चामुंडेश्वरी देवी

आंदुर्ले, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग

कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले या निसर्गसंपन्न गावामध्ये चामुंडेश्वरी देवीचे भव्य मंदिर आहे. चामुंडेश्वरी हे आदिशक्ती पार्वतीचे एक रूप असल्याचे मानले जाते. ही देवी शक्तीस्वरूप आहे. अत्याचारी राजसत्तेच्या विरोधात लढून लोकांना दास्यमुक्त करणारी अशी ही देवता असल्याची पौराणिक आख्यायिका आहे. आंदुर्ले येथील चामुंडेश्वरी ही येथील पाटील, पाटकर आणि दळवी घराण्याची कुलदेवता आहे. ही देवी भक्तांच्या हाकेला धावून येते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. येथील देवीचे स्थान कडक आणि जागृत आहे. ते सुमारे ६०० वर्षे प्राचीन असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येते.

‘देवीकोशा’नुसार चामुंडादेवी ही करालवदना, खड्ग, पाश, विचित्र खट्‌वाग, नरमुंडमाला धारण करणारी, गजचर्म पांघरणारी, आरक्त नेत्र असणारी आणि शंखनादाने दशदिशा भारून टाकणारी अशी देवता आहे. या देवीने चंड आणि मुंड या दैत्यांचा नाश केला म्हणून तिचे चामुंडा हे नाव रूढ झाले, अशी कथा प्रचलित आहे. ‘भारतीय संस्कृती कोशा’मध्ये या देवीविषयी अशी माहिती आहे की प्राचीन काळी महिषासुराने इंद्राबरोबर सतत १०० वर्षे युद्ध केले व त्याचे इंद्रपद हरण केले. ही गोष्ट समजल्यानंतर ब्रह्मा-विष्णू-महेश यांनी आपल्या मुखतेजामधून एक तेजस्वी देवता निर्माण केली. सर्व देवांनी तिला आयुधे दिली व हिमालयाने सिंहासन दिले. तिने युद्ध करून महिषासुराचा वध केला. तीच चामुंडा देवी होय. ही देवता म्हैसूर राजघराण्याची कुलदेवता आहे. तिला भेरुंडादेवी असेही संबोधले जाते. म्हैसूर येथे एका उंच टेकडीवर चामुंडा देवीचे मंदिर आहे. येथेच महिषासुर या राजाचा एका हातात तलवार व दुसऱ्या हातात नागफणा घेतलेला भव्य पुतळाही आहे.

आंदुर्ले येथील मंदिरात असलेली चामुंडेश्वरी ही खड्‌गधारी असली तरी ती उग्रवदना, नरमुंडधारिणी अशा स्वरूपात नाही. तिचे स्वरूप संरक्षक देवतेचे आहे. येथील मंदिराचा असा इतिहास सांगण्यात येतो की आंदुर्लेनजीकच्या पाट या गावाचे ग्रामाधिपती पाटील व पाटकर कुटुंबीय होते. येथील तसेच पंचक्रोशीत राहणाऱ्या पाटील व पाटकर घराण्यांतील लोकांनी सुमारे ६०० वर्षांपूर्वी येथे चामुंडेश्वरीची प्रतिष्ठापना केली. पुढे कालौघात मंदिरास जीर्णावस्था आली. इ.स. १९२७ मध्ये कृष्णाजी शिवाजी पाटकर व रामचंद्र कृष्णाजी पाटकर यांनी या मंदिरास भेट दिली. त्यावेळी येथील मूर्तीला तडे गेल्याचेही त्यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी मंदिराची पुनर्बांधणी करण्याचे व तेथे नवीन मूर्ती प्रतिष्ठापित करण्याचे ठरवले. त्यानुसार सर्वांनी मिळून येथे नवीन मंदिर बांधले. १५ फेब्रुवारी १९२९ रोजी माघ शुक्ल षष्ठीच्या मुहूर्तावर त्यात देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. या सोहळ्यास सावंतवाडी संस्थानचे तत्कालीन राजे श्रीमंत राजेबहादूर बापूसाहेब सरदेसाई हेही उपस्थित होते. या बाबतची माहिती तेव्हाच्या ‘गर्जना’ नामक वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती. त्या माहितीनुसार, मंदिराच्या गर्भगृहाची उंची बारा फूट होती व त्यावर घुमट होता. मंदिराच्या मंडपाचे मुख्य खांब नऊ फूट उंच व दीड फूट रुंद होते, तर मंदिराचे बारा बाह्य खांब साडेसात फूट उंच व सव्वा फूट रुंद होते. यानंतर ५१ वर्षांनी, १९७८ मध्ये या मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले.

आंदुर्ले येथील या मंदिराचे आवार प्रशस्त आहे. मंदिरासमोरच देवी चामुंडेश्वरी उद्यान आहे. मंदिराच्या बांधणीवर कोकणी स्थापत्यशैलीची काहीशी छाप आहे. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. कोकणी स्थापत्यशैलीमध्ये मंदिराचे छत उतरते व कौलारू असते. या मंदिराचे छत मात्र समतल आहे. मंदिरावर तीन शिखरे आहेत. यातील मुख्य शिखर हे खालच्या बाजूस षटकोनी व त्यावर घुमट आहे. या घुमटावर आमलक आणि कलश आहे. मुख्य शिखराच्या दोन्ही बाजूंना दोन कलशाकार शिखरे आहेत. मुख्य शिखराच्या तुलनेत ती लहान आहेत. मंदिराच्या छोट्या मुखमंडपाच्या छतावरही दोन्ही बाजूंना दोन छोटी शिखरे आहेत.

मंदिरासमोर एका चौथऱ्यावर उंच असा दीपस्तंभ आहे. मंदिराचा सभामंडप आयताकृती, दुमजली व प्रशस्त आहे. अर्धखुल्या पद्धतीच्या या मंडपाच्या बाह्य दोन्ही बाजूंना कक्षासने आहेत. त्यात चौरसाकार स्तंभ आहेत. हे स्तंभ वरच्या बाजूने एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत. कक्षासनांपासून आत काही अंतरावर दोन्ही बाजूंना पाच-पाच गोलाकार उंच स्तंभ आहेत. या स्तंभांच्या वरचा छताचा भाग त्रिकोणाकृती आहे. त्यावर सुंदर नक्षी चितारलेली आहे.

अंतराळाच्या प्रवेशद्वारास नक्षीकाम केलेले सोनेरी स्तंभ आहेत. या चौकटीचा वरचा भाग त्रिकोणाकृती आहे. ललाटबिंबाच्या वरच्या बाजूस, अंतराळाच्या दर्शनी भिंतीवर गजलक्ष्मीची मूर्ती कोरलेली आहे. या दर्शनी भिंतीत प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस खिडक्या आहेत. या खिडक्यांच्या चौकटीही प्रवेशद्वाराच्याच प्रतिकृती आहेत. या प्रवेशद्वाराच्या तीन पायऱ्या चढून प्राग्रीव म्हणजेच लहान आकाराच्या अंतराळात प्रवेश होतो. अंतराळातून गर्भगृहास प्रदक्षिणा मार्ग आहे. यामुळे यास सांधार प्रदक्षिणा मार्ग म्हणजे छत असलेला प्रदक्षिणा मार्ग असे म्हणतात.

समोरच गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. लाकडी कोरीवकाम केलेली चौकट आणि त्या भोवती सोनेरी रंग दिलेले स्तंभ असे या प्रवेशद्वाराचे स्वरूप आहे. तेथील स्तंभांच्या खालच्या दोन्ही बाजूंना छोट्या चौथऱ्यावर सोनेरी रंग दिलेल्या सिंहमूर्ती आहेत. आत पाषाणाच्या चौकोनी शाळुंकेसारख्या वज्रपीठावर चामुंडेश्वरी देवीची मूर्ती विराजमान आहे. बसलेल्या अवस्थेतील, एक पाय दुमडलेला, दुसरा गुडघा दुमडून वर घेतलेला, उजव्या हातात खड्ग, डाव्या हातात ढाल, मस्तकी मुकुट, नाकात नथ, गळ्यात लहान लहान नरमुंडे असलेली माला अशा स्वरूपात येथे चामुंडेश्वरी आहे. मूर्तीच्या पाठटेकणीच्या भागावर नक्षीदार स्वरूपातील सिंहमूर्ती कोरलेल्या आहेत. ही देवीची मूर्ती १९२९ मध्ये कुणकावळे येथील बाळा बाबू कुणकावळेकर (मिस्त्री) यांनी साकारली होती. मूर्तीसाठी कुणकावळे येथे आढळणारा कोळथर पाषाण वापरण्यात आला आहे. मंदिराच्या आवारात गणेशाचे, तसेच पाटील-पाटकर वंशाच्या कुलपुरुषाचेही मंदिर आहे.

येथे मंदिराचा वर्धापन दिन, अश्विन नवरात्र आणि विजयादशमी हे उत्सव अत्यंत धामधुमीत व भक्तिपूर्ण वातावरणात साजरे केले जातात. मंदिरात १९२९ मध्ये सद्यमूर्तीची स्थापना करण्यात आली होती. त्याच्या स्मृत्यर्थ दरवर्षी माघ शुक्ल पंचमी व षष्ठी या दोन दिवशी वर्धापन दिन उत्सव साजरा केला जातो. त्या दिवशी येथे होम-हवन तसेच नवचंडी यज्ञाचे आयोजन केले जाते. या उत्सवाच्या निमित्ताने येथे हजारो भाविकांची गर्दी होते.

उपयुक्त माहिती

  • कुडाळपासून १५ किमी, तर ओरोसपासून ३१ किमी अंतरावर
  • कुडाळपासून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Back To Home