पुणे शहराच्या वायव्य दिशेला असलेल्या सेनापती बापट रस्त्यावरील एका टेकडीवर वसलेले चतुःशृंगी देवीचे मंदिर पुण्याच्या सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. चार शिखरे लाभलेली ही टेकडी ‘चतुःशृंगी’ या सार्थ नावाने ओळखली जाते. अधिकृतपणे वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले हे स्थान निसर्गरम्य आहे. महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या त्रिशक्तीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या मंदिरात पोहोचण्यासाठी भाविकांना साधारणतः १७० हून अधिक पायऱ्या चढाव्या लागतात. शारदीय नवरात्रोत्सवात येथे अत्यंत भव्य स्वरूपाचा उत्सव साजरा केला जातो.
१८८५ च्या ‘बॉम्बे प्रेसिडेन्सी गॅझेटियर’मध्ये या मंदिराचा उल्लेख आढळतो. त्यानुसार चतुःशृंगी देवीचे मंदिर पुण्याच्या वायव्येला सुमारे दोन मैलांवर असलेल्या भांबुर्डा येथील एका डोंगरावर वसलेले आहे. चार शिखरे लाभलेल्या या डोंगराला ‘चतुःशृंगी’ किंवा स्थानिक भाषेत ‘चतरसिंग’ डोंगर म्हटले जाई. पुण्याचे प्रसिद्ध व श्रीमंत व्यापारी दुर्लभशेट पितांबरदास महाजन हे नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी देवीचे निस्सीम भक्त असल्याचा उल्लेख या गॅझेटियरमधील आख्यायिकेमध्ये आढळतो.
ते दरवर्षी नित्यनियमाने देवीच्या दर्शनासाठी वणीला जात असत. तथापि वाढत्या वयामुळे त्यांना दरवर्षी वणीचा खडतर प्रवास करणे कठीण जाऊ लागले. दुर्लभशेट यांच्या निस्सीम भक्तीवर प्रसन्न झालेल्या देवीने त्यांना स्वप्नात दृष्टांत देऊन ‘तुला आता इतक्या लांब येण्याची गरज नाही, मी पुण्यातच या डोंगरावर प्रकट होईन’ असे सांगितले. दृष्टांतात सांगितल्याप्रमाणे दुर्लभशेट यांनी डोंगरावर शोध घेतला असता त्यांना तिथे देवीची स्वयंभू मूर्ती सापडली. त्यानंतर त्यांनी त्याच ठिकाणी देवीचे मंदिर बांधले.
दगड व चुन्याने बनवलेले हे तत्कालीन मंदिर एक छोटेखानी बांधकाम होते. डोंगराच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी दगडी पायऱ्या बांधण्यात आल्या होत्या. या गॅझेटियरमध्ये येथील नवरात्र उत्सवासोबतच जत्रेचे वर्णनही आढळते. आश्विन महिन्यात नऊ दिवस चालणाऱ्या या जत्रेसाठी पुणे शहर व आजूबाजूच्या ग्रामीण भागातून हजारो भाविक दर्शनासाठी येत असत. त्यावेळी डोंगराच्या परिसरात मोठी बाजारपेठ भरत असे आणि विविध धार्मिक विधी पार पाडले जात.
पुणे शहराच्या सांस्कृतिक व धार्मिक इतिहासातील या मंदिराचे महत्त्व अधोरेखित करणारी ही नोंद आहे. दुर्लभशेट महाजन यांच्या निधनानंतर या मंदिराची जबाबदारी दस्तगीर गोसावी नावाच्या साधूकडे व त्यांच्या शिष्याकडे सोपवण्यात आली. त्यानंतर साधारण अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात मंदिराचे व्यवस्थापन अंगल कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आले.
आध्यात्मिक दृष्टीने चतुःशृंगी देवीला ‘अंबरेश्वरी’ या नावानेही ओळखले जाते. महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती या तीनही रूपांचे एकत्रित स्वरूप मानली जाणारी ही देवी सप्तशृंगी देवीचा अंश आहे. स्थानिक लोककथेनुसार चतुःशृंगी देवी पुण्याच्या संरक्षणासाठी टेकडीवर सदैव पहारा देते. या टेकडीच्या परिसरात वेताळ महाराजांचे वास्तव्य लाभले असून ते देवीचे रक्षक म्हणून कार्य करतात अशी भाविकांची श्रद्धा आहे.
सेनापती बापट रस्त्यालगत डोंगराच्या पायथ्याशी मंदिराचे पहिले प्रवेशद्वार आहे. तटबंदीत असलेल्या या प्रवेशद्वारावरील घुमटाकार छतावर आमलक व कळस आहेत. या प्रवेशद्वारातून मोकळ्या प्रांगणात प्रवेश होतो.
वाहनतळ व पूजा साहित्याची दुकाने असलेल्या या प्रांगणातून काही पायऱ्या चढून आल्यानंतर मंदिराच्या महाद्वाराजवळ पोहोचता येते. सुमारे तीस फूट उंच असलेल्या या विशाल महाद्वारात तीन कमानी व त्यावर सज्जा आहे. सज्जावर नगारखाना असून पायरीमार्गावर पाषाणी बांधणीच्या दीपमाळा आहेत. येथून पायऱ्या चढून वर जाताना वाटेत गणेशाचे मंदिर लागते. ‘पार्वतीनंदन गणपती’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रशस्त मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर अष्टविनायकाच्या दगडात कोरलेल्या प्रतिकृती आहेत. येथून पुढे आणखी पायऱ्या चढल्यावर दुर्गादेवी आणि लक्ष्मीचेही मंदिर आहे.
पुढे चतुःशृंगी मंदिराच्या सभामंडपाचे प्रवेशद्वार आहे. चांदीची सजावट लाभलेल्या सहा कमानी या मंदिराला आहेत. प्रवेशद्वारापेक्षा उंचावर असलेल्या सभामंडपात प्रवेश करण्यासाठी पायऱ्या आहेत. सभामंडपाच्या मध्यभागी यज्ञकुंड स्थित असून भिंतीतील देवकोष्टकांत विविध देवीदेवतांच्या मूर्ती आहेत. या सभामंडपात भाविकांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली असून भाविकांना बसण्यासाठी आसने उपलब्ध आहेत.
सभामंडपापेक्षा सुमारे बारा फूट उंचावर असलेल्या गर्भगृहात जाण्यासाठी सुमारे पंधरा पायऱ्या आहेत. गर्भगृहाचे प्रवेशद्वार साधे आहे. गर्भगृहात मध्यभागी मागील भिंतीलगत देवीची केशरी रंगातील तांदळास्वरूपातील स्वयंभू पाषाण मूर्ती आहे. कलाकुसर असलेला मुकुट, नाकात नथ व गळ्यात विविध सुवर्णालंकार धारण केलेले हे देवीचे रूप अत्यंत तेजस्वी दिसते. चांदीच्या वज्रपीठावर विराजमान असलेल्या या मूर्तीच्या दोन्ही बाजूंना सिंहशिल्पे कोरलेली आहेत. देवीच्या मागे चांदीची वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम केलेली प्रभावळ आहे. सूर्य, हंस आणि विविध फुलांची व वेलींची नक्षी या प्रभावळीवर आढळते. प्रभावळीच्या शीर्षस्थानी सिंहाचा चेहरा कोरलेला आहे. गर्भगृहाच्या छतावर चारही कोनांवर व्याघ्रशिल्पे असून मध्यभागी पाच थरांचे गोलाकार शिखर आहे. शिखराच्या प्रत्येक थरात देवकोष्टके व त्यांवर कळस आहेत. शिखराच्या शीर्षभागी आमलक, कळस व ध्वजपताका डोलत आहेत. पुजाऱ्यांच्या माहितीनुसार या मंदिरात सजावटीसाठी पाचशे ते सातशे किलो चांदीचा वापर करण्यात आला आहे. जागृत देवस्थान असलेल्या या देवीवर भाविकांची निस्सीम श्रद्धा आहे.
या मंदिरातील उत्सवांमध्ये नवरात्रीचा सोहळा अत्यंत भव्य असतो. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत सुमारे १५ दिवस चालणाऱ्या या काळात डोंगराच्या पायथ्याशी मोठी जत्रा भरते. विजयादशमीच्या दिवशी देवीची चांदीची मूर्ती एका मोठ्या चांदीच्या रथात बसवून तिची मिरवणूक काढली जाते. या प्रसंगी राज्यभरातून हजारो भाविक देवीच्या दर्शनाला येतात. देवीस साडी-चोळी व सौभाग्य अलंकार अर्पण करून भाविक नवस फेडतात. यावेळी मंदिरात नवचंडी यज्ञाचे आयोजन केले जाते. मंदिरात दुर्गासप्तशती पाठ व ललितासहस्रनाम स्तोत्राचे सामूहिक पठण केले जाते. देवीस कुंकुमार्चन व अभिषेकासारखे विधी पार पाडले जातात. त्रिपुरारी पौर्णिमेला मंदिर परिसरात एक हजार पणत्या लावल्या जातात तेव्हा मिणमिणत्या प्रकाशात मंदिर परिसर न्हाऊन निघतो. याशिवाय वटपौर्णिमा, होळी आणि दिवाळी यांसारख्या सणांच्या वेळीही मंदिरात विशेष धार्मिक विधी आणि रोषणाई केली जाते. सकाळी १० वाजता व रात्री ८ वाजता देवीची आरती होते. सकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत भाविकांना मंदिरात देवीचे दर्शन घेता येते.