाला. नंतर स्वामींनी भविष्य वर्तविल्यानुसार ठरलेल्या दिवशी बडेखानाचा मेहुणा परत आला. तेव्हा बडेखानाने त्यांचा मोठी दक्षिणा देऊन गौरव केला. यावेळी स्वामींनी बडे खानाकडून परशुराम देवस्थानासाठी पेढे आवडस या दोन्ही गावांच्या इनाम सनदा लिहून घेतल्या, असे पारसनिसांनी नमूद केले आहे. त्यानंतर स्वामींनी येथील टेकडीवर उंबराच्या झाडापाशी दत्तपादुकांची प्रतिष्ठापना केली.

या टेकडीवर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. एक ३१५ पायऱ्यांचा मार्ग आहे दुसरा गाडीमार्ग आहे. .. १९०६०७ मध्ये तत्कालीन जंजिरा संस्थानचे सरन्यायाधीश राजाध्यक्ष यांनी या पादुका मंदिरात दत्ताच्या छोट्या मूर्तीची स्थापना केली. या मूर्तीसमोर ब्रम्हेंद्रस्वामींनी प्रतिष्ठापित केलेल्या दत्ताच्या पादुका ठेवण्यात आल्या. येथे तेव्हा छोटेसे मंदिरही बांधण्यात आले. हे प्राचीन मंदिर कोकणी स्थापत्यशैलीत बांधलेले कौलारू उतरत्या छपराचे होते. १९२६२७ मध्ये या छोट्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. असे सांगण्यात येते की त्या मंदिराच्या सभामंडपातील प्रत्येक काष्ठस्तंभावर काचेवर कोरलेले सुविचार होते. सभामंडपास लाकडी छत होते. त्यावर दत्त मंदिरातून दिसणारी आजूबाजूच्या परिसराची चित्रे कोरण्यात आली होती. यानंतर २१ जून १९९७ रोजी या मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार करण्यात आला. हे नूतन मंदिर पूर्वीच्या मूळ पायावरच उभारण्यात आले आहे जुन्या भिंतीही तशाच ठेवलेल्या आहेत. केवळ कौलारू छपराऐवजी तेथे सिमेंट कॉंक्रिटचा स्लॅब टाकून सभामंडप गाभारा सुशोभित करण्यात आला आहे.

नूतनीकरण करण्यात आलेल्या या मंदिराची संरचना मुखमंडप, सभामंडप, गर्भगृह आणि मुखमंडपाच्या गर्भगृहाच्या वर शिखर अशी आहे. खुल्या स्वरूपाच्या मुखमंडपासमोर एका छोट्या चौथऱ्यावर तुळशी वृंदावन आहे. मुखमंडपाच्या छतावरील शिखर मोदकाच्या आकाराचे, वर छोटा आमलक असलेले आहे. येथून पाच पायऱ्या चढून सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपास प्रशस्त खिडक्या असून, त्यामुळे मंदिरात मुबलक सूर्यप्रकाश असतो. सभामंडपातूनच गर्भगृहास प्रदक्षिणेचा मार्ग आहे. गर्भगृहाच्या दर्शनीभिंतीवर प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस देव्हारा आहे त्यात गणेशाची धातूची मूर्ती आहे. गर्भगृहात उंच वज्रपीठावर लाकडी सुबक कोरीवकाम केलेल्या देव्हाऱ्यामध्ये त्रिमुखी दत्ताची मूर्ती आहे. शेजारीच दत्त पादुकांची स्थापना केलेली आहे. ब्रह्मेंद्रस्वामींची तसबीरही येथे आहे.

या दत्त मंदिरास प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे. हे देवस्थान १०६ गुंठ्यांत विस्तारलेले आहे. त्यामुळे प्रदक्षिणा तेवढी मोठी होते. देवस्थानात गुरुवारी संध्याकाळी भजन, कीर्तन असे कार्यक्रम असतात. दत्त नामस्मरणात भाविक रममाण होतात. दत्त जयंतीला येथे यात्रा भरते. तीन दिवस चालणाऱ्या यात्रेला सुमारे १०० वर्षांची परंपरा आहे. १९२७ मध्ये येथील यात्रा सोहळ्यास पहिल्यांदा प्रारंभ झाला, अशी नोंद आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशीही येथे उत्सव असतो

उपयुक्त माहिती

  • मुरूड एसटी स्थानकापासून . किमी, तर अलिबागपासून ५० किमी अंतरावर
  • मुंबई, ठाणे रायगड जिल्ह्यातील अनेक शहरांतून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : अव्यय जोशी, सेवेकरी, दत्त मंदिर : मो. ७७७५८८११९४
Back To Home