चिंतामणी पार्श्वनाथ जैन दिगंबर मंदिर

लातूर शहर, ता. जि. लातूर

महाराष्ट्र राज्यातील लातूर शहरात स्थित असलेले चिंतामणी पार्श्वनाथ जैन दिगंबर मंदिर हे या प्रदेशातील जैन संस्कृतीचे आणि धार्मिक परंपरेचे महत्त्वाचे केंद्र आहे. लातूरचे जुने नाव ‘लत्तलूर’ असे होते. हे शहर राष्ट्रकूट राजांच्या सत्तेचे मुख्य केंद्र होते. नवव्या शतकातील राष्ट्रकूट सम्राट अमोघवर्ष या जैन राजाच्या कारकिर्दीत लातूर परिसरात अनेक जैन मंदिरांची उभारणी झाली. या मंदिराला मोठा राजाश्रय मिळाला होता. हा वारसा जपणारे हे मंदिर लातूर जिल्ह्यातील दिगंबर जैन धर्मियांचे श्रद्धास्थान मानले जाते. लातूरच्या किल्लारी परिसरातील कार्ला गावात अकराव्या शतकातील कन्नड लिपीतील जैन शिलालेख सापडला आहे. तो या प्रदेशातील जैन परंपरेची साक्ष देतो.

जैन दिगंबर परंपरेमध्ये तेविसावे तीर्थंकर भगवान पार्श्वनाथ यांना महत्त्वाचे स्थान आहे. भक्तांच्या सर्व चिंता दूर करून त्यांना सुख आणि शांती देणारे रूप म्हणून यांना ‘चिंतामणी’ म्हटले जाते. जैन पुराणे आणि प्राचीन दस्तऐवजांच्या अभ्यासानुसार, भगवान पार्श्वनाथ यांचा काळ ख्रिस्तपूर्व आठव्या शतकाचा मानला जातो. आचार्य गुणभद्र रचित ‘उत्तरपुराण’ या दिगंबर जैन ग्रंथामध्ये भगवान पार्श्वनाथ यांच्या पूर्वभवांचे आणि त्यांच्या जीवनाचे वर्णन आढळते. या पुराणानुसार, त्यांचा जन्म वाराणासी येथे इक्ष्वाकु वंशाचे राजे अश्वसेन आणि राणी वामादेवी यांच्या पोटी झाला. त्यांच्या जन्मापूर्वी राणीला स्वप्नात सर्प दिसला होता, त्यावरून त्यांचे नाव ‘पार्श्व’ ठेवले गेले आणि त्यांचे प्रतीक सर्प निश्चित झाले. त्यांनी वयाच्या तिसाव्या वर्षी राजवैभवाचा त्याग करून दीक्षा घेतली आणि कठोर तपश्चर्या करून केवळज्ञान मिळवले व पुढे झारखंड येथील सध्याच्या संमेद शिखरजी पर्वतावरील पारसनाथ टेकडीवर त्यांना मोक्ष प्राप्त झाला. त्यानंतर त्यांनी समाजात अहिंसा, सत्य, अस्तेय आणि अपरिग्रह या चार गुणांचा प्रसार केला.

चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर मूर्तींची रचना विशिष्ट असते. या मूर्ती प्रामुख्याने दोन मुद्रांमध्ये आढळतात, त्यात ध्यानस्थ बसलेली ‘पद्मासन’ मुद्रा आणि सरळ उभे राहून तपश्चर्या करणारी ‘कायोत्सर्ग’ मुद्रा समाविष्ट आहे. पार्श्वनाथ यांच्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या डोक्यावर असलेले सर्पफणांचे छत्र होय. पूर्वजन्माचे वैर आठवून कामठासुराने जेव्हा भगवान पार्श्वनाथांवर संकट आणले, तेव्हा सर्पराज धरणेंद्र आणि देवी पद्मावती यांनी सर्प रूपात त्यांच्या डोक्यावर सप्तफणी छत्र धरून त्यांचे रक्षण केले होते. याच घटनेचे प्रतिबिंब मूर्तीशास्त्रात दिसते. त्यानुसार भगवान पार्श्वनाथांच्या मस्तकावर सात किंवा अकरा फण्यांचा छत्र विस्तारलेला दाखवला जातो. मूर्तीच्या खालील आसनावर सर्पाचे लांछन म्हणजेच चिन्ह कोरलेले असते. दिगंबर परंपरेनुसार या मूर्ती पूर्णपणे वस्त्राभरणरहित आणि शांत, वीतरागी भाव दर्शवणाऱ्या असतात. पद्मासनात बसलेली व डोक्यावर सप्तफणी छत्र असलेली भगवान पार्श्वनाथांची मूर्ती भाविकांच्या चिंता दूर करते, अशी श्रद्धा आहे.

विविध शिलालेख आणि ताम्रपटांमध्ये चिंतामणी पार्श्वनाथ यांच्या मंदिरांचा आणि मूर्तींचा स्पष्ट उल्लेख येतो. प्राचीन काळापासून राजे-महाराजे आणि श्रीमंत व्यापाऱ्यांनी या मूर्तींची स्थापना केल्याचे पुरावे शिलालेख देतात. मध्ययुगीन काळातील चालुक्य, राष्ट्रकूट आणि होयसळ राजांच्या कालखंडातील शिलालेखांमध्ये जैन मंदिरांना दिलेल्या दानांचा उल्लेख आहे. त्यात पार्श्वनाथ मंदिरांचा प्रामुख्याने समावेश होतो. लातूरपासून सुमारे ४५ किलोमीटर अंतरावर असलेल्या सहाव्या शतकातील चालुक्यकालीन ‘खरोसा लेण्यां’मध्ये कोरलेली ध्यानस्थ जैन तीर्थंकरांची शिल्पे आणि यक्ष मूर्ती या प्रदेशातील जैन परंपरेच्या प्राचीनतेची साक्ष देतात. राष्ट्रकूट राजे दंतिदुर्ग आणि अमोघवर्ष यांच्या काळात या परिसराला ‘लत्तलूर’ नावाने ओळखले जात होते. या मंदिराची मूळ निर्मिती सहाव्या शतकात झाल्याचे मानले जाते. त्यानंतर विविध कालखंडात त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिराची मूळ वास्तू जुनी झाल्यामुळे काळाच्या ओघात ती जीर्ण झाली होती. त्यामुळे इ.स. २००३ मध्ये मंदिराचे प्राचीनत्व अबाधित ठेवून दर्शनी भागाचा आणि गर्भगृहाचा जीर्णोद्धार व विस्तार करण्यात आला.

नाशिक येथील गोदावरी नदीच्या काठावर असलेली ५२ सेंटीमीटर उंच, निळ्या रंगाची चिंतामणी पार्श्वनाथांची मूर्ती महत्त्वाची मानली जाते. ‘नासिक्यपूरकल्प’ ग्रंथात या मूर्तीचा उल्लेख सापडतो. राजस्थानातील जैसलमेर येथे मुख्य मूलनायक म्हणून चिंतामणी पार्श्वनाथ आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही जैन चिंतामणी पार्श्वनाथ यांचे मंदिर आहे. हरिद्वार येथील श्री चिंतामणी पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर देखील परिचित आहे. लातूर येथील दिगंबर जैन मंदिरामध्ये ‘भट्टारक’ परंपरेतील जनार्दन नावाच्या कवीने चाळीस अध्यायांचा ‘श्रेणिक पुराण’ हा ग्रंथ लिहून जैन साहित्यात मोलाची भर घातलेली आहे.

जुन्या लातूर शहरातील या मंदिरास तटबंदी व प्राचीन रचनेचे प्रवेशद्वार आहे. येथील प्रांगणात सभोवार ओवऱ्या, अन्नछत्र, अभ्यासिका व मुनी निवासाच्या इमारती आहेत. प्रांगणात एक नक्षीदार मानस्तंभ आहे. पायाजवळ अधिक रुंद असलेला हा मानस्तंभ छतातून पार गेला आहे. छताच्या वर गेलेल्या स्तंभाच्या शीर्षभागी असलेल्या काचेच्या मखरात भगवान पार्श्वनाथ यांची मूर्ती आहे. पद्मासनावर विराजमान व चौकोनी पाठशिळेच्या चारही दिशांना चार शिल्पे अशा रचनेची ही मूर्ती विशिष्ट पद्धतीची आहे. मखरावर पंचरथ प्रकारचे शिखर व शिखरावर कळस आहे.

सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वारास लाकडी झडपा आहेत आणि त्यावर महिरपी तोरण आहे. या सभामंडपात काचेची तावदाने असलेल्या कपाटात भगवान महाविरांच्या वेगवेगळ्या धातूतील विविध आकाराच्या अनेक मूर्ती आहेत. सभामंडपात भिंतींवर भगवान महावीर यांच्या आयुष्यातील विविध प्रसंगांची चित्रे लावलेली आहेत. सभामंडपातून तळघरात जाणारा पायरी मार्ग आहे. तळघरात वज्रपीठावर भगवान पार्श्वनाथ यांची पद्मासनात बसलेली ध्यानस्थ अवस्थेतील मूर्ती आहे. मूर्तीच्या खालील वज्रपीठावर यक्ष शिल्पे आहेत. सभामंडपापुढे अंतराळ आहे. या अंतराळात चार स्तंभ आहेत. पुढे स्वतंत्र रचनेचे गर्भगृह आहे. गर्भगृहाचे प्रवेशद्वार अंतराळापेक्षा उंचावर आहे आणि या प्रवेशद्वारास पायऱ्या आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस दर्शनी भिंतीत दीपकोष्टके आहेत. द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी आहे आणि ललाटबिंबावर तीर्थंकराचे शिल्प आहे.

गर्भगृहात वज्रपीठावर, चांदीच्या मखरात, पद्मासनात बसलेल्या चिंतामणी भगवान पार्श्वनाथ यांची सुवर्ण मूर्ती आहे. भगवान पार्श्वनाथ यांच्या डोक्यावर सप्तफणी नागाने छत्र धरलेले आहे. मखरावर शुभचिन्हे चित्रित आहेत. गर्भगृहातील भिंती आणि वितानावर काचेची मीनाकारी सजावट केलेली आहे. गर्भगृहाच्या बाह्यबाजूने प्रदक्षिणामार्ग आहे. प्रदक्षिणामार्गात भिंतीत देवकोष्टके आहेत. त्यात धरणेंद्र, पद्मावती, भगवान पार्श्वनाथ व इतर तीर्थंकरांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या छतावर लहान देवळी आहे. त्यात वज्रपीठावरील काचबंद मखरात जैन देवतेची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या छतावर चौकोनी शिखर आहे.

पौष कृष्ण एकादशीला भगवान पार्श्वनाथ यांचा जयंती उत्सव साजरा केला जातो. या प्रसंगी भगवान पार्श्वनाथ यांची मूर्ती रथात ठेवून मिरवणूक काढली जाते. असाच उत्सव चैत्र शुक्ल त्रयोदशीला भगवान महाविरांच्या जन्मकल्याणक दिनी मंदिरात साजरा केला जातो. भाद्रपद महिन्यातील १० दिवस चालणारे दशलक्षण पर्व हा येथील प्रमुख सण आहे. या काळात दया, क्षमा, मार्दव आदी १० गुणांची आराधना, पूजा, उपवास आणि स्वाध्याय केला जातो. त्यानिमित्ताने मंदिरात प्रवचन, भजन, स्तुतीगायन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. श्रुतपंचमी आणि कार्तिक एकादशी या दिवसांत विशेष धार्मिक विधी, महाभिषेक आणि ग्रंथांची पूजा केली जाते. उत्सवकाळात भगवान पार्श्वनाथ यांच्या मूर्तीवर जल, दूध, केसर इत्यादींसह सुगंधी द्रव्यांनी अभिषेक केला जातो. मंदिरात दररोज सकाळी ७ वाजता शिखर मंदिरातील महावीर भगवंतांचा अभिषेक केला जातो. त्यानंतर सकाळी ७.३० वाजता चोवीस तीर्थंकर भगवंतांचा अभिषेक पार पडतो. सकाळी ८ वाजता गर्भगृहातील चिंतामणी पार्श्वनाथ भगवंतांचा तर सकाळी ८.३० वाजता सभागृह वेदीवरील चिंतामणी पार्श्वनाथ भगवंतांचा अभिषेक केला जातो. दररोज संध्याकाळी ७ वाजता भगवंतांची आरती केली जाते. या दैनंदिन विधींशिवाय प्रत्येक रविवारी सकाळी ९ वाजता णमोकार महामंत्र जाप आणि प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी ६ वाजता स्वाध्याय वर्गाचे आयोजन केले जाते. मंदिरात प्रत्येक अष्टमी व चतुर्दशीला सायंकाळी ७ वाजता भक्तामर दीप विधान यांसारखे विशेष धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. दररोज सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात चिंतामणी पार्श्वनाथांचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती

  • लातूर बस स्थानकापासून ३ किमी अंतरावर
  • जिल्ह्यातील अनेक शहरांतून लातूरसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे

चिंतामणि पार्श्वनाथ जैन दिगंबर मंदिर

लातूर शहर, तालुका और जिला लातूर

Back To Home