बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील कोथळी येथील विश्वगंगा नदीच्या तीरावर वसलेली चिंतामणी महादेव आणि शाळीग्राम महादेव ही दोन प्राचीन शिवालये तेराव्या शतकातील यादवकालीन वास्तुकलेचा अमूल्य वारसा समजली जातात. निसर्ग आणि विज्ञानाचा संगम येथे अनुभवायला मिळतो. खगोलशास्त्रीय अचूकता हे या मंदिरांचे वैशिष्ट्य आहे. वर्षातील काही दिवस सकाळी शाळीग्राम महादेवावर तर सायंकाळी चिंतामणी महादेवाच्या पिंडीवर सूर्यकिरणे पडतात. ही मंदिरे मध्ययुगीन भारताच्या प्रगत स्थापत्यशास्त्राची आजही साक्ष देतात.
बुलडाणा जिल्ह्याच्या कुशीत वसलेला मोताळा तालुका ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाने अत्यंत समृद्ध आहे. विदर्भ आणि खानदेशच्या सीमेवर वसल्यामुळे या भूमीवर दोन्ही संस्कृतींचा सुंदर मिलाफ झालेला आहे व त्याचा प्रभाव येथील बोलीभाषेपासून ते चालीरीतींपर्यंत जाणवतो. मोताळ्यापासून जवळच असलेले कोथळी हे गाव येथील प्राचीन शिवालयांवरील शिल्पकलेमुळे विदर्भात प्रसिद्ध आहे.
प्राचीन काळी अजिंठा लेणी आणि इतर महत्त्वाच्या व्यापार केंद्रांकडे जाणाऱ्या मार्गांचा हा भाग असल्याने कोथळीसारख्या गावांना त्याकाळी विशेष महत्त्व प्राप्त झाले असावे, हे येथील या मंदिरांमुळे स्पष्ट होते. तेराव्या शतकात देवगिरीचा राजा रामदेवरायांच्या कारकिर्दीत त्याचा प्रधान तसेच वास्तुशिल्पकार हेमाद्री पंडित याने ही मंदिरे उभारल्याचे सांगण्यात येते. त्यापैकी एक मंदिर गावाबाहेर, विश्वगंगा नदीच्या काठावर आहे. हे शिवालय चिंतामणी महादेव मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे.
नदीच्या तीरावर असलेल्या या मंदिराभोवती आवारभिंत आहे. त्यातील प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात या प्रवेशद्वारापासून ते मंदिरापर्यंत काँक्रीटचा रस्ता आहे. या प्रांगणात अनेक प्राचीन वृक्ष आहेत. दर्शनमंडप, सभामंडप, दोन उपगर्भगृहे, अंतराळ व त्यापुढे मुख्य गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. संपूर्ण मंदिर हे दगडांत बांधलेले आहे. दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या दगडी ओट्यांवर नंदीच्या तीन प्राचीन मूर्ती आहेत. येथील दर्शनमंडपात भाविकांना बसण्यासाठी दगडी कक्षासने आहेत. येथून सभामंडपात प्रवेश होतो. अर्धखुल्या स्वरूपाच्या या सभामंडपात अनेक दगडी स्तंभ आहेत. त्यांचे स्तंभपाद हे नक्षीदार व वरील स्तंभदंड विविध आकाराचे आहेत.
सभामंडपात मध्यभागी अखंड पाषाणातील कोरीव काम असलेली नंदीची मूर्ती आहे. सभामंडपात उजवीकडे असलेल्या उपगर्भगृहात शिवपिंडी आहे, तर डावीकडील गर्भगृह हे रिकामे आहे. येथील मुख्य गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर अत्यंत सूक्ष्म आणि वैशिष्ट्यपूर्ण कोरीवकाम केलेले आहे. यामध्ये विविध स्तरांवर वेलपत्ती, भौमितिक नक्षी आणि मानवी आकृत्या आहेत. प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणेशाचे शिल्प आहे. त्यावरील उत्तरांगावर अनेक लहान देवकोष्टके आहेत व त्यांत विविध देव-देवतांच्या मूर्ती साकारल्या आहेत. याच द्वारशाखांवर खालील बाजूस गंगा-यमुनेसह द्वारपाल शिल्पे कोरलेली आहेत. येथून काही पायऱ्या उतरून मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश होतो. या गर्भगृहात मध्यभागी अखंड पाषाणात कोरलेली चिंतामणी महादेवाची पिंडी आहे. पिंडीच्या वरील बाजूला छताला टांगलेल्या गलंतिकेतून पिंडीवर अभिषेक होत असतो. बाहेरील बाजूने या गर्भगृहाचे बांधकाम तारकाकृती आहे. गर्भगृहावर घुमटाकार शिखर व त्यावर पितळी कळस आहे.
अशीच रचना असलेले एक मंदिर या गावाच्या मध्यभागी आहे. ते शाळीग्राम महादेव म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिरासमोर एक दगडी चौथरा आहे.
त्यापुढील काही पायऱ्या चढून या मंदिराच्या मंडपात प्रवेश होतो. येथे जुन्या मंदिराचे भग्नावस्थेत असलेले, अर्धवट तुटलेले सहा स्तंभ उरले आहेत. पूर्वी हा भव्य आकाराचा सभामंडप असावा, असा अभ्यासकांचा अंदाज आहे. त्यापुढे सभामंडप व तीन गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. चिंतामणी मंदिराप्रमाणेच येथील सभामंडप व गर्भगृहांची रचना आहे. गर्भगृहात सूरसुंदरी व यक्षशिल्पे आहेत. मुख्य गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या द्वारशाखेवर तसेच वरच्या भागात श्री विष्णू आणि लक्ष्मीसह अन्य देव-देवतांची शिल्पे कोरलेली आहेत. द्वारपट्टीच्या मध्यभागी गणेशाचे स्थान आहे. गर्भगृहात उंचावर शाळीग्राम महादेवाची पिंडी आहे. त्याच्या खालील बाजूस श्री विष्णूंचे वाहन असलेल्या गरुडाची मूर्ती कोरलेली आहे. याशिवाय अन्य दोन गर्भगृहांत शिवपिंडी आहेत. या मंदिराच्या चारही बाजूंनी दगडांवर सुंदर शिल्पे तसेच वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम आहे.
या गावातील दोन मंदिरांपैकी शाळीग्राम महादेवाच्या शिवलिंगावर वर्षातील विशिष्ट दिवशी सूर्योदयाच्या वेळी किरणे अभिषेक करतात, तर त्याच दिवशी चिंतामणी महादेवाच्या पिंडीवर मावळतीची सूर्यकिरणे पडतात, अशा प्रकारे या मंदिरांची रचना करण्यात आली आहे. या दोन्ही मंदिरांवर वैशिष्ट्यपूर्ण व आकर्षक कलाकुसर आहे. प्राचीन स्थापत्यशैलीचे उत्तम नमुने असलेली ही दोन्ही शिवालये भाविकांबरोबरच अभ्यासक तसेच पुरातत्त्व शाखेच्या विद्यार्थ्यांसाठीही आकर्षण ठरत आहेत. ही दोन्ही शिवालये राज्य पुरातत्त्व विभागाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केली आहेत.