चक्रेश्वर महादेव मंदिर

चक्रेश्वर वाडी, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर

भारत ही योगभूमी आहे. साधना, संन्यास, तंत्र, मंत्र, जप, तप, क्रिया, उपासना आणि जीवनशैली ही योगाची विविध अंगे आहेत. शरीरात असलेली सात मूलाधार चक्रे जागृत करणे हे योगाचे मुळ उद्दिष्ट. योग साधनेच्या उद्देशाने देशात काही स्थानांचा विकास झाला. आजच्या घडीला प्रचलित असलेली त्या स्थानांची नावे ते दर्शवून देतात. असेच एक स्थान म्हणजे राधानगरी तालुक्यातील हिरण्यकेशी नदीच्या तीरावर वसलेले चक्रेश्वर वाडी. येथील सुमारे ५०० वर्षांहून अधिक प्राचीन चक्रेश्वर महादेव मंदिर, गुहा आणि येथील पाषाणांवर कोरलेल्या चक्र आकाराच्या नक्षी या स्थानाचे नाव सिद्ध करतात.

असे सांगितले जाते की चक्रेश्वर महादेवाचे येथील स्थान आठव्या ते नवव्या शतकातील आहे. पंधराव्या शतकात या मंदिरास देणगी देण्यात आल्याचा उल्लेख येथील शिलालेखात सापडतो. येथील तपसा गुहेत सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचे शिवलिंग आहे. या मंदिराची आख्यायिका अशी की एकदा आई व मुलाच्या हातून नकळत घडलेल्या पापाचे क्षालन होण्यासाठी एका सिद्ध पुरुषाने त्यांना बिबव्याच्या चिकाने रंगवलेले श्वेतवस्र देऊन ते विविध तीर्थांमध्ये धुवून घ्यायला सांगितले. ते वस्र घेऊन माय-लेक देशाटन करता करता चक्रेश्वर वाडी येथे आले. येथील मंदिरासमोर असलेल्या हिरण्यकेशी नदीच्या पाण्यात ते वस्र धुवून घेताच ते पांढरे शुभ्र झाले. त्यामूळे या ठिकाणाला पापक्षालक म्हटले जाते.

हेमाडपंती स्थापत्य शैलीतील बांधकाम असलेल्या मंदिरासमोर दोन थरांचा चौथरा व त्यावर मोठी षटकोनी दीपमाळ आहे. चौथऱ्याच्या पहिल्या थरावर चारही कोनांत गजराज शिल्पे आहेत. दुसऱ्या थरावर चारही कोनांत व्यालशिल्पे आहेत. दीपमाळेत दीप प्रज्वलन करण्यासाठीं स्वतंत्र हस्त आहेत. येथून काही पायऱ्या उतरून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात डाव्या बाजूला असलेल्या लहान मंदिरातील वज्रपिठावर महाकाली, महालक्ष्मी, सरस्वती, विरभद्र यांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती व वीरगळ आहेत. मंदिराच्या बाजूला पाण्याचे कुंड आहे. कुंडाच्या भिंती घडीव दगडात बांधलेल्या आहेत व आत उतरण्यासाठी त्याला पायऱ्या आहेत.

दर्शनमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपात प्रत्येकी पाच नक्षीदार दगडी स्तंभांच्या चार रांगा आहेत. स्तंभात चौकोन, षट्कोन, अष्टकोन व वर्तुळाकृती अशा विविध भौमितिक आकृत्या साकारलेल्या आहेत. स्तंभांच्या शीर्षभागी वर्तुळाकार कणी व त्यावर हस्त आहेत. हस्तांवर तुळया व त्यावर छत आहे. बंदिस्त स्वरूपाच्या (गूढमंडप) सभामंडपात भिंतीलगत भाविकांना बसण्यासाठी प्रदक्षिणा मार्ग सोडून कक्षासने आहेत. बाह्य भागाकडील स्तंभ या कक्षासनांत आहेत. सभामंडपात मध्यभागी डाव्या व उजव्या बाजूला द्वार आहेत. सभामंडपातील जमीन दगडी फरशी आच्छादित आहे व मध्यभागी चार स्तंभांच्यामध्ये वज्रपिठावर गणपतीची काळ्या पाषाणातील चतुर्भुज मूर्ती आहे. गणपतीच्या मागील दोन्ही हातात त्रिशूल, खालील एक हात गुडघ्यावर व दुसऱ्या हातात मोदक आहे. कासे पितांबर असलेल्या गणपतीच्या डोक्यावर मुकुट, हातात कडे, गळ्यात कंठा व कमरेस नाग पाश आहे. गणपतीच्या मागील बाजूस गर्भगृहातील शिवलिंगाकडे मुख असलेल्या व वेगवेगळ्या आकाराच्या नंदीच्या तीन मूर्ती आहेत.

पुढे अंतराळाचे पाच नक्षीदार द्वारशाखा असलेले प्रवेशद्वार आहे. त्याच्या ललाटबिंबावर गणपती विराजमान आहे. अंतराळात भिंतीलगत अष्टभुजा तुळजा भवानी देवीची काळ्या पाषाणातील सायुध व सालंकृत मूर्ती आहे. डाव्या बाजुला चतुर्भुज नृसिंह मूर्ती व उजव्या बाजूला दोन पितळी मुखवटे आहेत. पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. गर्भगृहाच्या द्वारशाखा नक्षीदार असून ललाटबिंबावर गणपती आहे. गर्भगृहात मध्यभागी प्राचीन शिवपिंडी, बाजूला शंकर व पार्वती देवीचे पितळी मुखवटे आहेत. सभागृहाच्या छतावर कठडा व गर्भगृहावर १२ थरांचे चौकोनी शिखर आहे. वरच्या थरात कमळ फुलाची प्रतिकृती व त्यावरील आमलकावर चंद्रकोर आहे.

मंदिराच्या प्रांगणात एका चौथऱ्यावर विविध आकारातील शिवलिंग व वीरगळ आहेत. येथेच पुरातत्त्वीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा अवशेष म्हणजे शिलालेख आहे. त्यावर ‘विक्रम संवत १४२९’ (इ. स. १४९९) अशी अक्षरे स्पष्ट दिसतात. यावरून येथील मंदिर त्या आधीपासूनचे असल्याचे स्पष्ट होते. प्रांगणात घोडेमुख, ज्योतिबा व इतर देवतांची लहान मंदिरे आहेत. मंदिरात महाशिवरात्री हा मूख्य वार्षिक उत्सव साजरा केला जातो. या दिवशी राज्यभरातून अनेक भाविक चक्रेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी येतात. या दिवशी लघुरूद्र, महाअभिषेक, पालखी सोहळा, भजन, कीर्तन, प्रवचन, जागरण आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. श्रावणी सोमवार, प्रदोष व अमावस्या या दिवशीही येथे भाविकांची गर्दी असते.

येथून जवळच तपसा गुहा आहेत. गुहांचे प्राचीन नाव तपस्थान असल्याचे सांगितले जाते. गुहांच्या भिंतीवर मूर्ती कोरलेल्या आहेत. या गुहांमध्ये सध्या पाणी भरलेले आहे. असे सांगितले जाते की या गुहांमधून चक्रेश्वर मंदिरापर्यंत भुयारी मार्ग आहे.

मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या टेकडीवर योनीमुख व चक्रनक्षी कोरलेले अनेक पाषाण सापडतात. तसेच टेकडीच्या माथ्यावर पाषाणांच्या विशिष्ट रचनेतून महाचक्र साकारले आहे. यामुळेच या गावाला चक्रेश्वर वाडी हे नाव पडले असल्याचे सांगितले जाते. या टेकडीवर मृत ज्वालामुखी तसेच अश्मयुगीन दफनभूमी असल्याचेही सांगितले जाते.

उपयुक्त माहिती

  • राधानगरीपासून १५ किमी, तर कोल्हापूरपासून ४२ किमी अंतरावर
  • राधानगरी येथून चक्रेश्वर वाडीसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : नारायण भांदिगरे, अध्यक्ष, मो. ७०२०६२७२२८,
  • अमर नरके, सचिव, मो. ७३८७३१८२८४
Back To Home