अनेक अनोख्या प्रथा परंपरा लाभलेले आणि पेशवेकालीन वास्तुचा वारसा सांगणारे आष्टा शहरातील भक्तप्रिय देवस्थान म्हणजे चौंडेश्वरी देवी मंदिर. श्रीरामांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या या शहरात असलेल्या चौंडेश्वरी मंदिरातील भावई उत्सव सुप्रसिद्ध आहे. असे सांगितले जाते की कोणे ऐके काळी येथे नरबळी देण्याची प्रथा होती. सध्या मात्र या मंदिरात श्रीफळही वाढवले जात नाही. शाक्त संप्रदायी भावईची प्रथा मात्र येथे गेल्या काही शतकांपासून नेमाने पाळली जाते. आष्ट्यातील हा भावई उत्सव अत्यंत प्रसिद्ध आहे.
‘मार्कंडेय पुराणा’तील ‘देवी माहात्म्या’च्या ७व्या अध्यायानुसार, शुंभ–निशुंभ या दैत्यांनी इंद्रदेवाकडून त्रैलोक्याचे राज्य जिंकले. तेव्हा देवांनी आदिशक्ती भगवतीस साकडे घातले. ते भगवतीची प्रार्थना करीत असताना पार्वती देवी तेथे आली. तिच्या शरीरकोषातून अंबिका देवी निर्माण झाली. चंड आणि मुंड हे शुंभ–निशुंभाचे सेवक होते. त्यांनी अंबिकेस पाहिले व तिच्या रूपसौंदर्याचे वर्णन शुंभाकडे केले. शुंभाने अंबिकेस आपली पत्नी हो असा निरोप पाठवला. अंबिकेने त्यास धुडकावून लावले. तेव्हा तिला पकडून आणण्यासाठी शुंभ–निशुंभाने चंड आणि मुंड यांना पाठवले. तेव्हा अंबिकेच्या शरीरातून प्रकटलेल्या कालीने चंड–मुंडांचा वध केला. काली देवीने चंड–मुंड यांचा वध केल्यामुळे देवी भगवतीने तिला चामुंडा असे नाव दिले.
चामुंडा, चामुंडेश्वरी याचा अपभ्रंश होऊन येथील देवीस चौंडेश्वरी हे नाव प्राप्त झाले. चौंडेश्वरी या नावाने ओळखली जाणारी अनेक मंदिरे महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यातही आहेत. अशा मंदिरांतील मूर्ती कालिमातेशी, रणचंडीशी नाते सांगणाऱ्या उग्र रुपात असतात. आष्टा येथील मंदिरातील मुळ चतुर्भुज शस्त्रसज्ज मूर्तीही चामुंडेश्वरीशी नाते सांगणारीच आहे. पण, तिचे दिसणे आणि सजावट कोल्हापूरच्या अंबाबाईसारखी केली जाते. आष्ट्याचे हे चांमुडेश्वरीचे मंदिर अंबाबाईचे मंदिर म्हणूनही ओळखले जाते. या चामुंडेने महिषासुराचा वध केल्याचीही पौराणिक कथा आहे. ही महिषासुरमर्दिनी चामुंडा कर्नाटकातील म्हैसूर राजघराण्याची कुलदेवता आहे. येथील चौंडेश्वरी देवी हीसुद्धा मूळची कर्नाटकातील बदामीची असल्याचे सांगण्यात येते. देवीच्या आरतीत ‘आष्टेग्रामी रहिवास, परि तू बदामीस्वामीनी’ असा उल्लेख आहे. तिच्या या मूळ स्थानाच्या स्मृती आजही या मंदिरात बदामीतील शाक्त संप्रदायी भावई उत्सवाच्याद्वारे टिकवून ठेवलेल्या आहेत.
हा भावई उत्सव येथे कसा आला याबाबत एक आख्यायिका सांगितली जाते. कर्नाटक मोहीमेवर असताना वाळव्याच्या थोरात सरकारांना बदामी येथील लुटीत एक पेटी मिळाली. ती उघडली असता त्यातील एक मुखवटा अचानक उडून गेला. मग पेटीत असलेल्या दुसऱ्या मुखवट्यासारखा आणखी एक मुखवटा तयार करण्यात आला. तो तपासून पहात असताना त्या पेटीमध्ये तीन ताम्रपट असल्याचे उघड झाले. त्यावर असलेल्या माहितीवरून भावई खेळाच्या परंपरेबद्दल समजले. आष्टा येथील बारा बलुतेदारांनी येथे भावई उत्सव सुरू करायचे ठरवले. थोरात सरकारांनी त्याला पाठिंबा दिला. तेव्हापासून या भावई उत्सवाची परंपरा आष्टा येथे सुरू झाली, असे सांगितले जाते. भावई उत्सवातील सर्व खेळात तेव्हासारखेच आताही मानकरी असणारे बारा बलुतेदार सहभागी होत असतात.
देवीचे येथील मंदिर हेमाडपंती बांधणीचे आहे. नगारखान्यासह असलेल्या मोठ्या प्रवेशद्वाराला लागून आवारभिंत आहे. त्या महाद्वारातून आत प्रवेश करताना पहारेकऱ्यांसाठी असलेल्या विश्रामदेवड्या दिसतात. मंदिर परिसरात एकाच बाजुला असलेल्या आवारभिंतीतही छोट्या छोट्या कमानदार देवळ्या आहेत. तेथे आता व्यवस्थापन समितीची कार्यालये आणि दुकाने यासाठी व्यवस्था केलेली दिसते. दुसरी बाजू खुली आहे. आत प्रवेश करताच डाव्या हाताला एक काळ्या दगडातील छोटेसे शिखरयुक्त मंदिर दिसते. त्यात गणरायाची काळ्या पाषाणातील वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहे. मूर्तीच्या मागे धातूची सुंदर प्रभावळ आहे. त्यावर कीर्तिमुख कोरलेले आहे. जवळच शंकर मंदिराची घुमटीही आहे. उजव्या बाजुला तुळशी वृंदावन आणि दीपमाळ आहे. दीपमाळेच्या तळाशी चारही बाजूंना कोरीव व्याघ्रशिल्पे आहेत. बहुसंख्य ठिकाणी दीपमाळेच्या तळाशी हत्ती कोरण्याची प्रथा असते. ही दीपमाळ त्यामुळेच वेगळी वाटते.
मंदिराच्या समोर एक छोटा घुमटाकार नंदीमंडप आहे. पूर्वी येथे नंदी आणि एक शिवलिंग होते. सध्या या मंडपात काहीही नाही. उत्सवकाळात पालखीमंडप म्हणून याचा वापर होतो. या मंडपाला टेकून मंदिराच्या दिशेने दोन शेंदूरचर्चित पुरातन मूर्ती आहेत. त्यांच्या शेजारीच काळ्या दगडात घडवलेल्या दोन सिंहमूर्तीही आहेत. नंदीमंडपापासून मुख्य मंदिरापर्यंतचा अवकाश पत्र्यांनी शाकारलेला आहे. येथेच डाव्या हाताला अनेक दगडी अवशेष ठेवलेले दिसतात. त्यात सतीशिळाही आहेत.
मुख्य दगडी मंदिरावर प्राचिनतेच्या अनेक खुणा दिसतात. आत प्रवेश केल्यावर गूढमंडप म्हणजेच बंदिस्त सभामंडप आहे. पुढे अंतराळ आणि गर्भगृह आहे. गर्भगृहावरील शिखराच्या चार कोनांवर लघुशिखरे आहेत. मधल्या दोन टप्प्यांतील अष्टकोनी शिखरावर देवकोष्टके आहेत. त्यात हनुमान, विष्णू, राम आदी देवतांच्या मूर्ती आहेत. वर आमलक आणि शिखर आहे. सभामंडपाच्या दगडी छतावर पायऱ्या–पायऱ्यांची घुमटाकार रचना आहे. त्याच्या बरोबर खाली साठ ते सत्तर वर्षे जुने, भलेमोठे पितळी कासव आहे. सभामंडपात एकही स्तंभ नाही.
मुख्य गर्भगृहाच्या धातूच्या चौपदरी द्वारशाखांवर अत्यंत बारीक नक्षीकाम आहे. मंडारकावर कमलपुष्प आहे. गर्भगृहात देवीची चतुर्भुज मूर्ती व मागे सुंदर प्रभावळ आहे. देवीच्या चार हातांत त्रिशूळ, तलवार, नरमुंड आणि पानपात्र आहे. देवीच्या डाव्या बाजूस गणपतीची धातूमूर्ती आहे. उत्सवकाळात देवीस मुखवटा चढवला जातो. तिची सजावट प्रत्येक उत्सवानुसार वेगवेगळी असते. या मंदिराचा मुख्य उत्सव भावई हा ज्येष्ठ महिन्याच्या दशमीला सुरू होतो तो आषाढ पौर्णिमेपर्यंत चालतो. एकवीस दिवस या देवीची यात्रा सुरू असते. येथील भावई उत्सवाची एक आख्यायिका अशी की या परिसरातील घनदाट जंगलात देवीचे व चंड–मुंड राक्षसांचे युद्ध झाले. त्यात देवीने त्यांचा विनाश केला. याच घटनेला उजाळा म्हणून येथे भावईचा खेळ प्रतिवर्षी खेळला जातो.
या उत्सवात राक्षस पात्रांबरोबर लुटुपुटीची लढाई खेळली जाते. उत्सवाच्या सुरूवातीस मंदिरात रणवाद्ये वाजवली जातात. मग एक मानकरी डोक्यावर दिवा घेऊन राक्षस शोधण्यासाठी गावभर फिरतो. पण त्या दिवशी राक्षस सापडत नाही. दुसऱ्या दिवशी ४० मानकरी राक्षसाला शोधून काढून त्याचा विनाश करण्याची प्रतिज्ञा करतात. त्यास कंकण विधी म्हणतात. नंतर मानकऱ्यांपैकी एकजण राक्षसाचे सोंग घेऊन फिरतो. मायावी रूपे घेऊन फिरणाऱ्या त्या राक्षसाच्या शोधासाठी आळू–माळू, घोडी, पिसे, थळ उठवणे असे वेगवेगळे मार्ग अवलंबले जातात. रात्रीच्या वेळी पाच जण कुमारिकांचा वेष घेऊन, घरोघरी जाऊन राक्षसाला शोधतात. दमामे, गुरव, अटुगडे, हिरगुडे व कोरबी या पाच घराण्यातील मानकरी हा वेष घेतात. घरोघरी जाणाऱ्या या पाच कुमारिकांचे पूजन केले जाते. त्यानंतर लोट आणि लहू हे विधी होतात. अमावास्येच्या दिवशी एकजण राक्षसाचा मुखवटा घालतो. त्याला अरगडी म्हणतात. दोन जण देवतांचे मुखवटे परिधान करतात. मग राक्षसाचा मुखवटा घातलेल्याला पकडून देवीच्या मुखवट्यासमोर आणले जाते. राक्षसाला पकडून आणण्याचा मान येथील सरडे घराण्याकडे आहे.
राक्षसाचा शोध लागल्यानंतर देवी आणि त्याचे युद्ध सुरू होते. शहरातील अंबाबाई मंदिर, गणपती मंदिर, गांधी चौक, मारुती मंदिर आणि आणखी एका ठिकाणी हा खेळ होतो. देवी आणि राक्षसाच्या सीमारेषा ठरलेल्या असतात. रणवाद्यांच्या गजरात आणि हरहरच्या घोषात युद्ध सुरू होते. युद्ध म्हणजे धावे असतात. देवी आणि राक्षसाचे मुखवटे छत्र, चामर, चौरे यासह धावा घेऊ लागतात. जसजसा देवीचा मुखवटा मागे मागे सरकतो तसतसा अरगडी म्हणजे राक्षस पुढे पुढे येतो. राक्षसाला असे खेळवत खेळवत देवी आपल्या हद्दीत आणते आणि मग त्याच्यावर अचानक हल्ला चढवते. यावेळी अरगडी आपल्या हद्दीत पळून जायचा प्रयत्न करतो. देवी पुन्हा त्याचा पाठलाग करते. अशा पाच ठिकाणी पाच धावे होतात. शेवटी मारुती मंदिराजवळ अरगडी म्हणजेच राक्षस शरण येतो. आडवा झोपतो. मग देवीचे मुखवटे हरहर म्हणत त्याला ओलांडतात. दैत्याचा विनाश होतो. यावेळी देवीच्या विजयाचा आनंद साजरा केला जातो. त्याला पाखरे म्हणतात. यानंतर राक्षसाच्या आईचे सोंग घेऊन एकजण विलाप करत फिरतो. ही मिरवणूकच असते. तिला खाटले असे म्हणतात. त्या रात्री राक्षसाची बायको सती जाते, म्हणजे मोठा जाळ केला जातो. दुसऱ्या दिवशी हे सर्व मानकरी साड्या नेसतात व आनंदोत्सव साजरा करतात. एकादशीपर्यंत हे मानकरी बाईचा वेष घेऊन गावात नाचतात. या साऱ्यांसाठी वापरले जाणारे दिवा, कंकणविधी, आळुमुळु, घोडी, पिसे, थळ उठवणे, जोगण्या, लोट, लहू, मुखवटे, पाखरे, बाजले–खाटले, चोर सती, चिटक्या मिटक्या असे काही शब्द या उत्सवाचे वेगळेपण सांगतात. या उत्सवास राज्यभरातून हजारो लोक येतात.
उत्सव संपल्यावर हे सर्व मुखवटे पेटीत बंद करून ठेवले जातात. केवळ उत्सवाच्या वेळीच बाहेर काढले जाणारे हे मुखवटे इतर वेळी पाहायचेही नाहीत अशी येथे प्रथा आहे. बदामीप्रमाणेच येथे पौष महिन्यात साजऱ्या होणाऱ्या उत्सवादरम्यान देवीला ६० भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. देवीच्या खर्चासाठी देवीच्या नावे जमीन करण्यात आली आहे. ती सनद १७६३ मधली असल्याचे सांगतात.