चतुर्मुख मंदिर

पठारवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात असलेल्या पठारवाडी गावाजवळ असलेल्या ब्रह्मगिरी पर्वतावरील चतुर्मुख महादेव मंदिर हे जिल्ह्यातील प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर आहे. सृष्टीचे निर्माते भगवान ब्रह्मदेव यांची तपोभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तीर्थक्षेत्राला धार्मिकदृष्ट्या मोठे महत्त्व आहे. ब्रह्मदेवाने शिवाची आराधना करण्यासाठी निवडलेले कऱ्हा आणि चांबळी या नद्यांच्या उगमस्थानाजवळील हे स्थान आज ‘दक्षिण काशी’ म्हणूनही ओळखले जाते.

पुरंदरच्या डोंगररांगांमध्ये वसलेले हे प्राचीन शिवस्थान सह्याद्रीच्या उपरांगांनी वेढलेले आहे. प्राचीन काळापासून विविध ऋषीमुनींच्या वास्तव्याने हे क्षेत्र पावन झाल्याचे मानले जाते. ‘श्री नवनाथ भक्तिसार’ या ग्रंथातील तेविसाव्या आणि चोविसाव्या अध्यायामध्ये या परिसराचा उल्लेख आहे. थोर योगी चांगदेव महाराज यांनी या पठारावर काही काळ वास्तव्य करून तपश्चर्या केली होती. त्यामुळेच हे स्थान सिद्धांचे तपस्थान म्हणून प्रसिद्ध झाले आहे. सृष्टीचे निर्माते भगवान ब्रह्मदेव यांनी या डोंगरावर तपश्चर्या केली म्हणून त्याला ‘ब्रह्मगिरी’ हे नाव पडले. स्थानिक इतिहासात याला ‘सुवर्ण डोंगर’ म्हणजेच सोन्याचा डोंगर असेही म्हटले जाते. पावसाळ्यानंतर या डोंगरावर उगवणारे पिवळसर गवत आणि त्यावर पडणारी सूर्याची किरणे यामुळे हा परिसर सुवर्णासारखा झळाळतो आणि या वैशिष्ट्यामुळेच याला सुवर्ण डोंगर म्हटले जाते. कऱ्हा नदीच्या खोऱ्यातील हा प्रदेश पुरंदर किल्ल्याच्या सान्निध्यात असल्याने त्याला लष्करी आणि सांस्कृतिक इतिहासही लाभलेला आहे.

पौराणिक संदर्भांनुसार, ब्रह्मदेवांनी भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या डोंगरावर तब्बल एक हजार वर्षे खडतर तपश्चर्या केली होती. ब्रह्मदेवांच्या ‘चतुर्मुख’ म्हणजेच चार मुखे असलेल्या स्वरूपामुळेच या डोंगराला आणि मंदिराला चतुर्मुख असे नाव प्राप्त झाले. महाभारतातील एका प्रसंगानुसार, पांडव वनवासात असताना पुरंदर येथील पांडेश्वर या ठिकाणी मुक्कामास होते. तेव्हा त्यांच्या पित्याचा म्हणजेच राजा पंडू यांचा श्राद्ध विधी जवळ आला होता. या कार्यासाठी तसेच तेथे येणाऱ्या ऋषीमुनींच्या भोजनासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता होती. त्या वेळी भगवान श्रीकृष्णाने पांडवांना सांगितले की पश्चिमेकडील ब्रह्मगिरी डोंगरावर ब्रह्मदेव तपश्चर्या करत आहेत आणि त्यांच्या कमंडलूत १०८ पवित्र नद्यांचे तीर्थ साठवलेले आहे. श्रीकृष्णाच्या सूचनेनुसार महाबली भीम या डोंगरावर पोहोचला आणि त्याने ब्रह्मदेवांचा तो अक्षय कमंडलू लवंडला. या घटनेतून पाण्याचे दोन मुख्य प्रवाह निर्माण झाले आणि त्यातील एका प्रवाहाला कमंडलूतून उगम पावल्यामुळे ‘कऱ्हा’ हे नाव मिळाले. दुसरा प्रवाह जो ब्रह्मदेवांच्या चरणांना स्पर्श करून पुढे निघाला, त्याला ‘चरणावती’ किंवा स्थानिक भाषेत ‘चांबळी’ नदी म्हणून ओळख मिळाली. या दोन्ही नद्यांचा पुढे सासवड येथील संगमेश्वर मंदिराजवळ संगम होतो आणि या नद्यांच्या प्रवाहमार्गावर सुमारे ७४ शिवलिंगे असल्याचे सांगितले जाते.

मंदिराचा हा विस्तीर्ण परिसर उंच पठारावर वसलेला आहे. येथून सभोवतालचा निसर्ग आणि सह्याद्रीच्या डोंगररांगांचे विहंगम दृश्य दिसते. सोसाट्याचा वारा आणि ऊन-पावसाचा खेळ अनुभवण्यासाठी पर्यटक या परिसरात मोठ्या संख्येने येतात. मंदिराच्या आवारात पाच नैसर्गिक जलकुंडे आहेत आणि ती भीमाने आपल्या गदेच्या प्रहाराने निर्माण केल्याची लोकश्रद्धा आहे. मंदिराच्या परिसरात दोन विशाल वटवृक्ष आहेत. विशेष म्हणजे त्यांना इतर वडाच्या झाडांप्रमाणे पारंब्या दिसत नाहीत. ब्रह्मदेवाच्या ध्यानधारणेत अडथळा निर्माण झाल्यामुळे या झाडांना त्यांनी दिलेल्या शापामुळे या पारंब्या जमिनीपर्यंत पोहोचत नाहीत, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

मूळ मंदिर हे काळ्या पाषाणातील व प्राचीन आहे. अलीकडेच या वास्तूचा जीर्णोद्धार झाल्यानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. सभोवताली असलेल्या तटबंदीतील महाद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. महाद्वाराजवळ प्रांगणात नंदीमंडप असून त्यात काळ्या पाषाणातील नंदीची एक मोठी मूर्ती स्थित आहे. या नंदीच्या अंगावरील अलंकारांना सोनेरी रंग देण्यात आल्यामुळे तो अधिक आकर्षक भासतो. मंदिराच्या मुख्य पटांगणामध्ये एका उंच चौथऱ्यावर ढोल, डमरू, नाग आणि त्रिशूल यांचा समावेश असलेले एक रेखीव शिल्प आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस दोन उंच दीपमाळा आहेत. त्यांवर सुबक नक्षीकामासोबतच शिवस्तुती कोरलेली आहे.

सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. येथील प्रशस्त सभामंडपामध्ये एक लहान व एक मोठी अशा दोन नंदीमूर्ती आहेत. त्यापुढे गर्भगृहासमोर एक पितळी त्रिशूल व डमरू आहेत. मुख्य मंदिरासमोर हा सभामंडप नंतरच्या काळात बांधल्याचे जाणवते. सभामंडपात पुढे प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह आहे. गर्भगृहाचे बांधकाम मूळ काळ्या दगडांमध्ये आहे. गर्भगृहाच्या बाहेरच्या बाजूने प्राचीन दगडी स्तंभ आहेत. या स्तंभांवर वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर आहे. गर्भगृहात मध्यभागी मुख्य शिवपिंडी असून ती ‘चतुर्मुख’ स्वरूपातील आहे. या पिंडीच्या चारही बाजूंना महादेवाच्या मुखांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. अशा प्रकारची चतुर्मुख पिंडी दुर्मिळ मानली जाते. या गर्भगृहावर गोलाकार व वर निमुळते होत जाणारे चार स्तरीय शिखर आहे. या शिखराला प्रत्येक स्तरावर देवकोष्टके आहेत. शिखराच्या शीर्षभागी आमलक व कळस आहे. मुख्य मंदिराच्या डाव्या बाजूला दत्त मंदिर व प्रांगणात ब्रह्मदेव आणि गणपती यांची स्वतंत्र लहान मंदिरे आहेत.

या मंदिरात वर्षभर विविध धार्मिक सण आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतात. श्रावण महिन्यामध्ये या क्षेत्राला विशेष महत्त्व प्राप्त होते. महिनाभर येथे अभिषेक, पूजन आणि भजन कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. श्रावणी सोमवारी पुणे आणि पुरंदर परिसरातील हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. या वेळी हा संपूर्ण परिसर शिवनामाच्या जयघोषाने दुमदुमून जातो. महाशिवरात्रीला येथे जत्रा असते. या दिवशी मंदिराच्या दीपमाळा प्रज्वलित केल्या जातात आणि रात्रभर शिवस्तुती पठण केली जाते. या जत्रेदरम्यान पांडवकालीन परंपरेचे स्मरण करणारे स्थानिक कलाकारांचे विविध कार्यक्रम पार पडतात. चतुर्मुख मंदिराचे धार्मिक, ऐतिहासिक महत्त्व आणि भाविकांची वाढती संख्या विचारात घेऊन महाराष्ट्र सरकारने या मंदिराला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे.

उपयुक्त माहिती

  • सासवड येथून १६ किमी अंतरावर
  • पुणे येथून २६ किमी अंतरावर
  • सासवड व पुणे येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा नाही
Back To Home