मानवी मनातील भाव भावना, नातेसंबंध, नात्यांतील रुसवे–फुगवे माणूस आपल्या पूज्य देवतांच्या कथा व कहाण्यांतून गुंफित असतो. अनेकदा या कथा–कहाण्या शिल्परूपात साकारल्या जातात, तर अनेकदा त्या मंदिरे व देवतांच्या स्थानक्रमातून सुध्दा व्यक्त होत असतात. असेच एक मंदिर पती–पत्नी, बहीण–भाऊ व नणंद– भावजय या नात्यातील भाव उलगडून दाखवत पारे गावच्या डोंगरात उभे आहे. हे देवस्थान हजारो वर्षे प्राचीन व जागृत आहे.
या मंदिराबाबत आख्यायिका अशी की या गावातील बायप्पा कासार नावाचा शिवभक्त मध्य प्रदेशातील उज्जैन येथील काळभैरवाचे दर्शन घेण्यासाठी नियमित उज्जैनला जात असे. पुढे वृद्धत्व आल्यानंतर त्याला तिकडे जाणे अशक्य होऊ लागले. तेव्हा त्याने काळभैरवास आपल्या गावी येऊन राहावे, असे साकडे घातले. हा देव येथे आला, परंतु त्याने बायप्पास एक अट घातली, की ‘तुझ्या मुलाला मारून त्याच्या रक्ताचा टिळा मला लावल्यास मी येथे थांबेन.’ बायप्पानेही त्यानुसार मुलाच्या रक्ताचा टिळा देवास लावला. त्याबरोबर देवाने येथे थांबण्याचे मान्य केले व मुलगाही पुन्हा जिवंत झाला. अशा प्रकारे भक्ताच्या विनंतीला मान देऊन येथे आलेला काळभैरव दरगोबा म्हणून ओळखला जाऊ लागला.
पारे गावातील डोंगराच्या कुशीत दरगोबा देवाचे मुख्य मंदिर असले, तरी येथे देवाची बहिण चिलाबाई व देवाची पत्नी मिताबाई या नणंद–भावजयीची दोन मंदिरे अशी एकूण तीन मंदिरे आहेत. या डोंगराच्या पायथ्याशी पेव्हर ब्लॉक व फरशी आच्छादित प्रांगणात ही मंदिरे वसलेली आहेत.
या प्रांगणात दोन चौकोनी तुलसी वृंदावने आहेत. पुढे पाच थरांची गोलाकार दीपमाळ आहे. दीपमाळेत दीप प्रज्वलन करण्यासाठी स्वतंत्र हस्त आहेत. दीपमाळेतील थर वर्तुळाकार रिंगणाने विभागलेले आहेत. दीपमाळेच्या बाजुला काही सतीशिळा व वीरगळ आहेत. बाजुलाच असलेल्या एका समाधीच्या चौथऱ्यावर पाषाणी पादुका आहेत. येथील चिलाई देवी मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या एका मोठ्या चौथऱ्यावर भव्य अशी नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. या मूर्तीवर वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर व रंगकाम केलेले आहे. या नंदीमूर्तीच्या मागे आणखी एक दीपमाळ आहे. येथील लाल दगडात बांधकाम केलेल्या महिरपी कमानीतून चिलाबाई देवी मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या कमानीच्या दोन्ही बाजूला द्वारपाल शिल्पे आहेत. तलावाकाठी असलेले हे चिलाबाई देवीचे मंदिर हेमाडपंती स्थापत्यशैलीतील आहे. मंदिराच्या गर्भगृहात काळ्या पाषाणातील चिलाबाई देवीची सुंदर मूर्ती आहे. चिलाबाई मंदिरापासून काही अंतरावर मिताबाई देवीचे लहानसे मंदिर आहे.
चिलाबाई देवीच्या मंदिरापासून पुढे पायरी मार्गावर स्वागत कमान आहे. स्वागत कमानीस दोन्ही बाजूस दोन गोलाकार स्तंभ, महिरपी कमान व त्यावर सज्जा आहे. सज्जावर तीन बाशिंगे आहेत. त्यावर अश्वारुढ दरगोबा देव, चिलाबाई देवी व मिताबाई देवी यांची चित्रे आहेत. मधल्या बाशिंगावर कळस आहे. स्वागत कमानीजवळ आडव्या स्तंभास पितळी घंटा लावलेल्या आहेत. बाजूला दीपमाळ, लहान शिवमंदिर व रेवणसिद्धाचे मंदिर आहे.
येथून दरगोबा मंदिराकडे जाण्यासाठी सुमारे ४५० दगडी पायऱ्यांचा मार्ग आहेत. पायऱ्यांच्या बाजुने सुरक्षा कठडा आहे. पायरी मार्गाच्या वरील टोकावर मंदिराचे भक्कम स्वागतद्वार आहे. स्वागतद्वारातील पहिल्या पायरीत मध्यभागी चंद्रशीळा व दोन्ही बाजूस दोन कीर्तिमुख आहेत. येथून वर मंदिराचे फरसबंदी असलेले प्रांगण आहे. प्रांगणात मंदिरासमोर मेघडंबरीत नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. प्रांगणातील उंच आयताकार चौथऱ्यावर दोन्ही बाजूला दीपस्तंभ व दरीकडील बाजूस बाशिंगी कठडा आणि इतर तीन बाजूस लोखंडी सुरक्षा कठडा आहे. लोखंडी पायऱ्या असलेल्या या चौथऱ्यावरून चिलाबाई मंदिर व तलावाचे विहंगम दृश्य दिसते.
मंदिराच्या सभामंडपात जाण्यासाठी सात पायऱ्या आहेत. सात थरांच्या चौथऱ्यासारखी पायऱ्यांची रचना अनोखी आहे. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूस लोखंडी सुरक्षा कठडे व वर कमान आहे. सभामंडपाच्या अरूंद प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवरील नक्षी व ललाटबिंबावरील शिल्प अस्पष्ट झालेले आहे. पुढे देवकोष्टकाच्या आकारातील गर्भगृहात डोंगर कपारीचा भाग आहे. ही दरगोबा देवाची पाठ असल्याचे सांगितले जाते. गर्भगृहात दोन्ही बाजूस दीपकोष्टके आहेत.
मंदिराच्या उतरत्या चौकोनी छतावर मध्यभागी कळस आहे. मंदिराच्या बाह्य बाजूला भिंतीस लागून मेघडंबरी व त्यात शिवपिंडी आहे. मंदिरापासून काही अंतरावर खंडोबा देवाचे लहान मंदिर आहे. डोंगर वाटेने वर गेल्यावर मेघडंबरीत अश्वमुख आहे. तो देवाचा घोडा असल्याचे सांगितले जाते. दसरा व चैत्राच्या मूळ नक्षत्रावर येथे यात्रा भरतात.