दामोदर मंदिर

वास्को, जि. दक्षिण गोवा

देवाचा धावा करणे हा हिंदू धर्म परंपरेतील भक्तीचा एक मार्ग आहे. संकट काळात अनेकदा मानवी प्रयत्न तोकडे पडतात तेव्हा देवाच्या आशीर्वादाशिवाय तरणोपाय राहत नाही. अशावेळी महापूजा करणे, बळी देणे, मंदिरासाठी दान देणे किंवा मंदिर उभारणे, असे नवस बोलले जातात. नवसाने उभ्या राहिलेल्या मंदिरांची संख्या हजारोंच्या घरात आहे. गोव्याच्या स्वतंत्रता मार्गावर एका सावकाराच्या घरात स्थापित करण्यात आलेले दामोदर मंदिर त्यापैकीच एक आहे. येथील जागृत दामोदर देव नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. श्रावण महिन्यात येथे साजरा होणारा लोकप्रिय दामोदर भजनी सप्ताह सोहळा त्यानिमित्ताने होणारा सात दिवसांचा जत्रोत्सव प्रसिद्ध आहे

हे मंदिर १८९९ मध्ये एका घरात स्थापित करण्यात आले. याबाबत असे सांगितले जाते की त्यावेळी वास्को शहरात कॉलराची साथ पसरली होती. अनेक लोक किड्यामुंग्यांसारखे मरू लागले होते. मृत्यूचे तांडव सुरू होते. हे तांडव फक्त महादेवच थांबवू शकेल, अशी त्यावेळी लोकांची धारणा झाली. त्यामुळे महादेवाचा आशीर्वाद म्हणून मडगावपासून २२ किमी अंतरावरील, जांबावली येथील रामनाथ दामोदर मंदिरातून एक नारळ आणून वास्को येथील सावकाराच्या घरात ठेवण्यात आला. तेव्हाच येथे दामोदर महादेव मंदिराची स्थापना करण्याचे ठरले. या महादेवाच्या आशीर्वादानेच शहरातील रोगराई ओसरली, अशी येथील ग्रामस्थांची खात्री झाली होती. तेव्हापासून सुरू झालेली सात दिवसांचा वास्को भजनी सप्ताह उत्सव साजरा करण्याची परंपरा आजही अखंडीत सुरू आहे. आजचे दामोदर मंदिर त्याच घरात स्थापित असून घरचा काही भाग वेगळा करून मंदिराची निर्मिती करण्यात आलेली आहे.

वास्कोच्या समुद्र किनाऱ्यापासून जवळ रस्त्यालगत हे मंदिर आहे. अर्धमंडप, सभामंडप गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. अर्धमंडप रस्त्यापेक्षा सुमारे दोन फूट उंच आहे. प्रवेशद्वारास चार पायऱ्या आहेत. अर्धमंडपापेक्षा सभामंडप काहीसा उंच आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वारास दोन पायऱ्या आहेत. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात उजेड हवा येण्यासाठी प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला डाव्या बाजूच्या भिंतीत वातायने आहेत. वातायनांना लोखंडी जाळ्या काचेची तावदाने आहेत. सभामंडपात उजव्या बाजूला आणखी दोन दरवाजे आहेत. सभामंडपाच्या वितानावर सोनेरी रंगाची नक्षी आहे. सभामंडपात गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर वज्रपीठावर नंदीची संगमरवरी पाषाणातील मूर्ती आहे. पुढे लाकडी मेजावर पद्मपादुका आहेत. भाविकांना येथूनच दामोदर महादेवाचे दर्शन घ्यावे लागते. पुढे गर्भगृहाचे चांदीचे प्रवेशद्वार आहे. द्वारशाखांवर विविध प्रकारची नक्षी आहे. प्रवेशद्वारावरील तोरणात शेषशयनी विष्णू विष्णूचे पाय चेपणारी लक्ष्मी यांचे शिल्प आहे. या शिल्पाच्या दोन्ही बाजूला गरुड हनुमान यांची शिल्पे आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला खाली नंदी शिल्पे आणि झडपांवर लक्ष्मी सरस्वती यांची शिल्पे आहेत. गर्भगृहात वज्रपीठावर सिंहासनारूढ दामोदर देवाची काळ्या पाषाणातील द्विभुज मूर्ती आहे. मूर्तीवर चांदीचा मुकुट, मागील सुवर्ण प्रभावळीत शंखचक्र नक्षी आणि वरील बाजुला कीर्तीमुख आहे. देवासमोर दरवर्षी बदलले जाणारे नित्य पूजेतील श्रीफळ आहे. या मंदिराचे शिखररहित छत सपाट आहे.

मंदिरात श्रावण शुद्ध षष्ठी ते द्वादशी हा सात दिवसांचा आनंदोत्सव भजनी सप्ताह म्हणून साजरा केला जातो. वास्को सप्ताह नावाचा हा जत्रोत्सव संपूर्ण गोव्यात प्रसिद्ध आहे. यावेळी हजारो भाविक या मंदिरास भेट देतात. उत्सवाच्या पहिल्या दिवशी आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाते. सप्ताहाचे सर्व दिवस अखंड भजने गायली जातात. यात गोवा महाराष्ट्र राज्यातील नामवंत भजन गायक सहभागी होतात. शेवटच्या दिवशी पूजेतील श्रीफळ पालखी मिरवणुकीने समुद्रात विसर्जित करून नवीन श्रीफळ पूजेत ठेवले जाते. या सात दिवसात येथे विविध वस्तूंची दुकाने थाटली जातात

महाशिवरात्री, चैत्र पाडवा, दसरा, दिवाळी, कोजागरी पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा आदी सर्व सण उत्सव मंदिरात साजरे केले जातात. सर्व उत्सवांच्या वेळी राज्यभरातून हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी नवस फेडण्यासाठी येतात. यावेळी मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन, संगीत, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सोमवार, गुरुवार, पौर्णिमा, अमावस्या आदी दिवशी मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते

 

 

उपयुक्त माहिती:

  • वास्को बस स्थानकापासून किमी आणि वास्को रेल्वे स्थानकापासून ६०० मीटरअंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून वास्कोसाठी बस रेल्वेची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय

दामोदर मंदिर

वास्को, जिला दक्षिण गोवा

Back To Home