दामोदर हे भगवान श्रीकृष्णाचे एक नाव आहे. दाम म्हणजे दोरी. खोडकर बालकृष्णाच्या उदरास यशोदा मातेने दोरी बांधली, या कथेवरून कृष्णास दामोदर असे नाव पडले. शाळिग्राम वा कृष्णमूर्तीच्या स्वरूपात दामोदराची पूजा केली जाते. मडगावमधील दामोदर साळ मंदिरामध्ये मात्र दामोदर हे दैवत शंकराच्या रुपात विराजमान आहे. शैव आणि वैष्णव पंथाच्या एकीकरणाचे एक प्रतिक म्हणून येथील हे मंदिर मानले जाते. जगविख्यात तत्त्वज्ञ स्वामी विवेकानंद यांनी भेट दिलेले मंदिर ही या देवालयाची एक आगळी ओळख आहे.
गोवा गॅझेटियरनुसार, मडगाव हे गोव्यातील आर्यांच्या पहिल्या वसाहतीचे ठिकाण होते. या ठिकाणी आर्यांनी त्यांचे मठ स्थापन केले. त्यामुळे त्यास मठग्राम या नावाने ओळखले जाई. ‘गोमंतकाची सांस्कृतिक घडण’ या का. दा. नायक यांच्या पुस्तकानुसार, मडगावला पूर्वी म्हाडग्राम किंवा जोहारग्राम या नावानेही ओळखले जाई. ३ एप्रिल १७७८ मध्ये त्यास मोठे नगर म्हणून राजमान्यता मिळाली. गोव्याच्या स्वातंत्र्य संग्रामात या शहराची मोठी भूमिका राहिलेली आहे.
थोर समाजवादी नेते डॉ. राममनोहर लोहिया यांच्या नेतृत्त्वाखाली गोवा मुक्तीचा पहिला सत्याग्रह झाला तो याच शहरात. गोव्याच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासात महत्त्वाचे स्थान असलेल्या अशा या शहरात दामोदर साळ मंदिर वसलेले आहे.
काही जाणकारांच्या मते, येथे कदंब काळापासून म्हणजे १२व्या शतकापासून हे मंदिर अस्तित्वात होते. इ.स. १५६५ मध्ये पोर्तुगीज कॅप्टन दियोगु रुद्रिगीस (रॉड्रिग्ज) याने आर्चबिशप डोम कॅस्पर लियो पेरेरा यांच्या आदेशाने मडगावमधील हे मंदिर उद्ध्वस्त केले. परंतु त्या आधीच मंदिरातील मूळ मूर्ती ग्रामस्थांनी लपवून ठेवली होती. ती नंतर १५६७ मध्ये केपेतील जांबावली (झांबोलिम) या गावात हलवण्यात आली. तेथील गावकऱ्यांनी या मंदिरासाठी जमीन आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या. गोवा गॅझेटियरनुसार, येथे कलशाच्या स्वरुपात दामोदराची पूजा केली जात असे. इ.स. १८८४मध्ये जांबवणे येथे प्लेगची मोठी साथ आली. त्यावेळी दामोदराची मूर्ती पुन्हा मडगाव येथे आणण्यात आली. इ.स. १९१०मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. यानंतर १९५१ ते १९७२ या काळात वेळोवेळी त्याचे नूतनीकरण करण्यात आले. दामोदराचे एक मोठे मंदिर जांबावलीतही असून मडगावसह वास्को शहरात त्याची ‘सासय’ म्हणजे ठिकाणे आहेत.
या मंदिराच्या नावाबाबत आख्यायिका अशी की पूर्वी हे मंदिर मखजी दामोदर या नावाने ओळखले जात असे. मडगावची देशमुखी किंवा देसाईपण असलेल्या एका कुटुंबात मखजी किंवा मलकाजी दामोदर हा तरुण होता. आपल्या सत्कर्मांमुळे तो जनसामान्यांत प्रिय होता. त्याचा विवाह केळशी गावातील एका मुलीशी झाला. लग्न करून तेथून परतत असताना मडगावच्या वेशीवर त्या वधु-वरांची भाडोत्री मारेकऱ्यांनी हत्या केली. त्यामुळे संपूर्ण गाव हळहळले. पुढे ज्या ठिकाणी या वधु व वरांची हत्या करण्यात आली, तेथेच पापक्षालनार्थ एक मंदिर बांधण्यात आले. ते दामोदराचे मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले.
दामोदर ही ग्रामदेवता असल्याचीही लोकधारणा आहे. त्याविषयीच्या आख्यायिकेनुसार, १८८४ मध्ये आलेल्या प्लेगच्या साथीपासून दामोदर मुक्ती देईल, या श्रद्धेमुळे मडगावच्या ग्रामस्थांनी जांबावलीला जाऊन देवाचा प्रसाद घेतला होता. त्या प्रसादाचे श्रीफल एका चांदीच्या कलशात घालून या ठिकाणी ठेवण्यात आले. या कलशावर नंतर देवाचा मुखवटा चढवण्यात आला. प्लेगच्या साथीमुळे लोकांना आपली घरे बंद करून दुसरीकडे जावे लागले.
त्या काळात आपल्या घरांचे रक्षण दामोदर करतो आहे, असा त्यांचा विश्वास होता. रात्री दामोदर घोड्यावर बसून मडगावात फेरी मारतो, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. असे सांगितले जाते की पूर्वी मुख्य रस्त्याने दामोदराची पालखी फिरे. त्या वाटेशेजारच्या घरात त्याच्या स्वागतासाठी पाच किंवा सात वातींची समई पेटवण्याची प्रथा होती. त्यानुसार आजही मडगावात अनेक जुन्या घरांमध्ये दर सोमवारी दरवाजाजवळ अशी समई पेटवण्याची प्रथा आहे.
या मंदिराच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना म्हणजे येथे झालेले स्वामी विवेकानंद यांचे आगमन. शिकागोमध्ये सप्टेंबर १८९३मध्ये आयोजित करण्यात आलेल्या जागतिक सर्वधर्मपरिषदेत सहभागी होण्यासाठी स्वामी विवेकानंद अमेरिकेस गेले. तत्पूर्वी काही काळ त्यांची देशभरात भ्रमंती सुरू होती. याच काळात ते १८९२च्या ऑक्टोबरमध्ये बेळगावहून मडगाव येथे आले होते. ‘स्वामी विवेकानंद जीवनदर्शन’ या पुस्तकात वि. रा. करंदीकर यांनी त्या भेटीविषयी असे लिहिले आहे की ‘ते तेथे (मडगावला) पोचले तेव्हा स्वागतासाठी बरेच लोक उपस्थित होते आणि स्वामीजींना मिरवणुकीने सुबराय नायक यांच्या निवासस्थानापर्यंत नेण्यात आले. अशा प्रकारच्या स्वागताचा अनुभव स्वामीजींना प्रथमच आला. सुबराय आध्यात्मिक प्रवृत्तीचे होते. स्वामीजींच्या सहवासाचा त्यांच्यावर फार मोठा परिणाम झाला.’ सुबराय नायक यांच्या घराण्याने मूळ दामोदर मंदिरातील मूर्ती संकटकाळात सुरक्षित ठेवली होती. त्यांच्या राहत्या वाड्यामध्ये शेजारीच दामोदराचे मंदिर वसलेले आहे. या मंदिरास यावेळी स्वामी विवेकानंदांनी भेट दिली. त्याचप्रमाणे मंदिराशेजारील एका खोलीमध्ये या काळात त्यांनी वास्तव्य केले. त्यांनी मुक्काम केलेली ती खोली आजही उत्तम प्रकारे जतन करण्यात आली आहे. तेथे स्वामी विवेकानंदांची अनेक छायाचित्रे लावलेली आहेत.
मडगावमधील मोठ्या रस्त्यालगत हे मंदिर उभे आहे. मोठ्या गोमंतकीय वाड्यासारखे स्वरूप असलेल्या या मंदिरावर चारही बाजूंनी उतरते कौलारू छप्पर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस द्वाररक्षकांच्या दोन उंच मूर्ती आहेत. आत प्रवेश करताच समोरच एक खोली दिसते. याच खोलीमध्ये स्वामी विवेकानंदांनी वास्तव्य केले होते. त्या संबंधीची नोंद तेथील एका संगमरवरी शिळेवर करण्यात आली आहे. डाव्या हाताला दामोदर साळाचे स्थान आहे. त्याच्या सभामंडपाच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूंना दशावतारांची उठावशिल्पे कोरलेली आहेत. स्वामी विवेकानंदांप्रमाणेच विविध देवदेवतांच्या तसबिरी, छतावर काचेच्या हंड्या आणि झुंबर यांनी सभामंडप सुशोभित करण्यात आला आहे. मध्यभागी उंच शोभिवंत चौथऱ्यावर पाषाणात घडवलेल्या नंदीची सुबक मूर्ती आहे. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर सर्वत्र, चांदीचा कोरीव नक्षीकाम केलेला, पत्रा मढवलेला आहे. गर्भगृहास तीन महिरपी कमानदार प्रवेशद्वारे आहेत. त्यांवर गरुड, हनुमंत तसेच द्वारपालांची शिल्पे कोरलेली आहेत. आत उंच चौथऱ्यावर चांदीच्या मखरामध्ये दामोदराची मुखवटा असलेली मूर्ती प्रतिष्ठापित आहे.
या मंदिरात सकाळी ७.१५ ते रात्री ९ वाजेपर्यत देवदर्शन घेता येऊ शकते. देवस्थानात साजऱ्या केल्या जाणाऱ्या प्रमुख उत्सवांमध्ये रामनवमी, महाशिवरात्र, पाडवा, अक्षय तृतीया, अनंत व्रतोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी आणि माघ उत्सव यांचा समावेश आहे. उत्सवांच्यावेळी येथे अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. पंढरीच्या विठ्ठलाला जसे वारकरी लाडाने विठू असे म्हणतात, तसेच मडगावकर आपल्या लाडक्या देवतेला दामबाब असे म्हणतात. गोव्यात वडीलधाऱ्या व्यक्तीला बाब असे संबोधन आहे. अनेक भक्तगण आपल्या या दामबाबला महत्वाच्या कामांसाठी साकडे घालतात.