चिलाई देवी मंदिर

भाटवडे, ता. वाळवा, जि. सांगली

चिलाई देवी ही सप्तमातृकांपैकी चामुंडा देवीचे रूप असल्याची मान्यता आहे. काही ठिकाणी तिला जलदेवता म्हणूनही पुजले जाते, तर काही कथांनुसार चिलाई ही भैरवनाथांची बहीण असल्याचे स्पष्ट होते. महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात तसेच पूर्वोत्तर राज्यांमध्ये चिलाई देवी ही अनेक कुटुंबांची कुलदेवता अनेक गावांची ग्रामदेवताही आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये अनेक ठिकाणी चिलाई देवीची मंदिरे आहेत. यापैकीच एक प्राचीन प्रसिद्ध मंदिर वाळवा तालुक्यातील भाटवडे गावात आहे. देवीचे हे स्थान जागृत आहे ही देवी नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे

चिलाई माता ही राजस्थानात चिलाय माता म्हणून ओळखली जाते. ती राजस्थानातील इतिहासप्रसिद्ध तंवर वा तोमर क्षत्रिय राजपूत घराण्याची कुलदेवता आहे. ही देवी जोगमाया किंवा योगमाया, योगेश्वरी किंवा जोगेश्वरी, तसेच सरूण्ड माता वा मनसादेवी या नावांनीही पूजली जाते. तंवर राजपुतांच्या या कुलदेवतेचे मूळ स्थान हरियाणातील रेवाडी जिल्ह्यातील मायन (बलवाडी) हे आहे. पौराणिक आख्यायिकेनुसार, या ठिकाणी योगेश्वरी देवीने पांढऱ्या चील पक्षाचे (घार वा गरूड) स्वरूप धारण करून तोमर राजा जयरथ याचा पुत्र जाटूसिंग याचे रक्षण केले होते. तेव्हापासून ती चिलाई माता म्हणून ओळखली जाऊ लागली. महाराष्ट्रात ही देवी ग्रामदेवतेच्या स्वरूपात विराजमान आहे. चंडमुंड राक्षसांचा वध करणाऱ्या काली देवीच्या म्हणजेच चामुंडेच्या रुपातही ती येथे पूजली जाते

भाटवडे येथील चिलाई देवीचे हे मंदिर पाचशे ते सहाशे वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. १९७६ मध्ये लोकसहभागातून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आल्याची नोंद आहे. या मंदिरात सुवासिनी पंगत घालण्याची प्रथा आहे. त्यानुसार येथील मुलगी बाहेरगावी लग्न करून दिली की तिने या मंदिरात सात सुवासिनींना जेवण घालायचे असते. येथे गावातील लेकीसुनांचे पहिले अपत्य असलेल्या लहान मुलांना पाळण्यात ठेवून हे पाळणे विहिरीच्या पाण्यापर्यंत सोडून बाहेर काढण्याची प्रथा होती. असे सांगितले जाते की पूर्वी सुवासिनी पंगतीसाठी ज्या भांड्यांत अन्न शिजवले वा वाढले जाई ती भांडी मंदिराच्या आवारातील विहिरीतून प्राप्त होत असत. ती भांडी सोन्याचांदीची असत. पंगती आटोपल्या की लोक ती भांडी परत विहिरीत सोडून देत. परंतु एकदा त्यातील काही भांडी चोरीला गेली. त्यामुळे विहिरीचे सत्व नाहीसे झाले विहिरीतून भांडी मिळणे बंद झाले. अशाच प्रकारची आख्यायिका महाराष्ट्रातील दोन मंदिरांबाबतही सांगण्यात येते. त्यातील एक मंदिर वाळणकोंडी (ता. महाड, जि. रायगड) येथील वरदायिनी मातेचे दुसरे मंदिर धामापूर (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील भगवती मातेचे आहे. वरदायिनी मातेच्या मंदिरातून परिसरातील नागरिकांच्या घरातील शुभकार्यासाठी सोन्याचांदीची भांडी मिळत असत, तर धामापूरच्या मंदिराशेजारील तलावातून लोकांना विवाहसोहळ्यासाठी दागदागिने मिळत असत, अशी दंतकथा आहे

चिलाई देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर स्वागतकमान आहे. कमानीत रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन स्तंभपादावर चौकोनी नक्षीदार स्तंभ आहेत. स्तंभदंडावर जयविजय या वैष्णव द्वारपालांची शिल्पे, तसेच शंख, चक्र नक्षी कोरलेली आहे. स्तंभ महिरपी कमानीने जोडलेले आहेत वरील तुळईवर सज्जा आहे. सज्जावर तीन मेघडंबरी आहेत. गणपती शिल्प असलेल्या मधल्या मेघडंबरीच्या दोन्ही बाजूंस सिंहशिल्पे या शिल्पांच्या बाजुला निमुळती शिखरे आहेत. डाव्या बाजूच्या मेघडंबरीत शिवपार्वती उजवीकडे दत्तात्रेयांची मूर्ती आहे. सज्जावर दोन्ही टोकाला आणखी दोन सिंह शिल्पे आहेत. पुढे मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर दत्तात्रेयांचे षट्कोनी मंदिर आहे. मंदिरात वज्रपीठावर दत्तात्रेयांची उभी त्रिमुख षट्भुजा असलेली मूर्ती आहे. मंदिराभोवती प्रदक्षिणा मार्ग त्याभोवती सुरक्षा कठडा आहे. छतावर षट्कोनी शिखर, त्यावर आमलक कळस आहे.

पुढे चिलाई देवीचे मंदिर आहे. या मंदिरासमोर बारा फूट उंचीची किल्ल्यासारखी दिसणारी तटबंदी आहे. या तटबंदीवर बाशिंगी कठडा आहे. तटबंदीत दुमजली प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या वरील मजल्यावर नगारखाना आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला पहारेकरी आसने आहेत. आसनांवर चक्रनक्षी मागील स्तंभात दीपकोष्टके आहेत. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर पर्णलता, पुष्पलता, वेलबुट्टी नक्षी ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. द्वारशाखांच्या वरील बाजूस असलेल्या गजराजहस्तांनी ललाटपट्टी तोलून धरली आहे. प्रवेशद्वाराच्या लाकडी झडपा बारीक कलाकुसरीच्या नक्षीने सजलेल्या आहेत. येथून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो.

प्रांगणात सभामंडपाच्या प्रवेशद्वारासमोर दोन्ही बाजूला दोन चौथरे त्यांवर दीपमाळा आहेत. चौथाऱ्यांच्या चारही कोपऱ्यांवर कीर्तिमुख शिल्पे आहेत. दीपमाळेत दीपप्रज्वलन करण्यासाठी स्वतंत्र हस्त आहेत. दोन्ही दीपमाळांच्या मधोमध चौकोनी नक्षीदार तुलसी वृंदावन आहे. वृंदावनाच्या भिंतींवर गणपती, लक्ष्मी सरस्वती यांच्या प्रतिमा आहेत. सभामंडप गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपाच्या लाकडी प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर झडपांवर पानाफुलांची नक्षी आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दर्शनीभिंतीत दीपकोष्टके आहेत. या दीपकोष्टकांसमोर भिंतीतून बाहेर आलेले हस्त आहेत. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात हवा येण्यासाठी गवाक्षे आहेत. सभामंडपात जमिनीवर कासव शिल्प भिंतीत दीपकोष्टके आहेत

गर्भगृहाचे प्रवेशद्वार सभामंडपापेक्षा काहीसे उंच आहे. या प्रवेशद्वाराच्या रंगवलेल्या द्वारशाखांवर वेलबुट्टी नक्षी ललाटबिंबस्थानी गणपतीची मूर्ती आहे. मंडारकावर कीर्तिमुख आहे. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा दोन्ही बाजूंना दर्शनी भिंतीवर सुरसुंदरींची चित्रे आहेत. गर्भगृहात वज्रपिठावर मोत्यांनी सजवलेल्या नक्षीदार मखरात, पितळी सिंहासनावर देवीची पितळी द्विभुज मूर्ती आहे. सुवर्ण मुकूट ल्यालेल्या देवीच्या एका हातात तलवार दुसऱ्या हातात अमृतपात्र आहे. देवीला दररोज उंची वस्त्रे अलंकार परिधान केले जातात. देवीच्या मागील प्रभावळीवर सूर्य वर मध्यभागी कीर्तिमुख आहे. देवीच्या मागे दोन्ही बाजूला दोन सिंहशिल्पे आहेत. मखरावर चौकोनी शिखर त्यावर कळस आहे. वज्रपिठाच्या बाजूला सप्तमातृकांच्या मूर्ती आहेत. ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी चामुंडा या त्या सप्तमातृका होत. चामुंडा वगळता अन्य देवी चिलाईच्या बहिणी असल्याचे सांगितले जाते. वज्रपिठापुढे देवीचा पलंग आहे. या पलंगावर रोज रात्री देवी शयनी जाते, अशी भाविकांची श्रद्धा आहे

गर्भगृहाच्या बाह्य बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. या मार्गावर असलेल्या लहान लहान देवळ्यांमध्ये शिवपिंडी, गणपती, म्हसोबा आदी देवतांच्या मूर्ती आहेत. दुमजली सभामंडपाच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी बाहेरून उजव्या बाजूने जीना आहे. सभामंडपाच्या दुसऱ्या मजल्यावर, वर खाली असे दोन भागात विभागलेले कौलारू छत आहे. गर्भगृहाच्या छतावर उभ्या धारेची नक्षी असलेले उंच शिखर आहे. शिखराच्या शीर्षभागी एकावर एक असे दोन आमलक, त्यावर कळस ध्वज पताका आहे.

मंदिराच्या उजव्या बाजूला गोड्या पाण्याची आयताकार विहीर आहे. या विहिरीच्या आतील भिंतीवर सप्तमातृका पट त्याच्या दोन्ही बाजूस सिंहमुख शिल्पे आहेत. विहिरीत उतरण्यासाठी घडीव पायऱ्या आहेत. प्राचीन काळी याच विहिरीतून जेवणावळीसाठी भांडी निघत असत, असे सांगितले जाते. मंदिराच्या प्रांगणात सांस्कृतिक मंगल कार्यासाठीचे सभागृह, भांडारकक्ष मंदिर कार्यालयाची इमारत आहे.

शारदीय नवरात्रौत्सव हा येथील मुख्य वार्षिक उत्सव होय. अष्टमीला रात्री बारा वाजता मातीचे घट पाण्याने भरून सात कन्या पुजल्या जातात. दुसऱ्या दिवशी ते घट विहिरीत सोडले जातात. दसऱ्याच्या दिवशी ढोलताशांच्या गजरात, गुलाल उधळीत मिरवणुकीने देवीच्या पालखीची ग्रामप्रदक्षिणा घालण्यात येते. नंतर प्रत्येक मानकऱ्याच्या पुजाऱ्याच्या घरी देवी माहेरपणाला जाते कोजागिरी पौर्णिमेला पुन्हा मंदिरांत स्थानापन्न होते. मंदिरात कोजगिरी पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा असा महिनाभर दीपोत्सव साजरा केला जातो. यावेळी मंदिरातील दीपमाळा मंदिर परिसर तेलाच्या दिव्यांनी उजळून निघतो. या उत्सवाच्या वेळी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आदी राज्यांतून हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी नवस फेडण्यासाठी मंदिरात येतात. दर मंगळवार, शुक्रवार, अष्टमी, पौर्णिमा अमावस्या या दिवशी मंदिरात भाविकांची विशेष गर्दी असते. मंदिरात सुवासिनी पंगतीचा कार्यक्रम वर्षभर सुरू असतो

उपयुक्त माहिती

  • वाळवा शहरापासून २७ किमीतर सांगलीपासून ५७ किमी अंतरावर
  • वाळवा, शिराळा कराड येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : अशोक पुजारी, मो. ७०८३३०१०६०, यश पुजारी, मो. ८९९९२५९९६१
Back To Home