दैत्यसुदन मंदिर

लोणार, ता. लोणार, जि. बुलडाणा

जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या काठावर वसलेले दैत्यसुदन मंदिर प्राचीन भारताच्या प्रगत स्थापत्यशैलीची साक्ष देते. पौराणिक कथेनुसार, भगवान विष्णूंनी ‘दैत्यसुदन’ रूप धारण करून लवणासुर दैत्याचा वध केला होता. विष्णूंच्या या विशिष्ट अवताराला समर्पित असलेले हे मंदिर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्य रचनेसाठी आणि खजुराहो शैलीतील अप्रतिम कोरीव कामांसाठी ओळखले जाते. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी १४ ते १९ मे दरम्यान होणारा किरणोत्सव. या काळात सूर्याची किरणे गर्भगृहातील दैत्यसुदनाच्या मूर्तीवर १० मिनिटे जणू ‘अभिषेक’ करतात.

स्कंदपुराण आणि पद्मपुराणात लोणारचा उल्लेख ‘विराजक्षेत्र’ किंवा ‘विष्णूगया’ असा आढळतो. यांतील कथांनुसार, कृतयुगात या परिसरात लवणासुर (किंवा लोणासुर) नावाचा एक महाकाय दैत्य राहत होता. त्याने पृथ्वीवर आणि स्वर्गात हाहाकार माजवला होता. त्याचे वास्तव्य जमिनीखालील एका मोठ्या गुहेत होते आणि या गुहेचे तोंड एका डोंगराळ झाकणाने झाकलेले होते. त्यामुळे त्याचा ठावठिकाणा कोणालाच लागत नसे. देवतांच्या विनंतीवरून, भगवान विष्णूंनी अत्यंत मोहक, तेजस्वी आणि सुंदर युवकाचे रूप धारण केले. या अवतारालाच पुढे ‘दैत्यसुदन’ असे नाव मिळाले. या रूपात विष्णू त्या घनदाट जंगलात भटकू लागले. त्यावेळी लोणासुराच्या दोन बहिणींची नजर त्या युवकावर पडली व त्या त्याच्यावर मोहित झाल्या. विष्णूंनी चातुर्याने त्यांच्याकडून लोणासुराच्या वास्तव्याचे ठिकाण जाणून घेतले. आपला भाऊ एका विशिष्ट ठिकाणी जमिनीखाली गुहेत लपलेला आहे आणि त्या गुहेचे तोंड एका मोठ्या शिळेने झाकलेले आहे, अशी माहिती त्या बहिणींनी अनावधानाने दिली.

गुहेचे ठिकाण समजताच विष्णूंनी आपले ते रूप त्यागून मूळ रूप धारण केले आणि ते त्या गुहेच्या तोंडाशी गेले. विष्णूंनी आपल्या पायाच्या अंगठ्याने गुहेवरील शिळा उडवून लावली. गुहेचे झाकण उघडताच लोणासुर जागा झाला आणि तो गुहेतून बाहेर आला. विष्णू आणि लोणासुर यांच्यात घनघोर युद्ध झाले. अखेर, विष्णूंनी लवणासुराचा वध केला व त्याला त्याच्याच गुहेत गाडले. अशा प्रकारे एका भयावह राक्षसाचा अंत करून विष्णूने त्या क्षेत्राला पवित्र केले म्हणून या क्षेत्राला ‘विष्णूगया’ असेही म्हटले जाते. ही गुहा म्हणजेच आजचे प्रसिद्ध लोणार सरोवर होय, अशी श्रद्धा आहे. तिन्ही बाजूंनी पर्वतराजींनी व्यापलेल्या या सरोवरातील जल हे लवणासुराचे रक्त, तर पाण्यातील क्षार व खारटपणा हा या दैत्याच्या शरीराचा अंश मानला जातो. ‘विराजमाहात्म्य’ या ग्रंथात (अध्याय १४, श्लोक ११-१९) या सरोवराचे वर्णन आढळते. तसेच अध्याय १८ मध्ये लोणारचा उल्लेख ‘विष्णूगया’ असा केला आहे. हे स्थान गया (बिहार) इतकेच पवित्र मानले जाते. या ठिकाणी पितरांचे श्राद्ध केल्याने त्यांना मोक्ष मिळतो, अशी लोकमान्यता आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेले लोणार हे विदर्भातील सर्वांत प्राचीन गावांपैकी एक आहे. कृतयुगात या गावाची स्थापना झाल्याची दंतकथा प्रसिद्ध आहे. प्राचीन काळी या गावाचे नाव ‘विराजक्षेत्र’ असे होते. सत्ययुगात येथील जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर ‘वैरज तीर्थ’ या नावाने ओळखले जात असे. या सरोवराच्या काठावर लहान-मोठी १६ प्राचीन मंदिरे आहेत. त्यापैकी दैत्यसुदन मंदिर हे स्थापत्यकला व शिल्परचनेसाठी विशेष प्रसिद्ध आहे. या मंदिराची उभारणी नेमकी कधी झाली, याबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. काही इतिहासकारांच्या मते चालुक्य राजवटीदरम्यान दुसरा विक्रमादित्य (सन ७३३ ते ७४७) याच्या काळात, त्याची पत्नी लोकमहादेवी हिच्या आग्रहावरून हे मंदिर बांधण्यात आले. शिल्पकार त्रिभुवनकीर्ती याने तयार केलेल्या आराखड्यानुसार या मंदिराची बांधणी झाल्याचे सांगितले जाते. मंदिराची भव्यता आणि कोरीव काम बदामी-पट्टदकल येथील चालुक्य मंदिरांची आठवण करून देते. मात्र प्रसिद्ध पुरातत्वशास्त्रज्ञ हेन्री कझिन्स (Henry Cousens) यांच्या मते, हे मंदिर १३व्या शतकाच्या शेवटी किंवा १४व्या शतकाच्या सुरुवातीला, देवगिरीच्या यादवांच्या काळात बांधले गेले असावे.

यादव काळात या मंदिराला दान दिल्याचा चोवीस ओळींचा शिलालेख येथे आहे. परकीय आक्रमकांनी मंदिराचा मोठ्या प्रमाणावर विध्वंस केला. अशा आक्रमणांपासून मंदिराला वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी हे मंदिर मातीच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवले होते. या मंदिराची आख्यायिका अशी की, स्वामी सच्चिताश्रम सरस्वती यांच्या पायाला त्वचारोग झाला होता. लोणार सरोवरातील पाण्याने हा रोग बरा होतो, अशी माहिती त्यांना मिळाली होती. त्यामुळे ते १८७८ च्या सुमारास लोणार येथे आले. या सरोवरातील पाण्याने त्यांचा त्वचारोग बरा झाल्यानंतर त्यांनी या मंदिराच्या ढिगाऱ्याजवळ आश्रम बांधण्याचा निर्णय घेतला. या आश्रमाच्या बांधकामादरम्यान एक गरुड पक्षी रोज येथे येत असे आणि येथून उडून तो मातीच्या ढिगाऱ्याच्या दिशेने जात असे. अनेक दिवस हा प्रकार सुरू राहिल्याने ही बाब स्वामींच्या लक्षात आली. त्यानंतर तो ढिगारा उपसला असता त्यात हे मंदिर आढळले. १८७८ मध्ये स्वामी सच्चिताश्रम सरस्वती यांच्या नेतृत्वाखाली हे मंदिर मोकळे केले गेले, असे ‘सेंट्रल प्रॉव्हिन्सेस अँड बेरार डिस्ट्रिक्ट गॅझेटियर्स – अकोला डिस्ट्रिक्ट, व्हॉल्यूम ए’ (१९१०) मध्ये नमूद आहे. मूळ मंदिराची केव्हातरी पडझड झाली असावी, त्याची डागडुजी नंतर मध्ययुगीन काळात झाल्याचे विटांच्या बांधकामावरून लक्षात येते, असेही सरकारी गॅझेटियरमध्ये नमूद आहे.

या मंदिराच्या चारही बाजूंनी वस्ती असून मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेकडे आहे. जमिनीपासून सुमारे पाच फूट उंच असलेल्या एका मोठ्या अधिष्ठानावर हे मंदिर उभे आहे. प्रांगणातून सुमारे आठ पायऱ्या चढून मंदिराच्या या तारकाकृती अधिष्ठानावर प्रवेश होतो. अधिष्ठानाच्या बाह्य भागावर कोरीवकाम केलेले आहे. या मंदिराची तारकाकृती रचना भारतीय वास्तुकलेतील भूमिज शैलीच्या जवळ जाणारी आहे. मंदिराच्या पायाची आणि भिंतींची रचना कोनांमध्ये केलेली आहे. या रचनेत भिंतींना अनेक कोन असल्यामुळे मंदिराचा बाह्य पृष्ठभाग वाढतो आणि शिल्पकारांना कोरीवकामासाठी जास्त जागा मिळते. अशा रचनेमुळे मंदिराच्या बाह्य भागावर प्रकाश पडल्यावर तेथील शिल्पकाम उठून दिसते. दिवसा सूर्याचे स्थान बदलत असताना सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी मंदिरावरील मूर्तींचे भाव वेगवेगळे दिसतात.

मुख्य मंडप, दक्षिणोत्तर अर्धमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. त्यापैकी मुखमंडप सध्या अस्तित्वात नाही. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर नक्षीकाम आहे. प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. या प्रवेशद्वारातून सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपात भव्य स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत. या सभामंडपात उत्तर आणि दक्षिण दिशेला दरवाजे आहेत. सभामंडपाच्या वितानावर अनेक शिल्पे कोरलेली आहेत. अंतराळातील छतावर चार कोपऱ्यांत चार शिल्पे आहेत, ज्यापैकी एका शिल्पात लवणासुर वध व धार शिल्प आहे. दुसऱ्या शिल्पामध्ये कंसवध दर्शवण्यात आलेला आहे. तिसऱ्या शिल्पामध्ये नरसिंह आणि चौथ्यात गोपिका-गोवत्स कृष्णाचे शिल्प आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवरही वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर आहे. गर्भगृहात वज्रपीठावर भगवान विष्णूंची ‘दैत्यसुदन’ रूपातील मूर्ती आहे. ही मूर्ती सुमारे १.५ मीटर उंच आहे. विष्णूंच्या चार हातांमध्ये शंख, चक्र, गदा आहे आणि चौथ्या हाताने त्यांनी दैत्याची शेंडी पकडलेली आहे. हे रूप ‘असुरमर्दिनी’ देवीप्रमाणेच ‘असुरमर्दक’ विष्णूचे आहे. मूर्तीभोवतीच्या प्रभावळीवर विष्णूचे दशावतार कोरलेले आहेत. दैत्यसुदन मूर्तीबद्दल सर्वात मोठे कुतूहल म्हणजे तिचे चुंबकत्व. ही मूर्ती ज्या दगडापासून बनवली आहे, त्यात लोहखनिजाचे प्रमाण खूप जास्त आहे. भूगर्भशास्त्राच्या भाषेत याला ‘मॅग्नेटाईट’ किंवा ‘लोडस्टोन’ असे म्हणतात, ज्यात नैसर्गिक चुंबकीय गुणधर्म असतात. स्थानिकांच्या मते, या मूर्तीमध्ये इतके सामर्थ्यशाली चुंबकत्व आहे की ती पूर्वी अधांतरी तरंगत असे किंवा तिच्या संपर्कात आलेल्या लोखंडी वस्तू मूर्तीला चिकटून राहत असत. या मंदिरातील सध्याची मूर्ती नागपूरकर भोसले यांनी दिलेली आहे. या मंदिराच्या शिखराच्या भागात गोलाकार छिद्र आहे. याचे वैशिष्ट्य असे की, पावसाळ्यात या छिद्रातून पाण्याचा एक थेंबही मंदिरात पडत नाही. मात्र, दरवर्षी १४ ते १९ मे असे पाच दिवस या गोलाकार छिद्रातून सकाळी ११.१० ते ११.२० अशी दहा मिनिटे सूर्यकिरणे थेट श्रीविष्णूंच्या मूर्तीवर पडतात. हा किरणोत्सव अनुभवण्यासाठी शेकडो भाविक येथे उपस्थित असतात.

या मंदिराच्या बाह्य भिंतींना ‘दगडात कोरलेले महाकाव्य’ असे म्हटले जाते, कारण त्यांवर हजारो मूर्ती आणि प्रसंग कोरलेले आहेत. त्यात विष्णूचा वराह अवतार, नरसिंह अवतार आणि वामन अवताराच्या मूर्ती अत्यंत रेखीवपणे कोरलेल्या आहेत. तसेच श्रीकृष्णलीलेतील पूतना वध, कालिया मर्दन आणि कंस वध यांचे चित्रणही वैशिष्ट्यपूर्ण आहे. रामायण आणि महाभारतातील युद्धप्रसंग व वनवासातील प्रसंग अत्यंत बारकाईने येथे कोरलेले आहेत. खजुराहो आणि कोणार्कच्या मंदिरांप्रमाणेच, या मंदिराच्या बाह्य भिंतींवर काही ठिकाणी शृंगारिक आणि कामजीवनाशी संबंधित शिल्पे आहेत. यात रतिक्रीडेत मग्न असलेली युगुले, आलिंगन देणारे प्रेमी आणि विविध शृंगारिक मुद्रांचे चित्रण आहे. यामुळेच या मंदिराला ‘विदर्भाचे खजुराहो’ असेही संबोधले जाते. ही शिल्पे भारतीय संस्कृतीतील धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांचे प्रतीक मानली जातात. मंदिराच्या मागील बाजूला असलेल्या एका देवकोष्ठकात सूर्यदेवाची उभी मूर्ती आहे. याशिवाय या भिंतींवर सुरसुंदरींची अनेक शिल्पे आहेत, ज्यात विविध भावमुद्रांमधील स्त्रिया अंकित आहेत. त्यामध्ये आरशात बघत शृंगार करणारी (दर्पणधारिणी), पायातील काटा काढणारी, तर कोणी नृत्य करणारी अशी शिल्पे आहेत. या सुरसुंदरींची शारीरिक ठेवण, वस्त्रांच्या घड्या आणि दागिन्यांचे बारकावे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. मंदिराच्या आठही दिशांना त्या त्या दिशेचे स्वामी (अष्टदिग्पाल) त्यांच्या वाहनांसह कोरलेले आहेत.

दैत्यसुदन मंदिर महानुभाव पंथाच्या अनुयायांसाठीही अत्यंत पवित्र स्थान आहे. मंदिराच्या प्रांगणात आग्नेय कोपऱ्यात ‘त्रिपुरुष मठ’ आहे. महानुभाव पंथाचे संस्थापक स्वामी चक्रधर यांनी या ठिकाणी काही काळ वास्तव्य केले होते, अशी श्रद्धा आहे. या मठात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या मूर्ती होत्या. त्यापैकी शिवशंकराची मूर्ती चोरीला गेल्यामुळे तेथे महेशाच्या ऐवजी गरुडाची मूर्ती आहे. दैत्यसुदन मंदिरासमोर हनुमान मंदिर आहे. हनुमान मंदिराच्या परिसरात गणेश, गरुडदेव, शिवलिंग तसेच हनुमानाच्या मूर्तींचे दर्शन होते.

सद्यस्थितीत दैत्यसुदन मंदिर हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या संरक्षणाखालील राष्ट्रीय स्मारक आहे. या मंदिराची मुख्य यात्रा चैत्र शुद्ध एकादशी ते चैत्र शुद्ध त्रयोदशी या काळात असते. चैत्र शुद्ध द्वादशीला लोणार शहरातून देवाची पालखी आणि रथोत्सव निघतो. याशिवाय वैकुंठ एकादशी आणि इतर वैष्णव उत्सव येथे मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. श्रावण महिन्यात देखील भाविकांची मोठी गर्दी असते.

उपयुक्त माहिती:

  • लोणार बस स्थानकापासून १ किमी अंतरावर
  • बुलडाणा येथून ९२ किमी अंतरावर
  • जिल्ह्यातील अनेक शहरांतून लोणारसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय

दैत्यसूदन मंदिर

लोनार, लोनार, जिला. बुलढाणा

Back To Home