‘श्री गुरूदेवदत्त अवतार। पुनरपि प्रकटला साकार।’ असे ज्यांच्याबद्दल म्हटलेले आहे त्या सद्गुरू चिले महाराज यांचे समाधी मंदिर पैजारवाडी येथे आहे. चिले महाराज हे दत्त परंपरेतील एक थोर पुरुष मानले जातात. भाविकांची अशी श्रद्धा आहे की ते चमत्कारी पुरुष होते व त्यांची अनेक भाकिते खरी ठरत. त्यामुळे आजही त्यांच्या समाधी दर्शनासाठी असंख्य भाविक पैजारवाडी येथे येत असतात. येथील मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचा आकार. हे समाधी मंदिर कासवाच्या आकारात बांधलेले आहे.
चिले महाराज यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात १५ ऑगस्ट १९२२ रोजी पन्हाळा तालुक्यातील जेऊर या गावी झाला. त्यांचे वडील व्यवसायानिमित्ताने कोल्हापूरला स्थलांतरित झाले होते. मात्र चिले महाराज यांचे बालपण जेऊर या त्यांच्या मूळ गावीच गेले. जन्मानंतर काही दिवसांत त्यांच्या मातेचे निधन झाले. त्यानंतर ते कोल्हापूर येथे गेले. तेथे शालेय शिक्षण घेत असताना त्यांच्या वडिलांचेही निधन झाले. त्यानंतर त्यांनी शाळा सोडून भ्रमंती सुरू केली. पुढे त्यांना गराडे महाराज हे सत्पुरुष भेटले. तेच चिले महाराज यांचे पहिले गुरू. गराडे महाराजांनी त्यांना कोल्हापूरचे सिद्धेश्वर महाराज व पाटील महाराज यांच्याकडे पाठवले. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या एका काठावर सिद्धेश्वर यांची, तर दुसऱ्या तीरावर पाटीलबाबा यांची समाधी आहे. सिद्धेश्वराच्या समाधीजवळ त्यांनी २५ दिवसांचे अनुष्ठान केले होते. तेव्हापासून त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले.
तरुणपणी एकदा ते कोल्हापूर जिल्ह्यातील चिखली येथील दत्त मंदिरात गेले असता त्यांना साक्षात्कार झाला. त्यानंतर ‘माझे मन, तुझे मन, काय सांगू जनांस?’, असे काहीतरी नित्याप्रमाणे बोलत ते बाहेर हिंडू लागले. धनकवडीचे अवलिया संत शंकर महाराज यांचाही चिले महाराजांवर प्रभाव होता. ते शंकर महाराजांना थोरले बंधू म्हणून ‘दादा’ म्हणत. चिले महाराज यांची राहणी अत्यंत साधी होती. गाणगापूर येथील मधुकर ठाकूर ऊर्फ दास मधू यांनी १९९० च्या दशकात लिहिलेल्या ‘चिले महाराज माहात्म्य’ या ग्रंथात असे म्हटले आहे की ‘शुभ्र पायजमा परिधान। धवल पैरण शोभे छान। कधी टोपी ही शिराच्छादन। वेष हा त्यांचा।।’. त्यांची वृत्ती ‘आले मनी तेथे गेले’ अशी होती. ‘चिले महाराज हे आपल्याच भ्रमात असत व त्यांच्या मुखातून सरस्वती वाहात असे. ते चारचौघांत जे बोलत ते फक्त त्यांच्या भक्तासच समजे, इतर कोणास कळत नसे’, असेही त्यांचे वर्णन या ग्रंथात करण्यात आले आहे. ते लोकांना सत्यमार्ग दाखवत असत. ते एकाशी बोलत, परंतु त्यातून इतरांना संदेश मिळत असे. अनेकदा ते ‘अहम् ब्रह्मास्मि’, ‘मीच दत्त महाराज आहे’, असे सांगत असत. त्यांनी केलेली अनेक भाकिते खरी ठरल्याचे त्यांचे भक्त सांगतात. त्यांच्या अंतिम काळात लोकांना त्यांची महत्ता समजली. कोल्हापूर, सातारा, नाशिक या भागात त्यांचा विशेष संचार असे.
‘सुखात असताना आवर्जून दु:खास आठवावे आणि दु:ख आल्यास त्यास हसत सामोरे जावे, म्हणजे दु:खाची तीव्रता कमी होते,’ असे साधे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या,‘रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम’ हे भजन गात भगवद्भक्तीचा महिमा पसरविणाऱ्या अशा या सत्पुरुषाचे शके १९०८, चैत्र वद्य चतुर्दशी, बुधवारी (७ मे १९८६ रोजी) वयाच्या ६४ व्या वर्षी कोल्हापूर येथे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या मूळ गावी पैजारवाडी येथे त्यांचे समाधी मंदिर बांधण्यात आले.
गुरुदेव दत्त यांच्यासमवेत नेहमी गोमाता, तसेच श्वान असत. चिले महाराजांचीही प्राणिमात्रांवर माया असे. कासव या प्राण्यावर तर त्यांचा विशेष जीव असे. भगवान विष्णूने कासवाचा (कूर्म) अवतार धारण केला होता. त्यामुळेच चिले महाराजांच्या भक्तांनी स्थापन केलेल्या विश्वस्त संस्थेने जेव्हा त्यांचे भव्य समाधी मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्या मंदिरास कासवाचा आकार द्यावा असे ठरवण्यात आले. त्यानुसार पैजारवाडीतील प्रशस्त अशा भूखंडावर हे समाधी मंदिर बांधण्यात आले. आज ते भक्तगणांच्या आकर्षणाचे एक केंद्र बनले आहे. एवढेच नव्हे, तर या मंदिरास वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यासाठीचा अमेरिकन काँक्रिट असोसिएशनचा ‘आउटस्टँडिंग स्ट्रक्चर ऑफ दी इअर’ हा सन्मान प्राप्त झाला आहे.
उंच जगतीवर, गुलाबी दगडांचा वापर करून उभारलेले भव्य प्रांगण, त्याच्या चारही बाजूंना गोलाकार बुरुजासारख्या इमारती आणि त्या मधोमध कासवाचा आकार असलेली भव्य वास्तू अशी या समाधी मंदिराची रचना आहे. गोलाकार उंच इमारत, त्याच्या चारही बाजूंना कासवाच्या पायासारखा आकार, छत कासवाच्या पाठीसारखे, त्यावर छोटे शिखर आणि मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस कासवाचे मोठे मुख असे हे मंदिर आहे. काही पायऱ्या चढून या मंदिरात प्रवेश होतो. मंदिर प्रांगणात दगडांत कोरलेले एक सुंदर तुळशी वृदांवन आहे. त्यावर गणेश व राधाकृष्ण यांच्या रेखीव मूर्ती कोरण्यात आल्या आहेत. तुळशी वृंदावनाच्या खालच्या बाजूला चार टोकांवर कासवाच्या शिरोभागाचा आकार देण्यात आला आहे.
मंदिरात आत प्रवेश करताच भव्य असा घुमटाकार सभामंडप दिसतो. पूर्ण संगमरवरी बांधकामाच्या या सभामंडपाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यास खांबांचा आधार दिलेला नाही. या सभामंडपात मधोमध खोल विहिरीसारखा वरून मोकळा असलेला व कठडे लावलेला गाभारा आहे. काही पायऱ्या उतरून त्यात प्रवेश होतो. या गाभाऱ्यात मध्यभागी उंच गोल चौथऱ्यावर चिले महाराजांची मूर्ती आहे. ते नेहमी जसा वेष करत, त्याप्रमाणे पांढरा सदरा व पायजमा परिधान केलेली ही मूर्ती आहे. ती पांढऱ्या संगमरवरी दगडापासून बनविलेली आहे. या मूर्तीच्यासमोर चिले महाराजांच्या पादुका व कासवाची प्रतिकृती आहेत. त्याही संगमरवरी दगडांत घडविण्यात आल्या आहेत. महाराजांच्या मूर्तीच्या वर चांदीचे मोठे छत्र आहे.
मंदिरात लख्ख प्रकाश पडावा म्हणून सर्व बाजूंनी संगमरवरी जाळीदार गवाक्षे तसेच लाकडी कलाकुसर केलेली प्रवेशद्वारे आहेत. समाधी मंदिरात ध्यानधारणेसाठी तीन स्वतंत्र दालने आहेत. समाधी मंदिराच्या आवारात मागच्या बाजूस कोरीवकाम केलेल्या सुंदर छोट्या देवळ्यांत दत्त, विठ्ठल रुक्मिणी व हनुमान या देवांच्या मूर्ती आहेत. येथे महाराजांच्या पादुकांचेही स्थान आहे. येथेच प्रशस्त असे एक दालनही आहे. यात महाराजांची मोठी तसबीर ठेवलेली आहे.
चिले महाराज समाधी मंदिरात पहाटे ५ ते रात्री १० या कालावधीत दर्शन घेता येते. येथे पहाटे ६ वाजता अभिषेक, ७ वाजता आरती, दुपारी १२ वाजता नैवेद्य व आरती, सायंकाळी ५ वाजता आरती व रात्री ९ वाजता शेजारती होते. येथे दर गुरुवारी सकाळी ६ वाजता अभिषेक व विशेष पूजा आरती केली जाते. याच प्रमाणे येथे दर अमावस्येस महाप्रसादाचे वाटप केले जाते. मंदिरात दत्त जयंती, कोजागरी पौर्णिमा, महाशिवरात्र, गुरुपौर्णिमा, दसरा हे उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. गोकुळाष्टमी हा चिले महाराजांचा प्रकटदिन आहे. या दिवशीही येथे भाविकांची मोठी गर्दी उसळत असते.