दशरथेश्वर महादेव मंदिर

बारवगल्ली, मुखेड, ता. मुखेड, जि. नांदेड

भारतीय शिल्पकलेचा प्रारंभ हडप्पा-मोहंजोदडो काळापासून झाल्याचे मानले जाते. पुढे इसवी सन पूर्व मौर्य काळापासून बौद्ध स्तूप, हिंदू व जैन मंदिरांवर शिल्पकला दिसू लागली. त्यानंतर चालुक्य व यादव काळात ही कला विकसित होत जाऊन उच्चतम पातळीवर पोहोचली. त्यामुळेच चालुक्य, शिलाहार व यादव काळातील मंदिरांवर अप्रतीम शिल्पकला पाहायला मिळते. त्यापैकी अनेक मंदिरे आजही विविध ठिकाणी उभी आहेत. या मंदिरांपैकीच एक असलेले दशरथेश्वर महादेव मंदिर नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे आहे. येथील प्राचीन मंदिरावरील शिल्पकला आजही अभ्यासकांना भुरळ घालते.

हे मंदिर चालुक्य काळातील, म्हणजेच सुमारे अकराव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या मंडोवरावर असलेल्या मूर्ती पाहता ते याहून प्राचीन काळातील असल्याचा अंदाज अभ्यासकांकडून व्यक्त केला जातो. या मंदिराबाबत आख्यायिका अशी की रामायण काळात राजा दशरथाच्या हातून श्रावण बाळाची अनवधानाने हत्या झाली होती. या घटनेमुळे श्रावण बाळाच्या आई-वडिलांनी दशरथ राजाला शाप दिला. या शापातून सुटका व्हावी व हत्येचे पातक नाहीसे व्हावे म्हणून दशरथ राजाने या ठिकाणी शिवलिंग स्थापन करून महादेवाची आराधना केली होती. त्यामुळे या मंदिरास दशरथेश्वर महादेव नावाने ओळखले जाऊ लागले. पुढे अनेक राजवटींत या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याचे सांगितले जाते.

अर्धमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. मंदिर उंच अधिष्ठानावर स्थिर आहे. अर्धमंडपात चार नक्षीदार स्तंभ आहेत. स्तंभपाद चौकोनी आहेत, तर स्तंभदंड चौकोनी, षटकोनी, अष्टकोनी, गोलाकार अशा विविध भौमितिक आकारांत आहेत. स्तंभदंडावर कुंभ, पुष्प, पर्ण आदी नक्षी कोरलेली आहे. स्तंभाच्या शीर्षभागी चौकोनी कणी व त्यावर हस्त आहेत. पुढील दोन स्तंभांवरील हस्तांवर चतुर्भुज यक्षशिल्पे आहेत. या यक्षांनी वरील दोन्ही हातांनी हस्तांवर असलेल्या तुळई तोलून धरल्या आहेत. वितानावर चक्राकार नक्षी व पाषाणी झुंबर आहेत.

पुढे सभामंडपाचे प्रवेशद्वार काही इंच उंचावर आहे. प्रवेशद्वारास पाच द्वारशाखा आहेत. द्वारशाखांवर खालील बाजूस गंगा-यमुना, द्वारपाल व द्वारपालिका शिल्पे आहेत. द्वारशाखांवर पर्णलता, पुष्पलता नक्षी आहे, तर स्तंभशाखांवर भौमितिक आकृत्या साकारलेल्या आहेत. ललाटबिंबावर गणपती शिल्प आणि ललाटपट्टीवर पानाफुलांची नक्षी दिसते. तोरणावर मध्यभागी गजलक्ष्मी शिल्प आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूस विविध देवतांची शिल्पे आहेत.

सभामंडपात प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. यापैकी बाह्य बाजूचे स्तंभ भिंतींत आहेत. स्तंभपाद चौकोनी असून स्तंभदंड चौकोनी, षटकोनी, अष्टकोनी, गोलाकार अशा विविध भौमितिक आकारांत आहेत. स्तंभदंडातील चौकोनी पटलावर चारही बाजूंना विविध नक्षी तसेच रामायण, महाभारत आदी ग्रंथांतील प्रसंग दाखवणारी शिल्पे आहेत. स्तंभांच्या शीर्षभागी चौकोनी कणी आहे व त्यावर हस्त आहेत. हस्तांवर चतुर्भुज यक्ष शिल्पे आहेत, त्यांनी आपल्या वरील दोन्ही हातांनी हस्तावरील तुळई तोलून धरली आहे. तुळईवर छत आहे. अष्टकोनी वितानावर विविध नक्षी आहेत. वितानाच्या मध्यभागी चक्राकार नक्षी व त्यात पाषाणी झुंबर आहेत. सभामंडपाची रचना बंदिस्त स्वरूपाची आहे. सभामंडपात मध्यभागी वज्रपीठावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. सभामंडपात अंतराळाच्या डाव्या बाजूला वज्रपीठावर नागशिल्प, गणपती व दत्तात्रेय यांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत.

अंतराळात दोन्ही बाजूला असलेल्या नक्षीदार स्तंभांवर खाली द्वारपाल शिल्प व वर मंगलकलश तसेच इतर नक्षी दिसते. अंतराळात मध्यभागी स्टेनलेस स्टीलचा कठडा लावून गर्भगृहात जाण्यासाठी व गर्भगृहातून बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र रांगांचे व्यवस्थापन केलेले आहे. अंतराळात वितानावर चक्राकार नक्षी आहेत. येथून पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या नक्षीदार द्वारशाखा, ललाटबिंब व ललाटपट्टी धातूच्या पत्र्याने मढविलेली आहे. गर्भगृहात मध्यभागी शिवपिंडी आहे. बंदिस्त स्वरूपाच्या गर्भगृहात अष्टकोनी वितानावर चक्राकार नक्षी आहेत. मंदिरातील स्तंभ, कणी, हस्त, तुळई व वितान हे सर्व भाग नक्षीकाम केलेले असल्याने मंदिराच्या सौंदर्याला अधिक झळाळी प्राप्त झाली आहे.

या एकजंघा प्रकारच्या मंदिराच्या बाह्य भिंतीवर नृत्यगणेश, गौरीहर, अर्धनारीनटेश्वर, विष्णू, लक्ष्मी, सप्तमातृका, गजलक्ष्मी, सुरसुंदरी आदी शिल्पे आहेत. मंदिराच्या छतावर चहूबाजूने सुरक्षा कठडा आहे, याचे बांधकाम अलीकडील काळात केलेले जाणवते. गर्भगृहाच्या छतावर पिरॅमिड सारख्या पायऱ्या-पायऱ्यांच्या रचनेचे शिखर आहे. शिखरावर कळस व ध्वजपताका आहे. मंदिरासमोर काही अंतरावर प्राचीन बारव आहे. कोरीव पाषाणात बांधलेल्या या हौदवजा विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्यांची कलात्मक रचना आहे. आयताकृती विहिरीत भिंतींना लागून चौथऱ्यांची रचना आहे. येथे स्नान-संध्या करण्याची व्यवस्था आहे.

मंदिरात महाशिवरात्री हा मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी तसेच नवस फेडण्यासाठी येतात. वार्षिक उत्सवाच्या वेळी मंदिरात लघुरुद्र, भजन, कीर्तन, प्रवचन, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवशी देवाची पालखी, मिरवणुकीने ग्रामप्रदक्षिणा करते. यावेळी विविध वस्तूंची दुकाने थाटली गेल्याने परिसरास बाजारपेठेचे स्वरूप प्राप्त होते. मंदिरात श्रावण महिन्यात व दर सोमवारी तसेच पौर्णिमा, अमावस्या आदी दिवशी भाविकांची गर्दी असते.

उपयुक्त माहिती:

  • मुखेड बस स्थानकापासून १ किमी अंतरावर
  • नांदेड येथून ६३ किमी अंतरावर
  • जिल्ह्यातील अनेक शहरांतून मुखेडसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरारपर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे

दशरथेश्वर महादेव मंदिर

बरवागल्ली, मुखेड़, टी. मुखेड़, जिला. नांदेड़

Back To Home