चिंतामणी मंदिर (अष्टविनायक क्षेत्र)

थेऊर, ता. हवेली, जि. पुणे

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील थेऊर येथे अष्टविनायकांपैकी पाचवे श्री चिंतामणी मंदिर आहे. चिंता दूर करून चित्त स्थिर करणारे हे उपासनास्थान भाविकांना अतिशय प्रिय आहे. मुळा, मुठा नद्यांच्या काठावर हे क्षेत्र वसलेले आहे. पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाने मन स्थिर करण्याकरिता येथे श्री गणेशाची आराधना केली होती, म्हणून या गावाला ‘थेऊर’ नाव पडल्याची आख्यायिका सांगितली जाते. ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभलेल्या या ठिकाणी दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. या स्थानास ‘स्थावर क्षेत्र’ असेही म्हणतात. भाविकांच्या चिंता दूर करणारे हे जागृत क्षेत्र मानले जाते.

पेशवे कालखंडात या मंदिराला विशेष राजकीय आणि सामाजिक महत्त्व प्राप्त झाले होते. चिंचवड येथील महान गणेशभक्त मोरया गोसावी यांच्या घराण्यातील धरणीधर महाराज देव यांनी सर्वप्रथम या मंदिराचे मूळ बांधकाम केले. त्यानंतर सुमारे शंभर वर्षांनी श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांनी मंदिराचे मोठ्या प्रमाणावर नूतनीकरण केले. पेशव्यांचे कुलदैवत असलेले हे स्थान त्यांच्यासाठी श्रद्धेचे सर्वोच्च केंद्र होते. अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी क्षयरोगाच्या व्याधीने ग्रासलेल्या माधवराव पेशव्यांनी आपल्या आयुष्यातील अंतिम काळ याच ठिकाणी व्यतीत केला. १८ नोव्हेंबर १७७२ रोजी कार्तिक वद्य अष्टमीला त्यांनी चिंतामणीच्या चरणी प्रार्थना करत असतानाच आपला देह ठेवला. त्यांच्या निधनानंतर पत्नी रमाबाई यांनी पतीसोबत सती जाण्याचा निर्णय घेतला. मुळा-मुठा नदीच्या काठावर सती गेलेल्या या साध्वी रमाबाईंचे वृंदावन आजही त्या बलिदानाची साक्ष देते. मोगल सम्राट औरंगजेबाने देखील या देवस्थानाचे महत्त्व ओळखून गावाला सनद दिली होती. पेशवे काळातील प्रसिद्ध सेनापती हरिपंत फडके आणि इतर गणेशभक्तांनी वेळोवेळी मंदिराची दुरुस्ती करून त्याला सुस्थितीत ठेवले. १९६१ मध्ये झालेल्या पानशेत धरणफुटीच्या वेळी आलेल्या पुरात मंदिराच्या कळसाचे नुकसान झाले होते. त्यानंतर ‘स्वामी’ या अत्यंत गाजलेल्या कादंबरीचे लेखक रणजित देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या कळसाचे पुनरुज्जीवन केले.

‘मुद्गल पुराण’ आणि ‘गणेश पुराण’ या प्राचीन ग्रंथांमधील उल्लेखांनुसार, असुरकुलातील राजा अभिजित आणि राणी गुणवती यांचा पराक्रमी पुत्र गणासुर याने कपिलमुनींच्या आश्रमात असताना मुनींकडे असलेले दिव्य ‘चिंतामणी’ रत्न पाहिले. हे रत्न प्रत्यक्ष इंद्राने कपिलमुनींना दिलेले होते व त्याद्वारे इच्छिलेली कोणतीही गोष्ट प्राप्त होत असे. या रत्नाच्या प्रभावामुळे मुनींनी गणासुराच्या संपूर्ण सैन्याला पंचपक्वान्नांचे भोजन दिले. रत्नाचा हा चमत्कार पाहून गणासुराने लोभापोटी ते रत्न कपिलमुनींकडून बळजबरीने हिरावून घेतले. कपिलमुनींनी दुःखी होऊन दुर्गादेवीच्या आज्ञेनुसार श्री गणेशाची आराधना केली. गणपतीने प्रत्यक्ष प्रकट होऊन एका कदंब वृक्षाखाली गणासुराचा वध केला आणि ते रत्न पुन्हा कपिलमुनींना मिळवून दिले. कपिलमुनींनी कृतज्ञतेपोटी ते रत्न गणेशाच्या गळ्यात अर्पण केल्यामुळे गणपतीला ‘चिंतामणी’ हे नाव प्राप्त झाले. दुसऱ्या एका कथेनुसार गौतम ऋषींच्या शापामुळे देहव्याधीने त्रस्त झालेल्या इंद्राने याच कदंब वृक्षाखाली तप करून शापमुक्ती मिळवली. ज्या सरोवरात इंद्राने स्नान करून आपली व्याधी घालवली त्याला आजही चिंतामणी सरोवर म्हणून ओळखले जाते. सृष्टीच्या आरंभी ब्रह्मदेवाने देखील आपले चित्त स्थिर करण्यासाठी येथे अनुष्ठान केले होते. येथील कदंब वृक्षांच्या अस्तित्वामुळे या परिसराला प्राचीन काळी कदंबनगर असे देखील संबोधले जाई.

थेऊर येथील चिंतामणी गणपती मंदिरापासून काही अंतरावर प्रशस्त वाहनतळ आहे. वाहनतळापासून मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत येणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पूजा साहित्याची दुकाने आहेत. याच मार्गावर संस्थानाचे ‘चिंतामणी गणेश प्रतिकृती संग्रहालय’ आहे. या संग्रहालयात तांदूळ, सुपारी आणि विविध धातूंपासून बनविलेल्या गणपतीच्या अनेक दुर्मिळ मूर्ती आहेत. मंदिराभोवती भक्कम तटबंदी आहे. त्यातील प्रवेशद्वाराच्या लाकडी झडपांना पितळी पत्र्याने मढविलेले आहे. येथून पेव्हर ब्लॉकने सुशोभित केलेल्या प्रशस्त प्रांगणात प्रवेश होतो. मंदिरासमोर एक मोठी पितळी घंटा आहे. ती पेशव्यांना पोर्तुगीजांकडून मिळाली होती, असे सांगितले जाते.

प्रांगणात कोरीव पाषाणातील प्राचीन दीपमाळा, पिंपळाच्या पारावर असलेली शिवपिंडी आणि नंदी आहेत. येथेच दक्षिणमुखी हनुमान मंदिर व त्याच्या पुढे महादेव मंदिर आहे. या परिसरात विष्णू-लक्ष्मी मंदिर, अन्नछत्र आणि संस्थानाचे कार्यालय अशा विविध वास्तू आहेत. या मंदिराशी थोरले माधवराव पेशवे यांचे अतूट नाते आहे. प्रांगणात त्यांचे स्मारक मंदिर असून तेथे त्यांची मूर्ती आणि पालखी जतन केलेली आहे. मंदिराच्या मागे त्यांचा वाडा आहे व येथून काही अंतरावर नदीकाठी त्यांच्या पत्नी रमाबाई यांचे स्मारक आहे. त्याच ठिकाणी त्या सती गेल्या होत्या.

सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. येथील लाकडी सभामंडप पेशवेकालीन स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे. श्रीमंत माधवराव पेशव्यांनी सुमारे ४०,००० रुपये खर्चून बांधलेला हा लाकडी सभामंडप आजही त्याच्या मूळ सौंदर्यासह उभा आहे. लाकडाचा वापर करूनही शेकडो वर्षे हे बांधकाम अतिशय मजबूत स्थितीत टिकून आहे. सभामंडपामध्ये एक प्राचीन यज्ञकुंड असून धार्मिक विधींच्या वेळी तिथे अग्नी प्रज्वलित केला जातो. पुढे उंच जगतीवर पाषाणात बांधलेले अंतराळ आणि गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या चांदीने मढवलेल्या नक्षीदार प्रवेशद्वारातून आत आल्यावर चिंतामणी गणेशाची स्वयंभू पाषाण मूर्ती आहे. डाव्या सोंडेच्या या मूर्तीच्या डोळ्यांत रत्ने जडवलेली आहेत. या मूर्तीमागे चांदीची नक्षीदार प्रभावळ आहे. मंदिराच्या छतावर सहा थरांचे चौकोनी आणि घुमटाकार शिखर आहे. हे शिखर विटा आणि चुन्याच्या बांधकामातील आहे. त्यावर सोन्याचा मुलामा दिलेला आहे.

मंदिरात वर्षभर विविध धार्मिक उत्सव साजरे केले जातात. भाद्रपद शुद्ध चतुर्थी आणि माघ शुद्ध चतुर्थी हे येथील दोन मुख्य वार्षिक उत्सव आहेत. या वेळी मंदिरामध्ये विशेष महापूजा, अभिषेक आणि द्वारयात्रांचे आयोजन केले जाते. उत्सवादरम्यान मंदिर परिसरामध्ये मोठी जत्रा असते. कार्तिक महिन्यात श्रीमंत माधवराव पेशवे आणि साध्वी रमाबाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘रमा-माधव पुण्योत्सव’ मोठ्या श्रद्धेने साजरा होतो. या काळात मंदिरात भजन, कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात. प्रत्येक संकष्टी चतुर्थीला आणि विशेषतः अंगारकी चतुर्थीला पहाटेपासूनच भक्तांची येथे मोठी गर्दी होते. दररोज सकाळी आणि संध्याकाळी येथे चौघडावादन होते. उत्सवाच्या काळात भक्तांसाठी येथे मोफत महाप्रसादाचे आयोजन केले जाते.

मंदिराचे दैनंदिन कार्यक्रम पहाटे ५ वाजता काकड आरती आणि प्रक्षाळ पूजेने सुरू होतात. त्यानंतर सकाळी ७.३० वाजता पंचोपचार पूजा, नैवेद्य व धूपारती केली जाते. दुपारी १२ वाजता पुन्हा पंचोपचार पूजा आणि महानैवेद्य अर्पण केला जातो. दुपारी ३ वाजता प्रक्षाळ पूजा व पोशाख करण्याचा विधी संपन्न होतो. रात्री ८ वाजता धूपारती व आवरण देवतांची आरती होते, तर रात्री ८.३० वाजता महाआरती व मंत्रपुष्पांजली अर्पण केली जाते. दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता रात्री १०.३० वाजता शेजारतीने होते. दररोज सकाळी ५ वाजल्यापासून ते रात्री १०.३० वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात चिंतामणी गणेशाचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती

  • पुणे शहरापासून ३० किमी अंतरावर
  • पुणे शहरातील अनेक भागांतून येथे येण्यासाठी पीएमपीएमएल बस सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक सुविधा
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ७४१०१०४४२१
Back To Home